03 August 2020

News Flash

टेकजागर : मित्र तोच जाणावा..

टिपिकल’ मैत्रीपलीकडे सध्या एक नवा मित्रपरिवार वाढू लागला आहे. तो मित्रपरिवार म्हणजे समाजमाध्यमांवरील मित्रपरिवार.

(संग्रहित छायाचित्र)

आसिफ बागवान

समाजमाध्यमांमुळे प्रत्येकाचे जग विस्तारले गेले आहे. त्याच वेळी वेगवेगळ्या प्रांत, भाषा, धर्म, जातीची माणसे जवळ आली आहेत. यातून मैत्रीचे नवे बंधही निर्माण होत आहेत. मात्र ही मैत्री खरेच मैत्री असते?

मैत्री हे मानवी जीवनातले महत्त्वाचे नाते आहे. केवळ जन्मामुळे जोडले न जाणारे आणि तरीही आयुष्यभर घट्ट राहील, असे नाते मैत्रीचे असते. लहानपणापासूनचा एखादा शाळूसोबती असो की, गल्लीत उठताबसता सतत सोबत असणारा सवंगडी असो, नोकरीत आपल्याला प्रत्येक वेळी सांभाळून घेणारा किंवा त्याचबाबतीत आपल्याकडून अपेक्षा ठेवणारा सहकारी असो की, उतारवयात सकाळच्या फेरफटक्यादरम्यान न चुकता आपली सोबत करणारा साथी असो, आयुष्याच्या वाटेवर आपल्याला नवनवे मित्र गवसत जातात आणि त्यासोबत मैत्रीच्या सखोल नात्यातील निरनिराळे पदर अलगद उलगडत जातात. जीवनात वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटणाऱ्या मित्रांचा एक मोठा समूह प्रत्येक जण बाळगून असतो. मात्र या ‘टिपिकल’ मैत्रीपलीकडे सध्या एक नवा मित्रपरिवार वाढू लागला आहे. तो मित्रपरिवार म्हणजे समाजमाध्यमांवरील मित्रपरिवार.

आज स्मार्टफोन वापरणाऱ्या आणि इंटरनेटशी जोडलेल्या प्रत्येकाचे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी समाजमाध्यम समूहांवर अस्तित्व आहे. बहुतांश जण वरीलपैकी सर्वच समाजमाध्यम अ‍ॅपशी संलग्न आहेत. यापैकी प्रत्येक अ‍ॅपवर त्यांचा मोठा मित्रपरिवार तयार झालेला असतो. त्यामध्ये आधीपासून तयार झालेली मित्रमंडळी असताताच; पण त्याखेरीज परिचय असलेली, तोंडओळख असलेली, एकाच शाळेत शिकलेली आणि एकदाही प्रत्यक्षात न भेटलेली मित्रमंडळीही असतात. या सर्व मंडळींमुळे समाजमाध्यमांवरील अनेकांचा मित्रपरिवार एकत्रितपणे हजाराच्या वर गेलेला असू शकतो. पण त्यांना खरेच मित्र म्हणायचे का?

फेसबुक, ट्विटर यांसारख्या मोठय़ा व्यासपीठांवर सक्रिय झाल्यानंतर आपण नवनवीन मित्र जोडत जातो. सुरुवातीला आपल्या खऱ्या मित्रांपासून याची सुरुवात होते. मग हळूहळू त्यात केवळ परिचय असलेले, कुटुंब किंवा गोतावळ्यातील मित्र जमा होतात. पुढे सारखी आवड, छंद किंवा विचारसरणी असलेल्या व्यक्तींची त्यात मित्र म्हणून भर पडते. यातल्या अनेकांना आपण प्रत्यक्षात ओळखतही नाही, पण तरीही आपण त्यांच्या ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ स्वीकारतो किंवा बऱ्याचदा फेसबुकच आपल्याला ‘फ्रेंड्स यू मे नो’ असे सांगून नवनवीन मित्र सुचवते. असे करत करत आपला मित्रपरिवार प्रचंड विस्तारत जातो. ट्विटरवर त्याला मित्र (फ्रेंड) याऐवजी पाठीराखे (फॉलोअर्स) असा शब्द आहे. इन्स्टाग्रामवरही असे मित्र आपण जोडत जातो. तर व्हॉट्सअ‍ॅपवर एका ग्रुपवर सदस्य असलेल्या दोन व्यक्ती आपोआप मित्र म्हणून गणल्या जातात. समाजमाध्यमांवर आपला मित्रपरिवार किती मोठा आहे, हे दाखवण्याच्या प्रयत्नात आपण अनेकदा अकारण मित्र जोडत जातो. समोरून येणारी एखादी ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ मंजूर केली तर बिघडले कुठे, असा आपला त्यामागचा विचार असतो. पण इथेच आपण फसतो आणि आपल्या खऱ्या मित्रांपासून किमान समाजमाध्यमांवर तरी दुरावत जातो. कसे? तर जेव्हा तुम्ही नवीन मित्र जोडता तेव्हा त्या मित्रासोबतच त्याचे मित्र आणि त्या मित्रांचे मित्र आणि त्याही मित्रांचे मित्र अशी एक अदृश्य साखळी निर्माण होते. ही साखळी फेसबुकमार्फत सक्रिय होते आणि तुम्हाला तुमच्या फेसबुक पानावर या सगळ्यांच्या पोस्ट, अपडेट, छायाचित्र, व्हिडीओ दिसू लागतात. अशा अपडेट्सचा मारा तुमच्यावर होऊ लागतो आणि तुमच्या मूळ मित्रांच्या पोस्ट त्यात कुठे हरवून जातात, हे तुम्हाला समजतही नाही. अर्थात तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींपासून दूर करणे, हा फेसबुकचा हेतू नसतो. सोशल नेटवर्किंगचा गाभाच अशा एकमेकांना जोडणाऱ्या व्यक्तींच्या साखळीवर आधारित आहे. मात्र त्या नादात तुमचा तुमच्या मूळ मित्रांशी असलेला संपर्क आपोआप कमी होत जातो.

समाजमाध्यमांवर असंख्य मित्र असणे म्हणजे आपण किती ‘सोशल’ आहोत, हे दाखवण्याचाही एक ट्रेण्ड आहे. अनेकांना ते प्रतिष्ठेचे लक्षण वाटते. पण यापैकी किती मित्रमंडळींच्या आपण संपर्कात असतो, हा प्रश्नच आहे. एखाद्या मित्राच्या पोस्टला ‘लाइक’ करणे किंवा त्यावर ‘कमेण्ट’ करणे म्हणजे ‘कनेक्टेड’ असणे, ठरत नाही. समाजमाध्यमांप्रमाणेच त्यावरील दोन व्यक्तींमधील संवादही कृत्रिम होत चालला आहे. एकमेकांच्या पोस्टला लाइक करणे, वेगवेगळ्या इमोजींच्या माध्यमातून प्रतिक्रिया देणे एवढेच आपण करत असतो. अनेकदा तर एखाद्या मित्राच्या वाढदिवसाला त्याच्या ‘फेसबुक वॉल’वरून शुभेच्छा देतानाही आपण स्वरचित शब्दांपेक्षा तयार ‘जीआयएफ’ किंवा चित्रांचा आधार घेतो. मित्राशी संबंधित एखाद्या व्यक्तीच्या निधनाच्या पोस्टवर ‘आर.आय.पी.’ अशी बेगडी श्रद्धांजली देऊन आपण मोकळे होतो. फेसबुक, ट्विटर किंवा इन्स्टाग्राम सोडाच, पण व्हॉट्सअ‍ॅपवरूनही दोन व्यक्तींमधील संवादामध्ये ‘इमोजींचा वापरच अधिक वाढल्याचे दिसून येते. अशा प्रकारचा कृत्रिम किंवा तोंडदेखला संवाद कोणती मैत्री दृढ करतो?

सध्या प्रत्येकाचे आयुष्य धावपळीने भरलेले आहे. या धावत्या दिनक्रमात अनेकदा आपल्या कुटुंबासाठीही पुरेसा वेळ देता येत नाही. त्यात मित्रमंडळींना भेटण्याची किंवा त्यांच्याशी नियमितपणे बोलण्याची संधी प्रत्येकालाच मिळते, असे नाही. अशा वेळी ‘आपण समाजमाध्यमांवर एकमेकांशी कनेक्टेड आहोत’ या विचाराने आपण स्वत:ची समजूत काढत असतो. पण समाजमाध्यमांवरील कृत्रिम संवादामुळे मैत्रीच्या नात्यात हळूहळू कोरडेपणा येऊ लागतो आणि आपल्यातील बंध कमकुवत होत जातात. हे सगळे आपल्या इतक्या नकळत घडत असते की, ते पूर्णपणे लक्षात येईपर्यंत मित्रांमधील दुरावा कमालीचा वाढलेला असतो. याउलट आठवडय़ाच्या एखाद्या सुट्टीच्या दिवशी का होईना पण तासभर मित्रांना भेटणे किंवा त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणे हे कधीही चांगले.

समाजमाध्यमांवर कुणाचे किती मित्र असावेत, याला काही मर्यादा नाही. परंतु, यासंदर्भात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील मानसशास्त्र विभागातील एका प्राध्यापकांनी मध्यंतरी केलेल्या संशोधनानुसार, समाजमाध्यमांवर आपण जास्तीत जास्त दीडशे मित्र व्यवस्थित सांभाळू शकतो. आपल्या मेंदूची क्षमता तितके मित्र हाताळण्याची परवानगी देते, असे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या प्रत्यक्ष जीवनातील आणि ऑनलाइन मित्रमंडळींचा हा आकडा मेंदूमधील ‘न्यूकॉर्टेक्स’ या भागावर अवलंबून असतो. हा भाग एकूणच मानवी नातेसंबंधांचे व्यवस्थापन करण्याचे काम करत असतो. हा ‘न्यूकॉर्टेक्स’ जितका मोठा तितके जास्त नातेसंबंध आपण व्यवस्थितपणे हाताळू शकतो. त्यात मित्रपरिवारही आलाच. त्यानुसार आपण साधारणपणे दीडशे मित्रांशी चांगले, सुदृढ नाते कायम ठेवू शकतो, असा या संशोधनाचा निष्कर्ष. पण त्यासोबतच समाजमाध्यमांवर आपण किती वेळ घालवतो, त्यावरही हे मैत्रीचे समीकरण अवलंबून असते, असा या प्राध्यापकांचा दावा आहे.

भावनेशी जुळलेल्या कोणत्याही गोष्टीचे अचूक शास्त्रीय विश्लेषण करणे कठीणच वाटते. पण तरीही ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापकांच्या या संशोधनातील निष्कर्षांशी आपल्यापैकी अनेक जण सहमत होतील. याचे कारण साधे सरळ आहे. जितके जास्त मित्र किंवा नातलग तितकी आपली भावनिक गुंतागुंत अधिक वाढते. अशा वेळी आपल्यावर अनेकदा स्वत:च्या मतांशी, भावनांशी तडजोड करण्याची वेळ येते. त्यातून चिडचिड, नैराश्य निर्माण होऊ शकते. एकूणच हे सगळे आपल्याला न सोसवण्याच्या पातळीवर घेऊन जाते.

समाजमाध्यमांवरील मैत्रीच्या या खेळात प्रत्येकाला आपापल्या क्षमतेनुसार मित्र गोळा करण्याचा अधिकार नक्कीच आहे. जास्त मित्र असू नयेत, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. मात्र, ज्यांना आपण मित्र म्हणतो, त्यांना त्या नात्यानुसार आपण न्याय देऊ शकणार नसू तर, त्या मैत्रीला काय अर्थ उरला? मैत्री हे निरपेक्ष, निर्व्याज नाते आहे. पण संवाद, भेटीगाठी हा त्याचा प्राणवायू आहे. समाजमाध्यमांवरून आपण त्याला ‘कृत्रिम श्वसनपुरवठा’ करूही शकतो. पण त्यावर ते नाते किती काळ टिकेल, हे सांगता येणे कठीण आहे.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 5:08 am

Web Title: article on social media friends abn 97
Next Stories
1 फिट-नट : चिराग पाटील
2 ओळख ऑस्ट्रेलियन खाद्यसंस्कृतीची!
3 जगाच्या पाटीवर : ही वाट दूर जाते..
Just Now!
X