गायत्री हसबनीस

फॅशन डिझायनर वेन्डेल रॉड्रिक्सच्या निधनाची बातमी ही फॅशन क्षेत्रातले एक अभ्यासपूर्ण आणि प्रयोगशील पर्व हरपल्याची जाणीव देऊन गेली. फॅशन क्षेत्रातले वेगळे आणि चळवळीतले नाव ही वेन्डेल यांची ओळख होती. त्यांचे काम हे भारतीय फॅशनइंडस्ट्रीचा पाया रचणारे होते, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

भारतासारख्या विकसनशील देशात नव्वदच्या दशकात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. त्यामुळे भारतीय तरुण पिढीला वेगवेगळ्या क्षेत्रांत शिकण्यासारखे आणि स्व:तला घडवण्यासारखे नवनवीन व्यासपीठ मिळू लागले. ज्यांनी जागतिकीकरणाचा तो काळ अनुभवला आणि त्याच वेळी आपल्या कर्तृत्वाने ते त्यांच्या क्षेत्रात पुढे आले. प्रत्येकाचे क्षेत्र निराळे असले तरी त्या अख्ख्या पिढीने जगासमोर आदर्श निर्माण केला. त्यांच्यापैकीच एक महत्त्वाचे नाव म्हणजे वेन्डेल रॉड्रिक्स. वेन्डेलचे व्यक्तिमत्त्व जागतिक पातळीवर सर्वानाच प्रेरणा देणारे होते. साधारणपणे दोन-अडीच दशके फॅशनसारख्या ग्लॅमरस क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करूनही त्यांचे राहणीमान आणि जीवनशैलीत त्यांनी साधेपणाच जपला. सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य, समलिंगींसाठी उभारलेली चळवळ असे बहुपेडी व्यक्तिमत्त्व असलेल्या वेन्डेलला म्हणूनच २०१४ साली पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

वेन्डेल रॉड्रिक्स हा गृहस्थ मूळचा गोव्याचा. गोव्याहून सुरू झालेला आणि मुंबईपर्यंत पोहोचलेला त्याचा प्रवास प्रेरणादायी आहे. तो मुंबईतच लहानाचा मोठा झाला. मस्कतमधील आपली साहाय्यक संचालकाची नोकरी सोडून तो अमेरिका आणि पॅरिससारख्या देशांत गेला. आपल्या आवडीचे क्षेत्र अजमावू लागला आणि तेथून पुढे तो त्याच्या क्षेत्रात कार्यरत राहिला ते अगदी शेवटपर्यंत. आजच्या तरुणाईला भुरळ घालतात ते मनीष मल्होत्रा, कुणाल रावल इत्यादींसारखे तगडे आणि लोकप्रिय डिझायनर्स. परंतु वेन्डेलच्या जाण्यानंतर कित्येक तरुणांनी त्याला सोशल मीडियावरून आदरांजली अर्पण केली ही त्याच्या कार्याची खरी पावती आहे. वेन्डेलने फॅशन क्षेत्रात आव्हानात्मक आणि नावीन्यपूर्ण काम केले आहे. तो नेहमीच फॅशनचा चारही बाजूंनी सतत विचार करणारा विचारवंत होता असे म्हणायला हरकत नाही. जुन्या काळातील पारंपरिक पद्धतीने परिधान केल्या जाणाऱ्या वस्त्रांचे त्याला विशेष आकर्षण होते. जागतिक वस्त्रांच्या इतिहासाबद्दल महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारची व्याख्याने देणारा वेन्डेल वेस्टर्न फॅशनचाही उत्तम जाणकार होता.

वेन्डेलच्या कारकीर्दीतही चढ-उतार होतेच, पण त्यांच्यापुढे नतमस्तक होणाऱ्यातला तो नव्हता. एके काळी फॅशन कलेक्शन सादर करताना आर्थिक अडचणींनाही तो सामोरा गेला होता. योग्य फॅब्रिक, बूट्स, आऊटफिट्स पैशांच्या अभावी त्याच्या एकूण कलेक्शनमधले फार मोजकेच सिल्हाऊट्स तो शोकेस करू शकला. परंतु त्यानंतर मात्र तो लॅक्मे फॅशन वीक, ब्लेंडर्स प्राइड फॅशन टूर, दुबई फॅशन वीक, पॅरिस फॅशन वीक- प्रेट अ प्रोटर, एफडीसीआय (फॅशन डिझायनर काऊन्सिल ऑफ इंडिया) फॅशन वीकसारख्या मोठय़ा आणि नामवंत व्यासपीठांपर्यंत पोहोचला आणि तिथून तो खाली कधीच उतरला नाही. फॅशन क्षेत्रात तो परिचयाचा झाला जेव्हा त्याने सस्टेनेबल, इकोफ्रेंडली आणि स्वीमवेअर फॅशनची ओळख भारताला करून दिली. त्यामुळेच त्याला ‘पायोनिअर ऑफ रिसॉर्ट वेअर’ म्हणूनही ओळखले जाते. २०१० साली त्याने मूळची गोवन कुणबी साडी पुन्हा आपल्या वेगळ्या शैलीत जगासमोर आणली. गोव्याच्या संस्कृतीचा खूप मोठा भाग त्याच्या फॅशनमध्ये आत्तापर्यंत दिसून आला आहे. त्याच्या फॅशनमध्ये रंगीबेरंगी मोटिव्ह्स तर सतत पाहायला मिळायचे. गच्च भरलेली एम्ब्रॉयडरी, हेवी मटेरिअल आणि लांबलांब आऊटफिट्स त्याने कधीच बनवले नाहीत. कमर्शियल फॅशन शोधण्याचा त्याचा ध्यास मुळीच नव्हता. वेडिंग फॅशनसाठी आखलेल्या सर्वच कमर्शियल फॅशन शोजना तो नाहीच म्हणायचा. फक्त पैसे कमावणे हा मूळ उद्देश त्याचा आजतागायत नव्हता. आपली संस्कृती आणि भारतीय फॅशन त्याला जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची होती आणि त्याने ती पोहोचवलीदेखील. चळवळीतून क्रांती करणारा फॅशन डिझायनर, जो खादीसारख्या चळवळीतही मोठय़ा आत्मीयतेने सहभागी झाला होता.

त्याच्या याच नावीन्यतेच्या ध्यासामुळे त्याला १९९५ साली आयजीईडीओ या मोठय़ा आणि नामांकित फॅशन फेअरमध्ये निमंत्रित केले होते. आयजीईडीओ फॅशन फेअरला निमंत्रण मिळवणारा तो पहिलाच भारतीय फॅशन डिझायनर ठरला. यापूर्वीच त्याने १९८९ साली स्वत:चे लेबल सुरू केले होते. त्यानंतर त्याने व्हेजिटेबल डाइंग आणि फार्मिग कॉटनवर काम करायला सुरुवात केली. फॅशनमध्ये असा प्रकार सहसा कोणी तेव्हा केला नसेल, पण वेन्डेलचे वेगळेपण त्यातच होते. वेन्डेल वेस्टर्न आऊटफिट्सप्रमाणे भारतीय वस्त्रांचा खूप मोठा चाहता होता. त्यामुळे साडी आणि त्यांचे आकर्षक डिझाइन्स बनविण्यात तो पटाईत होता. अभिनेत्रींपासून ते राजकारणी स्त्रियांपर्यंत वेन्डेलच्या साडय़ा सर्वानी नेसल्या आहेत.

२०१६ साली तो निवृत्त झाला, पण तरीही त्याने मनापासून फॅशन क्षेत्रात काम सुरूच ठेवले होते. कारकीर्दीच्या या टप्प्यातही त्याने मोठे योगदान दिले होते. ‘लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिव्ह २०१६’मध्ये त्याने इंडियन वुमन्स साइज चार्ट आणला. त्यामुळे भारतीय स्त्री त्या चार्टद्वारे आपले कपडे खरेदी करू शके ल आणि बनवू शकेल इतके मोठे इनोव्हेटिव्ह काम त्याने केले. त्यानंतर त्याने लॅक्मे फॅशन वीकच्या मंचावरूनच प्लस साइजची फॅशन मेन्सवेअर आणि खासकरून वुमन्सवेअरमध्येही आणली. ‘ऑल- द प्लस साइज स्टुडिओ’च्या सहयोगाने त्याने प्लस साइज फॅशन रॅम्पवर आणली आणि अल्पावधीत ती लोकप्रियही केली. प्लस साइजबाबतीतला टॅबूही त्याने मोडून काढला. तो लेखकही होता हे बऱ्याच जणांना माहिती नव्हते. फॅशन डिझायनर म्हणून इंडियन फॅब्रिक्स, पेस्टल शेडेड रंग आणि नावीन्यपूर्ण डिझाइन्स करणारा डिझायनर अशीच त्याची जास्त ओळख होती. त्याची ‘मोडा गोवा- हिस्ट्री अ‍ॅण्ड स्टाइल’, ‘द ग्रीन रूम’ हे आत्मचरित्र आणि ‘पोस्केम- गोवन्स इन श्ॉडो’ ही तीन महत्त्वाची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

खरे तर वर म्हटल्याप्रमाणे तो खरोखरच चळवळीतून क्रांती करणारा फॅशन डिझायनर होता. तृतीयपंथीयांसाठीचा लढा, सस्टेनेबल फॅशनच्या बाबतीत पुढाकार, खादी चळवळ, प्लस साइज फॅशनमधील नावीन्यपूर्ण काम आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन संस्कृतीला जपणारा हा फॅशन अवलिया होता. वेन्डेल रॉड्रिक्ससारखे जाणते फॅशन डिझायनर पुन्हा उदयाला येणे ही काळाची गरज आहे.