05 August 2020

News Flash

क्षण एक पुरे!  घाडग्यांची सून रुपाली

सोनलच्या म्हणण्यानुसार तिला सगळ्यात मोठी ओळख ‘रुपाली’ने मिळवून दिली.

(संग्रहित छायाचित्र)

वेदवती चिपळूणकर

सायन्सच घ्यायचं हे तिचं ठरलेलं होतं. सायन्स घेऊन नेमकं काय करायचंय ते पक्कं नव्हतं. हळूहळू माहिती मिळाली तशी तिने फार्मसी करायचं नक्की केलं. फार्मसीचं शिक्षण पूर्ण करून तिने नोकरी सुरू केली आणि सोबतच छोटय़ामोठय़ा गोष्टी करत तिने अभिनयाची आवडही जोपासायचा प्रयत्न केला. याच आवडीचं रूपांतर करिअरमध्ये होईल हे तिच्या स्वप्नातही नव्हतं. सहज म्हणून या क्षेत्रात आलेली, अभिनयाचं कोणतंही फॉर्मल शिक्षण नसताना प्रेक्षकांच्या मनात घर केलेली ही अभिनेत्री म्हणजे ‘तुला पाहते रे’ मालिकेतली ‘रुपाली’ आणि आताची ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’मधली नवीन खलनायिका ‘चित्रा’, अर्थात सोनल पवार!

फार्मसी करताना अभिनय वगैरे अजिबात माहिती नव्हतं, कधी डोक्यातही नव्हतं, मात्र समोर येणाऱ्या एकेका संधीतून सोनलने आपल्या करिअरची वाट शोधली. फार्मसीसाठी साताऱ्याला असतानाच युथ फेस्टिव्हलशी तिची ओळख झाली आणि मग अभिनयाचं वेड तिच्या अंगात भिनत गेलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करताना अभिनयाकडे करिअरचं क्षेत्र म्हणून तिने कधीच पाहिलं नाही. सोनल म्हणते, ‘कॉलेजमधून युथला एकांकिका केली आणि अभिनयाचं बक्षीस कॉलेजला मिळवून दिलं. ते आमच्या कॉलेजचं अभिनयाचं पहिलंच बक्षीस होतं. तेव्हा मला स्वत:बद्दल कॉन्फिडन्स आला, पण ते सगळं तेवढय़ापुरतंच राहिलं. आणि मुंबईला परत आल्यावर एका हॉस्पिटलमधल्या फार्मसीमध्ये मी नोकरी करायला लागले. त्यात मध्येच एका मित्राने विचारलं म्हणून एकांकिका कर, कुठे छोटासा कॅरेक्टर रोल कर किंवा कुठे ऑडिशन दे, असं माझं चाललेलं असायचं. नोकरीतून फारसा वेळही मिळायचा नाही. तेव्हा माझ्याकडे पहिल्यांदा ‘अस्मिता’मधला एक कॅरेक्टर रोल आला आणि मी आपल्याला सेट बघायला मिळेल, शूटिंग बघायला मिळेल, वेगवेगळे कलाकार बघायला मिळतील या सामान्य विचारांनी शूटिंगला गेले.’ पहिल्यांदाच तो मेकअप, लाइट्स, सगळी तयारी, आपल्याला कोणीतरी महत्त्व देतंय असं सगळं फार कौतुकाचं वाटत होतं. मात्र स्क्रिप्ट हातात पडल्यावर मला टेन्शन आलं, कारण मला काहीच अनुभव नव्हता. तेव्हा मला दिग्दर्शक जे होते त्यांनी अगदी सुरुवातीपासून क्लोज कशाला म्हणतात, मास्टर शॉट कसा असतो, असं सगळं नीट समजावून दिलं आणि डायलॉग कसे म्हणायचे, काय टोन लावायचा हेही सगळं शिकवलं. त्या पहिल्याच सीरियलच्या पहिल्याच दिवशी मला बरंच काही नवीन शिकायला मिळालं, असं ती सांगते.

सोनलच्या म्हणण्यानुसार तिला सगळ्यात मोठी ओळख ‘रुपाली’ने मिळवून दिली. त्याआधी तिने ‘सरस्वती’मध्ये काम केलं होतं, पण रुपालीची भूमिका हा तिच्यासाठी संपूर्णपणे वेगळा अनुभव होता. सुबोध भावे लीड करत असलेल्या सीरियलमध्ये काम करणं हीच तिच्यासाठी पर्वणी ठरली. मात्र त्या भूमिकेपर्यंत पोहोचताना अनेकदा अशा वेळा आल्या जेव्हा ही धडपड सोडून द्यायची इच्छा तिला झाली. त्याबद्दल सोनल सांगते, ‘हॉस्पिटलची मॅनेजमेंट बदलली आणि एकदम शेवटच्या टोकाला असलेल्या अनेकांना नोकरीवरून कमी करण्यात आलं. त्यातच माझीही नोकरी गेली आणि त्याच नोकरीच्या भरवशावर करिअर उभं करायचा विचार असल्याने ‘आता काय’ हा प्रश्न समोर उभा ठाकला. मी मधूनमधून ऑडिशन देत होते, आता त्याकडेच जरा लक्ष देऊन प्रयत्न करायचं ठरवलं. मात्र रोज ऑडिशनला जायचं आणि नकार घेऊन यायचा तर या सगळ्यात पैसे खूप खर्च व्हायचे. रोज रोज दीड-दोनशे रुपये घरी मागणं मला आवडायचं नाही. म्हणून मी सगळीकडे शक्य तितकं चालत फिरायला सुरुवात केली’. अख्खी फिल्मसिटी मी पायी फिरले आहे, असं ती सांगते. एकदा असं झालं की, ऐन उन्हाळ्याचे दिवस होते आणि चालता चालता माझी चप्पल तुटली. त्याला काहीही रिपेअर करणं शक्य नव्हतं, पिन लावणं शक्य नव्हतं, शेवटी चप्पल काढून हातात घेतली. एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला बसून खूप रडले. काहीच संधी मिळत नाहीत, कुठेच सिलेक्शन होत नाही या सगळ्यामुळे असंही वाटून गेलं की, आपल्याला काही येतच नाही, आपल्यात टॅलेंट नाही. हे सगळं सोडून फार्मसीकडेच लक्ष द्यायला हवं होतं, हे आपलं क्षेत्र नाही, असे अनेक विचार मनात येऊन गेले. जेव्हा जेव्हा असे विचार यायचे तेव्हा तेव्हा आरशासमोर उभी राहून मी स्वत:लाच समजावायचे. तू फार्मसी सोडून या क्षेत्रात पाऊल टाकलयस म्हणजे इथे नक्की तुझं भविष्य लिहून ठेवलेलं असणार आहे. तुझ्या दृष्टीने तू सगळे प्रयत्न करतेयस आणि त्याचे परिणाम हळूहळू दिसतील, असं मी स्वत:ला सांगायचे आणि स्वत:चा कॉन्फिडन्स वाढवायचे. कधीही तो निगेटीव्ह विचार टोकाला मात्र जाऊ  दिला नाही आणि इथेच काम करायचं यावर अडून राहिले, अशी आपली आठवण सोनल सांगते. तिचा हा अनुभव कुठल्याही क्षेत्रातील नवोदितांना खूप मार्गदर्शक ठरणारा आहे.

‘रुपाली’ ही व्यक्तिरेखा खूप साधी, सरळ आणि छान होती. तिला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सोनलला पुन्हा तशीच भूमिका करायची नव्हती, उलट तिला एखादी निगेटिव्ह व्यक्तिरेखा करायची होती. पुन्हा ऑडिशन देत असताना एकदा तिला सहज एक फोन आला आणि ‘चित्रा’ तिच्यासमोर उभी ठाकली. सोनल म्हणते, ‘मला फोन आला होता तो ऑडिशनसाठी नाही, तर थेट लुक टेस्टसाठी! चॅनेलमधून माझं नाव सीरियलसाठी सुचवलं गेलं होतं. ‘सरस्वती’ ही मालिका केल्यामुळे चॅनेलला माझं काम माहिती होतं. ‘चित्रा’साठी माझी निवड झाल्यानंतर मला सांगण्यात आलं की हे एक अत्यंत महत्त्वाचं पात्र आहे. आधीपासून मालिकेत कियारा, वसुधा काकू, अमृताचे काका असे खलनायक होते आणि त्यात चित्रा अजून एक! त्यामुळे सगळ्यांपेक्षा वेगळं राहतच मला हा रोल करायचा होता. निगेटिव्ह रोल करायचाय हे म्हणणं जितकं सोपं आहे, तितकं ते प्रत्यक्षात करणं अवघड! सगळे रेटिंग्ज, आकडे तुमच्यावर अवलंबून असतात तेव्हा ते प्रेशर खूप जास्त असतं, असं सोनल सांगते.

सोनलच्या दृष्टीने ‘रुपाली’ हा तिच्या करिअरमधला शार्प टर्न म्हणता येईल. तिने ओळख मिळवून दिली आणि ‘चित्रा’ने त्या ओळखीला चॅलेंज केलं आहे. सोनलच्या या चढत्या आलेखाकडे बघता लवकरच तिला मुख्य भूमिकेत बघण्याची संधी तिच्या चाहत्यांना मिळू शकते.

फार्मसी सोडलं आणि अभिनयात आले. मात्र जेव्हा जेव्हा स्वत:बद्दल शंका आली तेव्हा हे पक्कं केलं की एकावेळी एकाच दगडावर पाय ठेवायचा. दोन्ही गोष्टी सांभाळायला जाऊ  तर तोंडावर आपटू. त्यापेक्षा ज्या वेळी जे योग्य ते करावं. स्वत:बद्दलचा कॉन्फिडन्स असेल तर पुन्हा मागे वळून बघण्याची किंवा पर्याय शोधण्याची गरज पडत नाही. मात्र सुबोध दादाने सांगितलेली एक गोष्ट फार महत्त्वाची; कितीही मोठी झालीस तरी पाय इतरांसोबत जमिनीवरच ठेवून चालत राहा. लोकांना माझं काम आवडतं म्हणून मी आहे. त्यामुळे त्यांना मान वर करून बघायला लागू नये, त्यांना मी त्यांच्यातलीच वाटली पाहिजे, मी तसं राहिलं पाहिजे हे मला सुबोध दादाने शिकवलं.

– सोनल पवार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 1:40 am

Web Title: article on tula pahate re sonal pawar abn 97
Next Stories
1 हम पाँच: ऑल-गर्ल्स रोबोटिक्स टीम
2 फिट-नट : विशाल निकम
3 टेकजागर : नियंत्रण हवेच; पण कुणाचे?
Just Now!
X