News Flash

स्टाईल ‘से’ साडी

साडी आणि ब्लाऊजमध्ये आलेला ट्रेण्ड, बदल यांचं मूळ  कम्फर्टमध्ये आहे

फोटो सौजन्य : सुता, उज्ज्वल तारा

तेजश्री गायकवाड

गेल्या काही वर्षांत फॅशनच्या बदलत्या परिणामांचा प्रभाव साडीवरही पडला आहे. पारंपरिक वस्त्रप्रकार म्हणून त्याकडे न बघता, त्यात प्रिंट्स-फॅब्रिक आणि ड्रेपिंगमध्ये सातत्याने केले गेलेले प्रयोग आणि बदल यामुळे साडीसुद्धा स्टाईल‘से’मिरवली जाते.

छोटं कपाट असो की मोठं कपाट .. त्यात कितीही वेगवेगळ्या पद्धतींचे कपडे असले तरी एका बाजूला साडीचा कप्पा हमखास असतो. हा कप्पा आता फक्त प्रौढ स्त्रियांच्याच कपाटात असतो असं अजिबात नाही. वेगवेगळ्या पद्धतींच्या अनेक साडय़ा आणि डिझाइन्सचे ब्लाऊज हल्ली तरुण मुलींच्या कपाटातही सहज सामावलेले दिसतात. त्यांच्या कपाटातल्या साडय़ा कधी आजीच्या असतात, तर कधी आईकडून हट्टाने घेतलेल्या असतात. साडीचे प्रकार वेगवेगळे असतील, पण साडीची कपाटातील आणि पर्यायाने मुलींच्या मनातील जागा कायम असते. गंमत म्हणजे प्रत्येक पिढीने मागच्या पिढीतील साडीचं पहिलं स्वरूप पाहून नाकं मुरडलेली असतात, त्यामुळे काळानुरूप या साडीने स्वत:च्या रूपात अनेक बदल करून घेतले आहेत. बदल हा कायम असतो हे समीकरण साडीला आत्ताही चुकलेले नाही. हल्लीच्या सहा-सहा महिन्यांत बदलणाऱ्या ट्रेण्ड्सच्या भाऊगर्दीत साडीही या शर्यतीत उतरली आहे आणि प्रत्येक वेळी ती नव्या पद्धतीने सगळ्यांसमोर येते.

नक्की कोणत्या पद्धतीने आजची साडी तरुणींच्या मनात आहे, याबद्दल ‘सायली राज्याध्यक्ष सारी’च्या डिझायनर सायली राज्याध्यक्ष सांगतात, ‘‘कॉटन, लिननसारख्या साडय़ांचा ट्रेण्ड आता खूप असला तरी हा जुनाच ट्रेण्ड पुन्हा आलेला आहे. अगदी आपल्या आईपासून सुरू झालेला हा ट्रेण्ड वर्षांनुवर्षे सुरू आहे; पण काळानुसार या ट्रेण्डमध्ये बदल नक्कीच झालेले दिसून येतात. कॉटन, लिनन, सिल्क यांसारख्या सुंदर कपडय़ांच्या साडय़ांमध्ये पेस्टल रंगछटांची चलती आहे. मिक्स आणि मॅच हा प्रकार सध्या तरुण पिढी साडीमध्ये करताना दिसते. कलमकारी डिझाइनचा ब्लाऊज आणि कॉटनची साडी असे अनेक ट्रेण्ड बाजारात आले आहेत. ‘जुनं ते सोनं’ म्हणत हातमागाला सोन्याचे दिवस आले आहेत. गेल्या काही काळात पॉवरलूमवर तयार केल्या जाणाऱ्या साडय़ांना जास्त मागणी होती; परंतु उत्तम डिझाइन, वजनाने हलकं असं नवनवीन कलेक्शन हातमागामध्ये आलं आणि त्यामुळे ग्राहकवर्ग हातमागाला महत्त्व देऊ  लागला. तो या कलेक्शनबाबतीत जागृतही झाला आहे.’’

सायली राजाध्यक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे कॉटन, लिनन साडय़ांचा ट्रेण्ड हा जुनाच आहे, पण या साडय़ांवर प्रिंट आणि डिझाइनच्या बाबतीत केले गेलेले प्रयोग त्यांना वेगळं रूप देऊन गेले आहेत. ‘आर्ट एक्स्पो’ आणि ‘उज्ज्वलतारा’च्या संस्थापक आणि डिझायनर उज्ज्वल सामंत यांच्या मते, साडय़ांच्या डिझाइनमध्ये, कपडय़ामध्ये लक्षणीय बदल नक्कीच झाले आहेत. अशा साडय़ा बाजारात आल्या आहेत ज्या स्त्रियांबरोबरच तरुण मुलीही अगदी सगळ्याच कार्यक्रमांना नेसू शकतील. यात प्रामुख्याने अजरकचं काम असलेलं प्लेन, मऊ  कापड जास्त ट्रेण्डमध्ये आहे. साडय़ांच्या बॉर्डर्समध्येही कमालीचे बदल केले जात आहेत. जाड बॉर्डर बाजूला ठेवून अतिशय बारीक आणि नाजूक जरी वर्क केलं जात आहे. मोडाल सिल्क आणि नाजूक जरी वर्क हे सध्याचं सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन आहे, असं त्यांनी सांगितलं. शिवाय, महाराष्ट्राची शान असलेल्या पैठणीला आपण सिल्कशिवाय बघूच शकत नव्हतो, परंतु आता अगदी कॉटनच्या पैठण्याही शान वाढवत आहेत. करवती काठाच्या साडय़ाही ग्राहकांना खूप आवडत आहेत. साडय़ांच्या रंगांमध्ये सगळ्या लाइट रंगाच्या जसं नॅचरल रंग, बिस्किट रंग, मोती रंग जास्त फॅशनमध्ये आहेत. यंदाच्या वर्षी ब्लाऊजमध्येही उत्तम बदल दिसून येतील, असं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी बंद गळ्याच्या ब्लाऊजचा ट्रेण्ड होता. यंदा ब्लाऊजच्या हाताच्या म्हणजेच बाहींच्या स्टाईलमध्ये खूप बदल येऊ  शकतात. फुग्याची बाही, अमरेला बाही, थ्री फोर्थ बाही जास्त ट्रेण्डमध्ये येईल, अशी माहिती उज्ज्वल सामंत यांनी दिली. एकंदरीत  साडीचा ब्लाऊज हा आता केवळ गरजेचा भाग राहिलेला नाही, त्याकडेही फॅ शनच्या दृष्टीनेच पाहिले जाते.त्यामुळे साडीइतकेच ब्लाऊजच्या ट्रेण्डमध्येही सतत बदल होत असतात. सध्या स्टेटमेंट ब्लाऊजचा ट्रेण्ड आहे. त्यामुळे सिंपल साडीवर मस्त एम्ब्रॉयडरी केलेला, कॉन्ट्रास मॅचचा ब्लाऊज घालण्याकडे तरुणींचा कल दिसून येतो आहे.

साडी आणि ब्लाऊजमध्ये आलेला ट्रेण्ड, बदल यांचं मूळ  कम्फर्टमध्ये आहे, असं मत ‘सुता’ या फॅशन ब्रॅण्डच्या संस्थापक सुजाता आणि तानिया बिस्वास व्यक्त करतात. ‘‘लोक मऊ , साध्या सुती किंवा सर्वात सोप्या रेशीम साडय़ांचा पर्याय निवडतात. अशा साडय़ा खूप मोहक दिसतात. या फॅब्रिक साडय़ा जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल केल्या जातात तेव्हा तुम्हाला त्या अगदी ऑफिससाठीही नेसता येतात. कपडे हा स्वत:ला व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे आणि आपल्या मूडला अनुकूल करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने एकच साडी ड्रेप करता येते. आरामात कोणतीही तडजोड न करता फॅशन करायची ही शैली आहे. आजकाल स्त्रिया सहसा सर्व हंगामांत साडय़ा नेसताना दिसतात, कारण आताच्या साडय़ा लाइटवेट, वावरण्यासाठी सोप्या आणि डिझाइन-रंग सगळ्या बाबतीत अष्टपैलू अशा आहेत, असं सुजाता आणि सानिया सांगतात. आमची ‘मेड इन हेवन मुल (mul)’ ही साडी एक बेस्टसेलर आहे जी वेगवेगळ्या रंगांत उपलब्ध आहे. या अशा कम्फर्टमुळे आणि हटके डिझाइन तसेच स्टायलिश दिसणाऱ्या साडय़ांना पसंती मिळत असल्याचं त्या सांगतात. ‘‘आजच्या तरुण मुलींनासुद्धा साडी नेसण्याची आवड निर्माण झाली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे अशा साडय़ा नेसणं खूपच सोप्पं आहे आणि सोबतच स्टायलिशसुद्धा आहे. या साडय़ा डिझायनर लुकही देतात. शिवाय, जास्त त्रास न देता अंगाला व्यवस्थित चिकटून बसणारं कापड असल्याने फिटिंगच्या दृष्टीनेही त्या सुंदर दिसतात आणि या साडय़ा माफक दरात उपलब्ध आहेत,’’ अशी माहिती सुजाता आणि सानिया यांनी दिली.

एकंदरीत रोजच्या धावपळीच्या जगण्यातून साडी हा पेहराव हद्दपार झाला असं आता अजिबात म्हणता येणार नाही. डिझायनर, ब्रॅण्ड्स मिळून आता खादी सिल्क, खादी लिनन, मटका सिल्क, प्युअर कॉटन, लिनन अशा अनेक पारंपरिक कापडाचा वापर करून साडय़ा बनवत आहेत. या कापडांवर अजरक, बटिक, दाबू, कलमकारी प्रिंट उमटल्या की साडय़ाही खुलून येतात. त्यामुळे साडी नको म्हणण्यापेक्षा स्टाईल‘से’ साडीच नेसण्यावर भर दिला जातो आहे.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2020 12:16 am

Web Title: article on stylish saree abn 97
Next Stories
1 व्हिवा दिवा : श्रुती थोरात
2 तंत्रस्नेही फॅशन
3 सदा सर्वदा स्टार्टअप : स्टार्टअपचे भान
Just Now!
X