18 October 2019

News Flash

फूड.मौला : पारंपरिक आणि पौष्टिक

थालीपिठाखालोखाल माझ्या यादीत नंबर लागतो तो म्हणजे घावनाचा. घावन हा बनवायला अत्यंत सोपा पदार्थ आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सरिता पाटील

काळ बदलला तसं सगळं हळूहळू बदललं आणि आपण आपल्याच खाद्य खजिन्याला पार विसरलो. कधी वजन कमी किंवा जास्त करण्यासाठी दररोज नवनवीन डाएट्सच्या मागे धावायला लागलो. पण खरंच डाएटच्या नावाखाली आपण खात असलेले पदार्थ आपल्यासाठी योग्य आणि आपल्या रोजच्या जगण्यातले आहेत का..?

आपल्या राज्यातील प्रत्येक छोटय़ा छोटय़ा गोष्टीतही अमूल्य असा वारसा दडलेला आहे. दर दोन मैलांवर भाषा, लोकांचं रहणीमान, तिथली खाद्यसंस्कृतीही काही अंशी बदलत जाते. त्या त्या भौगोलिक परिसराला अनुकूल अशा भन्नाट पाककृती तयार करून तिथे खाल्ल्या जातात. पण काळ बदलला तसं सगळं हळूहळू बदललं आणि आपण आपल्याच खाद्य खजिन्याला पार विसरलो. कधी वजन कमी किंवा जास्त करण्यासाठी दररोज नवनवीन डाएट्सच्या मागे धावायला लागलो. पण खरंच डाएटच्या नावाखाली आपण खात असलेले पदार्थ आपल्यासाठी योग्य आणि आपल्या रोजच्या जगण्यातले आहेत का..?

मला स्वत:ला कायम हेल्दी पदार्थ खाण्याची सवय, मात्र मध्यंतरी माझी तब्येत एकाएकी ढासळायला लागली. आणि ती स्वत:च पुन्हा रुळावर आणायची असा निर्धार मी केला. त्यामुळे मी स्वत:वर नवनवीन प्रयोग करून पाहायला लागले. आणि स्वत:साठी डाएट शोधताना मला अनेक मराठमोळ्या पदार्थानी साथ दिली. नाजूक अवस्थेतही सगळं काही स्वत: करून खायचं असल्याने करायला झटपट आणि चवीला खुसखुशीत, त्यासोबत पचायलाही हलके आणि पोषणमूल्यांनी भरपूर असे पदार्थ तयार करून खायला सुरुवात केली. आणि त्यातूनच शोध लागला तो आपल्याला सहज बनवून खाता येतील अशा काही पदार्थाचा. थालीपीठ, उपमा, पोहे, लाडू, खिचडी, घावन, पुलाव अशा पदार्थानी मला माझ्या तब्येतीची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणायला मोठी साथ दिली. हेच पदार्थ थोडे वेगळ्या पद्धतीने बनवले तर हे पदार्थ आपल्या रोजच्या जगण्यासाठी लागणारी प्रथिनं, काबरेदकं, व्हिटामिन्स आणि फायबर यांचा कोटा निश्चितच पूर्ण करू शकतात.

यातला पहिला पदार्थ जो घरोघरी अगदी सहज बनवला जातो तो म्हणजे थालीपीठ. हा पदार्थ दरवेळी बनवताना आपण त्यात वेगवेगळे प्रयोग करू शकतो. अगदी चार धान्यांपासून ते थेट अठरा धान्यांच्या मिश्रणाने आपण हा सर्वगुणसंपन्न पदार्थ बनवू शकतो. एवढंच नाही तर भरपूर कांदा, कोथिंबीर, तिखट, मीठ आणि गरजेपुरत्या तेलाचा वापर करून हा पदार्थ आपण तयार करू शकतो. मी स्वत: थालीपीठ बनवताना त्यात काही अधिक गोष्टींचा वापर केला. थालीपिठाचं पीठ मळतानाच त्यात अळशी, तीळ, ओवा, ऑरिगॅनो, खसखस, भोपळा आणि सूर्यफुलाच्या सुकलेल्या बिया असं बरंच काही मिक्स करते. आपण हे पदार्थ काही प्रमाणात बारीक करून थालीपिठाच्या मिश्रणात घालू शकतो. असं केल्याने आपल्याला ओमेगा थ्री, व्हिटामिन ए, बी, सी असं बरंच काही मिळतं. आणि सकाळच्या न्याहारीला अशी दोन थालीपिठं खाल्ली तरीही पुढील बराच काळ आपल्याला भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठी किंवा प्रवासात खाऊ  म्हणून सोबत नेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. सोबतीला मस्त दही असलं की विषय संपला. तसंच त्याला वेळेचं काही बंधन नसल्याने नाश्त्याला किंवा फिरतीची नोकरी असेल तर जेवणाला पर्याय म्हणून आणि झटपट खाण्याजोगा पदार्थ म्हणून आपण ते डब्यातही घेऊन जाऊ शकतो.

थालीपिठाखालोखाल माझ्या यादीत नंबर लागतो तो म्हणजे घावनाचा. घावन हा बनवायला अत्यंत सोपा पदार्थ आहे. तांदळाच्या पिठात पाणी आणि मीठ टाकलं की झालं घावनाचं मिश्रण तयार. तांदळाप्रमाणेच गव्हाचेही घावन असेच झटपट तयार करता येतात. याशिवाय आपण ज्वारी, बाजरी, नाचणी अशा कोणत्याही धान्याच्या पिठापासून घावन तयार करू शकतो. थोडीशी कल्पनाशक्ती आणि नवनवीन प्रयोग करायची तयारी असली तर अशक्य असं काहीही नाही. थालीपिठाप्रमाणेच घावन या पदार्थानेही डाएट सांभाळण्यासाठी मोठा हातभार लावला आहे.

पण दरवेळी आपण थालीपीठ आणि घावन करून खाऊ  नाही ना शकत. तेच तेच खाऊन कंटाळा येण्याची शक्यता जास्त असते. माझंही काहीसं तसंच झालं म्हणून मग मी इंटरनेटवर अजून काही वेगळं बनवता येईल का, याचा शोध घ्यायला लागले. आणि त्यातूनच कधीही बनवून खाता येतील अशी काही प्रीमिक्स बनवून खायला मी शिकले. त्याचा फायदा असा झाला की मी आता पोहे, उपमा, सांजा, खिचडी आणि व्हेज पुलावचेही प्रीमिक्स बनवून ठेवते. त्यामुळे जेव्हा केव्हा भूक लागेल तेव्हा फक्त त्यात पाणी घालायचं की झाला पदार्थ तयार. फास्ट फूड खाण्याला प्रीमिक्स हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात पोहे आणि उपमा करताना आपण त्यात शेंगदाणे किंवा हिरवे वाटाणे, मोड आलेली कडधान्यं, उडीद आणि चण्याची डाळ असं आपल्याला आवडेल ते घालून खाऊ  शकतो. आणि आपल्याला रोजचे साधे वाटणारे हे पदार्थ अजून न्यूट्रिशन्स करू शकतो.

एवढं सगळ खाऊ न झाल्यावर कधी कधी काहीतरी गोड करून खाण्याची इच्छा आपल्या सगळ्यांनाच होते. त्यासाठी आपल्याकडे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. ज्याद्वारे आपली दैनंदिन प्रथिनं आणि व्हिटामिन्सची गरज पूर्ण होऊ  शकते. त्याचसोबत आपल्याला फॅटी अ‍ॅसिड्सही मिळतात. आपण हवं तर सगळा सुकामेवा एकत्र करून त्याचे लाडू आणि चिक्की तयार करू शकतो. साखर वापरण्याऐवजी ओले खजूर किंवा चिक्कीचा गूळ वापरून आपण हे लाडू बनवू शकतो. बरं हे लाडू गरम पडतील असं वाटत असेल तर त्यात गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या टाकता येतील. याशिवाय मूग, बेसन, गहू, नाचणी या पिठापासून बनवलेले लाडू आपण खाऊ  शकतो. ते करताना त्यात काजू बदामासोबत लाल भोपळा किंवा कलिंगडाच्या बिया बारीक करून त्याची पूड टाकल्यास पौष्टिकता अधिक वाढते. आणि झटपट खायला एक उत्तम पर्याय उपलब्ध होतो.

आपल्या आजूबाजूला नीट पाहिलं तर आपल्याच स्वयंपाकघरात अशा सुपर फूडचा खजिना आहे. फक्त गरज आहे ती जाहिरातबाजीला बळी न पडता आपल्या घरीच दडलेल्या या खजिन्याला ओखळण्याची. आपल्या घरात असलेले सगळ्यात मोठे सुपर फूड आहे ते म्हणजे घरात बनवलेले शुद्ध साजूक तूप मग ते गायीचं असो वा म्हशीचं. आपल्या शरीरात अन्नद्रव्यं सगळीकडे पोहोचवण्याचं काम हे तूप करतं. त्यामुळे दररोज निदान दोन चमचे साजूक तूप खावं. त्यासोबतच सैंधव किंवा जाड मिठाचा वापर आहारात करावा आणि पांढरं मीठ टाळावं.

या गोष्टी मी स्वत: करून पाहिल्या आणि त्याचे सकारात्मक बदल माझ्या आयुष्यात झाले. आपणही थोडं थांबून विचार केला तर आपल्याला जाणवेल की आपलं आयुष्य हे आपलं आहे. आणि ते निरोगीपणे कसं जगायचं तेसुद्धा आपल्या हातात आहे. आपण जर योग्य प्लॅनिंग करून त्यानुसार टप्प्याटप्प्याने आपल्या आहारात हे बदल केले तर त्याचा आपल्यालाच फायदा होणार आहे. आणि हे सगळं करताना आपण आपल्या लहान मुलांना त्यात सामील करून घेतलं तर सोने पे सुहागा.. लहान मुलांना नवनवीन गोष्टी करून पाहायला आवडतात. त्यामुळे बाजारातून काही गोष्टी आणण्यापासून ते आठवडय़ाचा मेन्यू ठरवण्यापर्यंत आणि प्रत्यक्षात पदार्थ करताना मुलांच्या वयानुसार आपण त्यांना जमेल तसं काम नेमून देऊ  शकतो. अशाने बऱ्याच गोष्टी साध्य होतील. एकतर ती नवं काहीतरी शिकतील. त्यांना काय खावं कसं खावं याची माहिती मिळाल्याने पारंपरिक पदार्थाचं महत्त्व कळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकालच्या मोबाइलच्या जमान्यात मूल आणि पालक यांच्यात हरवत चाललेला संवाद यानिमित्ताने नव्याने सुरू होण्यास मदतच होईल.

सध्या उन्हाळा असल्याने शरीराला थंडावा देणारी ही कोशिंबीर नक्की करून पाहा.

कोशिंबीर

साहित्य : १ गावरान काकडी (किसलेली), १ लहान पांढरा कांदा (बारीक चिरलेला), १ डाळिंबाचे दाणे, १ बीट (किसलेले),१ गाजर (किसलेले), १०-१२ पुदिन्याची पानं बारीक चिरलेली, १ टेबलस्पून टरबुजाच्या बिया, कोथिंबीर, पाव चमचा धणे-जिरे पूड, चिमूटभर काळीमिरी, सैंधव मीठ ( चवीनुसार), एक वाटी दही.

कृती : १ गावरान किसलेली काकडी, लहान किसलेला पांढरा कांदा, एका डाळींबाचे दाणे, गाजर आणि बीट हे सगळे एकत्र करावे. त्यात पुदिना आणि कोथिंबिरीची पेस्ट करून टाकावी. त्यानंतर गरजेपुरत्या टरबुजाच्या बिया टाकून त्यानंतर थोडीशी काळीमिरी आणि सैंधव मीठ टाकावं. या सगळ्या मिश्रणात एक वाटी दही मिसळून काही वेळ हे मिश्रण झाकून ठेवावे. त्यानंतर ही रेसिपी सव्‍‌र्ह करावी. उन्हाळ्यातील शरीराची दाहकता कमी करण्यासाठी ही कोशिंबीर निश्चितच उपयोगी ठरेल.

viva@expressindia.com

First Published on May 3, 2019 12:04 am

Web Title: article on traditional and nutritious food