26 January 2021

News Flash

वारीचा तरुण चेहरा

समतेची पताका खांद्यावर घेऊन शेकडो वर्षांची परंपरा आजही जपणाऱ्या वारकरी संप्रदायातील महत्त्वाची आषाढी वारी सुरू झाली आहे.

|| मितेश जोशी

आषाढी एकादशी आठवडय़ावर येऊन ठेपली आहे. ठरलेल्या तिथीला पंढरीच्या वारीसाठी जाण्यास वैष्णव तयार होत आहेत. ज्यामध्ये तरुणांचासुद्धा मोठा वाटा वेगवेगळ्या रूपांत दिसतो आहे. वारकरी संप्रदायासाठी योगदान देणाऱ्या तरुण वैष्णवांच्या कामाचा व अनुभवांचा हा आगळावेगळा विशेष लेखाजोखा!

समतेची पताका खांद्यावर घेऊन शेकडो वर्षांची परंपरा आजही जपणाऱ्या वारकरी संप्रदायातील महत्त्वाची आषाढी वारी सुरू झाली आहे. शेकडो मल पायी चालत वारकरी आषाढी एकादशीला पंढरीला येतो. या आषाढीसाठी जवळपास दरवर्षी लाखो भाविक पंढरीत दाखल होतात. टाळ-मृदंग, हरिनामाच्या जयघोषाने पंढरीनगरी गजबजून जाते. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता तसेच कोणतेही निमंत्रण नाही की बोलावा-सांगावा नसतानाही वारकरी पंढरीत दाखल होतो. हे विशेष! अशी महाराष्ट्राची शेकडो वर्षांची परंपरा महाराष्ट्रातील युवकसुद्धा जपण्यासाठी तयार होत आहेत.

सुरुवातीलाच विशेष नाव घ्यावंसं वाटतं ते जेजुरीच्या नेहा भोसले या तरुणीचं. विद्यार्थीदशेत असलेली नेहा कीर्तनकार आहे. यूटय़ूबवर तिची असंख्य कीर्तनं आहेत. पण ‘बारावीच्या मुलीचं कीर्तन’ या नावे असलेलं तिचं कीर्तन विशेष प्रसिद्ध आहे. नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या नेहाला भजनाची गोडी तिच्या आजी-आजोबांमुळे लागली. केवळ आजोबा एकतारी भजन गायचे. घरात कोणीही कीर्तनकार नाही. आजीच्या निधनानंतर नेहा सहावीला असताना, तिला आपण कीर्तनकाराच्या भूमिकेतून समाजप्रबोधन करावं असं वाटू लागलं. म्हणून तिने आळंदीला संस्थानच्या आध्यात्मिक शिक्षणात प्रवेश घेतला. जिथे ती मृदुंग वाजवायला शिकली. त्याचबरोबर हरिपाठ, संतचरित्राचा अभ्यास व कीर्तनकलेचा अभ्यास तिने दोन वर्षे पूर्ण केला. हा अभ्यास करत असताना तिने आळंदीच्या प्राथमिक शाळेत आपलं शालेय शिक्षणही पूर्ण केलं. त्याचबरोबर गाण्याचे क्लासेस लावून गाण्याची परीक्षा देण्यासाठीही तिची जय्यत तयारी सुरू होती. सातवीला असताना दिवाळीच्या सुट्टीत तिला तिच्या मामाच्या गावी पहिल्यांदा कीर्तन करण्याची संधी चालून आली. कीर्तन करताना चुकलीस तरीही आमचीच आहेस, असा दिलासा गावकऱ्यांनी दिल्याने, तिच्यात लहान वयातच हजारो लोकांसमोर कीर्तन करण्याचा एक हुरूप आला. हे नेहाचं सर्वात पहिलं कीर्तन ठरलं. यानंतर तिची घोडदौड सुरू झाली. कीर्तनकराच्या कीर्तनाला प्रतिष्ठा लोकच मिळवून देतात, असं नेहा म्हणते. ‘माझ्या मामाच्या गावी माझं कीर्तन ऐकायला आजूबाजूच्या गावांतून शेकडो माणसं आली होती. माझा गाण्याचा गळा असल्याने व समर्पक शब्दात कीर्तन केल्याने माझ्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले होते. मामाच्या गावी कीर्तन झाल्यानंतर मी पुढे महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक कीर्तनं केली. त्यातील काही कीर्तनं काही तरुण मुलांनी यूटय़ूबवर टाकली. भविष्यात आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं जर आजच्या तरुण पिढीला वाटत असेल तर त्यांनी त्या दृष्टीने आताच प्रयत्न करायला हवेत,’ ती आग्रहाने नमूद करते. गावोगावची तरुण पिढी सध्या कीर्तनाकडे ओढली गेली आहे, असं नेहा सांगते. लहानपणापासूनच गावातील मुलांमध्ये हरिनामाचे, वारीचे बीज रोवले गेले आहे त्यामुळे तेथील मुले कीर्तनाला आवर्जून येतात. शहरात धावपळीचं जीवन असल्याने मुलं कीर्तनाला येत नाहीत, मात्र समाजमाध्यमांवर आम्ही तुमचं कीर्तन ऐकलंय, असं शहरातील लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतं, हेही नेहा नमूद करते. सध्या ती तिचं पदवी शिक्षण पूर्ण करत असून तिला कीर्तनाच्या माध्यमातून पुढे भविष्यात जनप्रबोधन करायचं आहे.

वारी व वारकरी संप्रदायाबद्दल कुतूहल असणाऱ्यांसाठी वारीचे अपडेट्स थेट लोकांच्या मोबाइलवर मिळावेत या हेतूने नवी मुंबईतील घणसोलीतल्या अक्षय भोसले या तरुण वारकऱ्याने इंटरनेट व सोशल मीडियाचा आधार घेत वारीला डिजिटल युगाशी जोडलं आहे. वारीच्या व्यतिरिक्त १० महिने तो संत माहात्म्य, अभंग चिंतन, ज्ञानेश्वरीच्या ओव्या, सुभाषितांचा सरळ अर्थ लोकांपर्यंत पोहोचवतो. अक्षयचा जन्म साताऱ्यातील बिजवडी गावात झाला. गावात रोजगार नाही म्हणून त्याचं कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालं.  अक्षय लहानपणी नियमितपणे कलावती आईंच्या बालोपासना केंद्रात जायचा. कृष्णनामाची ओळख व गोडी त्याला तिथे लागली. एके दिवशी मदानात खेळत असताना मंदिरातून हरिनामाचा गजर अक्षयच्या कानावर पडला. चटकन तो आवाजाचा पाठलाग करत मंदिरात जाऊन कीर्तनाला बसला. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प्रमोद महाराज जगताप यांचे कीर्तन तेव्हा सुरू होते. त्यांच्या मधुर वाणीतून बाहेर पडणारा एक एक शब्द अक्षयचं मन वारकरी संप्रदायाकडे ओढून नेत होता. कीर्तनाच्या शेवटच्या टप्प्यात माळेचं माहात्म्य अक्षयच्या कानावर पडलं व अक्षयने घरच्यांच्या अनुमतीने माळ घातली. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानादेखील वेळ काढून अक्षय वारीत सहभाग घ्यायचा. मित्रमत्रिणींमध्ये संत माहात्म्याचं विवेचन करता करता अक्षयने ज्ञानेश्वरीच्या ओळी फेसबुकवर पोस्ट करायला सुरू केल्या. त्याला काहीच दिवसांत भरघोस प्रतिसाद मिळू लागला. वारीला व वारकरी संप्रदायाला डिजिटल युगाशी जोडून देणारा अक्षय युवा कीर्तनकाराची भूमिकादेखील तितकीच उत्तम बजावतोय. वयाच्या १७व्या वर्षीच त्याने प्रवचन-कीर्तनाच्या माध्यमातून भक्तिसंप्रदायाचा प्रसार करण्यास प्रारंभ केला. नेत्रदान, ग्रामस्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीयता निर्मूलन, साक्षरता, व्यसनमुक्ती, स्त्रीशिक्षण, रक्तदान यांसारख्या सामाजिक विषयांवर वेळोवेळी ते आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकतो.

तरुण वारकऱ्यांना संघटित करण्यासाठी अक्षयने ‘वारकरी युवा मंच महाराष्ट्र राज्य’ या मंचाची स्थापना केली आहे. या मंचाच्या अंतर्गत यंदाच्या आषाढी वारीत एकूण १२०० तरुण वारकरी आपलं योगदान देत आहेत. हे तरुण वारकरी हरिनामाच्या गजरासोबतच, वारकऱ्यांसाठी व्यसनमुक्ती तसेच स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आहेत. या युवा मंचाने यंदाच्या वारीत महाएनजीओ फेडरेशनच्या साथीने ‘वारकरी सेवा रथ’ उभा केला आहे. ज्यामध्ये तरुण वारकऱ्यांसाठी रोजगार मेळावा, शैक्षणिक सोयी-सुविधा व इतर माहिती वारकऱ्यांना पुरवली जाणार आहे. यंदाच्या वारीत तरुणांच्या सहभागाविषयी माहिती देताना अक्षय म्हणाला, ‘‘शहरात नोकरीधंदा करणाऱ्या तरुणांना इच्छा असूनही वारीत सहभाग घेता येत नाही. त्यातील काही हौशी मंडळी पुण्यात मुक्कामाच्या दिवशी, चांदोबाचा िलब येथे उभं गोल रिंगण व वाखरीचे रिंगण पाहण्यासाठी हमखास येतात. आज वारकरी युवा मंचामुळे अनेक शहरांतील तरुण मंडळी वारीकडे आकर्षति होत आहेत. थोडा टप्पा चालत आहेत. तरुण हौशी फोटोग्राफर वारीत फोटोग्राफीच्या निमित्ताने का होईना येत आहेत.’’ अक्षयला भविष्यात वारकरी संप्रदायाचा प्रसार जगभर करायचा आहे. तसेच त्याला संत साहित्यविश्वात महत्त्वपूर्ण कार्य करायचे आहे. गेल्याच वर्षी पुण्याच्या एका सामाजिक संस्थेने त्याच्या कार्याची दखल घेऊन त्याला ‘वारकरी रत्न’ या पुरस्काराने अलंकृत केले आहे.

अक्षय आणि नेहाच्या घरात वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांनी खेचून आणली. पण इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेणारा चतन्य वासकर हा तरुण घराण्याची खूप मोठी जबाबदारी पार पाडतो आहे. त्यांच्या घराला संत तुकाराम महाराजांची गुरू-शिष्य परंपरा आहे. महाराष्ट्राचे वैभव असणारी आषाढी वारी, वारकरी संप्रदायामधील फड परंपरा, दर महिन्याची पंढरीची वारी, या सर्व कार्याची नांदी वासकर घरातून झाली. आणि आता या मोठय़ा परंपरेचं जतन वासकरांच्या दहाव्या पिढीच्या माध्यमातून चतन्य करतो आहे. चतन्य सध्या हजारो वारकऱ्यांचा गुरू ही भूमिका व कॉलेजचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची भूमिका पेलतोय. मग अशा दोन्ही भूमिका सांभाळताना आव्हानं येतात का यावर चतन्य म्हणाला, ‘‘लहानपणापासूनच या परंपरेची जाणीव होती. त्या जाणिवेतूनच मोठा झाल्याने तरुण वयात वेगळी जाणीव किंवा मनाची तयारी वगरे करावी लागली नाही. दोन भूमिका सांभाळाव्या तर लागतातच. आषाढी व काíतकी अशा दोन्ही वारीचं नियोजन बघावं लागतं. दर महिन्याची पंढरीची वारी अभ्यास व इतर जबाबदारी सांभाळून करावी लागते. वासकर फड ज्या गावी आहे तिकडे कीर्तनसेवासुद्धा मी जाऊन देतो,’’ असं तो सांगतो.

भागवत शिरवळकर हा तरुणही आपल्या घराण्याला लाभलेली परंपरा जोपासतोय. पेशाने वकील असलेला भागवत संत गंगू महाराज यांची परंपरा संभाळतोय. भागवतची आषाढी वारी इतरांपेक्षा जरा लवकर सुरू होते. कारण संत गंगू महाराज माऊलींनी न्यायला स्वत पंढरपूर ते आळंदी पायी जायचे. आळंदी ते पंढरपूर माऊलींसोबत परत चालत जायचे. परतवारी सोबत माऊलींनी सोडायला ते पंढरपूरपासून आळंदीपर्यंत चालत निघायचे. माऊलींना सोडल्यानंतर परत आपल्या पंढरपूरला ते चालत निघायचे. अशी चार वेळा त्यांच्याकडून येजायेजा घडायची. नवल वाटेल पण तेच पायी जाणं-येणं भागवत आजही करतो. एक वारकरी या नात्याने माझ्या आयुष्यातील २ महिने पूर्णपणे मी माऊलींच्या चरणी देतो. मी माझं कर्तव्य पूर्ण करतो, असं भागवत सांगतो. वकिलीचं आयुष्य जगायला १० महिने मिळतात ते पुष्कळ झाले असंदेखील तो नमूद करतो. वास्तविक वकील क्षेत्रात भागवतचं पुण्यात मोठं नाव आहे. त्याचे क्लाएन्ट्सही त्याच्या या कार्याचा हेवा करतात. वकील आणि वारकरी अशी दोन्ही भूमिका लीलया पेलणाऱ्या भागवतला भविष्यात संप्रदायाचा व संतवाङ्मयाचा सखोल अभ्यास करायचा आहे.

म्हटलं की अभंग आलेच. मुंबई आणि कॉलजेची तरुणाई म्हटलं की ‘अभंग रिपोस्ट’ हा बँड आपसूकच डोळ्यासमोर आला. अभंगांना नवसंजीवनी देऊन रिपोस्ट करणाऱ्या या तरुण चमूला विसरून चालणार नाही. दुष्यंत देवरुखकर आणि स्वप्निलतर्फे यांनी एका मराठी रॉक संगीत स्पध्रेत भाग घेतला होता. ज्यात त्यांनी मराठमोळे अभंग रॉक ठेक्यात सादर केले. मग हे आपण पुढे प्रोफेशनली नेऊयात असं त्यांना वाटू लागलं. आणि त्यातूनच पुढे ‘अभंग रिपोस्ट’ या फोक बँडची स्थापना झाली. या बँडला पहिली प्रोफेशनल कामाची संधी चालून आली, गिरगावच्या गुढीपाडव्याच्या शोभयात्रेच्या माध्यमातून. तिकडे लोकांना हे हटके अंदाजात सादर केलेले अभंग इतके आवडले की या बँडने एक एक अभंग जवळपास पाच-सहा वेळा सादर केले. याच बँडमधील प्रतिनिधी विराज आचार्य म्हणतो, ‘अभंग, भजन, बालगीतं, शिवतांडव स्तोत्र यांना पाश्चात्त्य संगीताचा साज चढवत आम्ही सादर करायला सुरुवात केली. सुमारे ४ वर्षांपूर्वी हा बँड अस्तित्वात आला. आतापर्यंत आम्ही अनेक मान्यवर लोकांच्या पुढय़ात सादरीकरण करून त्यांची दाद मिळवली आहे. २५० प्रयोग भारतभर केले आहेत. स्वरानंद पुरस्कार आम्ही नुकताच पटकावला आहे. काहीच दिवसांपूर्वी टेडेक्सवर मुलाखत देण्याचा योग जुळून आला. सर्वात पहिलावहिला मराठमोळा फोक बँड थेट टेडेक्सवर जाण्याचं भाग्य अभंग रिपोस्टला मिळालं आहे. लवकरच आमचा अभंग एका मराठी चित्रपटात दिसणार आहे. एवढंच नाही तर आमचा स्वतंत्र अल्बम या वर्षांत सर्वत्र प्रसिद्ध होण्याच्या वाटेवर आहे. अनेक आजीआजोबा नातवंडांसह कार्यक्रमाला येतात. आणि आजच्या पिढीच्या हातात आमचे अभंग सुखरूप आहेत. आमचे पाय धरून भावुक होतात,’ असंदेखील त्याने सांगितलं.

काळाची गती ओळखून पावले टाकणारी व्यक्ती जगाच्या प्रवासात कधीच मागे पडत नाही, हे या तरुणांनी सिद्ध केलं आहे. कोण आपली गुरू-शिष्य परंपरा जपतंय, कोणी कीर्तनकार म्हणून उदयास येतं आहे, कोणी फोक बँडच्या माध्यमातून अभंग रिपोस्ट करतं आहे, तर कोणी वारकरी युवा मंचाची स्थापना करून तरुण वारकऱ्यांना संघटित करतं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 11:55 am

Web Title: ashadhi ekadashi 2019
Next Stories
1 चोखंदळ अभिनेत्री
2 ओडिसा, छेनापोडा आणि बरंच काही..
3 स्मार्टफोनचा मेंदू
Just Now!
X