05 August 2020

News Flash

क्षण एक पुरे! : सूफी संगीताची पूजा

नेहमीपेक्षा वेगळ्या संगीतप्रकारात उत्तमता साधणारी तरुण कलाकार म्हणून आज पूजाकडे बघितलं जातं.

(संग्रहित छायाचित्र)

वेदवती चिपळूणकर

अगदी लहान वयापासून तिने संगीत शिकायला सुरुवात केली. आईने सहज म्हणून शास्त्रीय संगीताच्या क्लासला घातलं तेव्हा त्या माऊ लीलाही आपल्या लेकीचं भविष्य ठाऊक नव्हतं. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी प्रचंड मोठय़ा संख्येच्या श्रोत्यांसमोर तिने पहिल्यांदा गजल पेश केली आणि तेव्हापासून पूजा गायतोंडे या नावाने सर्व गजल रसिकांच्या मनात घर केलं. उर्दू भाषेचीही तिने तालीम घेतली आणि सूफी संगीतातही तिने हळूहळू जम बसवला. स्वत:च्या प्रोफेशनल आणि कमर्शियल मैफिली करायलाही तिने अगदी लहान वयातच सुरुवात केली. नेहमीपेक्षा वेगळ्या संगीतप्रकारात उत्तमता साधणारी तरुण कलाकार म्हणून आज पूजाकडे बघितलं जातं.

पूजाला संगीताची ओळख तिच्या आईने करून दिली. आपल्या मुलीचा आवाज चांगला आहे एवढंच पाहून आईने तिला शास्त्रीय संगीत शिकायला पाठवलं. तिची गायकीच तिची ओळख बनेल याची कल्पनाही तेव्हा आईला नव्हती. तिने तर केवळ एक चांगली आवड निर्माण व्हावी म्हणून तिला संगीताच्या क्षेत्राची वाट दाखवली होती. केवळ शास्त्रीय संगीत शिकणं हे अवघ्या दहा वर्षांच्या मुलीला कदाचित कंटाळवाणं होईल म्हणून लाइट म्युझिक शिकण्यासाठीही पूजाच्या आईने तिला गाण्याच्या क्लासला घातलं. तिथे गजल हा प्रकार पूजाला विशेष चांगला जमतो हे तिच्या गुरूंच्या लक्षात आलं आणि तिचा त्या दिशेने रियाज सुरू झाला. पहिल्यांदा तिने मोठय़ा स्टेजवर तिची कला सादर केली आणि तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. त्या अनुभवाबद्दल ती सांगते, ‘एका मोठय़ा संस्थेच्या तितक्याच मोठय़ा कार्यक्रमाला आई मला घेऊन गेली होती. हा संपूर्ण गजलांचा कार्यक्रम होता आणि मोठमोठे ख्यातनाम गायक त्यात गाणार होते. अगदी जगजीत सिंग यांच्यापासून ते सुरेश वाडकरांपर्यंत सगळेच दिग्गज गायक तिथे होते. कसं काय माहीत नाही, पण बऱ्याच प्रयत्नांनंतर माझ्या आईने आयोजकांशी बोलून मला छोटय़ा ब्रेकमध्ये एक गजल गाऊ देण्याची परवानगी मिळवली’. त्यावेळी पूजा चौादा वर्षांची होती. ‘मी आणि माझ्यासोबत तबल्यावर साथ द्यायला माझा दहा वर्षांचा भाऊ होता. माझं नाव घेतल्यानंतर मी स्टेजवर जाऊन स्थिर होईपर्यंत जमलेल्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया या काही फार छान नव्हत्या. पण अगदी लहान असल्यामुळे मला तेव्हा त्याचं काहीच वाटलं नाही. मात्र माझी गजल झाल्यानंतर श्रोत्यांनी मला प्रचंड डोक्यावर घेतलं. एकच गजल गायची ठरलेली असल्याने मी सगळं आवरून स्टेजवरून खाली उतरले. मात्र श्रोत्यांच्या प्रतिसादामुळे आणि आग्रहाखातर मला आयोजकांनी परत बोलावलं आणि मी आणखी दोन गजल सादर केल्या’, अशी आठवण पूजा सांगते. तो कार्यक्रम झाल्यानंतर लोकांनी माझ्याभोवती जी गर्दी केली त्याने मी खरंतर भांबावले होते. सगळ्या लोकांचे सगळे प्रश्न मी बाबांकडे वळवले आणि माझी सुटका करून घेतली. त्यावेळी मला एक मौलवी येऊन भेटले. त्यांनी माझ्या गायकीचं कौतुक केलं, मात्र माझ्या उच्चारांत ‘डाळभात’ ऐकू येतो असं म्हणाले. म्हणजे माझ्या उर्दू शब्दांच्या उच्चारांत मराठीचा प्रभाव स्पष्ट कळत होता. ते सुधारण्यासाठी मी त्यांच्याकडेच त्यानंतर उर्दूची तालीम घ्यायला सुरुवात केली, असं सांगणाऱ्या पूजाला या एका प्रसंगाने तिला उर्दू गाण्याची तालीम देणारा खरा गुरू मिळवून दिला होता.

एका बाजूला संगीताचा रियाज आणि एका बाजूला उर्दूची तालीम यातून माझी गजल गायकी तर सुधारत होतीच, पण त्या उर्दूच्या तालमीच्या काळातच माझी सूफी संगीताशी ओळख झाली. त्या पहिल्या अचानक केलेल्या स्टेज परफॉर्मन्सने मला ‘करिअर’ म्हणजे काय हे न कळण्याच्या वयातच माझा मार्ग दाखवला, असं ती सांगते. संगीतात करिअर करायचं किंवा त्यालाच आपलं प्रोफेशन ठरवायचं असा कोणताही निर्णय पूजाला जाणूनबुजून घ्यावाच लागला नाही. तिच्या इतक्या लहान वयातच लोकांना तिचं गाणं एवढं आवडलं होतं की संगीतातलं करिअर ही अगदी स्वाभाविकपणे घडत गेलेली गोष्ट आहे, असं ती म्हणते. अर्थात याबद्दल एक मुलगी म्हणूनही तिची स्वतंत्र मतं आणि विचार आहेत. ती म्हणते, ‘मी मुलगी आहे म्हणून मी हा विचार करू शकले. मी जर मुलगा असते तर इतक्या अनिश्चित असलेल्या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार मी कदाचित केला नसता किंवा त्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी मला कदाचित खूप विचार करावा लागला असता’. पूजाचे हे मत कदाचित इतरांना खटकणारे असेल, ती मात्र फार व्यावहारिकपणे याचा विचार करते. सध्या करिअरच्या स्पर्धेत मुलगी म्हणून माझ्याकडे हे प्रिव्हिलेज आहे की घराची संपूर्ण जबाबदारी माझ्या एकटीच्या खांद्यावर येणार नाही. मनोरंजन हे क्षेत्र कायमच अनिश्चित आहे. त्यामुळे जर माझ्यावर शंभर टक्के जबाबदारी असेल तर मी या क्षेत्रात उतरण्यापूर्वी अनेकदा विचार करेन, असं ती स्पष्टपणे सांगते. मी मुलगी आहे आणि उद्या माझं लग्न झालं की मुख्यत्वे जबाबदारी नवऱ्याची असणार आहे यामुळे मी हे स्वातंत्र्य घेऊ शकते आहे. मुलगी म्हणून एखादी गोष्ट कर किंवा करू नकोस, असं कधीच मला कोणी सांगितलेलं नाही. बाहेरगावी किंवा अगदी देशाबाहेरही कार्यक्रम करायला मला कधी कोणी अडवलं नाही. उलट मुलगी म्हणून मला या निर्णयाचं अधिक स्वातंत्र्य घेता आलं, असंही ती ठामपणे सांगते.

सूफी म्हणजे इतर धर्मीयांचं भक्तीगीत वगैरे अशा संकल्पना आपल्याकडे रुजलेल्या आहेत. मात्र वस्तुस्थिती तशी नाही हे पटवून देण्यासाठीही पूजा कायमच प्रयत्नशील असते. तिने जॅझ आणि सूफी अशा संगीतप्रकारांचा मेळ घालून स्वत:चा एक कार्यक्रमही तयार केला आहे. ‘पंचम निषाद’च्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही या बाबतीत लोकांचं मन वळवण्याचा ती प्रयत्न करत असते. पूजा म्हणते, ‘सगळ्यांचा देव तर एकच आहे. सूफी हा एक संगीतप्रकार आहे. त्यात कबीरही आहे आणि मीराबाईही आहेत. त्यामुळे त्याला एक संगीतप्रकार म्हणून बघावं, त्याचा आस्वाद घ्यावा आणि त्यातलं सौंदर्य समजून घ्यावं.’ अर्थात, लोकांना सूफी संगीताकडे वळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागणार आहेत, याचीही जाण तिला आहे.

पूजा तिच्या विचारांबद्दल आणि तिच्या निर्णयांबद्दल अगदी स्पष्टवक्ती आहे आणि तितकीच ठाम आहे. नवनवीन प्रयोग करणं आणि नवनवीन शिकत राहणं हाच तिचा संगीतातला मूळ उद्देश असल्याचं ती त्याच आत्मीयतेने सांगते.

‘सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रोफेशनच्या बदलत्या गरजांप्रमाणे आपण बदलायला हवं आणि त्यासाठी स्वत:ला तयार करायला हवं, तरच आपण दीर्घकाळ आपल्या प्रोफेशनमध्ये टिकून राहू शकतो.’ – पूजा गायतोंडे

आपल्या करिअर आणि आवडीबद्दल निर्णय घेताना प्रत्येकाला आपल्या क्षमतेबद्दल आणि निर्धाराबद्दल खात्री असली पाहिजे. आपले आईबाबा कधीच आपल्या वाइटाचा विचार करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात जाऊन काही करण्याऐवजी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करणं हे जास्त योग्य! त्यासाठीच आपल्या क्षमतांबद्दल क्लीअर असणं गरजेचं आहे..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2019 12:08 am

Web Title: article on sufi music puja gayatonde abn 97
Next Stories
1 फिट-नट : नम्रता गायकवाड
2 जगाच्या पाटीवर : मैत्री ऊर्जाप्रणालींशी
3 अराऊंड द फॅशन : हिपस्टरची कथा..
Just Now!
X