12 July 2020

News Flash

रॅम्पवरची टॉक टॉक फॅशन

काही फॅशन्स सतत वेगवेगळं काहीतरी समोर आणतात, तर काही मूलत: न बदलता आधुनिक ट्विस्ट देऊन समोर येतात.

(संग्रहित छायाचित्र )

वैष्णवी वैद्य

साधारण घरी असणाऱ्या आपल्या आई-आजीसाठी चप्पल म्हणजे बाहेर जाताना घालायचे ‘पायताण’.. इतपतच त्याला महत्त्व! तसंच तरुण पिढीसाठी कॅज्युअल वेअर, ऑफिस वेअर, पार्टी वेअर अशा वेगवेगळ्या निमित्तांसाठी चपला असतात. लॅक्मेच्या विसाव्या वर्षांची खासियत म्हणजे हीच फुटवेअरमधली विविधता. या विविधतेमध्ये आधुनिकता आणि परंपरेचा संगम प्रकर्षांने जाणवला.

फॅशनची दुनिया काही वेगळीच असते. कधी ती पारंपरिक साज देते तर कधी अगदी हटके आणि ट्रेण्डी स्टाईल देते आणि कधी दोन्हीचा संगम साधून समकालीन होते. पण या सगळ्यात सर्जनशीलता असते. काही फॅशन्स सतत वेगवेगळं काहीतरी समोर आणतात, तर काही मूलत: न बदलता आधुनिक ट्विस्ट देऊन समोर येतात. काळानुरूप सेलिब्रिटीजसह तरुण मुलं-मुलीसुद्धा फॅशनबद्दल सजग राहू लागली आहेत. आता ती फक्त कपडय़ापुरती मर्यादित न राहता अगदी नखशिखांत झाली आहे. तुम्ही काय कपडे घालता यासोबतच त्याला साजेशी ज्वेलरी, मेकअप, शूज / फुटवेअर या सगळ्या गोष्टींनासुद्धा तितकेच महत्त्व आले आहे. आपण पूर्णपणे स्टाईल आयकॉन दिसायला हवं याबद्दल तरुण मुलं-मुली आग्रही असतात. या सगळ्या फॅशन पाश्र्वभूमीचा पूर जिथे पाहायला मिळतो ते ‘फॅशन शोज’ ही तरुणांसाठी उत्सुकतेची बाब असते. या वेळी कुठल्या डिझायनरची काय वेगळी स्टाईल असेल, काय रंगसंगती असेल ते अगदी आपण काय कपडे घालावेत अशी सगळी तयारी करायला सुरुवात होते.

या फॅशन विश्वातील सगळ्यात लोकप्रिय आणि बहुचर्चित शो म्हणजे ‘लॅक्मे फॅशन वीक!’ शोचं यंदा हे विसावं वर्ष पार पडलं. या वीस वर्षांंत फॅशन विश्वातील अनेक मोठी मोठी नावं इथूनच आपल्याला मिळाली. अगदी कपडय़ांपासून ते फुटवेअपर्यंतची बदलती स्टाईल स्टेटमेंट लॅक्मेतून पाहायला मिळतात. साधारण घरी असणाऱ्या आपल्या आई-आजीसाठी चप्पल म्हणजे बाहेर जाताना घालायचे ‘पायताण’.. इतपतच त्याला महत्त्व! तसंच तरुण पिढीसाठी कॅज्युअल वेअर, ऑफिस वेअर, पार्टी वेअर अशा वेगवेगळ्या निमित्तांसाठी चपला असतात. लॅक्मेच्या विसाव्या वर्षांची खासियत म्हणजे हीच फुटवेअर मधली विविधता. या विविधतेमध्ये आधुनिकता आणि परंपरेचा संगम प्रकर्षांने जाणवला. कपडय़ांमध्ये विविध फॅब्रिक आणि रंगसंगतीचा वापर करून वैविध्य आणले जाते, पण चपलांसाठी तीच पद्धत वापरली तर अर्थातच त्यात किती नावीन्य असेल. हा ट्रेण्ड लॅक्मेच्या रॅम्पवर अगदी सुरेख पद्धतीने दिसला. पाश्चात्त्य कपडय़ांवर उंच टाचेच्या चपला घालणं हे काही नवीन नाही किंबहुना तशी पद्धत आणि गरजच आहे. पण डेनीम कापडातून जसे पारंपरिक कपडे बनतात तसाच चपलांनासुद्धा का नाही पारंपरिक फील द्यायचा!

जे कपडे आपण घातले आहेत त्याच कापडाच्या किंवा साधारण चपलांसाठी टिकाऊ असणाऱ्या फॅब्रिकच्या चपला घालून तशी स्टाईल करणं हा ट्रेण्ड झाला आहे. भारतीय पद्धतीच्या फ्लॅट जुती चपलासुद्धा वेगवेगळ्या कापडांत आणि फॅशनमध्ये रॅम्पवर दिसल्या. श्वेता टांटिया यांचे ‘ताहविव-विसकोसो’ कलेक्शनमधील फुटवेअरमध्ये कमालीचे वेगळेपण होते. जुती आणि लेसचा वापर अगदी अनोख्या पद्धतीने यात केलेला दिसला. फक्त पायाच्या बोटापर्यंतचे कापड वापरून मागे लेसने बांधलेल्या हाफ जुतीही इथे दिसल्या. डिझायनर श्वेता म्हणतात, ‘कपडय़ांच्या रंगाला अगदी साजेसं पण वेगळं असं काहीतरी हवं होतं. मॉडेल्सना वॉक करताना उत्तम दिसणं जेवढं महत्त्वाचं असतं तेवढंच व्यवस्थित चालता येणंसुद्धा महत्त्वाचं असतं. म्हणून त्यांना चालायला अगदी कम्फर्टेबल वाटावं या विचाराने हे फुटवेअर बनवले आहेत.’ कपडय़ांमध्ये सध्या पेस्टल रंगांची लोकप्रियता वाढत चालली आहे. हेच रंग आता फुटवेअरमध्येसुद्धा वापरायला सुरुवात झाली असून ते अगदी मनमोहक वाटतात. चपलांमध्ये रंगसंगती करणं तसं दुर्मीळच, कारण त्यात ठरावीक रंग असतात. जे मळखाऊ आणि टिकाऊ असतात, पण लॅक्मेच्या मंचावरून फुटवेअरमध्येही रंगसंगती पाहायला मिळाली. डिझायनर आनंद काब्रा यांचे कलेक्शन आयव्हरी आणि शिमर पद्धतीचे होते. त्यावरसुद्धा अगदी साजेशी एम्ब्रॉयडरी जुती त्यांनी वापरली होती. अगदी प्लेन पण जराशी चमक असलेल्या कापडांवरची ही रंगरंगोटी उठावदार दिसत होती.

कलाकारांसाठी रंगमंच ही पवित्र जागा असते. प्रयोगाला किंवा सादरीकरण करताना कलाकार सहसा चपला घालत नाहीत. असेच काहीसे विचार काही डिझायनर्सचे आहेत असं वाटलं. रॅम्पवर चालणं हे मॉडेल्सचं आणि पर्यायाने डिझायनर्सचं सुद्धा एक प्रकारे कलाक्षेत्रच आहे. एथनिक कलेक्शन असलेले डिझायनर्स गौरांग शाह, आपली मराठमोळी वैशाली शडांगुळे यांच्या मॉडेल्सच्या पायात अनेक वेळा कुठल्याच पद्धतीच्या चपला नसतात. यांचे कलेक्शन भारतातल्या विविध प्रांतांच्या संस्कृतीतून प्रेरित झालेले असते. त्यामुळे कुठलेही शुभकार्य किंवा रंगमंच सादरीकरण करत असताना आपल्या पायात शक्यतो चपला नसतात, हा सांस्कृतिक समभाव फॅशनच्या पाश्र्वभूमीवर दिसणं ही बाबसुद्धा कौतुकास्पद वाटली.

जसा पेस्टल रंगांचा वापर वाढला आहे तसा ग्लॉसी आणि निऑन कलर वापरणंसुद्धा ट्रेण्ड होत चालला आहे. या स्टाईलचा जास्त वापर हाय हिल्समध्ये केला जातो. पार्टी वेअर किंवा ऑफिस वेअर फ ॉर्मल्सवर असे हिल्स खूप शोभून दिसतात. ‘समा, मीरा आणि मुझफ्फर अली’ या डिझायनर परिवाराच्या कोटवारा ब्रॅण्डमध्ये हे हाय हिल्स वापरले गेले. मुळात कपडय़ांमध्ये थोडंसं शीमर असताना त्यावरच्या हिल्स साध्या असाव्यात ही रंगसंगतीची समज डिझायनरला आत्मसात करावी लागते. डिझायनर रीना सिंग हिचा ‘एका’ हा लोकप्रिय ब्रॅण्ड आहे. तिने ‘तेलंगणा स्टेट विवर्स असोसिएशन’बरोबर हातमिळवणी करून भारतीय टिकाऊ फॅब्रिकची फॅशन दाखवली. याचा रंग आणि फील मुळातच थोडा डल असतो म्हणून जरा वायब्रण्ट रंगाचे शुज वापरले. यातसुद्धा हाय हिल्स आणि बेल्टचे शुज आणून वेगळेपणा दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

या वर्षीची आणखी एक खासियत म्हणजे ‘बाटा’ने अनेक डिझायनर्स सोबत हातमिळवणी केली असून फॅशन रॅम्पवर बाटाचे कमालीचे आधुनिक पद्धतीचे फुटवेअर दिसले. बाटाची ओळख म्हणजे साधारण शाळेचे काळे बूट, डॉक्टर चपला किंवा टिकाऊ लेदरच्या चपला ज्यांचा डिझाईन आणि रंगांशी फार संबंध नसतो, परंतु लॅक्मेच्या मंचावर बाटाचे आधुनिक आणि सुशोभित रूप पाहायला मिळाले. बाटाचे सीईओ संदीप कटारिया म्हणतात, ‘लॅक्मे फॅशन वीकच्या मंचावर येणं ही नेहमीच खास बाब आहे. यावेळी बाटाने ‘रेट्रो फॅशन’ वेगळा डिझाइन ट्विस्ट देऊन आणायचं ठरवलं. पण इथे कुठेही सर्जनशीलता आणि दर्जा यामध्ये कमी पडायचं नव्हतं. तुम्हाला स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर नावीन्य साधणं गरजेचे आहे. तेच बाटाने लॅक्मेच्या मंचावर करण्याचा प्रयत्न केला.’

फॅशन चक्राकार फिरत असते. कुठलीही एक पद्धत पूर्णपणे कालबाह्य होत नाही. ती वेगवेगळ्या पद्धतीने समोर येते. हेच या क्षेत्राचे वैशिष्टय़ आहे. ते प्रायोगिक क्षेत्रसुद्धा आहे. दरवेळी काहीतरी नवीन हाती लागेलच, मग तुम्ही ते प्रेक्षक म्हणून आत्मसात करा किंवा डिझायनर म्हणून कामातून अमलात आणा. तसचं काहीसं या वर्षीचं नावीन्य म्हणजे कपडे आणि मेकअपसोबतच फुटवेअरच्या फॅशनची पर्वणी पाहायला मिळाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 1:10 am

Web Title: article on ramp walk fashion abn 97
Next Stories
1 संशोधनमात्रे : भाषेच्या राज्यात नांदू चला!
2 बुकटेल : वाईज अ‍ॅण्ड अदरवाईज : अंतर्मुख करणारा कथासंग्रह
3 माध्यमी : बी युअरसेल्फ
Just Now!
X