वेदवती चिपळूणकर

बी. एस्सी. अ‍ॅग्रिकल्चर, रूरल मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करून घरचा व्यवसाय सांभाळणाऱ्या प्राजक्तला नाटकाची आवडही खुणावत होती. एकाचवेळी नाटक आणि व्यवसाय अशा दोन्ही धुरा समर्थपणे पेलत त्याने ‘संगीत देवबाभळी’सारखी अभूतपूर्व कलाकृती घडवली.

संगीत देवबाभळी’ या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पाऊ ल ठेवणारा आणि आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात आणि थोरामोठय़ांच्या कौतुकाच्या वर्षांवात सुरुवात करणारा, चौकटीबाहेरचा विचार करणारा दिग्दर्शक म्हणजे प्राजक्त देशमुख! बी.एस्सी. अ‍ॅग्रिकल्चर, रूरल मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करून घरचा व्यवसाय सांभाळणाऱ्या प्राजक्तला नाटकाची आवडही खुणावत होती. एकाचवेळी नाटक आणि व्यवसाय अशा दोन्ही धुरा समर्थपणे पेलत त्याने ‘संगीत देवबाभळी’सारखी अभूतपूर्व कलाकृती घडवली. एकांकिकांपासून सुरू झालेला हा प्रवास आता ‘मुक्ती’पर्यंत येऊ न पोहोचला आहे. अशाश्वत मानल्या जाणाऱ्या या कलेच्या क्षेत्रात आपल्या मेहनतीने स्वत:ची अनवट वाट निर्माण करणाऱ्या प्राजक्तने नाटय़रसिकांवर जणू मोहिनी घातली आहे.

रंगभूमीबद्दलचं प्रेम आणि नाटय़क्षेत्रात येण्याची प्रेरणा यांच्याबद्दल बोलताना प्राजक्त म्हणाला, लहानपणी मी अनेकांच्या हुबेहूब नकला करायचो असं आई म्हणते. नंतर शाळेच्या दप्तराचं ओझं वाढत गेलं तसं हे सगळं कमी झालं. पण माझा बालमित्र श्रीपाद देशपांडे नाटकात कामं करू लागला तेव्हा मी त्याच्यासोबत सहज म्हणून जायचो. मी नुसताच येतो तर निदान माझा काही उपयोग होईल या हेतूने दिग्दर्शक सरांनी मला नाटकातल्या एका प्रेतावर रडायला बसवलं. तिलाच माझी पहिली भूमिका म्हणता येईल. खरं सांगायचं तर नेमकं कशाने प्रेरित झालो आठवत नाही. पण अचानक वास्तवाचा दिवा बंद करून एक वेगळीच व्यक्तिरेखा जगतोय असं जाणवलं. त्यातून नवीन शक्यता निर्माण झाल्यासारखं मला वाटायला लागलं. नंतरच्या काळात माझं शांत होत जाणं, वाचन आणि एकांत हे सगळं वाढलं. मात्र व्यावसायिक क्षेत्रात माझं पाऊ ल पडलं ते सर्वस्वी प्रसाद दादा (कांबळी) यांच्यामुळे! रंगभूमीवर पहिलं पाऊ ल पडलं ती प्रेरणा श्रीपाद आणि व्यावसायिक क्षेत्रात भविष्य घडवायचंय ही प्रेरणा प्रसाद दादा यांच्याकडून मला मिळाली.

अनिश्चित मानल्या जाणाऱ्या या क्षेत्रात भविष्य घडवण्याचा निर्णय घेताना घरच्यांचा पाठिंबा हा खूप मोठा आधारस्तंभ असतो. याबद्दल बोलताना प्राजक्त म्हणाला, माझ्या बाबांनी देशमुख सोलर एनर्जी प्रा. लि. हा स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. सोलर पॅनेल मॅन्युफॅक्चारिंग आणि शेतीत लागणाऱ्या सिंचन प्रणालीसंबंधी हा व्यवसाय आहे. त्यांनी खूप कष्टाने या व्यवसायाचं साम्राज्य उभं केलंय आणि माझ्या मोठय़ा भावाने, प्रतीकने ते यशस्वीपणे अजून विस्तृत केलं आहे. तेच शिक्षण मीही घेतलंय आणि याच व्यवसायात आहे. आताही मी पूर्णवेळ रंगभूमीवर आहे, असं म्हणता येणार नाही. मला दोन्हीकडे लक्ष ठेवूनच पुढे जायचं आहे. मात्र नाटक करायचं ठरवलं तेव्हा तालमींच्या वेळाची सांगड घालणं महत्त्वाचं होतं. कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झालं नसतं. त्यांचा पाठिंबा नसता तर हा प्रवास एकांकिकांपुरताच संपला असता. जेव्हा नाटक करायचं ठरलं तेव्हा मी खूप निश्चितपणे पुढे काय होईल, कसं बाहेर जावं लागेल वगैरे गोष्टींची कल्पना मी घरी दिली होती. त्यावर हरकत नाही हे शब्द ऐकल्यावर माझं जे ओझं हलकं झालं तो आनंद कमाल होता. अचानक पाठीवरच्या शंखाचे पंख व्हावेत इतका मी सुखावलो होतो. टीव्ही, पेपर वगैरे सगळ्यामुळे त्यांनाही माझ्या कौतुकाचं अप्रूप होतं. नुकताच एका सोहळ्यात ‘देवबाभळी’साठी माझ्यापेक्षा माझ्या आईबाबांचाच मोठा सत्कार झाला. तो आनंद काय वर्णावा! अशा क्षणांवर आपले अनेक तास ओवाळून टाकावेत.

संगीत देवबाभळी’बद्दल बोलताना भावनिक होत तो बोलत होता, ‘देवबाभळी’ हे माझं पहिलंच व्यावसायिक नाटक. त्याआधी पंधरा र्वष समांतर रंगभूमीवर अनेक प्रयोग केले, कामं केली. मात्र ‘देवबाभळी’च्या वेळच्या भावनाच वेगळ्या होत्या. सगळ्या गोष्टी इतक्या पटापट घडत होत्या की मला काय वाटतंय, कसं वाटतंय यासाठी माझ्याकडे वेळच नव्हता. प्रयोगाची वेळ जवळ येत चालली होती. सेट, म्युझिक आणि इतर गोष्टींसाठी सतत फिरतीवर होतो. शिवाजीला रंगीत तालमी सुरू झाल्या. शुभारंभाच्या प्रयोगाला मुळ्ये मामांचा आशीर्वाद घेतला. त्यांना माझी धाकधूक जाणवली असावी. त्यांनी मला जवळ घेतलं आणि मी ‘हे सत्य की भास’ अशा या प्रसंगात मी खूप रडलो.

देवकीताई पंडित यांच्यासोबत तो सध्या करत असलेल्या ‘मुक्ती’च्या घडणीचा अनुभव सांगताना प्राजक्त म्हणाला, ‘देवकी पंडितांनी सात विविध भाषिक संत कवयित्रींवर अभ्यास करून काही गाणी बांधली होती. त्याला वेगळ्या पद्धतीने साजरं करायचं होतं आणि हे त्या अनेक र्वष अनेकांशी बोलत होत्या. एकदा जेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी मला त्यांची ही कल्पना ऐकवली आणि थोडा वेळ घेऊ न मी ते प्रत्यक्षात आणण्याच्या माझ्या कल्पना त्यांच्यासमोर मांडल्या. त्यांना माझी कल्पना आवडली आणि ‘मुक्ती’ आकाराला आली. मी ते लिहिलं. पण असं काही करणं हे माझ्यासाठी नवीन होतं. हा कार्यक्रम हिंदीत आहे, त्याचे प्रयोग ठिकठिकाणी सुरू आहेत आणि त्यांना प्रतिसादही चांगला आहे. गाणं आणि नाटय़ यांच्यातला हा प्रयोगशील मेळ अनेकांना आवडतोय.’

व्यवसाय करता करताच आपली नाटकाची आवड सांभाळणं आणि व्यावसायिक क्षेत्रात पाऊ ल ठेवण्याचं धाडस करणं ही तारेवरची कसरतच होती. स्वत:च्या या भूतकाळातल्या निर्णयाबद्दल वर्तमानात बोलताना प्राजक्त समाधानाने म्हणाला, ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता!’ हा तुकोबा माहिती होता, पण प्रचीतीतून आणखी कळला. मला वाटतं आठवणीत रमण्यापेक्षा त्या घडवण्यात व्यस्त राहायला हवं. हा निर्णय तसाच होता. आज मागे वळून पाहताना असं लक्षात येतंय की कधी कधी मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी निर्णायक ठरतात. हेतू केवळ आनंद देण्याघेण्याचा असेल तर यश साहजिक मिळतंच.

निर्णायक क्षणी संभ्रमित न होता पाऊ ल पुढे टाकलं की ते पाऊ ल तिथे घट्ट रोवून उभं राहायची शक्ती आपोआप मिळते. पुढची वाटचाल खडतर असली तरी आत्मविश्वास आणि निर्धार यांच्या बळावर ती अशक्यही नसते. हा विश्वास स्वत:लाच स्वत:मध्ये निर्माण करावा लागतो. अनिश्चिततेची टांगती तलवार घेऊ न वावरणाऱ्या अनेक कलाप्रेमींना प्रेरणास्रोत ठरेल असा हा प्राजक्त देशमुख!