तेजश्री गायकवाड

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतू कोणताही असो, आपल्याला दिवसभर प्रेझेंटेबल राहावंच लागतं. आपल्या कामाबरोबरच स्वत:ला प्रेझेंट करणं ही आता काळाची गरज झाली आहे. मेकअप करणं म्हणजे नटणं असा विचार आता अजिबात राहिलेला नाही. मेकअप हा आताच्या काळात व्यक्तिमत्त्वाचा भाग झाला आहे. मग अशा वेळी उन्हाचा वाढता पारासुद्धा मेकअप करण्यापासून आपल्याला कसा वंचित ठेवू शकतो?

उन्हाळ्यात घाम येणं, नेहमीपेक्षा जास्त उन्हाचा त्रास होणं, अवसान गळून गेल्यासारखं होणं, थकल्यासारखं वाटणं, सतत तहान लागणं अशी नानाविध लक्षणं दिसतात, मात्र या उन्हाळ्यात सगळ्यात जास्त जर कशावर परिणाम होत असेल तर ती म्हणजे आपली त्वचा. म्हणून रोजचा मेकअप करतानाही आपल्या त्वचेला सांभाळून करावा लागतोच. जास्त काही करता येत नसेल किंवा करत नसाल तरी बेसिक किमान काजळ, आयलायनर आणि लिपस्टिक लावलीच जाते. भर उन्हातही हाच लुक कायम ठेवणं थोडंसं त्रासदायक वाटत असलं तरी अवघड नक्कीच नाही. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतो आहे, त्यामुळे घाम पुसत असतानाच आपला मेकअप तर खराब होणार नाही ना अशी चिंता अनेकींना सतावत असते. आता उन्हाळ्याच्या दिवसांतही तुम्हाला नेहमीसारखेच अप टु डेट दिसायचे असेल तर मेकअपसाठी उपयुक्त असणाऱ्या काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

उन्हाळ्यातील मेकअप कसा असावा, तो जास्त वेळ कसा टिकवून ठेवावा, त्यासाठी कोणते प्रॉडक्ट्स वापरावेत यासाठी व्हिवाने थेट एक्स्पर्टला बोलतं केलं.  मेकअप, लॅक्मे सलोनच्या राष्ट्रीय क्रिएटिव्ह डायरेक्टर अनुपमा कटयाल सांगतात, ‘उन्हाळा सुरू झाला की गरम हवामान आहे म्हणून लोक कमीतकमी मेकअप करायला सुरुवात करतात. तर काही जण अजिबातच मेकअप करत नाहीत. पण रोज प्रेझेंटेबल राहण्यासाठी मेकअप गरजेचा आहे. उन्हाळ्यात मेकअप चुकला तर संपूर्ण चेहरा खराब दिसू शकतो. अशा वेळी तुमचा मेकअप आधीच नीट प्लॅन करा. चेहऱ्यावर मेकअप करताना काय काय लावायचं ते आधीच नीट ठरवा. शक्य तितके चांगल्या गुणवत्तेचे आणि ऑइल-फ्री असणारे प्रॉडक्ट्स वापरा. संपूर्ण चेहऱ्यावर फाउंडेशन लावण्यापेक्षा जिथे गरज आहे त्याच ठिकाणी स्पॉट कन्सिलर लावा. कलरफुल मेकअप करताना जरा जपून कलर वापरा. आपण ज्या पद्धतीने मेकअप आपल्या चेहऱ्यावर लावतो त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो, त्यामुळे हळुवारपणे पद्धतशीर मेकअप करावा’.

उन्हाळा ऋतू म्हणजे सुट्टी आणि लग्नसमारंभ यांचाही काळ असतो. मग तर ‘फर्स्ट इम्प्रेशन हेच लास्ट इम्प्रेशन असतं’ या विचारानेच प्रत्येकजण लग्न सोहळ्यात आपण छान कसे दिसू याचा विचार करत असतो. कपडय़ांच्या खरेदीपासून ते सौंदर्यप्रसाधनांपर्यंत सगळ्याचीच खरेदी केली जाते. मात्र या वस्तू खरेदी करतानाही योग्य ती काळजी घ्यायला हवी. आपण खरेदी करत असलेली वस्तू चांगल्या ब्रँडची आहे की नाही हे तपासून घ्यायलाच हवे. लिपस्टिक, लायनर, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट यांची शेड आपल्या त्वचेवर सूट होईल अशी आहे का?, तेही तपासून घ्यावे. मात्र त्याचबरोबरीने त्या प्रसाधनाची एक्सपायरी डेट न विसरता तपासावी. उन्हाळ्यात  मेकअपचे प्रॉडक्ट्स आपल्या चेहऱ्यावर लावण्याआधीही काळजी घ्यायची असते, अशी माहिती अनुपमा यांनी दिली. कोणतेही प्रॉडक्ट आपल्या चेहऱ्यावर लावण्यापूर्वी आपला संपूर्ण चेहरा व्यवस्थित धुवा. त्यानंतर मेकअप सुरू करण्याआधी काही सेकंद बर्फाच्या क्यूबने चेहऱ्यावर मालिश करा, असे त्यांनी सांगितले.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. या काळात चेहरा तेलकट होणं, पिंपल्स येणं, चेहरा आणि हात ‘टॅन’ होणं म्हणजेच काळे पडणं अशी अनेक लक्षणं दिसून येतात. त्यामुळे चेहरा सुंदर दिसण्यासाठी अनेक सोपस्कार केले जातात. सनस्क्रीन लोशन्स, अँटीटॅनिंग क्रीम यांच्यामागे लपवून त्वचेचं रक्षण करण्याचे अनेक प्रयत्न केले जातात. पण त्यातला नेमकेपणा कोणीच लक्षात घेत नाही. बाजारात मिळणाऱ्या क्रीम्सचा त्वचेवर कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय सातत्याने मारा केला जातो आणि त्याचा वाईट परिणाम म्हणजे त्वचा आणखी खराब होऊ  शकते. अमुक एका प्रकारच्या त्वचेसाठी कोणतं क्रीम वापरावं यासाठी स्कीन एक्स्पर्टचा सल्ला घेण्याऐवजी जाहिराती पाहून आपल्या मनानुसार सनस्क्रीन प्रॉडक्ट्स वापरण्याचं प्रमाण जास्त दिसून येतं. या गोष्टीचा सगळ्यांनाच तोटा होतो असं नाही, मात्र सतत प्रदूषण, ऊन, धावपळीमुळे खाण्याच्या सतत बदलणाऱ्या पद्धती यामुळे त्वचेच्या गरजा बदलतात ज्यांचा आपण फार गांभीर्याने विचार करत नाही. काही जणांना उन्हापासून रक्षण करण्यासाठी कोणतंही क्रीम चालतं तर काही जणांना त्याच क्रीमचा त्रासही होऊ  शकतो, ही बाब आपण लक्षात घेत नाही. याविषयी बोलताना, उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण आणि त्याची चमक राखून ठेवण्यासाठी दैनिक वापरासाठी व्हिटॅमिन सी सिरम वापरा. योग्य प्रकारचा एसपीएफ (SPF) ५० हा  फॉर्म्युला आपल्या त्वचेचं सूर्यापासून रक्षण करण्यासाठी नक्की वापरा, असं अनुपमा यांनी सांगितलं. उन्हाळ्यात मेकअप जास्त काळ टिकत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. अशा वेळी काय करावं हा प्रश्न नेहमीच पडतो. त्यासाठी आपल्या चेहऱ्यावर मेकअप करायच्या आधी थंड पाण्याने चेहरा धुवा, चेहरा संपूर्ण कोरडा करा. प्रत्येक मेकअपची सुरुवात चांगल्या सिरमने करा. अशा आद्र्र हवामानात चेहरा चांगला मॉइस्चराइझ राहण्यासाठी हे गरजेचं आहे. चांगल्या गुणवत्तेचं आणि ऑइल-फ्री प्राइमर तुमचा मेकअप जास्त वेळ ठेवण्यासाठी मदत करेल. हेवी फाउंडेशन आणि पावडर शक्यतो टाळा. वॉटर बेस्ड किंवा टिंटेड मॉइस्चराइझर वापरून पाहा. यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर वेगळेपण नक्की बघू शकाल. वॉटरप्रूफ मस्कारा आणि आयलायनर वापरा. कमी पण योग्य आणि गरजेपुरताच मेकअप करा. हा काळजीचा भाग जसा चेहऱ्यासाठी आवश्यक आहे. तसंच शरीराचीही आतून काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी भरपूर पाणी पिण्यास विसरू नका आणि स्वत:ला हायड्रेट ठेवा. हे आपल्या त्वचेसाठी महत्त्वाचं आहे. त्याचा परिणाम आपल्या मेकअपवरही होणार आहे. त्यामुळे चेहरा उजळून निघायचा असेल तर शरीराची आतून-बाहेरून काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं..

viva@expressindia.com