चारुदत्त चौधरी

पर्यावरण आणि ऊर्जा हे माझ्या आवडीचे विषय आहेत. त्या अनुषंगाने युरोपमध्ये बरंच काम सुरू आहे. या संदर्भातली फ्रान्सची भूमिका सर्वश्रुत आहेच. स्वत:च्या अनुभवांचं क्षितिज विस्तारण्यासाठी, तिथल्या शिक्षणपद्धतीत शिकण्यासाठी मला परदेशी शिकायला जायचं होतं. मॅनेजमेंटच्या शिक्षणात अनुभव हा खूप महत्त्वाचा मुद्दा ठरतो.

अनेकदा असं होतं की आपलं एक ध्येय ठरलेलं असतं. त्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू झालेली असते. काही वेळा ठरवलेली किंवा न ठरवलेली वळणं समोर येतात. त्यांना सामोरं जात करिअरचा प्रवास सुरूच ठेवावा लागतो. आपल्या आवडीच्या विषयांतील शिक्षण, कामाचा अनुभव, आपल्या सामाजिक जाणिवा आणि संवेदनशील स्वभाव आपल्या करिअरमध्ये प्रतिबिंबित झाल्यावर आपलं प्रोफाईल चांगलं होऊन ते अधिकाधिक समृद्ध होतं. मी ‘बीआयटीएस पिलानी’मध्ये बी.ई (ऑनर्स) मॅन्युफॅ क्चरिंग इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केली. पहिलं वर्ष ऑपरेशन्समध्ये काम केलं, पण कामात नावीन्य हवंसं वाटू लागलं. स्वत:ला सिद्ध करायचं होतं. मग ‘बिल्डिंग सोल्युशन्स अँण्ड एनर्जी एफिशिएन्सी’ क्षेत्रात काम केलं. बराच अनुभव मिळाला. अनेक लोकांच्या भेटीगाठी झाल्या. या क्षेत्रातील अनेक घडामोडींसह त्यातल्या संधीही कळल्या.

मला ‘युनायटेड नेशन्सच्या सस्टेनेबल डेव्हलपमेन्ट गोल्स’विषयी आस्था वाटते. शाश्वत विकास म्हणजे आपल्या वर्तमानातील गरजा पूर्ण करताना पुढील पिढय़ांच्या त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेला बाधा न येऊ  देता साध्य केलेला विकास होय. या अंतर्गत दारिद्रय़ निर्मूलन, हवामान बदल, पर्यावरणाचा वाढता असमतोल, समृद्धी, शांतता, न्याय वागणूक आदी ध्येयं २०३० पर्यंत गाठण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शिवाय मलाही लोकांसोबत काम करायचं होतंच. आधारभूत सोयीयुविधांबद्दल सरकारची ध्येयधोरणं काय आहेत, ही धोरणं प्रत्यक्षात कशी राबवली जातात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. हाही माझा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मी वर्षभर ‘स्वच्छ भारत मिशन ग्रामीण’मध्ये नोकरी केली. जिल्हा हागणदारीमुक्त करणं हे आमचं लक्ष्य होतं. त्याअंतर्गत रायगडमध्ये आणि जळगावला काम केलं. शिवाय काही उपक्रम आणि योजनांमध्ये उदाहरणार्थ मासिक पाळीबाबत जागृती, हात धुण्याची सवय इत्यादींमध्ये सहभागी झालो. दरम्यान काही काळ बिहारमध्येही होतो. या नोकरीच्या निमित्ताने समाजकारणी, राजकारणी, नोकरशाही, युनियन लीडर्स आदींच्या भेटीगाठी झाल्या. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. नोकरी करतानाच दुसरीकडे एम.बी.ए.साठी अर्ज करायला सुरुवात केली. पर्यावरण आणि ऊर्जा हे माझ्या आवडीचे विषय आहेत. त्या अनुषंगाने युरोपमध्ये बरंच काम सुरू आहे. या संदर्भातली फ्रान्सची भूमिका सर्वश्रुत आहेच. स्वत:च्या अनुभवांचं क्षितिज विस्तारण्यासाठी, तिथल्या शिक्षणपद्धतीत शिकण्यासाठी मला परदेशी शिकायला जायचं होतं. मॅनेजमेंटच्या शिक्षणात अनुभव हा खूप महत्त्वाचा मुद्दा ठरतो. आईबाबांशी अनेकविध मुद्दय़ांवर अनेकदा चर्चा व्हायची. अगदी विद्यापीठांत अर्ज करताना दोघांनीही वेळोवेळी मदतीचा हात दिला. माझ्या आत्मविश्वासाला त्यांचा खंबीर पाठिंबा मिळाला. शिष्यवृत्ती मिळाली असली तरी मी शैक्षणिक कर्जही घेतलेलं आहे.

मी सध्या ‘एचईसी पॅरिस’मध्ये एम.बी.ए. शिकतो आहे. १८८१मध्ये स्थापन झालेली ही संस्था युरोपमधील सर्वाधिक नावाजलेल्या बिझनेस स्कूलपैकी एक आहे. अनेकदा आपली मानसिकता केवळ ब्रॅण्डनेम किंवा प्रसिद्ध संस्थेलाच पहिली पसंती देण्याची असते. परदेशी शिक्षण घेण्यासाठी निवड करताना केवळ संस्थेचं नावच नव्हे तर सगळ्याच गोष्टींचा सारासारविचार करावा लागतो. त्यासाठी शक्यतो तिथले परिचित, प्राध्यापकांशी किमान ई-चर्चा करावी. संधी मिळाल्यास तिथे प्रत्यक्षात जाऊन यावं. अनेक ठिकाणी अर्ज करताना त्या अर्जाची गुणवत्ता कमी होऊन उपयोग नाही. विद्यापीठांच्या प्रवेशप्रक्रियेचा कालावधी लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने हे अर्ज करताना पुढच्या निवडप्रक्रियेचे टप्पे आधीच समजून घ्यावेत. मी जवळपास ८-१० ठिकाणी अर्ज केला होता. शेवटच्या टप्प्यात कॉल यायला लागले. शेवटी या कॉलेजमध्ये संधी मिळाली. दोन मुलाखती झाल्या. ‘एचईसी पॅरिस स्कॉलरशिप फॉर एक्सेलन्स’ या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. या १६ महिन्यांच्या अभ्यासक्रमाच्या जानेवारीत सुरू होणाऱ्या वर्षांसाठी मी आधीच्या एप्रिलमध्ये अर्ज केला होता. मेमध्ये होकार आल्यानंतर  पुढच्या व्यावहारिक प्रक्रिया सुरळीतपणे होण्यासाठी आणि कुटुंबीयांना मला पुरेसा वेळ देता आला. हा माझा दुसरा परदेश प्रवास. घरी कधी परतायला मिळेल, हे तेव्हा माहिती नव्हतं. त्यामुळे थोडीशी रुखरुख मनाशी होती. इथे येऊ न सहा महिने झाले असून अजून वर्षभर तरी घरी जाता येईल, असं वाटत नाही. लहानपणापासून आम्ही अनेकदा जागा बदलल्याने जागा बदल ही नवीन गोष्ट नव्हती, फक्त ही जागा परदेशात असणार होती. इथल्या संस्कृतीची माहिती नाही. भाषा नीट येत नव्हती. त्यामुळे किंचितशी धाकधूक होती. मात्र सहविद्यार्थ्यांंच्या फेसबुक-व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर याविषयीच्या चर्चेतून थोडासा दिलासा मिळायचा.

कॉलेज सुरू व्हायच्या दोन दिवस आधी मी पॅरिसला पोहचलो. ऑनकॅम्पस राहायची सोय भारतातूनच झाली होती. सुरुवातीचे दोन दिवस पॅरिसमध्ये फिरलो. आमचा इंटेग्रेशन कालावधी दोन आठवडय़ांचा होता. बऱ्याच सोशल इव्हेंट झाल्या. त्यामुळे इतरांशी संवाद साधता आला. स्थानिक विद्यार्थ्यांसह चीन, जपान, इंडोनेशिया, यूएसए, कॅनडा, मोरक्को, इटली, पाकिस्तान, युके, ब्राझील आदी देशांतील विद्यार्थ्यांशी ओळख झाली. प्रत्येकाची संस्कृती, भाषा, देहबोली, शिष्टाचार, अवकाश वेगळं होतं. ते प्रत्येकाला समजून-उमजून घ्यावं लागलं. या गप्पांच्या ओघात ते ते देश, संस्कृती, खाद्यजगाविषयी अनेक गोष्टी कळतात. अशा परिचयांतून कालांतराने हळूहळू नेटवर्किंग तयार होतं. त्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. आमचा कॅम्पस हा अनेक सोयीसुविधा असणारा आहे. अनेकविध संदर्भग्रंथ, मासिकांसह सुसज्ज असणाऱ्या अत्याधुनिक ग्रंथालयाची अविरत सेवा मिळते. मल्टिपर्पज जिममध्ये इनडोअर माऊंटन क्लायम्बिग वॉल, वेट ट्रेनिंग रूम, कार्डिओ ट्रेनिंग रुम, एरोबिक्स, बॉक्सिंग, मार्शल आर्ट्स इत्यादींची सोय आहे. तर टेनिस कोर्ट, अ‍ॅथलेटिक्स ट्रॅक, फुटबॉल – बास्केटबॉलची मैदानेही आहेत. इथे खेळाला बरंच महत्त्व दिलं जातं. मी स्विमिंग, इनडोअर माऊंटन क्लायम्बिग करतो.

आमच्या वर्गातील विद्यार्थी नोकरदारही आहेत. दर सेमिस्टर्सना वर्ग बदलतात. शिवाय प्रत्येकाचे स्टडी ग्रुप असून ग्रुप प्रोजेक्टही त्यांच्यासोबत केले जातात. व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम असल्याने वैयक्तिक असाईनमेंट कमी असतात. ग्रुप असाईनमेंटमुळे इतरांशी संवाद वाढतो. शिवाय प्रत्येकाच्या स्वभावानुसार मित्रपरिवार कमी-जास्त असतो. इथे वेगवेगळ्या देशांतील शिक्षणपद्धतींत शिकलेले विद्यार्थी आहेत. प्राध्यापकांचं शिकवणं लक्षपूर्वक ऐकलं जातं. सखोल चर्चा केली जाते. शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावलेला असतो. काही प्राध्यापकांचं शिकवणं तितकंसं चांगलं न वाटल्याने त्याविषयी आम्ही डीनशी चर्चाही केली. इथे प्राध्यापकांबद्दल योग्य ते मत विद्यार्थ्यांनी सांगणं अनिवार्य आहे. मत सांगितलं नाही तर विद्यार्थ्यांना ग्रेड सांगितली जात नाही. काही प्राध्यापकांशी माझा चांगला संवाद होत असून त्यांचं मार्गदर्शन मिळत आहे. आम्हाला काही कंपन्यांच्या केसेसचा अभ्यास करावा लागतो. आम्ही शिकत असलेली तत्त्वं त्या केसमध्ये कशी वापरता येतील, हा विचार करावा लागतो. ग्रुपमध्ये चर्चा केली जाते. विश्लेषण केलं जातं. असाईनमेंट सबमिशनच्या वेळी पुन्हा वर्गात चर्चा केली जाते. थेट चूक – बरोबर असं न सांगता प्राध्यापक मार्गदर्शन करतात. प्राध्यापक आमच्याकडून अधिकाधिक केसेसचा अभ्यास करून घेतात. त्याला एक्सपिरिअन्स बेस्ड लर्निंग म्हटलं जातं. सतत काही ना काही अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये वर्गाला गुंतवून ठेवलं जातं. उदाहरणार्थ – ऑर्गनायझेशन बिहेवियरची एक टेस्ट झाली. त्यात मी गटनेता होतो आणि आमच्या गटाला माऊंट एव्हरेस्ट चढून न्यायचं होतं. एकदा स्टॅटिस्टिक्स विषयाची संकल्पना प्राध्यापकांनी टेबलावरती उभं राहून आत्मीयतेनं समजावली होती. शिवाय त्या शिकवण्याला संगीताची जोडही दिली होती. प्रत्येकाची शिकवायची तऱ्हा विभिन्न असते. इथे गुणांची चर्चा केली जात नाही. स्टिम्युलेशनच्या एका सरावात माझा ग्रुप सगळ्यात शेवटी आला. त्यानंतर आम्ही खूप मेहनत घेतली आणि पुढचे प्रोजेक्ट चांगले झाले. एक ग्रुप प्रेझेंटेशनमध्ये पाच मिनिटांत नवीन संकल्पना मांडायची होती आणि स्टडी मटेरिअलचा रोलरकोस्टर करायचा होता. त्यात आमची सरशी झाली, कारण आमच्या ग्रुपमधल्या ब्रिटिश विद्यार्थ्यांने लव्ह रोलर कोस्टर तयार करायची नामी कल्पना सुचवली होती. ती कल्पना अनेकांनी उचलून धरली. प्रत्येकाने आपल्या क्षमता आणि गुण ओळखून त्यांचा योग्य तो वापर केल्यावर टीमवर्कचं महत्त्व आपसूकच  अधोरेखित होतं. जेन्डर बॅलन्सच्या एका कोर्समध्ये जेन्डर डायव्हर्सिटी विषयावर काही मिनिटांचा व्हिडिओ तयार करायचा होता. मासिक पाळीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या प्रॉडक्टवर नर्मविनोदी व्हिडीओ आम्ही तयार केला होता.

पॅरिसमध्ये बरंच फिरणं झालं. फ्रेंच संस्कृती आणि समाजाची ओळख करून देणारे काही छोटे कोर्सेस शिकलो. फ्रेंच लोक जीवनाचा आस्वाद घेत जगतात. मात्र कामाच्या वेळी काम किंवा अभ्यासाच्या वेळी अभ्यासच करतात. आपण अनेकदा अतिमेहनतीतच गुरफटून जातो. हे उमगलं असलं तरी ते प्रत्यक्षात घडत नव्हतं. ते इथे घडलं. इथे वेळेचं व्यवस्थापन करायला शिकल्याने अभ्यास आणि एन्जॉय करणं या दोन्हीचा समतोल राखता यायला लागला. पर्यावरणाची योग्य प्रकारे काळजी घेणाऱ्या समाजात वाववरण्याचा आनंद मला मिळतो आहे. या कालावधीत मी याआधी शिकलेल्या गोष्टी निश्चितच उपयोगी पडतात. त्या क्षेत्रातला अनुभव, लोकांशी संवाद साधण्यातलं कौशल्य, काम करून घ्यायची हातोटी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजभानाची महती कळलेली होती. सध्या मी फ्रेंच भाषा शिकतो आहे. इथे इंग्रजी बहुतेकांना कळत असलं तरी कितीही मोडकंतोडकं फ्रेंच बोललात तर लगेच संवाद साधला जातो. इथे काम करायचं तर फ्रेंच भाषा यायला हवी. कॉलेजचीही अट आहे की, पदवी मिळेपर्यंत अमूक एका स्तरापर्यंत फ्रेंच यायला हवं. शिक्षण संपल्यानंतर काही वर्षं इथल्या कामाचा अनुभव घ्यायचा विचार आहे. मला पर्यावरण आणि उर्जा क्षेत्रांत रस असल्याने कदाचित आशिया किंवा आफ्रिकेत जाईन. कारण विकसित देशांत याबाबत बरंच काम सुरू आहे, मात्र विकसनशील देशांत अद्याप बरंच काम बाकी आहे. बघूया काय होतं ते. फक्त तुमच्या शुभेच्छांची गरज आहे.

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com