प्रियांका वाघुले

‘तारा फ्रॉम सातारा’ या सोनी टेलिव्हिजनवरील हिंदी मालिकेत वरुण मानेच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता आशीष गोखले फिटनेसबाबतीत जागरूक आहे. मात्र अनेकदा फिटनेस रुटीन सांभाळताना आपण कोणत्या भूमिकेत आहोत, व्यायाम केल्यानंतर त्या भूमिकेत विनाकारण शारीरिक बदल होईल का? अशा वेळी आपण साकारत असलेल्या व्यक्तिरेखेची देहबोली कायम ठेवत स्वत:चा फिटनेस सांभाळण्याचे भान कलाकाराला ठेवावे लागते, असे सांगतो. माणूस जसा अन्न-पाण्याशिवाय राहू शकत नाही. तसेच त्याने व्यायामाशिवायही राहू नये, असे आशीष आवर्जून सांगतो. त्यामुळे आपला फिटनेस आणि भूमिका यांचा ताळमेळ घालण्याची कसरत करतच आपले शारीरिक-मानसिक स्वास्थ्य सांभाळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्याने सांगितले.

फिटनेस म्हणजे ४ दिवस किंवा काही दिवस व्यायाम केला म्हणजे झाले, असं होत नाही. त्याने आपण फिट होत नाही त्यासाठी व्यायामात सातत्य सगळ्यात महत्त्वाचे असते, असं तो म्हणतो. त्यामुळे त्यानेही आपला व्यायाम सातत्याने सुरू ठेवला आहे. दैनंदिन जीवनात वेट ट्रेनिंग हा त्याचा आवडीचा फिटनेस प्रकार आहे. या आवडीचे त्याचे मुख्य कारण म्हणजे वेट ट्रेनिंगमध्ये आपण आपल्याच शरीराला आणि पर्यायाने मनाला आव्हान देत असतो. स्वत:ला फिटनेसची ध्येये देत, ती साधण्यासाठी स्वत:शी फाइट करणं, वजन उचलण्यासाठी अधिकाधिक जिद्द निर्माण करण्याची संधी वेट ट्रेनिंगमध्ये मिळते, असं तो सांगतो. ही सवय एकदा लागली की आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांनाही आपण त्याच जिद्दीने, ताकदीने फेस करतो असा आपला अनुभव असल्याचे आशीषने सांगितले.

वेट ट्रेनिंगसाठी नियमित दीड तास देत असल्याचे आशीष सांगतो. परंतु सध्या या भूमिकेनुसार व्यायामात काही प्रमाणात बदल करावे लागल्याने नियमितपणे कार्डिओवर भर दिला जात असल्याचे त्याने सांगितले. नियमित धावणे, स्किपिंग या गोष्टी करीत असल्याचे तो सांगतो. धावणे हा त्याचा अतिशय आवडीचा प्रकार असल्याने तो एका तासात १० किलोमीटर धावतो. १०००-१२०० दोरीच्या उडय़ा, सायकलिंग या गोष्टीही करत असल्याचे तो सांगतो. शिवाय या सगळ्याच्या जोडीला स्विमिंगही करत असल्याची माहिती आशीषने दिली. फिटनेस करताना नीट विचारपूर्वक त्याचे नियोजन करून, मनापासून आणि सातत्याने केला तर त्यातून मिळणारा उत्साह दैनंदिन जीवनात आनंद निर्माण करणारा ठरत असल्याचे आशीष गोखले सांगतो.

viva@expressindia.com