राधिका कुंटे

आदित्य कुलकर्णीच्या करिअरची माहिती वाचताना कळलं की त्याने भाषाशास्त्रात एम. फिल. केलं आहे. विषय होता संयुक्त क्रियापदाविषयी संशोधन. सध्या तो हंगामी साहाय्यक प्राध्यापक म्हणून शिकवतो आहे. हे सगळं बी.एस्सी. फिजिक्सच्या पार्श्वभूमीवर कसं घडलं ते जाणून घेऊ या.

‘द महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा’मध्ये भाषाशास्त्र विभागात आदित्य कुलकर्णी हंगामी साहाय्यक प्राध्यापक म्हणून गेले पाच महिने कार्यरत आहे. आपल्याकडे फार कमी विद्यापीठांमध्ये बी.ए.लाही भाषाशास्त्र हा विषय घेता येऊ  शकतो, त्यापैकी या विद्यापीठाच्या भाषाशास्त्र विभागात ही सोय आहे. त्याआधी त्याने ‘प्रॉडक्टिव्ह प्लेहाऊ स’मध्ये ‘लिंग्विस्टिक्स प्रोजेक्ट मॅनेजर’ म्हणून काम केलं. तिथे तो एका ‘टेक जायंट’ कंपनीला मराठी भाषाविषयक तज्ज्ञ पुरवणाऱ्या टीमचा प्रमुख होता. त्यानंतर एम.फिल. होण्याआधी नेटची परीक्षा त्याने दिली आणि त्याहीआधी फग्र्युसन महाविद्यालयात बी.एस्सी. फिजिक्सची पदवी त्याने घेतली. ‘इफेक्टस् ऑफ ऑईल्स ऑन मसल्स अ‍ॅण्ड सिल्क फायबर’ हा त्याच्या प्रबंधाचा विषय होता. डॉ. सुनील कुलकर्णी आणि डॉ. सुहास आसगेकर हे त्याचे मार्गदर्शक होते.

विज्ञानाकडून भाषाशास्त्राकडे वळणं ही आदित्यच्या करिअरमधली विलक्षण योगायोगाची गोष्ट आहे. बी.एस्सी.चा अभ्यास करताना त्याला काही विषय आवडत होते, काही नावडते होते. त्यामुळे आवडत्या भाषेच्या अभ्यासाचा विचार त्याच्या मनात येऊ  लागला. संस्कृतची गोडी होतीच. मग त्याविषयी चौकशीला सुरुवात केली. आर्किऑलॉजी आणि अँथ्रोपोलॉजीचे पर्यायही तो चाचपडत होता. डेक्कनमधल्या आर्किऑलॉजी विभागातल्या एका वरिष्ठ प्राध्यापकांनी चौकशीअंती करिअरची फारशी संधी नाही वगैरे गोष्टी सांगितल्या. आदित्य बावचळून गेला. तिथून संस्कृत विभागात गेला. तिथल्या प्राध्यापकांसोबतच्या चर्चेत फारसा आशेचा किरण दिसला नाही. मग त्याने शेजारच्या भाषाशास्त्राच्या विभागातही चौकशी करायची ठरवली. विभागप्रमुख प्रा. सोनल कुलकर्णी-जोशी यांच्याशी त्याचा संवाद झाला. नंतरही आणखी काही जणांशी बोलून त्याने अधिक माहिती घेतली. तरीही खात्री वाटत नसल्याने संस्कृत आणि भाषाशास्त्राच्या प्रवेशपरीक्षा दिल्या. त्यानंतर मिळालेल्या सल्लय़ानुसार त्याने ‘डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट रिसर्च अ‍ॅण्ड इन्स्टिटय़ूट’मध्ये ‘एम. ए. इन लिंग्विस्टिक्स’ या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. हा करिअरबदल करताना त्याच्याविषयी घरच्यांना काळजी वाटत होती. त्याचा अभ्यासविषयक कल काय आहे याचा अंदाज आल्याने घरच्यांनी कायम त्याला भक्कम पाठिंबा दिला आणि हा बदल अधिक सुकर झाला.

आदित्य सांगतो, ‘सुरुवातीच्या काळात सगळ्या संकल्पना समजून घेणं, विचार करण्याची पद्धत आणि अभ्यासशाखांच्या दृष्टिकोनातला फरक जाणण्यात वेळ गेला. सहाध्यायी आणि प्राध्यापकांची मोलाची मदत झाली. सर्वासाठीच हा विषय नवीन आहे, हे गृहीत धरून शिकवलं जात असल्याने खूपच फायदा झाला. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगला संवाद होता’. अनेकदा तज्ज्ञांची व्याख्यानं, चर्चा, सादरीकरण इत्यादी उपक्रमांमुळे त्याची या विषयातली गोडी वाढली. या दरम्यान डेक्कन महाविद्यालयातच झालेल्या दोन आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भाषावैज्ञानिकांना भेटायची, त्यांच्याशी बोलायची संधी त्याला मिळाली. त्याशिवाय आयआयटी पाटणामधल्या ३९ व्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ लिंग्विस्टिक्स सोसायटी ऑफ इंडिया’मध्ये ‘नाऊन – व्हर्ब कॉम्प्लेक्स प्रेडिकेशन इन मराठी : अ केस ऑफ एचआयटी – एक्स्प्रेशन्स’ हा पेपर त्याने सादर केला. डेक्कनमध्ये संशोधनासाठी विद्यार्थ्यांना कायमच प्रोत्साहन दिलं जातं. एम.ए.च्या चौथ्या सत्रात एका प्रबंधाच्या निमित्ताने आदित्यच्या संशोधनाचा श्रीगणेशा झाला. डॉ. शुभांगी कार्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्यने Syntax and Semantics of HIT Expressions in Marathi हा प्रबंध लिहिला. तो सांगतो की, याआधी ‘खाणे’ या क्रियापदावर अभ्यास झालेला होता आणि ‘मारणे’ हे क्रियापद त्याच्याच सदृश गुणधर्म दाखवत असल्याचं लक्षात आलं. म्हणून मी ‘मारणे’ हे क्रियापद अभ्यासलं. ‘मारणे’ हे क्रियापद आहे. त्याचा नामांशी संपर्क झाल्यावर ‘संयुक्त क्रियापद’ तयार होतात. उदाहरणार्थ- थाप मारणे, माशा मारणे वगैरे. अशा प्रकारची जवळपास १५० भाववाचक क्रियापदं मिळाली.

‘एम.ए. झाल्यानंतरच्या काळात मी एम.फिल. घेतलं खरं, पण माझ्याकडे विषय नव्हता. त्यावेळी या विषयावर पेपर लिहायला सुरुवात केली होती. तेव्हा याच संदर्भात मी डेक्कनच्या ग्रंथालयातील संयुक्त क्रियापदांशी संबंधित प्रबंधांचं वाचन करत होतो. त्यातून या विषयाचा आवाका खूप मोठा असल्याचं लक्षात आलं. त्यातून विषय निवडत निवडत मी ‘संयुक्त क्रियापदां’चा कालक्रमिक अभ्यास करावा, या निष्कर्षांप्रत आलो’, असं तो सांगतो. ‘इंडो आर्यन भाषांमधल्या संयुक्त क्रियापदांचा उगम, विकास आणि त्यांचं आजचं स्वरूप याबाबत अभ्यासकांमध्ये मतभेद आढळतात. मराठीतील संयुक्त क्रियापदांचा एकाकालीन / कालनिरपेक्ष (सिंक्रोनिक) आणि कालक्रमिक (डायक्रोनिक) दृष्टिकोनातून अभ्यास’ हा माझ्या एम.फिल.च्या प्रबंधाचा विषय होता. मार्गदर्शक होत्या प्रा. सोनल कुलकर्णी – जोशी. एकेकाळी इंडो – आर्यन भाषांमध्ये दोन क्रियापदांच्या संयोगाने तयार होणारी संयुक्त क्रियापदं कमी असायची, असं एक निरीक्षण आहे.  त्यात संशोधनाला वाव होता. या संयुक्त क्रियापदांचा प्रसार कसा वाढला याचा मुख्यत्वे अभ्यास करायचा होता. उदाहरणार्थ, ‘मी पुस्तक वाचून टाकलं’. यात ‘टाकणं’ या क्रियेचा शब्दश: अर्थ घ्यायचा नव्हता. मुख्य अर्थ ‘वाचणं’ हाच होता, असं तो म्हणतो.

या अभ्यासासाठी अभ्यास साधन निवडणं ही एक मोठीच प्रक्रिया होती. ठरावीक कालावधीत प्रबंध लिहायचा असल्याने भाषेच्या प्रत्येक टप्प्यातील निवडक साहित्याची त्यातही सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकणाऱ्या वेच्यांची निवड केली. ज्ञानेश्वरी ते २०१८ पर्यंतच्या काळातील साहित्यप्रकारांतील मोजक्या वेच्यांचा अभ्यास असा त्याचा आवाका होता. त्यात ‘लोकसत्ता’मधले काही अग्रलेख, ‘जागता पहारा’ हा ब्लॉग यांचा समावेश होता. त्यात किती ‘संयुक्त क्रियापदां’चा वापर आढळतो, तो कालानुरूप कसाकसा बदलत गेला, त्यांचा अर्थ व त्यातले बदल टिपत गेलो. यात हातात गोष्टी आहेत आणि त्या झरझर वाचत गेलं असं होत नाही. खूप वेळ फक्त वाचणं, खुणा करणं, उतरवून घेणं, नोंदी करणं आदी अनेक गोष्टींची व्यवधानं सतत ठेवावी लागतात. हे सगळं अत्यंत वेळखाऊ  काम होतं. ऑनलाइन सर्च करतानाही गोष्टींचे चटकन उलगडे होत नव्हते, अशी त्याची आठवण तो सांगतो.

या अभ्यासातील मुख्य निरीक्षणं म्हणजे मागच्या सुमारे सात शतकांत मराठीतील ‘संयुक्त क्रियापदां’च्या संख्येत लक्षणीय बदल घडून आले. याच कालावधीत संयुक्त क्रियापदांची वारंवारता १ टक्के वरून सुमारे १२ टक्केवर पोहोचली. यातून ‘संयुक्त क्रियापदं’ ही संरचना मध्यकालीन इंडो-आर्यन भाषांमध्ये उदयाला येऊन अर्वाचीन (न्यू) इंडो – आर्यन भाषांमध्ये फोफावली, या प्रवादाला आणखीनच बळ मिळतं. मात्र याच दरम्यान ‘संयुक्त क्रियापदा’तील अर्थलोपी क्रियापदांमध्ये (व्हेक्टर व्हर्ब्स) घडणारं अर्थपरिवर्तन मात्र अत्यंत मर्यादित स्वरूपाचं आहे. इंडो – आर्यन भाषांचा विचार करता, मराठीतील ‘संयुक्त क्रियापदं’ त्यांच्या गुणधर्माच्या बाबतीत त्यांच्यापेक्षा अधिक प्रगत अशा हिंदी ‘संयुक्त क्रियापदां’कडे सरकत आहेत अशी शंका घेण्यास वाव आहे.

यापैकी दुसऱ्या निरीक्षणाचा अभ्यास करताना मार्गदर्शकांनी एखाद्या क्रियापदाचा अर्थ कसा बदलतो आहे; याकडे अधिक लक्ष देणं का गरजेचं आहे हे समजावलं. उदाहरणार्थ – ‘जाणे’ या क्रियापदाच्या अनेक अर्थछटा आहेत. ते आधीच्या साहित्यातही आढळतं. मग त्याच्या अर्थात काय बदल होत गेले, ते अभ्यासलं. त्याची आधीची व्याप्ती आता मोठी झालेली दिसते. या अभ्यासाशी संबंधित दोन महत्त्वाचे प्रवाद आहेत. त्यांच्या पार्श्वभूमीवर मला हे काम मांडता आलं. त्यापैकी आदिती लाहिरी आणि मरिअम बट्ट यांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार संयुक्त क्रियापदं ही इंडो – आर्यन भाषांमध्ये संस्कृतपासून आलेली आहेत. ती काही नवीन नव्हेत. ती तयार झाली की त्यात काही बदल होत नाहीत. तर पीटर हूक यांच्या मतानुसार ‘संयुक्त क्रियापदं’ ही मराठीत किंवा कोणत्याही इंडो – आर्यन भाषांमध्ये पहिल्यापासून नव्हती. मध्यकालीन इंडो – आर्यन भाषांमध्ये ही क्रियापदं हळूहळू निर्माण झाली आणि ती वाढत गेली. गंगेच्या खोऱ्यात हा भाषिक विस्तार अधिक प्रमाणात झाला, असं सांगतानाच माझी निरीक्षणं या भाषाशास्त्रज्ञांच्या मतांच्या मधली होती, असं आदित्य सांगतो. या निरीक्षणांच्या एका टप्प्यात पीटर हूकचा पेपर सापडण्यासाठी जंग जंग पछाडावे लागले. अगदी शेवटच्या टप्प्यात तो मिळाला आणि माझी मतं त्या पेपरच्या पार्श्वभूमीवर मांडताना त्यांना अधिक उठाव आला. या सगळ्या कालावधीत मार्गदर्शकांच्या सकारात्मक मार्गदर्शनाची खूपच मदत झाली. त्यांनी मला सतत कामात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीचं अत्यंत वेळखाऊ काम करून पुढे चांगली निरीक्षणं गवसणं या टप्प्यात वेळोवेळी बदल होऊ शकणं, मानसिक थकवा येणं आदी गोष्टी घडणं अगदी सहज होतं. तेव्हा त्या कायमच माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. प्रबंधाच्या इव्हॅल्यूएशनच्या वेळी प्राध्यापक प्रशांत परदेशी आणि प्रा. बिस्वमोहन प्रधान यांच्याकडून चांगले इनपूट मिळाले, असे तो सांगतो.

भाषाशास्त्राच्या प्रांतात अधिकाधिक ज्ञानार्जन करण्यासाठी तो ग्रीसमधल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ क्रिट’मध्ये समर स्कूलला गेला होता. तिथली बहुतांशी तज्ज्ञ मंडळी एमआयटी, कें ब्रिज, स्टॅण्डफोर्ड किंवा तत्सम विद्यापीठांमधली होती. बंगलोरमध्ये ‘मायक्रोसॉफ्ट रिसर्च इंडिया’च्या ‘आर्टिफिशिअल सोशल इंटेलिजन्स’च्या कार्यशाळेतही त्याने हजेरी लावली होती. मुंबई विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथल्या ‘ग्लोबल इनिशिएटिव्ह इन अकॅडमिक नेटवर्क’चे अनेकविध अभ्यासक्रमही तो शिकला. मधल्या काळात बडोदा विद्यापीठात नोकरीची संधी उपलब्ध झाली आणि मुलाखत वगैरे होऊन तो लगेच रुजूही झाला. पुढे पीएचडी करायचा त्याचा विचार सुरू आहे. आतापर्यंत कार्यलक्ष्यी (functional) दृष्टिकोनातून त्या अंगाने भाषाशास्त्राचा अभ्यास मी केला. आता रूपलक्ष्यी (formal) दृष्टिकोनातूनही भाषाशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी काही संधी मिळतात का, याचा विचार सुरू आहे. त्या दिशेने पावलं टाकताना पेपर सादरीकरण, तज्ज्ञांशी चर्चा, परिषदा – उपक्रमांना हजेरी लावणं, समर स्कूलला जाणं या सगळ्या गोष्टी करणं आदींची सुरुवात झाली आहे. संशोधन क्षेत्रात यायचं झाल्यास सबुरी अंगी बाळगावी लागते. समोरच्या गोष्टींचा अभ्यास करताना निरीक्षणं – अभ्यासांती आपली मूळ गृहीतकंसुद्धा पूर्णपणे बदलू शकतात, हे स्वीकारायला हवं. नवीन दृष्टिकोन, संकल्पनांचा विचार करता यायला हवा आणि संवाद साधायची हातोटी साधायला हवी, असं त्याचं मत आहे. भाषाशास्त्राच्या प्रांतातल्या आदित्यच्या संशोधन मुशाफिरीला शुभेच्छा.

viva@expressindia.com