स्वप्निल घंगाळे, गायत्री हसबनीस

सर्वत्र निवडणुकांचे लढवय्ये म्हणून एखाद्या राजकीय पक्षाशी नाळ जोडलेले तरुण होतकरू  नेते जितके राजकीय मंचावर सक्रिय आहेत तितकेच ते एक जाणकार फॅशन करणारे म्हणून देखील नावारूपाला आले आहेत. निवडणुकांच्या निमित्ताने या तरुण नेत्यांच्या फॅशनची आणि बदलत जाणाऱ्या स्टाईल स्टेटमेंटची एक झलक..

निवडणुकांच्या तोंडावर राजकीय घडामोडींना सगळीकडे एकच वेग आला आहे. सध्याच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार, निवडणुकांची तयारी, नेतृत्व, दौरे यांमधून वावरणाऱ्या लोकप्रिय तरुण नेत्यांची हलकीफुलकी सहज फॅशन, त्यांचा स्वतंत्र पेहराव, त्यातील वेगळी निवड, रंगाची चॉईस इत्यादी गोष्टीही तरुण पिढीला आकर्षित करत आहेत. राजकारणी म्हटलं की डोळ्यासमोर कायम पांढरा शुभ्र कुर्ता आणि पॅन्ट, डोक्यावर टोपी या पेहरावातलेच नेते येतात. किंबहुना, ते तसाच पेहराव करतात, असं वर्षांनुवर्ष आपण पाहिलेलं असतं. परंतु आपल्या आणि मागच्या पिढीत विचार, राहणीमान, आवडनिवड, व्यक्तिमत्त्व, मतं यामध्ये एवढा फरक आहे की त्यात राजकीय तरुण पिढीचे प्रतिनिधी असणारे नेते आणि त्यांची फॅशनही कशी मागे पडेल. फॅशन ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने के ली जाते आणि ती तशीच लोकांना आणि विशेष करून तरुणांना भावते. खादी, कॉटन कपडय़ांची फॅशनही आजही कूल वाटते आणि भाषणे, सभा इत्यादी ठिकाणीसुद्धा तरुण नेते तशी साधी सोपी फॅ शन अवलंबवताना दिसतात. तरुण महिला राजकीय नेत्यांचाही या सहज सोप्या पद्धतीने भावणाऱ्या फॅशनकडेच ओढा असल्याचेही सहज जाणवून येते.

मॉडर्न विचार, राहणीमान याचा अवलंब करत अस्सल राजकारणातही अव्वल राहण्याचं समीकरणदेखील तितक्याच ताकदीने तरुण नेत्यांना जमलं आहे. यामध्ये अनेक लोकप्रिय तरुण नेत्यांची नावं समाविष्ट आहेत. खरं तर कुठल्याही प्रकारचा तोचतोचपणा टाळून सदाबहार आणि युनिक फॅशनकरण्यावरही या नव्या राजकारणी पिढीचा भर आहे. सध्या सोशल मीडियावरून नामवंत राजकारण्यांचे फोटो आपण पाहतच असतो त्यात असे अनेक तरुण राजकारणी एका विशिष्ट पेहरावात आपल्याला दिसतात. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे सर्वात तरुण नेते. नाइट लाइफ असो किंवा आरे.. सर्वच प्रश्नांमधून तरुणांच्या विचारसरणीप्रमाणे विचार करणारा चेहरा म्हणून आदित्य प्रसिद्ध आहेत. हीच इमेज जपण्यासाठी ते अनेकदा कॅज्युअल लुकमध्ये दिसतात. अर्थात प्रचारसभांमध्ये सफेद कपडय़ांमध्ये दिसणारे आदित्य अनेकदा हा ड्रेसकोड टाळतानाही दिसतात. अगदी डिनर डेट वगैरेला कॅज्युअलमध्ये दिसणारे आदित्य तरुण नेत्याला शोभणारी इमेज कॅरी करतात. रोहित पवार यांची ओळख म्हणजे सध्या आघाडीचा ग्रामीण भागातील तरुण चेहरा. कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढवणारे रोहित पवार हे तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये कम्फर्टेबल कपडे आपल्याला आवडतात, असं सांगितलं. प्रचारादरम्यान फिरताना ठरावीक घडय़ाळंदेखील ते घालतात. त्यांना घडय़ाळांचा शौक आहे. त्यांच्याकडे तब्बल २२ घडय़ाळं आहेत. त्यामुळे आपल्या कपडय़ांच्या आवडीबरोबरच आपली स्वत:ची एक वेगळी स्टाईल स्टेटमेंटसुद्धा त्यांनी विकसित केली आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. संदीप देशपांडे हे निवडणुकीशिवायही अनेकदा सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून समोर येतात. मनसेचे उमेदवार असणारे संदीप देशपांडे हे तरुण ब्रिगेडपैकी एक आहेत. ते अनेकदा कॅज्युअल लुकमध्ये प्रचार करताना दिसतात. त्याचप्रमाणे मनसेचे उमेदवार असणारे अविनाश जाधव हे त्यांच्या पोस्टरवर मोदी जॅकेटमध्ये दिसतात हे विशेष. निलेश राणेही अनेकदा कॅज्युअल ड्रेसमध्येच वावरतात.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणीदेखील आपल्या सहजसुंदर पेहरावाने उठून दिसतात. विविध रंगांच्या छटा असणाऱ्या कॉटनच्या साडय़ा, त्यावर मंगळसूत्र, साधी केशरचना आणि हातात घडय़ाळ, कपाळावर टिकली; इतकी सहज आणि टापटीप अशी त्यांची फॅ शन असते. फॅ शनचा उत्तम सेन्स म्हणून प्रियंका गांधी यांचेही कौतुक केले जाते. कॅज्युअल पंजाबी ड्रेस, खादीच्या डिझायनर साडय़ा, जीन्स आणि टी-शर्ट अशा अनेकविध प्रकारची फॅ शन हुशारीने आणि प्रसंगानुरूप अनुसरताना त्या दिसतात. मुळात कपडय़ांची रचना कशी ठेवायची याची त्यांना उत्तम जाण आहे त्यामुळे फॉर्मल लुकमध्येही त्या मॉडर्न आणि फ्रेश दिसतात. हल्ली साडय़ांच्या बाबतीत एक वेगळं स्टाईल स्टेटमेंट ठेवण्याची आयडिया कूल वाटते. प्रियंका चतुर्वेदी, प्रियंका गांधी, डिप्पल यादव यांची नावे यात प्रामुख्याने घेता येतील. साडी आणि फुल हॅण्डचा ब्लाऊ ज असा फंडाही रुजतो आहे, किंबहुना गडद रंगाची आवडही या महिला नेत्यांमध्ये बऱ्यापैकी दिसून येते. पूनम महाजन यांची फॅशनही अगदी योग्य आणि अचूक आहे. प्रत्येक ओकेजनला जाताना योग्य रंगसंगतीसोबत अचूक साडीची निवड किंवा ड्रेसची निवड त्या करतात. त्यांच्यावर फिकट रंग खूप छान दिसतात. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक गोड वाटते. ऋतुराज पाटील हे काँग्रेसमध्ये सध्या सक्रिय असलेले नेते व शिक्षण सम्राट डी. वाय. पाटील यांचे नातू अशी त्यांची ओळख आहे. २९ वर्षांच्या ऋतुराज यांच्या फॅ शनमध्येही फॅ शन अ‍ॅक्सेसरीजवर जास्त भर आहे. रोहित पवारप्रमाणे त्यांनाही स्मार्ट वॉचेस वापरण्याची हौस आहे. संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी) हेसुद्धा बऱ्याचदा शर्ट, कुर्ता, जॅकेट, ब्लेझरमध्ये दिसतात.

खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्या श्रीवर्धन, रायगडमधून निवडणूक लढवत आहेत. चारचौघांप्रमाणेच आणि अगदी सोज्वळ असा त्यांचा पेहराव असतो. शिवेंद्रसिंहराजे भोसले जे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत व ज्यांनी नुकताच एनसीपीमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे ते विविध प्रकारच्या शेड्सचे जॅकेट्स वापरतात. बऱ्याच वेळा ते ब्राइट रंगाचे कुर्ते परिधान करतात. मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला असून खूप सुंदर व उत्तमोत्तम डिझायनर साडय़ा त्या वापरतात. ‘बिग बॉस’ मालिकेतील प्रसिद्ध चेहरा असलेले एजाझ खान एक स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत आणि त्यांच्याप्रमाणेच बिग बॉस मराठीच्या घरात राहून आलेले अभिजीत बिचुकले हेदेखील तितक्याच विविध स्टाईलने फॅशन करताना दिसतात. धनंजय मुंडेदेखील बऱ्यापैकी सफेद कपडय़ांना पसंती देतात. तर अभिनेता रितेश देशमुख यांचे बंधू अमित देशमुख हेदेखील तितक्याच ताकदीने राजकीय मंचावर वेगळी

फॅशनअवलंबवताना दिसतात. प्रत्येकाची फॅशन ही वेगळी आहे. त्यांच्या फॅशननुसार त्यांचे व्यक्तिमत्त्वही खुलून येते. एका साच्यातील फॅशनयांच्यापैकी कोणीही करत नाही, यासाठी या तरुण नेत्यांचे कौतुक वाटते. कारण स्वत:ला लोकांसमोर प्रेझेंट करताना मुळातला आत्मविश्वास त्यांच्या वावरण्यातून तर दिसतोच, पण कपडय़ांची योग्य निवड आणि सहजसोप्या पद्धतीने केलेला फॅशनचा वापर त्यांच्या चाहत्यांनाही भावतो. आतापर्यंत केवळ चित्रपटांमधूनच येणारी फॅशन राजकारणाच्या मंचावरूनही प्रभावीपणे लोकांपर्यंत खासकरून तरुणाईपर्यंत पोहोचते आहे हे विशेष!

viva@expressindia.com