20 October 2019

News Flash

डेनिमचा महिमा!

डेनिम हा तसा आजच्या काळात फॅ शनच्या बाबतीतला सर्वात ‘कूल’ मानला जाणारा प्रकार

(संग्रहित छायाचित्र)

गायत्री हसबनीस

या वर्षी ‘सेक्शुअल अब्यूज/हरॅसमेंट प्रीव्हेन्शन’ अशी थीम डेनिम डेसाठी ठेवण्यात आली होती. आपली जीन्सच आपल्याला मोठय़ा प्रमाणात सुरक्षित ठेवू शकते, असा विचार यातून मांडण्यात आला होता. त्या अर्थाने फॅ शन स्टेटमेन्ट नव्हे तर जीन्सक डे सोशल स्टेटमेन्ट म्हणून मुलींनी पाहायला हवे, असा संदेशही दिला गेला. सोशल मीडियावर अनेक सेलेब्रिटींनी व तरुणींनी डेनिम जीन्स घालून आपल्या कॅप्शनमध्ये लैंगिक अत्याचाराविरोधातलं मत स्पष्ट केलं. ‘सेलियो’ या फॅ शन स्टोअरनेदेखील #वेअरयुवरडेनिम या हॅशटॅगद्वारे सोशल मीडियावर या डेनिम डे थीमच्या अनुषंगाने सेलेब्रिटींना घेऊन त्यांची मतं आणि जीन्ससह फोटो शेअर केले.

यंदा २४ एप्रिलला ‘वर्ल्ड डेनिम डे’ साजरा करण्यात आला. आपल्या ग्राहकांना डेनिमचे महत्त्व कळावे म्हणून विविध मोठय़ा ब्रॅण्ड्सनी डेनिमची लोकप्रियता आणि एकूणच सामाजिक उपयुक्तता समोर ठेवली होती. डेनिम या कापडाला नुसतेच फॅ शनच्या बाबतीत महत्त्व नसून सामाजिक स्तरावर डेनिमला एक विशेष लक्षणीय महत्त्व आहे. डेनिमचा आत्तापर्यंतचा इतिहास याची साक्ष देतो, त्यामुळे तो समजून घ्यायलाच हवा..

डेनिम हा तसा आजच्या काळात फॅ शनच्या बाबतीतला सर्वात ‘कूल’ मानला जाणारा प्रकार. डेनिमचे प्रत्येक आऊटफिट्स सध्या जोरदार ट्रेण्डमध्ये आहेत. डेनिमचे वनपीस, शर्ट्स, जॅकेट्स, जीन्स, कफ्तान, जम्पसूट, पिनाफोर, गाऊन, फ्रॉक, शॉर्ट्स आणि ड्रेसेस असे नानाविध प्रकार आहेतच, पण लौकिकार्थाने डेनिमचे अस्तित्वच कौतुकास्पद आणि उत्कंठावर्धक आहे. डेनिमचा रंग आणि त्याचे कापड इथपासूनच त्याविषयीची उत्सुकता वाढते. यंदा ‘वर्ल्ड डेनिम डे’च्या निमित्ताने आपल्या आवडत्या डेनिमच्या इतिहासाची काही पाने परत पडताळून पाहिली गेली. आपल्याला माहिती असलेल्या डेनिमपेक्षाही आपल्याला माहिती नसलेल्या डेनिमचे अप्रूप अधिक आहे. आत्तापर्यंत लोकप्रिय डेनिमची

फॅशन, त्याचा प्रवास, त्याचे महत्त्व आणि त्याचे वर्चस्व कसे वाढत गेले हे लक्षात घेऊयात..

खरं तर जग जेव्हा ट्रॅडिशनल लुकमध्ये रमले होते त्या काळात ‘डेनिम’सारख्या पूर्णत: वेगळ्या कपडय़ापासून तयार केलेल्या आधुनिक स्टाइलच्या आऊटफिटला एक वेगळंच स्थान प्राप्त झालं. १८७३ च्या काळात डेनिम हे सर्वप्रथम ओळखले जाऊ  लागले. आज प्रत्येक ओकेजनला, पार्टी आणि विशेषत: रूटिन लाइफमध्ये प्रत्येक वयोगटातील स्त्री-पुरुष डेनिमचे कपडे हमखास वापरतातच. कुठे तरी त्या काळात आजच्या डेनिमच्या लोकप्रियतेचा विचार रुजला असावा असं आजच्या पिढीच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनलेल्या डेनिम आऊटफिट्सकडे पाहिल्यावर वाटतं. प्रथम डेनिमचा वापर मेन्सवेअरमध्येच जास्त होता. त्याच्याआधी डेनिमचे कापड मोठय़ा प्रमाणात कामगारांसाठी वापरले जायचे. त्या वेळी सोनं खणणाऱ्या अमेरिकन कामगारांना अंगावर मजबूत कापड असणे आवश्यक होते. त्यामुळे डेनिम दैनंदिन जीवनात जास्त आवश्यक ठरला. डेनिमचे फॅब्रिक हे एक प्रकारचे कॉटन असते, जे ‘ट्विल’ या वीणकाम पद्धतीने केलेल्या दोऱ्यांनी बनते. ज्यामुळे ‘व्रॅप’ आणि ‘वेफ्ट’ या दोन धाग्यांचे सरळ रेषेतील वीणकाम तयार होते. व्रॅप असलेले धागे इंडिगो रंगात डाय केले जातात, तर वेफ्ट असलेले धागे शुद्ध पांढऱ्या रंगाचे ठेवले जातात.

डेनिमचे मूळ : डेनिमचे फॅॅब्रिक पहिल्यांदा बनले ते इटलीच्या ‘सिटी ऑफ जिनोआ’मध्ये. त्या काळात डेनिम हे इंडिगो रंगात अक्षरश: डाय केले जायचे. तेव्हापासूनच डेनिमला ‘ब्लू दे जेनेस’ किंवा ‘ब्लू ऑफ जिनोआ’ असे संबोधले जाऊ  लागले. विशेष लक्षणीय गोष्ट म्हणजे डेनिमसाठी वापरले जाणारे इंडिगो रंगाचे डाय हे भारतीय मुळातील वनस्पतींपासून तयार करून वापरले जायचे. जागतिक बाजारपेठेत आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात नावीन्यपूर्ण गोष्टी येत होत्या; परंतु तरीदेखील ‘डेनिम’ या कापडाचे वैशिष्टय़ ठळकपणे रुजले. टिकाऊ , स्टायलिश, स्वदेशी आणि सर्वात जास्त मागणी असलेले अशी डेनिमची ओळख वाढली.

१९३० मधील डेनिमची उत्क्रांती : त्या काळात हॉलीवूडचा प्रचंड प्रभाव लोकांवर होता आणि त्याचबरोबरीने त्या फॅ शनचासुद्धा. हॉलीवूडमध्ये त्या वेळी ‘काऊ बॉय’ धाटणीचे सिनेमे बनू लागले आणि हिरोच्या अंगावर डेनिम जीन्स चढवल्या गेल्या. तेव्हापासून त्याचा वापर अधिक वाढला. त्या वेळी दुसऱ्या महायुद्धामध्ये डेनिमचा खप कमी झाला, पण तेव्हा डेनिमची लोकप्रियता इतकी वाढू लागली की, अमेरिकन सैनिक सुट्टीवर असतानाही डेनिम जीन्स वापरत होते.

१९५० : डेनिम जीन्सच्या लोकप्रियतेचे पर्व : टीनएजर्समध्ये ब्लू जीन्स म्हणजेच डेनिमची फॅ शनपाहायला मिळाली. तेव्हाच्या हॉलीवूड चित्रपटातून डेनिमचे फॅ शनस्टेटमेंट ‘रिबेलियस’ या अर्थाने विकसित झाले. तरुणांची जीवनशैली आणि स्थितीही सुधारत होती. कफ्ड डेनिम स्टाइल, ब्लॅक बेसिक जीन्स, लाइट वॉश्ड असे जीन्स ट्रेण्ड्स हे मुलांमध्ये असून त्या काळी मुली जास्त प्रमाणात डेनिम जीन्स वापरू लागल्या होत्या. १९५३ आणि १९५५ सालच्या ‘द वाइल्ड वन’ आणि ‘रिबेल विथआऊट अ कॉझ’ या चित्रपटांमुळे फॅ शनमधून उमटणारा बंडखोर आणि बोल्ड अ‍ॅटिटय़ूड तरुणांमध्ये भिनला आणि त्याला जोड मिळाली ती डेनिमची..

१९६० जीन्स एक ‘काऊं टर कल्चर’ फॅ शन: हिप्पी कल्चरची या दरम्यान जगाला ओळख झाली. ६० च्या दशकात अमेरिकाच नव्हे तर संपूर्ण जगात तरुणाईची विचारशैली बदलत गेली. फ्री लव्ह मूव्हमेंट उदयास आली. वेस्टर्न कल्चर यानिमित्ताने एवढे बदलले की, फॅशनमधून तरुणांचा ‘फ्रीडम’ जगासमोर येत होता. क्लासिक कॅज्युअल ब्लू जीन्स या तरुणाईच्या स्वतंत्र विचारांचे एक प्रतीक बनली. या काळात तरुणांच्या स्वभावात कुठेही स्वैराचार नव्हता. जवळपास पर्सनलाइज्ड फॅ शनला येथूनच सुरुवात झाली. स्टोन फिनिशिंग असलेली गडद रंगाची एम्ब्रॉयडरी आणि पॅचवर्कची स्टाइल डेनिमवर अवतरली.

१९७० आणि १९८० डिझायनर जीन्सचा काळ : बेल बॉटम फ्लेअर्स आणि लो-राइस हिप हगर्स असे कट्स डेनिममध्ये या काळात जोरदार दिसू लागले होते. हिप्पी वेअरमध्ये जीन्स जॅकेट्स फॅ शनट्रेण्डमध्ये फिक्स बसले. स्टोन वॉश्ड, अ‍ॅसिड वॉश्ड आणि रिप्ड जीन्स तेव्हा अधिक प्रिय होत्या. निमुळत्या रचनेचा ‘स्किनर लेग कट’ या नवीन स्टाइलने वेगळी भर डेनिममध्ये आणली.

१९९०  बॅगी जीन्स : या काळात तरुणांचा कल हा रॉक बॅन्ड, गिटार म्युझिक इत्यादी गोष्टींकडे वळत होता आणि त्यातूनच हा काळ ‘ग्रन्ज एरा’ म्हणून ओळखला जातो. आवश्यक कपडय़ांहून या दरम्यान कॅ ज्युअल स्टाइलच्याच डेनिम जीन्स तरुण वापरत होते. डेनिममध्ये मल्टिपल पॉकेट्स, टॅब्स, हेड-टू-टो डेनिम डंगरी आणि ड्रेसेस जास्त ट्रेण्ड इन ठरले. अशा डेनिम स्टाइल्स या तरुण मुलींमध्ये जास्त पसंतीस उतरल्या होत्या, तर हिप हॉपची फॅ शनजशी लोकप्रिय ठरली तशी तरुण मुलांमध्ये बॅगी जीन्सची फॅशनअधिक रुळली.

२००० : स्किनी जीन्स : या काळात मात्र एक गरज म्हणून डेनिमचे नाते अधिकच घट्ट झाले. पॉप स्टार आणि त्यांच्याभवतीचे पॉप कल्चर अल्ट्रा लो-राइझची फॅ शनघेऊन परतले. या काळात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे ७०-८० च्या दशकातील डेनिमची फॅ शनपरत पाहायला मिळाली. या वेळी फ्लेअर आणि बूट कट असे काही कट्स डेनिममध्ये लोकप्रिय होते. एव्हाना डेनिमच्या स्ट्रेचनेसमध्ये फार नावीन्यपूर्ण पद्धती विकसित होत होत्या आणि त्याचबरोबर ‘स्किनी जीन्स’ हा प्रकार ट्रेण्डमध्ये आला.

२०१० : हाय वेस्ट्स आणि क्रॉप्ड लेग्ज : डेनिमचा उपयोग हा वर्कआऊट किंवा शारीरिक तंदुरुस्तीसाठी अधिक होऊ लागला. या काळात मात्र डेनिममध्ये वैविध्य यायला लागले. मोठय़ा प्रमाणात तरुण मुलींमध्ये स्किनियर स्टाइल्स तितक्याच लोकप्रिय झाल्या. डेनिममध्ये हाय वेस्ट जीन्सही या काळात विलक्षण लोकप्रिय झाल्या. त्या काळात ‘स्ट्रेच डेनिम्स’ आल्या.

२०१९ मध्ये ‘स्पायकर’ या ब्रॅण्डने (GYMJNS) या धाटणीच्या जीन्स आणल्या आहेत ज्यांची रचना ‘फोर वे डायनॅमिक स्ट्रेच’ आणि ‘इर्गोनोमिक कन्स्ट्रक्शन’ पद्धतीने केलेली असून स्पेशली फिटनेससाठी डिझाईन केल्या आहेत. लेग स्विंग, आर्म सर्कल्स, लंग्स आणि बॉडी वेट स्क्वॉट्ससारखे व्यायाम प्रकार करताना कम्फर्टेबल वाटतील अशी या जीन्सची रचना आहे.

viva@expressindia.com

First Published on May 3, 2019 12:03 am

Web Title: article on world denim day