गायत्री हसबनीस

तरुणांच्या रिबेलियस स्वभावामुळे समाजात त्यांचे स्थान अधिक गडद होते आहे. व्यक्त होताना किंवा तटस्थ भूमिका बजावताना अधिकाधिक रिबेलियस होत जाणारी तरुण पिढी जगासमोर आली आहे. गेले काही दिवस सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनातून याचीच प्रचीती येते. यातून तरुण पिढी राजकीय मंचावर आणि सामाजिक पातळीवर अधिक प्रमाणात सतर्क होते आहे. येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तरुणांच्या या बदलत चाललेल्या वृत्तीचा घेतलेला सकारात्मक आढावा.

गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९ पासून आत्तापर्यंत भोवताली वेगाने बदल घडत आहेत. त्या बदलांचे स्वरूप नकारात्मक असले तरी त्याविरोधात आंदोलने, चर्चासत्रे, भाषणं आणि विविध माध्यमांद्वारे व्यक्त होणं या सर्वच गोष्टींचा पाऊस पडत होता. पण या सगळ्यात विद्यार्थी आंदोलनाचा परिणाम सर्वात जास्त प्रमाणात पाहायला मिळाला. आरेमधील वृक्षतोडीला विरोध असेल, मेट्रो कारशेडला विरोध, सीएए-एनआरसीवरून सुरू असलेले आंदोलन, मोर्चे, जेएनयू विद्यार्थ्यांंच्या सपोर्टसाठी देशभरातील विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन, त्याआधी खुद्द् जेएनयूच्या विद्यार्थ्यांंनी फी वाढीविरोधात केलेले आंदोलन आणि सात वर्षांपासून निर्भयाच्या अपराधींचा कोर्टात सुरू असलेला खटला आणि त्या चौघांना देण्यात येणारी फाशी पुढे ढकलल्याने संतापलेले भारतीय नागरिक आणि त्यांनी केलेला प्रोटेस्ट या सगळ्यांची एकच जरब सध्या पाहायला मिळते आहे. आंदोलनांची ही मालिका एक नागरिक म्हणून दुरून पाहताना आपली आणि स्वत: त्या प्रत्येक घटनेशी संबंधित असल्याने आपणहून आंदोलनात भाग घेणाऱ्यांची मानसिकता एकाच समाजात राहून भिन्न असू शकते. पण या प्रत्येक घटनेच्या निषेध किंवा समर्थनासाठी उभी राहिलेली तरुणाई मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळाली. समाजात होणाऱ्या प्रत्येक बदलाचा ते भाग होत आहेत हे यावरून पुन्हा सिद्ध झाले.

आपण त्या घटनेचा भाग नाही अथवा आपल्यावर अन्याय झाल्याची भावना नाही, मग आपल्याला त्याच्याशी काय कर्तव्य आहे, अशी भूमिका आज कुठल्याही तरुण विद्यार्थ्यांंची नाही. ते आपापल्या पद्धतीने घडामोडींचा वेध घेत आहेत आणि त्यात तळमळीने सहभागी होत आहेत, हे चित्र स्पष्ट दिसते आहे. आजची तरुणाई ही राजकीय स्तरावर होणाऱ्या चुकीच्या घडामोडीं विरुद्ध आपल्या नागरिकत्वाच्या अधिकारापोटी सजग राहते आहे. त्यामुळे त्यासंबंधी फक्त कुठेतरी व्यक्त होण्यापेक्षा आणि आपले विचार, मतं दाबून ठेवण्यापेक्षा सामाजिक स्तरावर सरळ मार्गे आपली सदसद्विवेकबुद्धी न सोडता मैदानात उतरू लागली आहे. हा एक महत्त्वाचा सकारात्मक बदल ठरला आहे. भारत हा तरुणांचा देश आहे हा विचार प्रत्यक्षातही तितकाच खरा वाटतो आहे.

आंदोलनं करणारी पिढी ही उद्धट आहे किंवा त्यांचा मार्ग चुकतो आहे अशीही काही मतं समोर येत आहेत, पण आंदोलन करणं हे जरी चित्र डोळ्यासमोर दिसतं असलं तरी त्यापलीकडेदेखील तितक्याच ताकदीने तरुण पिढी आपले काम करते आहे. राजकीय पटलावरचे असेल किंवा शेती, कायदा, हक्क, बेरोजगारी, अधिकार, नागरी आणि सार्वजनिक सेवेत सहभाग अशा अनेक क्षेत्रांतून तरुणांचा सहभाग वाढतो आहे. आपल्या मूलभूत सुविधा, गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत ही पिढी अधिक सक्षम होते आहे. आता आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एकत्रितपणे जमणाऱ्या तरुण युवक-युवतींची आपापसातील मतमतांतरे असतात जी टोकाची आणि सामंजस्याची असू शकतात, सगळेच महाविद्यालयीन विद्यार्थी वेगवेगळ्या घरगुती वातावरणातून, भिन्न शैक्षणिक-आर्थिक स्तरातून आलेले असतात. त्यामुळे प्रत्येकाची परिस्थिती आणि प्रायोरिटीज वेगवेगळ्या असू शकतात, तरीही एकमेकांशी संवाद साधत तरुण पिढी आंदोलनात सहभागी होते. सोशल मीडियासारखं प्रभावी माध्यम असताना त्यावर व्यक्त होण्यापेक्षा स्वत: मैदानात उतरून आंदोलनात सहभागी होण्याचे श्रम तरुणांकडून आजच्या घडीला घेतले गेले आहेत. आंदोलनाचा हेतू लक्षात घेऊन त्यात सहभागी होणारी ही तरुणाई निश्चितच वेगळी ठरली आहे.

सेलिब्रिटींनी सामाजिक-राजकीय घटनांबाबत भूमिका घेतली तर त्याला सर्वाधिक सपोर्ट हा तरूणाईकडून मिळतो. उदाहरणार्थ, अभिनेता आयुषमान खुराणाचा ‘वर्ल्ड मेन्स डे’ला व्हायरल झालेला व्हिडीओ आणि त्याने त्यात तथाकथित पुरुषी विचारांच्या विरोधात घेतलेल्या भूमिके चे तरुणाईकडून तुफान स्वागत झाले. अगदी ताजं उदाहरण म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोणने जेएनयू विद्यार्थ्यांच्या सपोर्टसाठी काढलेल्या मोर्चात सहभागी झाल्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली तेव्हा तिच्या बाजूने उभी राहणारी ही पिढीही होती. याआधीही सॅनिटरी पॅडला सपोर्ट असो, प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मदत, पूरग्रस्तांना मदत, भाषा संवर्धनासाठी प्रयत्न आणि पाठिंबा, चित्रपटाविरोधी उठलेल्या हिंसक दंगलीविरुद्ध जाऊन चित्रपटाला पाठिंबा देणारी, जीएसटी वाढीविरोधी, निश्चलीकरण आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर एकत्रितपणे आंदोलनं करणारी, बलात्कारपीडितांना पाठिंबा देणारी, ट्रिपल तलाक विरुद्ध आवाज उठवणारी आणि मुस्लीम महिलांना पाठिंबा देणारी हीच तरुणाई होती. इतकंच नाही तर एलजीबीटी कम्यूनिटिजना पाठिंबा, #मीटूला सपोर्ट, चांद्रयान मोहिमेला पाठिंबा अशा विविध विषयांवर नुसतंच बोलण्यापेक्षा थेट पाठिंबा देण्यात तरुणाई अग्रेसर राहिली आहे. नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश, कलबुर्गी, गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थदेखील आवाज उठवणारी आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सकारात्मक प्रयत्न करतानाही तरुणाईच दिसते आहे. अगदी काही दिवसांपूर्वी झालेल्या मेग्झिट म्हणजेच प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केलच्या आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र होण्याच्या दृष्टीने परिवारपासून लांब राहण्याच्या त्यांच्या निर्णयालादेखील तरुण पिढीकडून खूप पाठिंबा मिळालेला पाहायला मिळाला.

आंदोलन करणं म्हणजे केवळ सोशल मीडियावर झळकण्यासाठी किंवा शो ऑफ करण्यासाठी मैदानावर उतरणे हा विचार त्यांच्या मनात नसतो. स्वातंत्र्य, शांतता आणि लोकशाही यांची सार्थ जाण तरुण पिढीला आहे. रोजगार, आर्थिक परिस्थिती, लग्न, करिअर, स्वत:ची ओळख, सक्सेस आणि अचिव्हमेंट्स यांचा वैयक्तिक पातळीवर सतत लढा या पिढीकडून चालूच आहे. तरुण पिढीला आपण सर्वानी समजून घेण्याची गरज यामुळेच निर्माण होते. समाजातल्या चुकीच्या गोष्टी आणि उदासीन कारभाराविरुद्ध आवाज उठवताना जे समाजासाठी योग्य आहे तेच माझ्यासाठीही योग्य आहे हा विचार जपताना ते दिसतात. तरुण पिढी रिबेलियस आहे, त्यांना कुठेही अन्याय सहन होत नाही. सोशल मीडियावरून ते सतत व्यक्त होत असतात आणि नवं काहीतरी शिकण्याची आणि नवं काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्याची स्फूर्ती, क मालीचा उत्साह त्यांच्यात असतो. बदलांचे वारे सर्वप्रथम या पिढीला लागतात आणि मग इतरांना. पुस्तकं वाचणं, नाटकात भाग घेणं, सिनेमे पाहणं, विविध आंतरराष्ट्रीय विषय शिकणं, सामाजिक कार्याला हातभार लावणं, मल्टिटास्किंग करणं, खेळात भाग घेणं, स्वच्छता मोहिमेत भाग घेणं.. बाहेरून कदाचित तरुण पिढी ही जरा काही झालं की मैदानात उतरते आणि आंदोलन करत सुटते, असा समज होतो. पण तरुण पिढी फक्त आंदोलन करत सुटते हे वक्तव्य पूर्णपणे बरोबर नाही. प्रत्येक घटनेच्या निषेधार्थ आंदोलनात भाग घेणारी तरुण पिढी आहे हे काही खोटं नाही. पण म्हणून ते फक्त त्यातच रमतात असे नाही.

#इंडियाअगेन्स्टकॅब किंवा #सीएएप्रोटेस्ट अशी हॅशटॅग्स वापरून एक्स्प्रेस होणारी तरुणाई एकीकडे आहे तर दुसरीकडे एक्स्प्रेस होण्याशिवाय आंदोलन करण्याव्यतिरिक्त पर्याय नाही असं म्हणणारी ही पिढी आहे. १३३ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात कुठल्याही प्रश्नावर विचारासाठी, कृतीसाठी राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक.. कुठल्याही भागातून पुढे येणारी ही तरुणाई काहीएक बदल घडवेल. हा बदल देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त विचार करता देशाच्या हितासाठी एकत्र येणाऱ्या या तरुणाईचे चित्र निश्चितच सुखावह असे आहे!

viva@expressindia.com