19 January 2020

News Flash

क्षण एक पुरे! : इतरांना शहाणं करणारा वेडा

मानसशास्त्र हाच विषय अभ्यासायचा, हे इयत्ता आठवीत शिकत असतानाच समीरने नक्की केलं होतं

(संग्रहित छायाचित्र)

वेदवती चिपळूणकर

त्याची ध्येयं खूप मोठी आहेत, त्याची स्वप्नं खूप दूरची आहेत आणि त्याचे विचार काळाच्या एक पाऊल पुढे आहेत. त्याचे हे ‘हाय गोल्स’ ऐकून कोणीही त्याला सहजपणे वेडय़ात काढेल, पण त्याच्या संकल्पना अगदी स्पष्ट आहेत. अगदी शाळेत असल्यापासून आपला मार्ग ठरवणाऱ्या आणि वयाच्या एकविसाव्या वर्षीच स्वत:ची कंपनी रजिस्टर्ड करणाऱ्या समीर दिघेने कंपनीसाठी पुढच्या ३०-३५ वर्षांची स्वप्नं बघितली आहेत. शून्य भांडवलावर सुरू  केलेली ‘संवेदन’ ही त्याची कंपनी गेली सात वर्षें वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रेनिंग वर्कशॉप आयोजित करते. मानसशास्त्र शिकलेला समीर आपल्या मानसशास्त्राच्या अभ्यासाचा योग्य ठिकाणी उपयोग करण्याबाबत आग्रही आहे.

मानसशास्त्र हाच विषय अभ्यासायचा, हे इयत्ता आठवीत शिकत असतानाच समीरने नक्की केलं होतं. माणसं समजून घ्यायला आणि माणसांमध्ये रहायला आवडतं म्हणून त्याला मानसशास्त्र विषय आवडत होता. मात्र वरवर दिसणारं मानसशास्त्र आणि त्याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून केला जाणारा अभ्यास यात समीरला बरीच तफावत जाणवली आणि त्याने पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी मानसशास्त्राची निवड केली नाही. तर ‘लेबर स्टडीज’ या विषयात त्याने मास्टर्स  केले. हे करत असतानाच त्याने स्वत:च्या कंपनीच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली होती. तो म्हणतो, ‘थर्ड इयरची परीक्षा संपण्याआधीच माझ्या कंपनीचं रजिस्ट्रेशन मी पूर्ण केलं होतं. नेमकं पुढे कसं जायचं हे काही ठामपणे ठरलेलं नव्हतं. मी लेबर स्टडीजसाठी आधी परीक्षा आणि मग

इंटरवू दिला. इंटरवूच्या वेळी माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे इंटरवू या प्रकाराची लोकांना असलेली भीती! लोकांमध्ये ही भीती आहे आणि त्यावर कोणी काम करत नाहीये हे लक्षात आलं आणि म्हटलं आपण काम करू या!’. एकदा मनात विचार डोकावल्यावर त्याने ही कल्पना त्याच्या संपर्कातल्या प्राध्यापक, विभागप्रमुख अशा सगळ्यांना सांगितली. ‘साधी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट पॅम्प्लेट छापून घेतली. त्या वर्षी गणपतीला मी झाडून सगळ्या ओळखीच्या लोकांकडे, नातेवाईकांकडे, मित्रांकडे गेलो. कोणीही काय करतोस सध्या म्हणून विचारलं की माझ्या मनात तयार असलेल्या ट्रेनिंग प्रोग्रॅमची माहिती सविस्तर द्यायची आणि हातात पॅम्प्लेट ठेवायचं. अशा पद्धतीने माऊथ पब्लिसिटी करत मी पहिली बॅच मिळवली. अनायासे ती बॅच संपता संपताच एकाचा इंटरव्ह्यू झाला आणि त्याला प्लेसमेंट मिळाली. त्यामुळे त्याच्या सगळ्या क्लासमेट्सच्या आग्रहावरून दुसरीही बॅच बनली. अशा पद्धतीने या ट्रेनिंग प्रोग्रॅमने जोर धरला’, असे समीर सांगतो.

स्वत:चा बिझनेस म्हटला की त्यात रिस्क हा भाग येतोच. काही वेळा अशाही येतात जेव्हा सगळं बंद करून दुसरा विचार करावा असंही वाटून जातं. अशावेळी खंबीर राहून स्वत:ला समजावण्याची गरज असते. अशा अनुभवाबद्दल समीर सांगतो, ‘लेबर स्टडीजमध्ये मास्टर्स केल्यानंतर कॅम्पस प्लेसमेंटमध्ये इंटरव्ह्यू न देताही मला महिंद्राची ऑफर होती, जेएसडब्ल्यू स्टील्सची ऑफर होती, पण मी एकही स्वीकारली नाही. नोकरी करायची नाही हे माझं ठरलं होतं. त्यामुळे कितीही छान ऑफर आली तरी मला ती स्वीकारायची नव्हती. कंपनी सुरू केल्यावर एकदा असाही प्रसंग आला की आधीच्या वर्कशॉप्समधून कमावलेले सगळे पैसे एक वर्कशॉप फसल्यामुळे त्यात घालावे लागले आणि मी पुन्हा शून्यावर आलो. त्यानंतर काही काळ मी काहीच काम केलं नाही, नवीन कोणतंही ट्रेनिंग डिझाइन केलं नाही. पण तेव्हाही कधी कंपनी बंद करण्याचा किंवा नोकरी शोधण्याचा विचारही माझ्या मनात आला नाही. स्वत:चं काहीतरी करायचं म्हणजे सगळे चढउतार बघतच पुढे जावं लागतं हे स्वीकारून मी हळूहळू पुन्हा कामाला सुरुवात केली.’

समीरच्या ‘संवेदन’ने कोणत्याही एका प्रकारापुरतं स्वत:ला मर्यादित ठेवलेलं नाही. पोलीस डिपार्टमेंटला ‘रिटायरमेंट ट्रेनिंग’ आणि ज्येष्ठ नागरिकांना ‘मोबाईल ट्रेनिंग’ या सध्याच्या त्याच्या विशेष नावीन्यपूर्ण दोन कल्पना. त्याबद्दल बोलताना समीर म्हणतो, ‘जिथे मानसिक दृष्टिकोनातून काम करण्याची गरज आहे हे मला जाणवलं तिथे आपण काहीतरी करू शकतो हा माझा विचार आहे. ‘लेबर स्टडीज’च्या कोर्समध्ये आम्ही रिटायरमेंट ट्रेनिंग वगैरे या सगळ्याचा अनुभव घेतलेला होता. त्यावेळीच मला ते आवडलं होतं. पोलिसांचं आयुष्य बघता त्यांना रिटायरमेंट प्लॅनिंगची सगळ्यात जास्त गरज आहे, असं मला वाटलं. सतत काम, बदल्या, डोक्यात सतत कामाचे विचार, काहीवेळा घरच्यांशी थोडासा आलेला दुरावा अशा अनेक गोष्टींचा परिणाम त्यांच्या रिटायरमेंटनंतरच्या आयुष्यावर होतो. त्यामुळे त्यांना या कोर्सची गरज आहे, असं मला जाणवलं’. एखादी कल्पना कितीही चांगली असली तरी प्रत्यक्षात उतरवणं तेवढंच अवघड असतं. समीरने कोणाचीही कोणतीही ओळख नसताना थेट डीसीपी साहेबांच्या पुढय़ात आपला प्लॅन ठेवला. ‘त्यांना तो प्लॅन तर आवडला, मात्र या वर्कशॉप्ससाठी पोलीस डिपार्टमेंट पैसे खर्च करू शकत नाही हेही त्यांनी मला सांगितलं. मग मी काही कंपन्यांशी टाय-अप केला आणि त्यांच्या ‘इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस’साठी असणाऱ्या फंड्सचा इथे वापर केला. ‘पोस्ट-रिटायरमेंट इन्व्हेस्टमेंट’ या विषयावरही एक सेशन घ्यायला सुरुवात केली आणि पोलिसांसाठी ही कार्यशाळा मोफतच ठेवली. त्यावेळी सीनियर सिटिझन्सचा मोबाइल शिकण्याचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला आणि तिथेही काही करावं असं मला वाटलं. म्हणून आम्ही ज्येष्ठ नागरिकांना मोबाइल शिकवण्यासाठी एक प्रोग्रॅम तयार केला, ज्यात आम्ही त्यांना फेसबुकचा डीपी बदलण्यापासून ते टॅक्सी बुक करण्यापर्यंत सगळं काही शिकवतो’, असं समीर सांगतो.

अशा विविध प्रकारच्या कार्यशाळा घेण्याबाबत समीरचा हातखंडा आहे. मात्र यातून केवळ पैसे न मिळवता त्याबाबतचा समीरचा विचार स्पष्ट आहे. त्याच्या म्हणण्यानुसार आपला देश स्वतंत्र होऊनही आपण मानसिक गुलामगिरीतच आहोत. त्या मानसिकतेतून जोवर बाहेर पडत नाही तोवर आपण खूप ग्रेट काही करू शकणार नाही. त्यामुळे जिथेजिथे त्याला मानसिक गुलामगिरी किंवा ज्येष्ठ नागरिकांसारखं परावलंबित्व जाणवतं, तिथेतिथे काम करण्याची त्याची इच्छा आहे. या इच्छेतूनच तो वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग डिझाइन करतो आहे.

‘दुसरी गोष्ट म्हणजे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं स्वप्न! वेस्टर्न जगात शिक्षणाची बाजारपेठ आहे. आपल्यासारखे लोक त्याला भुलतात आणि आपला मुलगा लंडनला शिकतो यात धन्यता मानतात. जोपर्यंत आपली बाजारपेठ आपल्या देशात आपण तयार करत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार नाही. कधीकाळी ईस्ट इंडिया कंपनीचे आपण गुलाम होतो, भविष्यात गुगल-फेसबुकसारख्या पाश्चात्त्य कंपन्यांचे गुलाम असू आणि ते मानाने मिरवू. या सगळ्यावर मात करायची म्हणूनच मला नोकरी करायची नव्हती आणि या माझ्या ठाम विचारांमुळे मी सगळ्या प्रॉब्लेम्सना तोंड देऊ शकलो.’

-समीर दिघे

प्रॉब्लेम्स येणारच आहेत. पण प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्याचं उत्तरही कुठे तरी नक्की अस्तित्वात आहे. आपल्याला फक्त थोडी मेहनत घेऊन, हिंमत ठेवून ते उत्तर शोधायचं काम करायचं आहे. प्रॉब्लेम तर कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही नोकरीतही येतात. आपल्या मनातली कारकुनीला असलेली उच्च जागा आधी रिकामी केली पाहिजे. आम्ही आयुष्यभर नोकरी केली म्हणजे किती ग्रेट काम केलं हे आधी डोक्यातून काढून टाकलं पाहिजे, तरच आपण व्यवसायात काही करू शकू..

First Published on November 8, 2019 4:37 am

Web Title: article on savidan training workshop abn 97
Next Stories
1 टेकजागर : खरंच ‘प्रायव्हसी’ उरलीय का?
2 फिट-नट : अंकित मोहन
3 जगाच्या पाटीवर : औषधमात्रे तन प्रतिकारशक्ती
Just Now!
X