25 April 2019

News Flash

डिझायनर मंत्रा : स्टार डिझायनर – रॉकी एस

कधी लंडन फॅशन तर कधी मिलान फॅशन वीक अशा एक ना अनेक फॅशन शोजमध्ये आपलं कलेक्शन सादर करणारा भारतीय फॅशन डिझायनर म्हणजे रॉकी एस

(संग्रहित छायाचित्र)

तेजश्री गायकवाड

कधी लंडन फॅशन तर कधी मिलान फॅशन वीक अशा एक ना अनेक फॅशन शोजमध्ये आपलं कलेक्शन सादर करणारा भारतीय फॅशन डिझायनर म्हणजे रॉकी एस. १९९५मध्ये रॉकीने त्याचं रॉकी स्टार हे लेबल सुरू केलं. इतकी र्वष फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम केलेल्या रॉकीने आधी वाणिज्य शाखेत पदवी घेतली आणि नंतर फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं. त्याबद्दल तो सांगतो, ‘‘मी वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे, पण एका क्षणी मला जाणवलं की मी फॅशनकडे ओढला जातो आहे. त्यानंतर मी एका फॅशन डिझाइन स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचाच असा निर्णय घेतला आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी लवकरच चित्रपट आणि सेलिब्रिटीजसाठी स्टायलिंग करायला सुरुवात केली.’’

इतर फॅशन डिझायनरप्रमाणेच त्यानेही त्याचं लेबल सुरू केलं. ‘‘मी माझं लेबल ‘रॉकी स्टार’ सुरू केलं. पण फक्त हे लेबल सुरू होणं एवढाच माझा प्रवास नव्हता. मला भारताला जागतिक फॅशनच्या नकाशावर नेऊन ठेवायचं होतं, खूप मोठं होताना बघायचं होतं,’’ असं तो सांगतो. त्याने करिअरच्या सुरुवातीच्या काळात जणू काय ही शपथच घेतली होती. आणि म्हणूनच तो पॅरिस, मिलान, लंडन अशा मानाच्या फॅशन वीकमधून आपलं कलेक्शन सादर करत राहिला, आपल्या देशाचं नाव मोठं करत राहिला. रॉकीने जागतिक फॅशनच्या नकाशावर भारताला मोठं तर केलंच, पण भारतीय टेक्स्टाईल, परंपरा अशा सगळ्या गोष्टीही ग्लोबली अनेकांपर्यंत पोहोचवल्या. ‘‘माझ्या कलेक्शनमधील डिझाइन्स हे कन्टेम्पररी असतात, पण त्या अ‍ॅस्थॅटिकली अर्थात त्यातलं सौंदर्य हे भारतीयच असतं,’’ असं तो म्हणतो. आपल्या देशाची समृद्धी आणि साधेपणा मला प्रेरणा देतो. माझ्या प्रत्येक कलेक्शनमध्ये भारतीय संस्कृती खोलवर रुजलेली तुम्हाला दिसेल. आंतरराष्ट्रीय ग्राहकांनासुद्धा या कलेक्शनमधील भारतीय सौंदर्य, कलाच आकर्षित करते. मी भारतीय हस्तकला, तंत्र आणि हस्तकलेच्या अनेक पद्धतींचा वापर माझ्या प्रत्येक डिझाइनमध्ये केला आहे, असं तो जाणीवपूर्वक सांगतो.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाला रिप्रेझेंट करायचं म्हणजे कोणाची छाती अभिमानाने फुलणार नाही. अशा ग्लोबल प्लॅटफॉर्मवर सातत्याने कलेक्शन सादर केल्यामुळे जागतिक फॅशन मार्केट आता व्यवस्थित समजू लागलं आहे, असं तो सांगतो. या प्लॅटफॉर्मवर अजून भारतातील अनेक गोष्टी सादर करायच्या आहेत. जागतिक डिझायनर्सच्या बरोबरीने आपल्याही कामाची प्रशंसा होतेय ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आता असंही म्हटलं जातंय की आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांचं लक्ष भारतीय डिझायनर्स, त्यांच्या डिझाइन्स याकडे वळलं आहे. त्यामुळेच भारतानेही जागतिक बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केलं असल्याची माहिती त्याने दिली.

बॉलीवूड आणि रॉकी एस यांचेही अनोखं नातं आहे. बॉलीवूडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा खिलाडी अर्थात अक्षय कुमारने त्याचे कपडे घातले होते, अशी आठवण तो सांगतो. अक्षय कुमार या नावानंतर प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय बच्चन, कतरिना, हृतिक रोशन आणि अजून कितीतरी सेलिब्रिटी नावांची मांदियाळी त्याच्या कलेक्शनवर फिदा होत गेली. त्याच्या बॉलीवूड ग्राहकांची यादी तेव्हापासून वाढतीच राहिली आहे. अर्थात तो फक्त बॉलीवूड सेलिब्रिटींसाठीच डिझाइन करतो असं नाही. बेयन्स, पॅरिस हिल्टन, निकोल झिंगझिंगर अशा इंटरनॅशनल सेलिब्रिटींसाठीही तो डिझाइन करतो. हॉलीवूड आणि बॉलीवूड दोन्हीकडच्या व्यक्तींसाठी डिझाइन कसं करतोस?, असं विचारल्यावर रॉकी म्हणतो, ‘‘माझ्या करिअरच्या माध्यमातून, कोणत्याही सेलिब्रिटीसाठी डिझाइन करताना त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घेणं महत्त्वाचं असतं. त्यानुसार आमच्या ब्रँडच्या डिझाइनशी जुळवून घेत आम्ही कपडे डिझाइन करतो. प्रत्येक सेलिब्रिटी वेगळी असते आणि त्यांची आवश्यकता वेगळी असते. आपण ज्या व्यक्तीसाठी डिझाइन करतो आहोत त्या व्यक्तीला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, हे भारतातील किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या दोन्ही सेलिब्रिटींसाठी त्याच पद्धतीने करावं लागतं.’’

रॉकी कितीतरी मोठे फॅशन शो करतो, मोठय़ा लोकांसाठी डिझाइन करतो पण म्हणून फक्त सेलिब्रिटी डिझायनर म्हणून चौकटीतील प्रतिमेत अडकणं त्याला मान्य नाही. मी फॅशन डिझायनर म्हणून सर्वसामान्यांसाठीही कपडे डिझाइन करतो. तीच माझी खरी ओळख आहे, असं तो म्हणतो. ‘‘मी माझी करिअर सुरू केली तेव्हा सेलिब्रिटीजसाठी डिझाइनिंग करण्यापूर्वी मी माझा कॅचर लेबल सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे लोक फॅशनबाबत अधिक जागरूक झाले आहेत. ते फॅशनचे विविध ट्रेंड फॉलो करतात, विशेषत: सेलिब्रिटीजने घातलेले कपडे फॉलो करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तेव्हापासून मला भारतातील लक्झरी फॅशनच्या दीर्घायुष्याची जाणीव झाली आणि मी माझा ब्रँड सुरू केला. आता मला याच गोष्टीचा आनंद आहे की सामान्य लोकही माझा ब्रँड ओळखतात आणि त्यावर प्रेम करतात,’’ असं त्याने सांगितलं.

नेहमीच काही ना काही तरी नवीन करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या रॉकीने परफ्युम, होम डेकॉर अशा गोष्टीही डिझाइन करायला सुरुवात केली आहे. रॉकी हा पहिला भारतीय फॅशन डिझायनर आहे ज्याने स्वत:चा परफ्युम बाजारात आणला. ‘‘मी सतत नवं काही करण्यावर आणि आपल्या कलेचा विस्तार करण्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे फॅशनच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही नवीन माध्यमातून मी काय करू शकतो याच्या मी कायम शोधात असतो,’’ हेही तो तितक्याच आत्मविश्वसाने सांगतो. त्यामुळेच आपल्या लेबलच्या यशानंतर बाकीच्याही गोष्टी डिझाइन करण्याचा निर्णय घेतल्याचं त्याने सांगितलं. ‘शॉपर्स स्टॉप’च्या सहकार्याने ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्डरॉकी स्टार आर. एस.’ जीन्स त्याने बाजारात आणल्या. या ब्रँडद्वारे मी माझ्या डिझाइन्समध्ये प्रयोग करण्यावर आणि ते रास्त दरात उपलब्ध करण्यावर आपला भर असल्याचं त्याने सांगितलं. होम डेकोर ब्रँड, रॉकी स्टार होम या ब्रँड्सच्या माध्यमातून फर्निचर आणि डेकोरमध्ये उच्च फॅशन आणणं हाच उद्देश ठेवून त्याने त्याच्या लेबलखाली जगभरातील अनेक गोष्टी एकत्रित आणून नानाविध पद्धतीने डिझाइन्स करायचा प्रयत्न त्याने केला आहे.

‘‘नवीन पिढीला, नवीन डिझायनर्सना माझं एकच सांगणं आहे की कठोर परिश्रम करत राहा. आपल्यावर, स्वत:च्या व्यक्तिमत्त्वावर विश्वास ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे इतर ब्रँड आणि डिझायनर्सचं अंशत: अनुकरण करू नका,’’ असं तो म्हणतो. फॅशन उद्योगात लोक नेहमीच नावीन्यपूर्ण डिझाइन शोधत असतात. त्यामुळे या इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्यांचं, नवं काही करू पाहणाऱ्यांचं नेहमीच कौतुक होत असतं. म्हणूनच सर्जनशील व्हा आणि कष्ट करा. शेवटी सर्वकाही योग्य ते योग्य जागी योग्य वेळी तुम्हाला मिळेलच, असा मंत्रही तो सगळ्यांना देतो.

viva@expressindia.com

First Published on February 1, 2019 1:10 am

Web Title: article on star designer rocky s