20 October 2019

News Flash

टेकजागर : ‘इडियट बॉक्स’चं ‘स्मार्ट’ होणं!

टीव्हीचं हे ‘स्मार्ट’ होणं काही आजची गोष्ट नाही. गेल्या आठ-दहा वर्षांत हे बदल होत गेले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

आसिफ बागवान

टीव्ही अर्थात टेलिव्हिजनला ‘इडियट बॉक्स’ का म्हणतात, हा अनेक वर्षांपासून पडणारा प्रश्न. इंटरनेटवर यासंबंधी शोध घेतला तरी, ठोस उत्तर काही मिळालं नाही. टीव्हीचं व्यसन माणसाला इतकं भारून टाकतं की, त्याची विचारशक्ती सीमित होत जाते, असा एका व्याख्येतील सूर. तर टीव्हीचं सतत बडबडत राहणं आणि तरीही समोरच्या व्यक्तीशी (प्रेक्षकाशी) दुतर्फा संवाद करण्याची क्षमता नसणं या गुणांमुळे त्याला ‘इडियट बॉक्स’ म्हणतात, असा काहींचा दावा. टीव्हीवर दाखवले जाणारे कार्यक्रम पाहिले तर त्याला ‘इडियट बॉक्स’ का म्हणतात, हे आपोआप कळेल, असं सांगणारेही इंटरनेटवर भेटतात. तसं तर यापैकी कोणतीही माहिती अधिकृत नाही; परंतु टीव्हीच्या बाबतीत वरील तिन्ही गुणधर्म तंतोतंत लागू होत असल्यामुळे ‘इडियट बॉक्स’च्या या व्याख्या चूक आहेत, असंही म्हणता येणार नाही.

हा ‘इडियट बॉक्स’ गेल्या काही वर्षांत मात्र ‘स्मार्ट’ बनत चालला आहे. एकीकडे टीव्हीला इंटरनेटशी जोडण्याची सुविधा देणारे ‘स्मार्ट’ टीव्ही बाजारात अगदी परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध झाले आहेत, तर दुसरीकडे इंटरनेटच्या माध्यमातून प्रसारित होणारे कार्यक्रम, मालिका, व्हिडीओ यांचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. यूटय़ूब, हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन, अल्ट बालाजी यांसारख्या ऑनलाइन प्रसारण वाहिन्या आज देशात सर्वाधिक पाहिल्या जात आहेत. या वाहिन्यांद्वारे प्रसारित केला जाणारा ‘कन्टेंट’ पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. अशा ‘ओव्हर द टॉप’ वाहिन्यांमुळे टीव्हीवर काय बघावं आणि काय नको, हे निवडण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहेच; पण ‘इडियट बॉक्स’ म्हणून टीव्हीबाबत केल्या जाणाऱ्या व्याख्याही मोडीत निघाल्या आहेत. एक म्हणजे, आता टीव्ही प्रेक्षकांशी दुतर्फा संवाद साधण्याइतका सक्षम झाला आहे. याचं उदाहरणच द्यायचं झालं तर तुम्ही ‘नेटफ्लिक्स’वर अमुक एक धाटणीच्या मालिका किंवा चित्रपट पाहात असाल तर पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा ‘नेटफ्लिक्स’वर जाता तेव्हा तेथील मेन्यूमध्ये ‘तुमच्या आधीच्या निवडीनुसार’ तयार करण्यात आलेली मालिका किंवा चित्रपटांची यादी समोर दिसते. प्रेक्षकांच्या आवडीनुसार कार्यक्रमांचे पॅकेज एकत्र करून देण्याची ही सुविधा जवळपास सर्वच ‘ओटीटी’ वाहिन्यांवर दिसून येते. आता हा थेट दुतर्फा संवाद नसला तरी किमान प्रेक्षक काय बघतोय, याचं विश्लेषण करण्याची क्षमता टीव्हीमध्ये या ‘स्मार्ट’पणामुळेच निर्माण झाली आहे.

दुसरं म्हणजे, ज्या काळी टीव्हीला ‘इडियट बॉक्स’ म्हणत त्या काळी टीव्हीवरून प्रसारित होणाऱ्या वाहिन्या आणि त्यावरील कार्यक्रम यांची संख्या मर्यादित होती. मात्र, कालौघात टीव्हीवरील प्रसारणाचे स्वरूप पूर्णत: बदलले आहे. प्रादेशिक प्रसारण, केबल प्रसारण, उपग्रह प्रसारण, डिजिटल प्रसारण आणि आता ‘ओटीटी’ प्रसारण अशा टप्प्यांत टीव्हीवरील वाहिन्यांची संख्या वाढत गेली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांकडे काय पाहायचे आणि काय नाही पाहायचे, याची निवड करण्यासाठी मुबलक पर्याय उपलब्ध झाले आहेत. हेही एका अर्थाने स्मार्ट होणे आलेच.

टीव्हीचं हे ‘स्मार्ट’ होणं काही आजची गोष्ट नाही. गेल्या आठ-दहा वर्षांत हे बदल होत गेले आहेत. याची सुरुवात मुख्यत: ‘स्मार्ट’ टीव्ही किंवा टीव्हीला इंटरनेटशी जोडण्याचे काम करणाऱ्या ‘अ‍ॅमेझॉन फायर स्टिक’, ‘गुगल क्रोमकास्ट’ यांसारख्या उपकरणांद्वारे झाली. पाश्चात्त्य देशांत ती पटकन रुळली; परंतु भारतात त्यांचा प्रभाव आता कुठे दिसू लागला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, ‘स्मार्ट टीव्ही’च्या किमतीत झालेली घसरण. सुरुवातीला ‘स्मार्ट टीव्ही’ची किंमत ५० हजारांपासून पुढे सुरू होत होती. नामांकित टीव्ही कंपन्यांचे हे टीव्ही ग्राहकांना आकर्षित करत असले तरी त्यांच्या किमती आपल्या आवाक्याबाहेर असल्याचे पाहून सर्वसामान्य ग्राहक त्याकडे फिरकत नव्हते; परंतु गेल्या दोन-तीन वर्षांत ‘मेड इन चायना’ स्मार्ट टीव्हींनी भारतात जम बसवला आहे. अगदी दहा हजार रुपयांतही ‘स्मार्ट टीव्ही’ उपलब्ध होऊ लागल्याने ग्राहकांचा त्याकडे ओढा वाढतो आहे.

अर्थात, याला पूरक जोड मिळाली ती इंटरनेटच्या उपलब्धतेची. देशात इंटरनेट सुरू होऊन आता तीन दशकांहून अधिक काळ लोटला; परंतु इंटरनेट खऱ्या अर्थाने गेल्या दशकभरात जास्तीत जास्त लोकसंख्येपर्यंत पोहोचले आहे. मोबाइल इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सर्वसामान्यांनाही इंटरनेटची गोडी लागली आहे. संगणकाचा वापर वाढल्याने घरोघरी इंटरनेट पोहोचले आहे. त्यातच इंटरनेट आता प्रचंड स्वस्त दरात उपलब्ध झाले असून त्याचा वेग मात्र वाढत चालला आहे. साहजिकच इंटरनेटची सहज उपलब्धता आणि परवडणारा स्मार्ट टीव्ही यामुळे टीव्हीचं स्वरूप बदललं आहे.

एकीकडे हे बदल होत असताना, टीव्हीच्या डिजिटल प्रसारणातील बदलांचाही परिणाम दिसून येतो आहे. ‘ट्राय’ने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात केबल तसेच डीटीएचच्या दरांचे समानीकरण करण्यासाठी वाहिन्यांवर आधारित शुल्करचना लागू केली. केबलचालकांकडून आकारण्यात येणारे मनमानी शुल्क आणि डीटीएच सेवा पुरवठादारांकडून वाहिन्यांच्या पॅकेजच्या नावाखाली वाढवण्यात येणारी किंमत यांना आळा घालण्यासाठी ‘ट्राय’ने नवीन नियमावली अमलात आणली. या नियमावलीमुळे वापरकर्त्यांना केवळ आपल्या पसंतीच्या वाहिन्याच निवडून त्यांचेच पैसे देण्याचा अधिकार मिळाला. त्यामुळे टीव्ही वाहिन्या पाहणे स्वस्त होईल, असे दावे केले जात होते; परंतु गेल्या तीन महिन्यांत ही नियमावली ग्राहकांनाच अधिक भुर्दंड देणारी ठरत असल्याचे चित्र आहे. वाहिन्यांच्या शुल्कानुसार आपल्या पसंतीच्या वाहिन्यांची निवड केल्यानंतर ग्राहकांना आधी मोजत होते त्याच किंवा त्यापेक्षा जास्त मासिक शुल्कात कमी वाहिन्या पाहायला मिळत आहेत. या नियमावलीबाबत अजूनही ग्राहकांमध्ये पुरेशी जनजागृती झाली नसल्याने त्यांना टीव्ही पाहण्यासाठी अधिक शुल्क मोजावे लागते आहे. अशा परिस्थितीत अनेक ग्राहकांनी आपला मोर्चा इंटरनेटवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांकडे वळवल्याचे दिसून येते. एका सर्वेक्षणानुसार, ‘ट्राय’ची नवी नियमावली लागू झाल्यापासून ८० टक्के ग्राहकांनी डीटीएच किंवा केबलऐवजी ‘ओटीटी’ वाहिन्यांना पसंती दिली आहे. ‘हॉटस्टार’ या देशातील अग्रगण्य ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवेच्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान ‘हॉटस्टार’च्या प्रेक्षकांची संख्या २६ कोटी ७० लाखांवर पोहोचली आहे. अन्य एका आकडेवारीनुसार ‘ओटीटी’ कार्यक्रम पाहणाऱ्यांचे प्रमाण ग्रामीण भागातही ६० टक्क्यांवर पोहोचले आहे. अर्थात यात मोबाइलवरून हे कार्यक्रम पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे; परंतु तरीही ‘ओटीटी’ कार्यक्रमांना मिळत असलेल्या पसंतीचे हे निदर्शक आहे. अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्स, हॉटस्टार या ‘स्ट्रीमिंग’ सेवावरून प्रसारित झालेल्या काही वेबसीरिज देशात प्रचंड लोकप्रिय ठरल्या. सॅक्रेड गेम्स, क्रिमिनल जस्टिस, ‘डॅमेज्ड’ अशा वेबसीरिज चांगल्याच लोकप्रिय ठरू लागल्या आहेत.

हे सगळे चित्र पाहता, येणाऱ्या काळात टीव्ही अधिकाधिक ‘स्मार्ट’ होईल, यात शंका नाही. ‘इडियट बॉक्स’कडून ‘स्मार्ट’ होण्यापर्यंतचा टीव्हीचा प्रवास हा तंत्रज्ञानातील प्रगतीमुळेच शक्य झाला आहे. या प्रगतीमुळे टीव्हीवर ‘काय आणि किती बघावं?’ यासाठी प्रेक्षकांना पर्याय उपलब्ध झाला आहे. फक्त तो प्रेक्षक किती वापरतात, हे येत्या काळात लक्षात येईल. सुरुवातीला प्रेक्षकांनी काय बघावं, हे सरकार ठरवत होतं. मग तो अधिकार वाहिन्यांकडे, केबलचालकांकडे आणि डीटीएच सेवा कंपन्यांकडे गेला. आता हळूहळू तो अधिकार ‘ओटीटी’ सेवा पुरवणाऱ्या वाहिन्यांकडे जात आहे. हे स्थित्यंतर होत असताना प्रेक्षकांनी आपली निवड आणि आवड ठामपणे मांडली नाही तर टीव्हीचं स्मार्ट होणं, हे केवळ तंत्रज्ञानापुरतं उरेल.

viva@expressindia.com

First Published on May 3, 2019 12:12 am

Web Title: article on smart idiot box