स्वप्निल घंगाळे

भटकायला जाणं म्हणजे त्यात नियोजन आलंच. कुठे जायचं, कुठे राहायचं, तिथे प्रवास कसा करायचा, तिथे काय पाहायचं – काय नाही?, अशा बऱ्याच गोष्टी या नियोजनामध्ये येतात. हे सर्व नियोजन करणं म्हणजे एक मोठा व्याप असायचा, मात्र आता वेगवेगळे अ‍ॅप्लिकेशन्स, वेबसाइट्स आणि सोशल नेटवर्किंगमुळे हा व्याप अगदीच कमी झाला आहे. याच स्मार्ट भटकंतीबद्दल आणि त्यामुळे वाढत असणाऱ्या सोलो म्हणजेच एकटय़ाने भटकण्याच्या ट्रेण्डबद्दल आपण बोलणार आहोत..

तुम्ही फिरायला जाण्याचे ठिकाण कसे ठरवता? अर्थात जिथे कधी गेला नसाल अशी जागा तुम्ही ठरवता, मग तुम्ही तिथे कसं जायचं वगैरेसारखं नियोजन सुरू करता. पण अनुश्री पवार मात्र आधी सर्वात स्वस्त विमान उड्डाणं कुठे आणि कधी उपलब्ध आहेत त्यानुसार भटकंतीचं नियोजन करते. अनुश्रीप्रमाणे अनेक सोलो ट्रॅव्हलर्स आहेत जे सर्वात कमी प्रवासखर्च असेल अशा जागांवर जाण्याचं निश्चित करतात आणि ते बुकिंग झाल्यानंतर पुढील राहण्याची, भटकण्याची व्यवस्था बघतात. ‘बुकिंग करताना कोणत्या जागी जायचंय हे ‘स्कायस्कॅनर’ या वेबसाइटच्या मदतीने ठरवते. स्वस्तात स्वस्त फ्लाइट बुकिंग करते. ‘हॅपी इजी गो’ नावाची वेबसाइटही खूप चांगली आहे. येथे विमानाच्या तिकिटांची जी किंमत दाखवली जाते ती इतर वेबसाइटच्या तुलनेत खूप कमी असते. एकदा विमानाचे तिकीट बुक झाले की त्यानुसार पुढील नियोजन करते. मी अनेकदा होम स्टेचा पर्याय निवडते. गूगलवर सर्च करून झाल्यावर त्याच होम स्टेच्या नावाने इन्स्टाग्राम, फेसबुकवर सर्च करते आणि मग गुगलवर रिवू चेक करते आणि लोकांचे रिवू वगैरे लक्षात घेऊनच मी होम स्टे बुक करते. होम स्टे वगैरेसारख्या ठिकाणी तुम्हाला अगाऊ  पैसे द्यावे लागत नाहीत. तुम्ही तिथे जाऊन ठरवू शकता तिथे राहायचं आहे की नाही? नसेल राहायचं तर तुम्ही ऐनवेळी दुसरी जागा शोधू शकता. अनेक हॉस्टेल्समध्ये अगदी ५०० रुपयांमध्ये मस्त राहण्याची सोय होते. बॅग पॅकर्स पांडा, झॉस्टेल असे अनेक पर्याय राहण्यासाठी उपलब्ध असतात. काही हॉस्टेल्स तर अगदी १३० रुपयांपासून तुम्हाला राहण्याची सोय उपलब्ध करून देतात. मुला-मुलींसाठी वेगळ्या डॉर्मेट्री असतात. थोडं सजग राहिलं की झालं..,’ असं अनुश्री सांगते.

अनेक जण वेगवेगळ्या वेबसाइट्सवर तिथे भटकंती करून आलेल्या पर्यटकांचे ब्लॉग्स वाचतात. म्हणजेच ‘ट्रीपेटो’सारख्या साइटवर एखाद्या ठिकाणासंदर्भातील सर्व ब्लॉग वाचल्यास बरीच माहिती मिळते. त्यात अगदी कुठल्या होम स्टेमध्ये राहायचं, किती पैसे लागतात, काय पाहण्यासारखं आहे काय नाही याबद्दलची इंत्थभूत माहिती पर्यटकांनीच दिलेली असते. ती जाहिरात नसते त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी असते, असं अनेक सोलो ट्रॅव्हलर्स सांगतात.

अनेकजण असे ब्लॉग वाचूनच एखाद्या ठिकाणावरील सर्वात स्वस्त होम स्टेचा पर्याय निवडतात. ‘त्यातही सोलो भटकंती करणाऱ्यांमध्ये हम्पी, राजस्थानसारख्या जागा लोकप्रिय आहेत. कारण येथे एकटय़ाने भटकायला येणाऱ्या परदेशी पर्यटकांचे प्रमाण अधिक असल्याने तिथे खूप सारे पर्याय स्वस्तात उपलब्ध असतात’, असं अनुश्री सांगते. हिमाचल, उत्तराखंड आणि लडाख यांसारखी ठिकाणे सोलो ट्रॅव्हलर्ससाठी स्वर्गासारखीच आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जागा एकटय़ाने फिरणाऱ्या मुलींसाठी सुरक्षित आहेत. येथील प्रमुख व्यवसायच पर्यटन असल्याने स्थानिक लोक खूप मदत करतात. ईशान्य भारतामध्ये सोलो ट्रॅव्हल करणे महागात पडते, कारण तिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच नाही. अशा ठिकाणी सोलो पण ग्रुपने जावे. ‘अशा अनेक साइट्स आणि अ‍ॅप्लिकेशन आहेत जे तुम्हाला एकटय़ाला बुकिंग करून देतात. तुमच्यासारखे एकटय़ाने भटकणारे अनेकजण असतात, मग अशा लोकांना एकच गाडी दिली जाते. आणि अशा माध्यमातून ओळखी वाढतात’, असं नुकत्याच दोन सोलो ट्रिप करणारी ऋतुजा जोशी सांगते. दक्षिणेतही एकटय़ाने फिरायला जाताना भाषेबद्दलचे एखादे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यास जास्त फायद्याचे ठरते, असा सल्ला अनेक सोलो ट्रॅव्हलर्स देतात.

‘एअरबीएनबी’वर होम स्टे पाहून त्याचे फेसबुक पेज असते तिथेही रिवू तपासून पाहता येतात. तेथील रिवू खरे असतात. एअरबीएनबीशी संबंधित स्टेच्या फेसबुक पेजवर अनेकदा तेथील मालकांचा थेट संपर्क क्रमांक मिळू शकतो. एअरबीएनबीवर आधी पैसे भरावे लागतात. त्यामुळेच त्या स्टेबद्दल फेसबुकवरून नंबर मिळाल्यावर हे मधले चार्जेस टाळता येतात. ‘गोआयबीबो’सारख्या साइट्सवरून स्वस्तात बस बुक करता येतात. उत्तर भारतात आणि ईशान्य भारतात भटकंतीसाठी बस बुकिंगही थेट घरात बसून करता येते.  एकटय़ाने भटकणाऱ्यांना मदत करण्यासाठी ‘ट्रीपेटो’, ‘ट्रॅव्हल तिकोणा’, ‘ट्रिप अ‍ॅडव्हायजर’, ‘ट्रीफोबो’ असे अनेक पर्याय बुकिंगसाठी आणि माहिती गोळा करण्यासाठी उपलब्ध आहेत. सोलो भटकंती करणाऱ्यांची हॉस्टेल्सला सर्वाधिक पसंती असते. यामागील मुख्य कारण म्हणजे हॉटेलप्रमाणे हॉस्टेल्स महागडी नसतात. ती तरुणाईच्या दृष्टीने पॉकेट फ्रेण्डली म्हणजेच स्वस्तात मस्त असतात. ‘गो स्टॉप्स’, ‘ट्रॅव्हलर’, ‘झॉस्टेल’, ‘नॉरमॅडिक’, ‘नोमॅड्स इंडिया’, ‘सालोम बॅकपॅकर्स’ असे खिशाला परवडणारे हॉस्टेल्सचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत.

‘सोलो फिरताना एखाद्याबरोबर फ्रेण्डली असणं वाईट नाही, पण अति होत असेल तर स्पष्टपणे सांगा. टूर मॅनेजरचा नंबर कायम सेव्ह करून ठेवावा. एकटे जात असला तर महागडय़ा गोष्टी नेऊ  नका. मिनिमलिस्टिक लाइफस्टाइलप्रमाणे गरजेपुरत्या गोष्टी न्या. कान आणि डोळे उघडे ठेवून भटकंती करा’, असा सल्ला सोलो ट्रॅव्हलर असलेली सायली पाटील देते. तसेच ‘स्थानिकांचे सल्ले ऐकणंही फायद्याचं ठरतं. एकटय़ाने भटकताना आपण जेथे राहणार आहोत त्या ठिकाणाची माहिती जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअ‍ॅपवरून देऊन ठेवावी. तिथे जाऊ न ठिकाण ठरलं तर लाइव्ह लोकेशन शेअर करावी’, असा अनुभवी सल्लाही सायली देते.

‘एअरबीएनबी’सारखी राहण्याचा पर्याय देणाऱ्या अ‍ॅपपासून ते ‘ट्रिप अ‍ॅडव्हायजर’, ‘ट्रीपेटो’सारख्या टूर ऑर्गनाइज करून देणाऱ्या अ‍ॅप्स आणि वेबसाइट्समुळे दूरदूरची भटकंतीही आपलीशी वाटू लागली आहे. या अ‍ॅप्सच्या जोरावरच तरुणाईने एकटय़ाची मुशाफिरी जवळ केली असून सगळे ताणतणाव धाब्यावर बसवत आजची तरुणाई मनमुराद भटकून येते, अनुभव गोळा करते आणि रिचार्ज होऊन पुन्हा कामाला लागते.

एअरबीएनबीची हवा देशात आणि परदेशातही कायम एकटय़ाने भटकायला आवडणारी मधुरा नेरुरकर ‘एअरबीएनबी’च्या मदतीनेच भटकंती करते. ‘मी शक्यतो एअरबीएनबी वापरते. इतर अ‍ॅपही पाहते, पण त्यात मला स्वस्त हे वाटतं. त्यातही एक गोष्ट अशी की जागेवर जाऊ न तुम्ही बुकिंग केलं तर ते जास्त स्वस्तही पडतं अनेकदा पण अनेकदा ते शक्य होतंच असं नाही. शिवाय जागेवर जाऊ न बुकिंग करणारे ट्रॅव्हलर वेगळ्या मानसिकतेतून प्रवास करत असतात हे लक्षात घ्यायला हवं’, असं मधुरा सांगते.

तर ‘एअरबीएनबी’च्या मदतीने जपान आणि पोर्तुगाल फिरून आलेली मोहिता नामजोशीही असे अ‍ॅप फायद्याचे असल्याचे सांगते. ‘मी जपान आणि पोर्तुगालला फिरायला गेले होते तेव्हा एअरबीएनबीवरूनच बुकिंग केलं होतं. एअरबीएनबी मला हॉस्टेलपेक्षा स्वस्त वाटतात. परदेशात प्रत्येक एअरबीएनबीच्या खोलीमध्ये वॉशिंग मशीन आवर्जून असतात हे विशेष. हॉस्टेलमध्ये लॉण्ड्रीचे बरेच पैसे घेतात त्यामुळे परदेशात एअरबीएनबी परवडतं’, असं मोहिताने सांगितलं. तसंच स्थानिकांमध्ये राहण्याची संधी मिळते आणि स्थानिक पदार्थ चाखता येतात हा एअरबीएनबीसारख्या अ‍ॅपचा फायदा असतो असंही मोहिताला वाटतं. ‘भटकण्याच्या जागा मला स्थानिकांकडून जाणून घ्यायला आवडतात. म्हणून मी हॉटेल वगैरे ऐवजी एअरबीएनबीला प्राधान्य देते. काही ठिकाणी तुम्हाला नाश्ताही दिला जातो. यातील विशेष गोष्ट म्हणजे स्थानिक ठिकाणची चव चाखता येते, कारण इथे हॉटेलप्रमाणे वेगळा भारतीय मेन्यू बनत नाही. थोडा खर्च करण्याची तयारी असेल तर सुपरहोस्ट हा पर्याय वापरून बुकिंग करता येते’, अशी माहितीही तिने दिली. एअरबीएनबी ही वेगळी संस्कृतीच विकसित होत चालली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.