10 April 2020

News Flash

क्षितिजावरचे वारे : चला ‘अपग्रेड’ होऊ या

तंत्रज्ञान आणि मानव यांच्यातली दरी कमी करण्याचे काही प्रयत्न गेल्या शतकात केले गेले

(संग्रहित छायाचित्र )

सौरभ करंदीकर

भविष्यात आपल्या सर्वाच्या दिमतीला यंत्रमानव असतील असे प्रसंग रंगवणाऱ्या विज्ञानकथा आता सत्यवत वाटू लागल्या आहेत. आपल्या घरातला पसारा यंत्रमानव आवरत नसला, स्वयंपाकघरात यंत्रमानव भाज्या चिरताना दिसत नसला तरी अनेक यंत्रं आपल्या मदतीला असतातच की. ‘आज तापमान किती आहे?’, ‘माझी यापुढची मीटिंग कधी आहे?’, असे प्रश्न ऐकायला आणि त्याची यांत्रिक आवाजात उत्तरं द्यायला एखादा रोबो – सेक्रेटरी आपल्या मागे-पुढे करत नसला तरी आपल्या फोनमधली ‘सिरी’, ‘गूगल असिस्टंट’ आणि ‘अ‍ॅलेक्सा’ अचूक उत्तरं देतातच की. थोडक्यात ‘यंत्रमानव’ ही संकल्पना भविष्याची चाहूल वगैरे नसून केवळ एक मनोरंजक पात्र वाटू लागली आहे.

दर वर्षी ग्राहकोपयोगी तंत्रज्ञानाच्या नवनवीन आवृत्त्या आपल्यासमोर येत असतात. परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या भराऱ्या मनुष्याला मात्र अपग्रेड करू शकलेल्या नाहीत. आपण आजही शतकानुशतकं जसे आहोत तसेच आहोत. अंधारात पाहायचं असेल तर आपण इन्फ्रा-रेड उपकरणं वापरू शकतो, परंतु आपल्या डोळ्यांना अशी काही शक्ती अजून तरी प्राप्त झालेली नाही.

तंत्रज्ञान आणि मानव यांच्यातली दरी कमी करण्याचे काही प्रयत्न गेल्या शतकात केले गेले. १९९८ साली केविन वॉरविक नावाच्या ब्रिटिश तंत्रज्ञाने आपल्या शरीरात मायक्रोचिप बसवण्याचा उद्योग केला होता. कॅप्सूलच्या आकाराची परंतु त्यापेक्षा काहीशी निमुळती ‘रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफायर’ (आरेफायडी) चिप केविन यांच्या दंडावर त्वचेखाली बसवण्यात आली. युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग, जिथे हा प्रयोग करण्यात आला, त्या इमारतीत बसवलेली यंत्रं आणि केविनच्या शरीरातील चिप यांच्यात संदेशांची देवाणघेवाण होऊ लागली. प्रोफेसर वॉरविक आले की दिवे लागत, दरवाजे उघडले जात. काही दिवसांनी ही चिप केविनच्या दंडातून काढण्यात आली, परंतु पहिला ‘यंत्रयुक्त मानव’ (सायबोर्ग) हे नाव त्यांना कायमचं पडलं.

केविन वॉरविक यांचे प्रयोग इथेच थांबले नाहीत. मानवी शरीरातली चिप जरी मनुष्याचा भाग झाली तरी ती मानवी मेंदूशी संपर्क करत नव्हती. त्यासाठी मानवी मेंदू आणि यंत्र यात थेट दुवा असण्याची गरज होती. २००२ साली वॉरविक यांच्या मनगटावर एक चिप बसवण्याची शस्त्रक्रिया केली गेली. चिप आणि त्यांच्या हातातील मज्जातंतूंशी केसाच्या आकाराचे १०० इलेक्ट्रोड जुळवले गेले. त्यामुळे चिप मधले सेन्सर्स आणि वॉरविक यांचा मेंदू यांच्यामध्ये संदेशांची देवाण-घेवाण होऊ  लागली. ब्रिटनमध्ये असलेल्या वॉरविक यांची मज्जासंस्था न्यू यॉर्कच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीशी इंटरनेटच्या साहाय्याने जोडण्यात आली. आणि वॉरविक यांच्या हातवाऱ्यांप्रमाणे अमेरिकेत बसवलेला रोबोटिक हात हलू लागला, आणि त्या हाताने पकडलेल्या वस्तूंची संवेदना वॉरविक यांना जाणवू लागली. यानंतरच्या काळात त्यांची पत्नी आणि स्वत: त्यांनी अशाच चिपच्या साहाय्याने संभाषणाशिवाय संवाद साधायचा प्रयत्न केला. एक ना एक दिवस आपण सारेच संभाषणापेक्षा ‘टेलिपथी’चा अधिक वापर करू, असा विश्वास त्यांना वाटतो आहे.

२०१७-१८ च्या सुमारास अमेरिकेतल्या विस्कॉन्सिन राज्यातील ‘थ्री स्क्वेअर मार्केट’ नावाच्या कंपनीने तसेच स्वीडनमधल्या एपिसेंटर या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये अशीच चिप बसवून घेण्याचा पर्याय दिला. या चिपच्या साहाय्याने कर्मचाऱ्यांना बंद दरवाजे उघडता येतील (म्हणजे सिक्युरिटीची गरज नाही!), कंपनीच्या कॅन्टीनमध्ये गेलात तर पैसे न भरता वस्तू विकत घेऊ  शकाल  (पैसे पगारातून आपोआप कापले जातील), इतकंच नाही तर कंपनीच्या वैद्यकीय आणि विमा योजनांचा लाभ घेताना कुठलाही फॉर्म भरावा लागणार नाही – फक्त हात स्कॅन करा बस्स, असं सांगण्यात आलं. आपल्याबद्दलची माहिती कंपनीच्या कंप्युटरला समजेल, ती हॅक झाली तर काय होईल, इत्यादी कुशंका अनेकांनी उपस्थित केल्या, परंतु विचाराअंती ‘अशा चिप्स भविष्यात आपल्या उपयोगाच्याच ठरतील’, असंच अनेकांचं मत पडलं (तंत्रज्ञाबद्दल असा उदारमतवाद युरोपमध्ये अधिक आढळून आला आहे).

आज आपण कुठे आहात, आणि काय करताय, हे हुडकून काढण्यासाठी कुठल्याही मायक्रोचिपची गरजच उरलेली नाही. आपला मोबाइल फोन जणू आपला एक अवयव बनला आहे! क्रेडिट कार्ड, बँक अकाऊंट इत्यादींशी आपला फोन जोडल्यानंतर खरेदी करताना आता फक्त एक ‘क्यू आर कोड’ दाखवला की काम होतंय. मनुष्याला यंत्रप्रणालीच्या जवळ आणायची गरज औद्योगिक क्षेत्रापेक्षा खरं तर वैद्यकीय क्षेत्रात अधिक आहे. मानवी मेंदूची कार्यपद्धती हे वैद्यकशास्त्राला पडलेलं कोडं आहे. त्याचा उलगडा होण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणं अनिवार्य आहे. एपिलेप्सी आणि पार्किन्सनसारख्या मेंदूशी संबंधित असलेल्या व्याधींवर उपचार म्हणून इलेक्ट्रोडच्या साहाय्याने मेंदूतील विद्युतलहरींचं मोजमाप केलं जातं, तसंच मेंदूचं कार्य व्यवस्थित व्हावं म्हणून नवीन लहरी मेंदूत पाठवल्या जातात. असं मोजमाप करण्याच्या शस्त्रक्रिया तुलनेनं कमी वेदनादायी आणि कमी धोकादायक व्हाव्यात म्हणून इलॉन मस्क या उद्योगपतीने २०१९च्या जुलै महिन्यात ‘न्यूरालिंक’ नावाच्या कंपनीची स्थापना केली आहे. न्यूरालिंकचे इलेक्ट्रोड हे मानवी के साच्या दसपट बारीक आहेत आणि के वळ दोन ते चार मिलिमीटरचा छेद करून ते मनुष्याच्या मेंदूपर्यंत सोडता येतात. ही शस्त्रक्रिया वेदनारहित आणि रक्तस्रावाविना व्हावी म्हणून ती रोबॉटच्या करवीच केली जाते. आणि रुग्णास भूल देण्याचीदेखील गरज भासत नाही.

आज न्यूरालिंकचं प्रमुख कार्य वैद्यकीय स्वरूपाचं असलं तरी भविष्यात त्याचा उपयोग मानवी कार्यक्षमता आणि संवेदनक्षमता वाढावी म्हणूनही केला जाऊ  शकेल. उद्या घराचा उंबरठा न ओलांडता गिर्यारोहणाचा अनुभव आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवण्याची शक्यता निर्माण होईल. क्षणार्धात नवीन ज्ञान आत्मसात करणं, नवे अनुभव घेणं सोपं होईल. इतकंच नाही तर भावना आणि संवेदना यांच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होऊ  शकेल, आणि शब्ददेखील कालबा ठरू शकतील. ही ‘अपग्रेड’ सध्या तरी प्रायोगिक स्वरूपात आहे, पण ती आपल्या भेटीस येते आहे, हे नक्की.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 1:11 am

Web Title: article on upgraded gadgets abn 97
Next Stories
1 रॅम्पवरची टॉक टॉक फॅशन
2 संशोधनमात्रे : भाषेच्या राज्यात नांदू चला!
3 बुकटेल : वाईज अ‍ॅण्ड अदरवाईज : अंतर्मुख करणारा कथासंग्रह
Just Now!
X