स्वातंत्र्यलढय़ाच्या गोष्टी आजच्या पिढीनं केवळ इतिहासात वाचल्या आहेत. अगदी थोडय़ांना आपल्या आजी-आजोबांच्या- पणजोबांच्या तोंडून ऐकायची संधी मिळाली असेल तरच. पण आजची टीनएजर्सची पिढी ही खऱ्या अर्थाने नव्या, आधुनिक भारताची प्रतिनिधी. कारण यांचे पालकही स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले. लहानपणापासूनच कॉम्प्युटर, इंटरनेट, मोबाईल यांच्याशी संबंध आलेली ही पिढी स्वातंत्र्यदिनाशी नेमकी कशा पद्धतीने रिलेट होते? हे मांडण्याचा हा प्रयत्न. आजची तरुणाई कशाकशातून स्वातंत्र्य उपभोगते? हवं तेव्हा हवं ते करता येणं, इतकी वरवरची आणि पोकळ व्याख्या स्वातंत्र्याची नाही, हे त्यांनाही माहिती आहे. स्वैराचार आणि स्वातंत्र्य यामध्ये फरक केला पाहिजे, हे तरुणाईला मान्य आहे. स्वतंत्रपणे व्यक्त होणं यालाच ही पिढी प्रामुख्यानं स्वातंत्र्य मानते. मग ते व्यक्त होणं एखाद्या व्हॉट्सअ‍ॅपच्या मेसेजमधून असेल किंवा एखाद्या कलाविष्कारातून. आपल्या कलेतून स्वतंत्रपणे व्यक्त होणाऱ्या, कलेद्वारे स्वातंत्र्याचा आविष्कार मांडणाऱ्या काही कलावंतांनी व्यक्त केलेल्या भावना.. त्यांच्याच शब्दात.

डान्स लाईक अ फ्री बर्ड
रेमो डिसूझा (कोरियोग्राफर)
माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला आपले विचार मुक्तपणे मांडता आले पाहिजेत. मी एक डान्सर असल्यामुळे माझे विचार मांडण्यासाठी डान्स हे माध्यम आहे, असं मी मानतो. इतर कलाप्रकारांप्रमाणेच नृत्य हेही असं एक माध्यम आहे, ज्यामधून आजची पिढी आपले विचार मुक्तपणे मांडू शकते. मी या तरुणांचं प्रतिनिधित्व करीत असल्याने या नृत्यप्रकारांकडे सहज खेचलो गेलो आहे. आज आपल्याकडे पारंपरिक नृत्यप्रकारांसोबतच काही असेही नृत्यप्रकार आहेत, ज्यामधून आपण आपल्या मनातील उद्रेक मांडू शकतो. पाश्चात्त्य देशांमध्ये हिप-हॉप, क्रंपिंग हे क्रांतीचे, बंडखोरीचे डान्स प्रकार म्हणून ओळखले जातात. क्रंपिंगची सुरुवात मनातील राग लोकांपुढे आणण्यापासून झाली. हिप-हॉप सध्याच्या लोकप्रिय डान्स प्रकारांमधील एक आहे. यामध्ये डान्स करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या नियमांचं, पेहरावाचं बंधन नसतं. हा डान्स फॉर्म मुक्त आहे.
 डान्सरला त्याच्या मनातील भावना लोकांपुढे मांडता येतील असे काही नृत्यप्रकार भारतातही फार पूर्वीपासून आहेत. दक्षिण भारतातील छाऊ, कलारी हे नृत्यप्रकार यासाठी प्रसिद्ध आहेत. छाऊ हा नृत्यप्रकार जंगलातील मुक्या प्राण्यांच्या हावभावांवर आधारित आहे. या प्रकारच्या डान्स प्रकारांमध्येही डान्सरला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. पण असं असलं तरी, डान्स करताना पाळायचे मूलभूत नियम आणि शिस्त मात्र पाळणं गरजेचं असतं. या नृत्यप्रकारांमधून तुमच्या भावना मांडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळत असलं, तरी त्यातून स्वैराचाराची परवानगी मिळत नाही. एक डान्सर म्हणून हे स्वातंत्र्य अनुभवताना या जबाबदारीचं भान असणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

मुक्त संगीत हे स्वातंत्र्याचं प्रतीक
गंधार संगोराम (संगीतकार)
माझ्या दृष्टीने स्वातंत्र्य म्हणजे मनापासून आवडतं ते करायला मिळणं. हव्या असणाऱ्या माध्यमातून व्यक्त होता येणं हादेखील स्वातंत्र्याचाच एक भाग आहे. माझ्यासारखा कलाकार कलेच्या माध्यमातून व्यक्त होतो. प्रत्येक कलाकार कोणत्याही बंधनात न अडकता, मुक्तपणे स्वत:साठी काम करू शकतो. अर्थात व्यावसायिक कामादरम्यान काही बंधनं येऊ शकतात, पण ती तुमच्या स्वातंत्र्याची गळचेपी करणारी नसावीत. सकारात्मकतेकडे नेणारी कला वाईट असूच शकत नाही. कलेचं मूल्यमापन व्यक्तिसापेक्ष बदलतं. त्यामुळे कलाकाराने समाजातील मूठभर लोकांच्या विरोधाकरिता स्वत:ची अभिव्यक्ती दडपू नये; किंबहुना कलेवर श्रद्धा ठेवून प्रामाणिकपणे व्यक्त व्हावं. स्वातंत्र्य हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मी नव्या काळाचं प्रतिनिधित्व करतो आणि त्यामुळे चांगलं संगीत, वेगवेगळ्या व्यासपीठांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचावं यासाठी माझं संगीत मी मुक्त ठेवलेलं आहे. मी स्वत: वेबसाइटवर ‘फ्री डाऊनलोड’साठी उपलब्ध केलेलं आहे. समाजात एखाद्या कलाकृतीवर तीव्र प्रतिक्रिया नोंदवण्यापेक्षाही कलेकडे सन्मानपूर्वक पाहिलं गेलं पाहिजे; किंबहुना समाजाने कलेप्रति आदर बाळगून कलावंताची कला ‘व्यक्त होण्याचं माध्यम’ म्हणून स्वीकारावी. तरच कलावंत अधिक सजगपणे व मोकळेपणाने काम करू शकतो.

अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे कलाकाराचं स्वातंत्र्य
आलोक राजवाडे (अभिनेता, दिग्दर्शक)
मुळामध्ये एक गोष्ट आपल्याला मान्य करायला हवी की, प्रत्येक माणूस वेगवेगळा आहे आणि त्याच्या स्वत:च्या जीवनदृष्टीने तो कलेतून व्यक्त होत असतो. परंतु जेव्हा समाज त्या दृष्टिकोनाला नाकारू पाहतो तेव्हा कलाकाराच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. कारण एक समाज म्हणून आपण संकुचित होत जातो आणि एखाद्या गोष्टीकडे बघायचे एकाशिवाय अनेक पलू असू शकतात हे विसरतो. परंतु जेव्हा आपण समोरच्याचं ऐकून घेण्याची मन:स्थिती तयार करू तेव्हा आपण समाज म्हणून सहिष्णू होऊ आणि एकमेकांबद्दल तसंच कलेबद्दल आदरभाव निर्माण होऊन अभिव्यक्तिस्वातंत्र्य सहज स्वीकारलं जाईल.
समाजाचा कुठला तरी हिस्सा कायम बंधनं घालणारच. परंतु एक कलाकार म्हणून ती कुठवर मान्य करायची हे प्रत्येकाने ठरवायला हवं..आणि जर मी पोटतीडिकीने, सत्य जाणून घेऊन माझी कला सादर करतोय तर समाजाच्या विरोधात जाऊन मांडायची माझी तयारी आहे. कारण माझा असा ठाम विश्वास आहे की, अंत:करणापासून सादर केलेली कला प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचते. त्यामुळे कलेतून व्यक्त होण्याचं काम कलाकाराने प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे !