माणसाचे मन जिंकण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो, हे आपण मोठय़ांकडून ऐकत आलो आहोत. ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या निमित्ताने त्याचं किंवा तिचं मन जिंकण्यासाठी नेहमीच्या पदार्थाना हेल्दी ट्वीस्ट दिलेल्या पाककृती प्रसिद्ध शेफ संजीव क पूर आणि रणवीर ब्रार यांनी ‘व्हिवा’च्या वाचकांसाठी दिल्या आहेत.

चणा खीर

साहित्य: चणा डाळ १ कप, किसलेला खवा १/२ कप, किसलेला गूळ पाऊण कप, दूध १ कप, बदामाचे काप १ टेबलस्पून, काजू व पिस्त्यांचे काप आवडीप्रमाणे, तूप १ टेबलस्पून, हिरव्या वेलचीची पूड अर्धा टेबलस्पून, डेसिकेटेड खोबरं १ टेबलस्पून, गुलाबपाणी १ टेबलस्पून.

कृती: चणा डाळ स्वच्छ धुऊन पाण्यामध्ये १ तास भिजवून ठेवा. नंतर ती पाण्यातून उपसून घेऊन कुकरमध्ये २ कप पाण्यात शिजवा. एका भांडय़ात अर्धा कप पाणी गरम करा आणि त्यात किसलेला खवा व गूळ घाला, चांगले मिसळून घ्या व त्याला उकळी येऊ  द्या. गॅसची आच मंद ठेवून खवा आणि गूळ पाण्यात पूर्ण विरघळेपर्यंत शिजवून घ्या. दुसऱ्या भांडय़ात तूप गरम करा, त्यात सर्व सुका मेवा घालून सोनेरी रंग येईस्तोवर तळून घ्या. आता यात शिजलेली चणाडाळ घाला व थोडा वेळ परतत राहा.

त्यामध्ये दूध घालून ते डाळीसोबत एकजीव करून घ्या व मिश्रणाला उकळी येऊ  द्या. गॅसची आच मंद करून ५ मिनिटे शिजू द्या. आता यात गूळ, पाणी व खव्याचे मिश्रण, वेलची पूड, डेसिकेटेड खोबरं घालून ३ मिनिटे शिजवा. या मिश्रणाला उकळी येऊ  देऊ  नका. गुलाबपाणी घालून मिसळा आणि गॅस बंद करा. सर्वाना नक्की आवडेल अशी चणाडाळ खीर तयार आहे. खीर थंड होऊ  द्या, मग वाढा.

कॉर्नफ्लेक तीळ मोदक

साहित्य: तांदळाचे पीठ १ कप, पाणी १ कप, मीठ चवीनुसार, तिळाचे तेल काही थेंब, कॉर्नफ्लेक्स पाऊण कप, दूध एक तृतीयांश कप, पाणी २ टेबलस्पून, किसलेला गूळ अर्धा कप, काळे तीळ २ टेबलस्पून भाजून व भरडून वेलची पूड अर्धा टेबलस्पून, तूप अर्धा टेबलस्पून

कृती: एका भांडय़ात तांदळाचे पीठ, पाणी, मीठ आणि तेल चांगले एकजीव करून घ्या व बाजूला ठेवा. खोलगट कढई घेऊन त्यामध्ये हे मिश्रण घाला. कढई मध्यम आचेवर ठेवून मिश्रण सतत ढवळत राहा. हळूहळू याचा घट्ट गोळा तयार होऊ  लागेल आणि कढईच्या कडांपासून सुटू लागेल. व्यवस्थित गोळा तयार झाला म्हणजे मिश्रण नीट शिजले आहे असे समजावे. गॅस बंद करावा, कढई बाजूला ठेवून त्यावर झाकण ठेवावे.

सारणाची कृती – एका छोटय़ा भांडय़ात कॉर्नफ्लेक्स आणि दूध एकत्र करून १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवून द्यावे. खोलगट टोप घेऊन त्यात पाणी उकळावे, गूळ घालून तो पूर्णपणे विरघळवून घ्यावा. आता यात तीळ, भिजवलेले कॉर्नफ्लेक्स घालून मंद आचेवर २ मिनिटे किंवा सारण हवे तितके दाट होईपर्यंत मिसळवून घ्यावे. सर्वात शेवटी यामध्ये वेलची पूड व तूप घालावे. गॅस बंद करावा व सारण थंड होऊ  द्यावे.

मोदकाच्या पिठाचे लिंबाएवढे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत, प्रत्येक गोळ्याची पारी तयार करावी. प्रत्येक पारीमध्ये मावेल तितके सारण भरून मोदकाचा आकार देत पारी बंद करून घ्यावी. इडली भांडे किंवा एका ताटलीला चांगले तूप लावून घ्यावे. त्यामध्ये हे मोदक एकमेकांना न चिकटता ठेवावेत. इडली स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवावे, त्याला उकळी आली की मोदक ठेवलेला स्टॅन्ड किंवा ताटली त्यामध्ये ठेवून वर झाकण ठेवून १० ते १२ मिनिटे किंवा मोदक नीट उकडले जाईपर्यंत मध्यम आचेवर ठेवावे. वाढायच्या भांडय़ात ठेवण्याच्या आधी मोदक जरा थंड होऊ  द्यावेत.

चिकन खिमा पुलाव

साहित्य: चिकन खिमा २०० ग्रॅम, भिजवून ठेवलेले बासमती तांदूळ दीड कप, आले दीड इंच, लसूण पाकळ्या १० ते १२, तूप ४ टेबलस्पून, जिरे १ टेबलस्पून, उभा चिरलेला कांदा १ कप, मध्ये एक चीर दिलेल्या हिरव्या मिरच्या ३, लाल तिखट १ टेबलस्पून, बारीक चिरलेले टोमॅटो अर्धा कप, मीठ चवीनुसार, पुदिन्याची पाने १५ ते २०, बारीक चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून, चिकन मसाला २ टेबलस्पून.

कृती: आले व लसूण यांची मऊ  पेस्ट बनवून घ्या. एका भांडय़ात तूप गरम करून घ्या, त्यात जिरे, कांदे व हिरव्या मिरच्या घाला. कांद्याचा रंग बदलायला लागेस्तोवर सतत हलवत राहा. आता यामध्ये चिकन खिमा घालून आच मोठी करा व ४ ते ५ मिनिटे चांगले परतवून घ्या. परतवलेल्या खिम्यामध्ये आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, टोमॅटो, ३ कप गरम पाणी, मीठ आणि बासमती तांदूळ घालून चांगले मिसळून घ्या. आता या मिश्रणाला एक उकळी येऊ  द्या. आच मंद करून भांडय़ावर झाकण ठेवा व १२ ते १५ मिनिटे शिजू द्या. नंतर पुदिन्याची पाने, कोथिंबीर आणि चिकन मसाला घालून पुन्हा चांगले मिसळून घ्या. भांडय़ावर झाकण ठेवून अजून ५ ते ७ मिनिटे शिजू द्या. चमचमीत चिकन खिमा पुलाव तयार आहे.

(टाटा संपन्न आणि केलॉग्जच्या सौजन्याने)

viva@expressindia.com