23 January 2020

News Flash

क्षण एक पुरे! : सॉक्सोहॉलिक

‘सॉक्सोहॉलिक’ हे खरं तर त्याच्या ब्रॅण्डचं नाव आहे. नावावरून जे वाटतं त्याच वस्तूचा हा ब्रॅण्ड आहे, अर्थात सॉक्सचा!

(संग्रहित छायाचित्र)

वेदवती चिपळूणकर

शिक्षणाने इंजिनीयर असलेला, नंतर अ‍ॅनिमेशनचं प्रोफेशनल शिक्षण घेतलेला आणि पेशाने प्रोफेशनल फोटोग्राफर असणाऱ्या अभिजीत देसाई या तरुणाने  ‘सॉक्सोहॉलिक’ नावाचा ब्रॅण्ड सुरू केला आहे. त्याच्या या ब्रॅण्डअंतर्गत त्याने सॉक्सची अनेक ‘क्वर्की’ डिझाइन्स आणली आहेत..

‘सॉक्सोहॉलिक’ हे खरं तर त्याच्या ब्रॅण्डचं नाव आहे. नावावरून जे वाटतं त्याच वस्तूचा हा ब्रॅण्ड आहे, अर्थात सॉक्सचा! सामान्यत: आपण सॉक्सचा ब्रॅण्ड बघत नाही आणि बघितलाच तरी तो बहुतांशी वेळेला ज्या कंपनीचे शूज असतात त्याच कंपनीचा ब्रॅण्ड असतो. बेबी सॉक्स सोडता बाकी सगळे सॉक्स हे अनेकदा प्लेनच असतात. सॉक्सना डिझाइन, पॅटर्न, प्रिंट, रंगीबेरंगी कॉम्बिनेशन्स या गोष्टींशी काही देणंघेणं नसतं. मात्र ‘हॅप्पी सॉक्स’सारख्या काही विदेशी कंपन्यांनी डिझायनर सॉक्स या प्रकारात चांगलाच जम बसवला आहे. याच धर्तीवर अभिजीत देसाई या तरुणाने इथल्या इथे स्वत:ची डिझाइन्स सॉक्सवर आणून आपला व्यवसाय उभा केला. सोशल मीडियाची त्याला यासाठी सर्वाधिक मदत झाली. शिक्षणाने इंजिनीयर असलेला, नंतर अ‍ॅनिमेशनचं प्रोफेशनल शिक्षण घेतलेला आणि पेशाने प्रोफेशनल फोटोग्राफर असणाऱ्या अभिजीतने सॉक्सची अनेक ‘क्वर्की’ डिझाइन्स आणली आहेत.

एखादं मोठं पाऊल उचलण्यासाठी लहानशी प्रेरणाही पुरेशी असते. एखाद्या व्यक्तीचं एखादं वाक्य, एखादं मत हे विचार करायला प्रवृत्त करतं आणि त्यातून कृती करण्याचं धारिष्टय़ही देतं. अभिजीत त्याच्या इन्स्पिरेशनबद्दल बोलताना म्हणाला, ‘माझी मुलगी इंद्रायणी लहान आहे. ती जेव्हा पहिल्यांदा शाळेत जायला लागली तेव्हा त्यांना एक युनिफॉर्म होता. त्या युनिफॉर्मनुसार सॉक्सचे तीनच रंग वापरायला त्यांना परवानगी होती ते म्हणजे निळा, काळा आणि पांढरा. त्या वेळी बोलता बोलता ती मला म्हणाली की, हे सॉक्स खूप बोअरिंग आहेत. त्याच्यावर काही चित्र नाही, वेगवेगळे रंग नाहीत. असे सॉक्स तिला घालायला अजिबात आवडत नव्हते. त्यावरून मला सहज कल्पना सुचली की आपण सॉक्समध्ये डिझाइन्स, पॅटर्न्‍स, रंग आणले तर.. माझी पत्नी कमर्शियल आर्टिस्ट आहे. तिच्याशी बोलून मी हा निर्णय पक्का केला. तिलाही ही कल्पना खूप आवडली आणि तिने या सगळ्या डिझायनिंगमध्ये मला खूप मदत केली. कोणत्या रंगावर काय चांगलं दिसेल, कोणती डिझाइन्स सगळ्यात जास्त आवडू शकतील, कोणकोणते रंग कॉर्पोरेट्समध्येसुद्धा चालू शकतील अशा अनेक महत्त्वाच्या बाबींमध्ये तिचं मत खूप महत्त्वाचं होतं.’ आर्टिस्ट असल्यामुळे तिच्याकडे ती व्हिजन आहे, केवळ वर्णनावरून ती चित्र डोळ्यासमोर आणू शकते. या सगळ्याचं मूळ माझी मुलगी असल्याने तिनेही प्रत्येक डिझाइन पाहून तिची मतं वेळोवेळी दिली आणि आम्हीही ती विचारात घेतली, असं अभिजीत सांगतो.

एखादा व्यवसाय उभा करताना महत्त्वाची असते ती सुरुवातीची गुंतवणूक. त्यातूनही स्वत:चं प्रॉडक्शन सुरू करायचं असेल तर या गुंतवणुकीची रक्कम आपसूकच वाढते. अशा वेळी गुंतवणूक आणि व्यवसायातून मिळू शकणारा अंदाजे नफा याची सांगड घालणं ही मोठी जिकिरीची कामगिरी असते. या सुरुवातीच्या अनुभवातून गेल्याशिवाय कोणताच व्यवसाय खंबीरपणे उभा राहत नाही. या अनुभवाबद्दल अभिजीत म्हणतो, ‘कस्टमाइज्ड डिझाइन्स करून देण्यासाठी मोठमोठे मॅन्युफॅ क्चर्स तयार होते. मात्र त्यांना त्यासाठी प्रत्येक डिझाइनची मोठय़ा संख्येने ऑर्डर देणं गरजेचं होतं. एवढी मोठी ऑर्डर देऊन माझ्यासाठी ती रिस्क ठरली असती, कारण तेवढा सेलच झाला नाही तर मी तोटय़ात गेलो असतो. छोटय़ा ऑर्डरसाठी विशिष्ट डिझाइन बनवणं त्यांनाही परवडणारं नव्हतं. माझा शोध सुरूच होता आणि प्रत्येक ठिकाणी हीच अडचण येत होती. तेव्हा एकदा मनात विचार आलाही होता की, एवढे महिने यावर विचार करण्यात घालवले आणि जे पाऊल उचलायचं ठरवलं ते चुकलं तर नाही ना! हे ऑर्डर आणि किंमत यांचं गणित काही जमत नव्हतं. पण मी प्रयत्न सोडले नाहीत. अखेरीस दोघे जण यासाठी तयार झाले. त्यांनाही तेच ते टिपिकल काळे-पांढरे सॉक्स बनवून कंटाळा आला होता. पहिली ऑर्डर झाली की पुढच्या ऑर्डरही त्यांनाच देण्याची अट त्यांनी घातली जी त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठीही फायद्याचीच होती. तिथून आमचं पुढचं काम सुरू झालं, अशा शब्दांत आपल्या व्यवसायाचा शुभारंभ कसा झाला, याची माहिती अभिजीतने दिली.

‘सॉक्सोहॉलिक’ हे नाव ठेवताना अभिजीतने विचार आणि अभ्यास दोन्ही केला होता. त्याच्या मते त्याचे हे सॉक्स फक्त त्याच व्यक्तींसाठी आहेत ज्यांना काही तरी वेगळं ट्राय करण्यात रस आहे, सॉक्स या गोष्टीला त्यांच्या दृष्टीने महत्त्व आहे आणि जे खरोखर सॉक्सशिवाय राहूच शकत नाहीत. त्याच्या डिझाइन्सबद्दल तो म्हणतो, ‘ज्या वेळी बऱ्याच नातेवाईकांना आपल्या व्यवसायाबद्दल माहिती असतं त्या वेळी आपले सुरुवातीचे ग्राहक तेच बनतात आणि आपल्याला रिव्ह्य़ूजही देतात. मी हा व्यवसाय सुरू करतो आहे हे माझी अगदी जवळची माणसं सोडता कोणालाही माहीत नव्हतं. त्यामुळे एकदम सुरुवातीला मला थोडा स्ट्रगल जास्त करावा लागला. माझ्या काही मित्रांना मी सॅम्पल्स म्हणून काही डिझाइन्स दिली होती जी त्यांनी त्यांच्या कॉर्पोरेटमध्येही वापरली आणि त्यांच्या ऑफिसमधल्या रिव्ह्य़ूजमधून मला माझ्या डिझाईन्सचं यश समजलं.’ सध्या त्याच्याकडे २०हून अधिक डिझाइन्स आहेत. पिझ्झा, डोनट्स, स्ट्राइप्स अशा अनेक प्रकारांत आणि अनेक रंगांत सॉक्स माझ्याकडे आहेत. सध्या यात अ‍ॅंकल लेन्थ आणि फुल लेन्थ असे दोन प्रकार आहेत. हळूहळू याचे प्रकार आणि साइज वाढवण्याचा माझा प्रयत्न आहे, असं तो म्हणतो.

एखाद्या लहानशा इच्छेने प्रेरित होऊन वेगळं काही तरी सुरू करणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करताना आपलं कामही न सोडणं ही आजच्या तरुण पिढीची खासियत आहे. अभिजीत केवळ हा व्यवसायच करत नाही तर तो त्याच वेळेला त्याची फोटोग्राफीही सांभाळतो. भारती विद्यापीठातून इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनीयरिंग केलेल्या अभिजीतने धोपटमार्गाने न जाता आधी अ‍ॅनिमेशन शिकून त्यात जवळजवळ दहा वर्ष काम केलं. आवड म्हणून स्वीकारलेल्या प्रत्येक क्षेत्रात जीवतोड मेहनत घेण्याची तयारी आणि चौकटीबाहेरचा निर्णय घेण्याचं धाडस या दोन गोष्टी अशा अचिव्हर्सकडून नक्कीच घेण्यासारख्या असतात.

‘आपल्याला सुचणाऱ्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी थोडी हिंमत करता आली पाहिजे. आपल्याला जे करावंसं वाटतं ते करण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी असली पाहिजे. कोणतंही नवीन आव्हान पेलताना थोडी कल्पकता, थोडा प्रॅक्टिकल विचार, थोडा संयम, अशा सगळ्याची आवश्यकता असते. या सगळ्या गोष्टी आपल्या आत असतात, फक्त त्यांना प्रयत्नाने कामाला लावावं लागतं. तेवढं जमलं की मग काहीच कठीण नसतं.’

अभिजीत देसाई

First Published on July 19, 2019 1:48 am

Web Title: article on soxoholic brand abhijit desai abn 97
Next Stories
1 टेकजागर : मोबाइल छायाचित्रणाचा आनंद
2 फिट-नट : आशुतोष पत्की
3 जगाच्या पाटीवर : संशोधनाची मॅजिक बुलेट
Just Now!
X