14 October 2019

News Flash

जगाच्या पाटीवर : साधेसोपे, सरळ वळण

मला पहिल्यापासून संशोधनातच रस होता. त्या अनुषंगाने मी रुईया महाविद्यालयातून बॅचलर्स केलं होतं.

(संग्रहित छायाचित्र)

वल्लरी सावंतचव्हाण

मला पहिल्यापासून संशोधनातच रस होता. त्या अनुषंगाने मी रुईया महाविद्यालयातून बॅचलर्स केलं होतं. न्युरोसायन्स हा विषय मुंबईव्यतिरिक्त इतर विद्यापीठात उपलब्ध असला तरी तो पर्याय मला नको होता. पदव्युत्तर शिक्षणासाठी मी सोफिया महाविद्यालयात अर्ज केला होता. मुंबईत केवळ तिथेच न्युरोसायन्स हा विषय असून, अगदी मर्यादित जागा असतात. मी कॉलेजटॉपर होते तरी तगडी स्पर्धा असल्याने प्रवेश मिळेल का, असा किंतु मनात होता. पण पहिल्याच यादीत प्रवेश मिळाला. सोफियातील अभ्यासक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे संशोधन करण्यासाठी स्वयंसिद्ध व्हावं, हा असतो. तिथे आमच्या टीमने बीएआरसीमधल्या कॉन्फरन्समध्ये पोस्टर प्रेझेंटेशन केल्यावर आम्हाला विचारणा झाली होती की, ‘तुम्ही पीएचडीच्या विद्याíथनी आहात का?’ दिवसातला अधिकांशी काळ किंवा अगदी रविवारीही आम्ही महाविद्यालयात असायचो. आम्हाला रिसर्च प्रोजेक्टसाठी तेवढा वेळ द्यायलाच लागायचा. त्यामुळे संशोधनाची गोडी आणखी वाढली. त्या काळात रिसर्च पेपर्स वाचताना परदेशातील खूप चांगल्या संशोधनातला दृष्टिकोन आणि अद्ययावतपणा जाणवला. मास्टर्सनंतर मला पीएचडीसाठी अर्ज करायचा होता. पण त्यासाठी आवश्यक असणारं माझं संवादकौशल्य कुठेतरी तोकडं पडलं असावं. मग मी रुईयामध्ये रिसर्च स्टुडण्ट आणि एचबीसीएसईमध्ये प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून काम केलं.

आधी केवळ अमेरिकेत जाण्यावर माझं लक्ष केंद्रित झालं होतं. दरम्यान, कॅनबेराच्या ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सटिीबद्दल कळलं. जगभरात हे विद्यापीठ २० व्या क्रमांकावर आहे. अधिक माहितीत कळलं की इथे मास्टर्स ऑफ न्युरोसायन्स आणि मास्टर्स ऑफ न्युरोसायन्स अ‍ॅडव्हान्स हे दोन अभ्यासक्रम आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी मी एडव्हाइज या काऊन्सेलिंग एजन्सीची मदत घेतली. त्यानंतर प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. आधी मास्टर्स झाल्याने त्याचं मूल्यमापन तिथे गेल्यावर केलं जाणार होतं. त्यासाठी अर्ज करून क्रेडिट घेता येणार होते आणि दोन वर्षांचा अभ्यासक्रम करण्यापेक्षा वर्षांचा अभ्यासक्रम करता येईल, असं त्यांनी सुचवलं. परदेशात शिकायचं आणि करिअर करायचा विचार मनात आला, तेव्हा घरच्यांनी भक्कम पाठिंबा दिला. स्कॉलरशिपचा पर्याय होता. मात्र त्यासाठी अर्ज करायची शेवटची तारीख संपल्यानं ती संधी हुकली. माझे बाबा आरबीआयमध्ये असल्याने पालकांना मिळणारं शैक्षणिक कर्ज घेतलं. प्रवेशप्रक्रिया पार पडून मी ‘एएनयू’त दाखल झाले.

या अभ्यासक्रमाचं वैशिष्टय़ म्हणजे वैज्ञानिक संशोधन करण्याआधी विद्यार्थ्यांचं शास्त्रोक्त वाचन आणि शास्त्रोक्त लिखाण चांगलं असायला हवं, हे पाहिलं जातं. म्हणजे मग संशोधन चांगलं करता येतं. पहिल्या सेमिस्टरचा अभ्यास या दृष्टिकोनावर आधारित असतो. तेव्हा कठीण भासणाऱ्या असाइनमेंट असायच्या आणि अजूनही असतात. दर आठवडय़ाला त्या आणि प्रॅक्टिकल्स द्यावी लागतात. प्रॅक्टिकलचं वैशिष्टय़ म्हणजे विद्यार्थ्यांना प्रयोगाची प्रक्रिया सांगितली जायची. त्याचा निष्कर्ष काय लागतो आहे, ते बघून तो निष्कर्ष कशासाठी वापरू शकाल किंवा या प्रयोगाचा अभ्यास कशासाठी करावासा वाटेल, त्याचं महत्त्व काय हे शोधून लिहायचं. आमचे लॅब रिपोर्टस शॉर्ट रिसर्च पेपर्ससारखे असायचे. या कालावधीत एक वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून मी अ‍ॅडव्हान्स अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. सध्या मी डॉ. ब्रायन बिलप्स (Brian Billups) या सुपरवाईजरसोबत रिसर्च प्रोजेक्ट करते आहे. काम करताना इथल्या प्राध्यापकांचा दृष्टिकोन असा असतो की, विद्यार्थ्यांने एखादी कल्पना घेऊन यावं किंवा आमच्या चालू कामात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं. या कामात पशांबाबतीत फारशी आडकाठी केली जात नाही. प्रयोगातली साधनसामुग्री जपून वापरावी लागते, कारण ती महाग असते. पण प्रयोग करून पाहायला कुणाचीच ना नसते. माझा अभ्यासविषय न्युरोसायन्स आहे. तर माझ्या सुपरवाइजरनं मास्टर्स केलं आहे कॉम्प्युटर सायन्समध्ये. त्यांना प्रोग्रॅमिंग वगरे खूप चांगलं येतं. त्यांनी पीएचडी न्युरोसायन्समध्ये केलं आहे. ते मला प्रोग्रॅमिंग वगरेही शिकवतात.

पहिलं सेमिस्टर खूप अस्वाभाविक होतं. सगळं वेगळं असणार आहे, हे माहिती होतं. दीर्घकाळासाठी मी घरापासून लांब कधीच राहिले नव्हते याआधी. शिकता शिकता मी आठवडय़ाचे २० तास पार्ट टाइम आणि सेमिस्टरच्या सुट्टीदरम्यान आठवडय़ातले ३८ तास फुल टाइम काम करते आहे. हे सगळं निभावायला कठीण असणार आहे, हेही माहिती होतं. तरी ते प्रत्यक्ष अनुभवताना आणि स्थिरावताना थोडं जड गेलं. अभ्यासाच्या दृष्टीने अपेक्षेहून छान गोष्टी शिकता आल्या. जणू सोफियामध्ये त्या गोष्टींचा पाया रचला गेला होता. इथे सार्वजनिक वाहतुकीची सोय वीकएण्डला थोडी कमी असते. अभ्यास सांभाळून सगळी कामं वीकएण्डलाच करायची असायची. तेव्हा थोडी धावपळ व्हायची. ऑन कॅम्पस राहाण्याची सोय थोडी महाग होती म्हणून मी एक फ्लॅट शेअर केला सुरुवातीला. ती ऑस्ट्रेलियन मुलगी स्वभावाने चांगली होती. मी भारतात असताना फ्लॅटविषयी आमचं बोलणं झालं तेव्हा तिने घर दाखवण्यासाठी स्काइप कॉल केला होता. इथे आले तेव्हा प्रचंड थंडी होती. सिडनीमध्ये राहाणाऱ्या माझ्या फियॉन्सीअनिकेतने त्या घरात स्थिरस्थावर व्हायला मदत केली. त्यानंतर विद्यापीठात जाऊन चार अभ्यासक्रमांच्या मार्गदर्शकांना भेटणं, त्यांच्या सल्ल्याने विषय निवडणं वगरे बाबींची पूर्तता झाली. मग रुटिन सुरू झालं.

विद्यापीठाचा कॅम्पस मोठा आहे. एक लेक्चर एका टोकाला तर दुसरं तिसऱ्या टोकाला. मग ते वेळेत गाठायची धावपळ, सोबत लॅपटॉप, बॅग वगरे सांभाळणं या सगळ्याची सवय होऊ लागली. मग मित्रमंडळी हळूहळू वाढत गेली. त्यामुळे लेक्चरव्यतिरिक्तचा वेळ ग्रंथालयात अभ्यास करण्यात, असाइन्मेंट करण्यात घालवते. दरम्यान, चारपाच दिवस माझ्या हाऊसमेटला मी पाहिलंच नव्हतं. आमच्या अभ्यास, कामाच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने जणू आमचा खो खो चालला होता. माझ्या मेसेजना ती रिप्लाय करत नव्हती. आपल्याला असं न बोलता राहायचीवावरायची सवय नसते. मी घरी किंवा भारतातल्या मित्रमंडळींना फोन केला खरा; पण खरंतर घर खायला उठलं होतं. त्यानंतर मी सिडनीला गेले. शेवटच्या सेमिस्टरचा भाग तिथून येजा करत पूर्ण केला. मात्र प्रवासाला लागणारा वेळ लक्षात घेता मग मी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच राहायला आले. पहिल्या सेमिस्टरनंतर पार्ट टाइम काम करायला लागले. खरंतर घरच्यांचा भक्कम पाठिंबा होता, आहे. काम करायलाच हवं असं काही नव्हतं. पण मला स्वतच्या पायावर उभं राहाणंही तितकंच महत्त्वाचं वाटलं. अशा निरनिराळ्या धडपडीमुळे स्वविकासाला मदत होते. दुसऱ्या सेमिस्टरपासून तुलनेने गोष्टी सुरळीत झाल्या.

पहिल्या सेमिस्टरला एक कोर्स होतारिसर्च प्रेझेंटेशन. त्यात एखाद्या प्राध्यापकांचा रिसर्च पेपर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर सादर करायचा. त्यासाठी तो समजून घ्यायला लागतो. तो फारच लक्षात राहाण्याजोगा अनुभव होता. आम्ही त्याचं पोस्टरही चांगलं केलं होतं. या ठिकाणचा श्रोता केवळ न्युरोसायन्स शिकणाराच नव्हे तर अन्य शाखांचा विद्यार्थीही असतो. त्या सगळ्यांना समजेल असं साध्यासोप्या भाषेत मी सादरीकरण केलं. मुळात साधीसोपी भाषा हे माझ्या लिखाणाचं वैशिष्टय़ आहे. तेव्हा माझ्या भाषेचं अनेकांनी कौतुक केलं. पहिल्या सेमिस्टरमध्ये माझे विषय थोडे कठीण होते, असं माझे सुपरवाइझर डॉ. ब्रायन बिलप्स म्हणाले होते. तरीही जिवापाड मेहनत केल्याने मला चांगले गुण मिळाल्यानं त्यांनी माझं कौतुक केलं.

इथल्या स्टुडण्ट अकोमोडेशनमधलं किचन पाचजणांमध्ये सामाइक होतं. त्यामुळे आपसूकच बाकीच्यांची भेट होऊन गप्पाटप्पा व्हायच्या. त्या त्या देशांमधली संस्कृती, त्यांचं राहाणीमान, जीवनमान, त्यांचे प्राधान्यक्रम वगरे वगरे. फिलिपन्स, ऑस्ट्रेलिया, जपान, इंडोनेशिया, युके, सिंगापूर, तवान आदी देशांतील विद्यार्थ्यांसोबत वावरताना, अभ्यास करताना, टीमवर्कने प्रकल्प सादर करताना आणि गप्पा मारताना बरीच माहिती मिळायची. काहींचे अभ्यासक्रम वेगळे असल्याने त्याबद्दल भारतातल्या कुणी संदर्भ मागितल्यास त्याविषयी सांगता येतं. इथे परीक्षेच्या काळात चहाकॉफी, स्नॅक्सची सोय केली जाते. विद्यापीठातल्या स्टुडण्ट सेंटरमध्ये ठरावीक दिवशी आणि वेळी नाश्ता, किराणा सामान मिळतं. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा, बाकी गोष्टींची काळजी आम्ही घेतो, असा दृष्टिकोन इथे दिसतो. पहिल्या सेमिस्टरमध्ये आल्याआल्याच या गोष्टी कळत नसल्याने थोडा ताण येतो, पण रुळल्यानंतर चांगलं वाटतं. इतकं की डिसेंबरमध्ये भारतात आल्यावर कॅनबेराचीच आठवण येत होती. एकूणच सगळी ऑस्ट्रेलियन लोकं चांगल्या स्वभावाची आणि मदतीस तत्पर असतात. विद्यापीठातही स्पर्धा आहे म्हणून माहिती देणार नाही, असं कुणी करत नाहीत. प्राध्यापक संपर्क साधल्यावर लगेच चांगलं मार्गदर्शन करतात. इथे कोणत्याही कामाला कमी लेखलं जात नाही. काम हे काम असतं, त्याला दर्जाचं लेबल लावलं जात नाही. आता लग्नानंतर मी नवरा अनिकेतसोबत कॅम्पसबाहेरच्या फ्लॅटमध्ये राहाते आहे.

इथे वर्क लाइफ बॅलन्स विद्यापीठातही प्रतिबिंबित होतो. आठवडय़ाचे पाच दिवस अभ्यासमेहनत करा आणि दोन दिवस मजा करा, अशी इथली धारणा आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावरच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक इव्हेंटस्, पार्टीज, मुव्ही नाइट्स, काऊन्सिल मीट्स, मल्टिकल्चरल फेस्ट, न्यू इयर सेलिब्रेशन वगरेंचं आयोजन केलं जातं. त्यामुळे अभ्यासेतर अनेक गोष्टी शिकायला आणि पाहायला मिळतात. मित्रत्वाची नाती जोडली जातात. आपला दृष्टिकोन विस्तारतो. भारतीयत्वाचा अभिमान बाळगत असतानाच विश्वचि माझे घर असा भाव मनी येतो. भारतीय विद्यार्थी घरी किंवा मित्रांना व्हीडिओ कॉल करणं किंवा सुट्टीच्या काळात घरी जाणं यात नकळतपणे बराच वेळ जातो. त्याऐवजी स्थानिकांशी संवाद साधणं, पार्ट टाइम जॉब करणं, आदी संधींचा सदुपयोग करावा. सध्या माझं शेवटचं सेमिस्टर सुरू आहे. मास्टर्सनंतर पीएचडीसाठी अर्ज करायचा विचार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण असल्याने स्पर्धा खूप आहे हेही खरं. तरीही आतापर्यंतची मेहनत आणि तिला मिळालेलं फळ बघता, पुढचा प्रवास थोडा सुकर होईल, असं वाटतं. हा आत्मविश्वास देणाऱ्या सोफियामधल्या आणि इथल्या शास्त्रोक्त शिक्षणाला माझा सलाम.

कानमंत्र

* चांगल्या गोष्टी होतील अशी आशा असावीच, पण काही वेळा वाईटही घडू शकेल याची मानसिक तयारी ठेवा.

* आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाला हातभार लावणाऱ्या चांगल्या संधीचा लाभ घ्या. मुळात परदेशी शिक्षण घेणं, हीच एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे आयुष्याला नवे आयाम लाभण्याची शक्यता २०० टक्के आहे.

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com

First Published on February 1, 2019 1:14 am

Web Title: article on worlds footsteps by vallari sawant chavan