News Flash

डिझायनर मंत्रा : ‘तेजस्विनी’ डिझायनर – अलका देवरे

आईकडून स्वत:चा व्यवसाय कसा करावा याचे धडे घेत सुरू केलेला प्रवास हा बराचसा खडतर वाटेवरून नेणारा होता, असे त्या सांगतात..

(संग्रहित छायाचित्र)

तेजश्री गायकवाड

आजूबाजूची बदलती परिस्थिती माणसाला कशी स्वत:मध्ये बदल करायला भाग पाडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फॅशन डिझायनर अलका देवरे. मूळच्या जळगावच्या असणाऱ्या अलका आता मुंबईमध्ये ‘तेजस्विनी क्रिएशन’ म्हणून स्वत:चा ब्रॅण्ड यशस्वीरीत्या चालवत आहेत. आईकडून स्वत:चा व्यवसाय कसा करावा याचे धडे घेत सुरू केलेला प्रवास हा बराचसा खडतर वाटेवरून नेणारा होता, असे त्या सांगतात..

जळगाव ते स्वत:चा फॅशन ब्रॅण्ड हा प्रवास अवघडच खरा.. पण, नेमकी आपल्या आवडीची आणि तेही फॅशन डिझायनिंगसारख्या ग्लॅमरस क्षेत्रात वाट सापडणे हेही सोपे नाही. अलका देवरे यांना त्यांची ही फॅ शन वाट कशी सापडली, याबद्दल त्या सांगतात,‘माझे लहानपण जळगावला गेले. माझी आई अनेक वर्षे शिवणकामाचा व्यवसाय करायची. ती नेहमी म्हणायची नोकरीपेक्षा व्यवसाय कधीही उत्तम. १९८८ मध्ये लग्न झाल्यावर माझ्या जीवनशैलीमध्ये फरक पडला. आकाशवाणीवर उद्घोषिका म्हणून पार्ट टाइम जॉब करत करत मी तीन वर्षांचा टीचर ट्रेनिंग आणि फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर मी घरीच छोटय़ा व्यवसायाला सुरुवात केली. टेलरिंग कोर्सही देऊ लागले. नवीन गोष्टीचा प्रयोग करण्यासाठी माझ्याकडे मटेरियल नव्हते, म्हणून मी ऑर्डरचे अनेक कपडे कोणतेही मानधन न घेता करून दिले. त्यामुळे ज्यांना जे हवे ते तयार करून मिळत असे आणि मलाही जे नवीन डिझाइन करून पाहायचे आहे ते करता येत असे,’ असे त्यांनी सांगितले. त्यांचा हा छोटेखानी प्रवास पुढे मुंबईत येऊन स्थिरावला, असे त्या सांगतात. ‘पुढे मी १९९३ला माझ्या भावाच्या सोबतीने मुंबईत निव्वळ ३५० रुपये घेऊन आले. त्या ३५० रुपयांपासून सुरू झालेला माझा प्रवास आज उत्तम सुरू आहे,’ असे त्या म्हणतात.

मुंबईत आल्यावर अलका यांनी प्रचंड मेहनत घेतली. शर्ट विकले, दुसऱ्या कंपनीसाठी डिझायनिंगचे काम केले, टिकलीवर स्टोन लावायचे काम अशी अनेक कामे करत त्यांनी स्वत:चे मार्केटिंग आणि डिझायनिंग दोन्हीचे ज्ञान वाढवले. कारण कुठलाही व्यवसाय करायचा तर नुसत्याच कल्पना असून चालत नाहीत, तर आपले उत्पादन कुठे आणि कसे विकता येईल, याचाही अभ्यास हवा. आणि अलका देवरेंच्या मनात तर मुंबईत आल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करायची इच्छा जोर धरू लागली होती. अनुभवातून त्यांच्या या कल्पनेला बळ मिळाले, असे त्या सांगतात. ‘२००२ मध्ये मी ‘तेजस्विनी क्रिएशन’ची स्थापना केली. सुरुवातीला माझ्याकडे मशीन नव्हती. ती घेण्यासाठी पैसेही नव्हते. तेव्हा मी बाहेरून कारागिरांना डिझाइन समजावून देऊन जॉब वर्क करून घ्यायला सुरुवात केली,’ असे त्या सांगतात. या पद्धतीने हळूहळू का होईना त्यांचे कामही सुरू झाले आणि विक्रीही चांगली होऊ लागली. ‘अगदी परदेशी कस्टमर्सही आम्हाला लाभले. तिथून पुढे मी स्वत:च्या मशिन्स घेतल्या आणि मग कारागिरांना कामाला ठेवले,’ असे त्यांनी सांगितले.

‘आपल्या ग्राहकांना उत्तम गोष्टी देण्यासाठी मी स्वत: काम करते. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिकडचे कापड निवडते, डिझाइनवर काम करते,’ असं त्या म्हणतात. स्वत:च्या आईकडून प्रेरणा घेत सुरू झालेल्या अलका यांच्या प्रवासात आता त्यांचा मुलगाही फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेत त्यांना मदत करतो आहे. ‘माझा मुलगा आणि मी आता विभागून काम बघतो. एका कक्षात आम्ही डिझायनर कपडय़ांचे काम करतो. यात अगदी लहान मुलांच्या कपडय़ापासून ते जीवनातील प्रत्येक वेगवेगळ्या क्षणांसाठी, सीझनसाठी आम्ही कपडे डिझाइन करतो. तर दुसऱ्या कक्षात आम्ही विविध कॉर्पोरेट ऑफिस, हॉस्पिटल, केमिकल इंडस्ट्री, शाळा यांना युनिफॉर्मही बनवून देतो, अशी माहिती त्यांनी दिली. महिलांना कितीही झाले तरी स्वत:च्या मनाप्रमाणे कपडे डिझाइन करून घायला आवडतात. म्हणून आम्ही त्यांना हवी ती डिझाइन पूर्णपणे मिळत नाही तोवर काम करत राहतो, असे त्या सांगतात.

सध्या हाताने केलेली पेंटिंग, एम्ब्रॉयडरी सोबतच घागरा चोळी, डिझायनर ब्लाऊज, नऊवारी साडी, पेशवाई साडी, ब्राह्मणी साडी, लावणी साडी असे वेगवेगळे प्रकार ही ‘तेजस्विनी क्रिएशन’ची खासियत बनली आहे. ‘आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला डिझाइनसोबतच त्यांच्या आऊटफिटसाठी कोणत्या प्रकारचे कापड वापरले जाणार आहे, त्याची खासियत काय आहे? त्यांच्या कपडय़ावर केले जाणारे वर्क कशा पद्धतीचे आणि कोणत्या प्रकारचे आहे हे सगळे सविस्तरपणे समजावून सांगितले जात. त्यामुळे त्यांनाही ही प्रक्रिया इंटरेस्टिंग वाटते, असे त्या म्हणतात.

फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात जम बसवतानात्यांना स्वत:ला ज्या परिस्थितीतून जावे लागले त्या परिस्थितीतून बाकीच्या मुलींना जायला लागू नये, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे म्हणून अलका यांनी स्वत:ची संस्था स्थापन केली असून त्याअंतर्गत अनेकींना या क्षेत्राचे ज्ञान देण्याचे कामही त्या करत आहेत. त्याबद्दल त्या सांगतात, ‘तेजस्विनी महिला मंडळ, ठाणे याअंतर्गत मी ग्रामीण भागातील महिलांसाठी काम करते आहे. २०११-१२ या कालावधीमध्ये माझ्या संस्थेने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महिला सक्षमीकरणाकरिता ठाणे, पालघर या जिल्ह्य़ातील दारिद्रयरेषेखालील महिला स्वयं साहाय्यता बचत गटाची स्थापना केली. त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळवून देण्याचे काम त्याअंतर्गत सुरू आहे. आज यातील अनेक महिला स्वतंत्रपणे स्वत:चा व्यवसाय करीत आहेत.’

स्वानुभवातून अनेक गोष्टी शिकत मोठय़ा झालेल्या अलका या नवीन मुलांना ठामपणे सांगतात की, ‘तुम्ही फक्त योग्य मेहनत करा. यश आणि रोजगार हा नक्कीच तुमचा आहे.’

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2019 1:28 am

Web Title: article on tejaswini designer alka devere abn 97
Next Stories
1 शेफखाना : पदार्थाचे जागतिकीकरण
2 फूड.मौला : हृषीकेशचा खाद्ययोग
3 अपरिचित तरी उपयोगी!
Just Now!
X