News Flash

माध्यमी : माणसं वाचणारी लेखिका

वडील दूरदर्शन आणि आकाशवाणीसाठी लिहीत असल्याने लेखनाचे, वाचनाचे संस्कार हे लहानपणापासूनच रोहिणी यांच्यावर झाले होते.

(संग्रहित छायाचित्र)

वेदवती चिपळूणकर

ना. सी. फडकेंनी त्यांच्या ‘प्रतिभा साधन’ या ग्रंथात असं म्हटलंय की, प्रतिभा ही मूलत: अंगी असावी लागते आणि तशी ती असली तरच तिला तंत्राने धारदार करता येतं. या उक्तीला खरं ठरवणाऱ्या, जात्याच प्रतिभावंत असलेल्या आणि सहजपणे परकायाप्रवेश करून पात्ररचना करणाऱ्या अनुभवी लेखिका म्हणजे रोहिणी निनावे. ‘अवघाचि संसार’, ‘कुंकू’ यांसारख्या पासष्ट मालिकांची शीर्षकगीतं त्यांनी लिहिली आहेत. आसपासची माणसं वाचून पात्रं घडवणाऱ्या या लेखिकेकडे तब्बल तेवीस वर्षांचा मालिका लेखनाचा अनुभव आहे.

वडील दूरदर्शन आणि आकाशवाणीसाठी लिहीत असल्याने लेखनाचे, वाचनाचे संस्कार हे लहानपणापासूनच रोहिणी यांच्यावर झाले होते. घरी थोरामोठय़ांचं येणंजाणं असल्याने आपोआपच अभिरुची घडत गेली. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांतलं शिक्षण घेतलेल्या रोहिणी निनावे सांगतात, ‘बाबा त्यांच्यासोबत माझ्याही कविता कधी कधी छापायला द्यायचे. तेव्हा मला त्याचं इतकं अप्रूप वाटायचं नाही. मी त्यांची मुलगी आहे म्हणून ते माझं कौतुक करत आहेत, असं वाटायचं. मात्र एका स्पर्धेत माझ्या कवितेला बक्षीस देताना राम पटवर्धन म्हणाले की ही कविता जर खरंच त्या मुलीने लिहिली असेल तर ते अविश्वसनीय आहे. त्या वेळी मला माझ्या लेखनाबद्दल जरासं कौतुक वाटलं. पहिली मालिका मी डीडी नॅशनलसाठी लिहिली. गो. नी. दांडेकरांच्या ‘पडघवली’ याचा हिंदी अनुवाद करून ‘कुछ खोया कु छ पाया’ ही मालिका मी लिहिली. त्यानंतर प्रामुख्याने अधिकारी ब्रदर्ससोबत माझा प्रवास सुरू होता. ‘दामिनी’ ही माझी पहिलीच दैनंदिन मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली. ‘अवंतिका’ या मालिके नंतर मात्र मी पुन्हा कधी मागे वळून पाहिलं नाही’.

लेखन म्हणजे मनाप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे करता येणारं काम, ही सामान्य समजूत चुकीची ठरवणारे अनेक अनुभव मालिका लेखनात रोहिणी निनावेंनी घेतले. ‘दामिनी मालिकेच्या वेळी आई बेडरिडन होती आणि मी हॉस्पिटलमध्ये तिच्याजवळ जमिनीवर बसून एपिसोड्स लिहिलेले आहेत. हे क्षेत्र असं आहे की कोणालाच कोणतंच कारण देऊन चालत नाही. लेखकाची स्वत:ची तब्येत बरी नसली किंवा इतर कोणती इमर्जन्सी असली तरीही ठरलेल्या वेळी ठरलेलं काम पूर्ण करून द्यावंच लागतं. सुचत नाहीये हेही कारण या क्षेत्रात स्वीकारलं जाऊ  शकत नाही, कारण रोजच्या रोज काहीतरी देणं गरजेचंच असतं’, असं त्या सांगतात. त्यामुळे सतत काहीतरी सुचत राहण्यासाठी अनेक गोष्टींनी स्वत:ला भरून घ्यावं लागतं. मी माझ्या इन्स्पिरेशनसाठी टीव्हीवरच्या मालिकाच बघते. इतर मालिकांमध्ये काय चाललंय, किती वेगाने चाललंय, आपल्याला या सगळ्यापेक्षा वेगळं काय सुचू शकतं, अशा अनेक अँगल्सनी मी या मालिका बघत असते. टीव्ही बघणं, शॉपिंग करणं, पॉलिटिक्सवर लक्ष ठेवणं, स्त्रियांच्या संदर्भात नवीन येणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवणं, आसपासच्या लोकांची मतं आणि दृष्टिकोन ऑब्झव्‍‌र्ह करत राहणं, अशा अनेक गोष्टी मी करत असते. या सगळ्यातून स्वत:ला तर नवी ऊर्जा मिळतेच, पण सुचत नाही अशी वेळच कधी येत नाही, असे अनुभवाचे बोलही त्यांनी सांगितले. मात्र हे करत असताना स्वानंदासाठी आपण काम करतो हा भ्रम मात्र विसरून जावा लागतो. सध्याच्या काळात सगळं टीआरपीवर ठरतं. त्यामुळे तुम्हाला मनापासून आवडो किंवा न आवडो, तुम्हाला लिहावं लागतं. अशा वेळी जे लिहितोय ते मनापासून लिहायचं या तत्त्वाने वागावं लागतं, असंही त्या स्पष्टपणे सांगतात. जर एखादा प्रसंग, एखादी घटना मलाच पटली नसेल तर ती मी इतरांना तरी कशी पटवून देऊ  शकणार? त्यामुळे पटलं नसेल तरीही आधी स्वत:ला कन्व्हिन्स करून मग ते लिहिण्यातही उतरवावं लागतं, असं त्यांनी सांगितलं.

फेसबुकवर कथास्वरूप काही पोस्ट लिहिल्या म्हणजे आपण लेखक झालो असं वाटणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात. याच क्षेत्रात करिअर घडवण्याच्या इच्छेने ते प्रयत्नही करतात. मात्र कथा, पटकथा, संवाद या तिन्ही गोष्टींमध्ये असलेला फरक अनेक सामान्यांना समजत नाही. ‘कथा म्हणजे गोष्टीचं मूळ बीज, कथेच्या नायक व नायिकेची मूळ कथा, पण ती कथा साकारताना त्या व्यक्तीच्या आसपासची माणसं जी तिच्या आयुष्यात, कथेत बदल घडवत असताता, त्यांचं उपकथानक मूळ कथेला जोडणं म्हणजे पटकथा आणि त्या पटकथेच्या अनुषंगाने पात्रं जे बोलतील ते संवाद’, हा फरक समजावून सांगतानाच त्यामागची मेहनतही रोहिणी सांगतात, ‘प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सगळीच नाती असतात असं नाही. त्यामुळे प्रत्येक नात्याचा अनुभव त्याला असेलच असं नाही. पण हे कारण लेखक देऊ  शकत नाही. त्याला व्हिलनसुद्धा इमॅजिन करावा लागतो, वेडासुद्धा इमॅजिन करावा लागतो आणि नायिकासुद्धा इमॅजिन करूनच लिहावी लागते. अशा वेळी आपलं वाचन, डोळे उघडे ठेवून जगाचे घेतलेले अनुभव, अशा गोष्टी उपयोगी पडतात. ‘अधुरी एक कहाणी’ या मालिकेतील निगेटिव्ह रोल लिहिताना मला स्वत:लाच खूप त्रास झाला होता, कारण मी इतकी वाईट किंवा खलनायकी नाही आहे. हा परकायाप्रवेश एकाच वेळी खूप इंटरेस्टिंग आणि त्रासदायकही ठरू शकतो’. याचबरोबरीने कोणतीही मालिका फुलवत नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं ते डिटेलिंग आणि त्यासाठी अर्थातच अभ्यास. ‘दामिनी’साठी मी डॉक्टर, रिपोर्टर, पोलीस, इत्यादी अनेक लोकांचं बारकाईने निरीक्षण करत असायचे, तर ‘अवंतिका’साठी मी खरोखर फॅमिली कोर्टात जाऊन बसले होते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषा! ग्रामीण आणि प्रमाण मराठी हा वाद वेगळा.. मात्र जेव्हा आपण एखादी विशिष्ट बोली वापरत नाही तेव्हा वापरली जाणारी भाषा ही शुद्धच असली पाहिजे, असं रोहिणी आग्रहाने सांगतात.

इतक्या वर्षांत एकदाही ‘मला लिहायला नवीन काही सुचत नाही’ अशी स्थिती रोहिणी निनावे यांच्या बाबतीत कधी आलीच नाही. सतत आसपासची माणसं वाचून मालिकेच्या पात्रांमध्ये रंग भरणाऱ्या या लेखिकेला पहिल्याच मालिकेत प्रिया तेंडुलकर, लालन सारंग, महेश मांजरेकर इत्यादी दिग्गज कलाकारांची साथही लाभली. कधीकाळी मंत्रालयात हिंदी मासिकाच्या उपसंपादक म्हणून काम पाहणाऱ्या रोहिणी निनावे केवळ स्वत:च्या प्रतिभेच्या आणि लेखनशैलीच्या बळावर इतकी वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत.

‘माझं लेखिका म्हणून वेगळं असं काही धीरगंभीर वगैरे व्यक्तिमत्त्व नाही. मी कोणताच वेगळा आव आणत नाही, सगळ्यांशी मनमोकळेपणाने वागते. मात्र या क्षेत्रात काहीही बोलायच्या आधी विचार करावाच लागतो. लोकांच्या भावना फार नाजूक असतात. त्यामुळे आपल्या बोलण्याचा विपर्यास होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. या क्षेत्रात मला कधीच कोणत्याच मेल डॉमिनन्सचा वगैरे त्रास झाला नाही. मात्र तुम्हाला जसं यश मिळायला लागतं, काम मिळायला लागतं, तसा आपोआप लोकांना तुमचा त्रास वाटायला लागतो आणि मग तो कधी तरी तुमच्यापर्यंतही येतो. तुम्ही काय वागता-बोलता यावर समोरच्याचं वागणं-बोलणं अवलंबून असतं.’

-रोहिणी निनावे

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 4:09 am

Web Title: article on writer rohini ninave abn 97
Next Stories
1 ‘मी’लेनिअल उवाच : परमिसन लेना चाहिए
2 डाएट डायरी : चांगले आणि वाईट काबरेहायड्रेट्स
3 वस्त्रांकित : लावणीतील वस्त्रबोली
Just Now!
X