आघाडीच्या टेलिव्हिजन वाहिन्यांमागची मास्टर माइंड, काहीतरी अधिक क्रिएटिव्ह करायला मिळावं यासाठी करिअरच्या कळसावर असताना नोकरी सोडून स्वत चित्रपट निर्माती होण्याचा निर्णय घेणारी आणि पदार्पणातच ‘ओह माय गॉड’ सारखा चाकोरीबाहेरचा, विचारप्रवृत्त करणारा चित्रपट देणारी
निर्माती – अश्विनी यार्दी. या धडाडीच्या  व्यक्तिमत्त्वाशी थेट संवाद साधायची संधी या महिन्याच्या व्हिवा लाऊंजमधून मिळणार आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याच्या समवेत ‘ग्रेझिंग गोट पिक्चर्स’ या कंपनीची संस्थापक म्हणून अश्विनी यार्दी हे मराठमोळं नाव झळकतं तेव्हा या नावामागचा यशस्वी इतिहास खूप कमी लोकांना माहिती असतो. कलर्स वाहिनी अस्तित्त्वात आली, तेव्हा या वाहिनीला चेहरा मोहरा मिळवून द्यायची मोठी जबाबदारी क्रिएटिव्ह हेड म्हणून अश्विनी यांच्यावर होती. आपल्या कारकीर्दीत कलर्सवरच्या ‘उतरन’, ‘बालिका वधू’ सारख्या वेगळ्या धाटणीच्या मालिका आणि‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ सारखे रिअ‍ॅलिटी शोज यशस्वी करून दाखवले. चित्रपट निर्मितीतील यशस्वी पदार्पणानंतर ‘७२ मैल’ सारखा चाकोरीबाहेरचा मराठी चित्रपट करायची धडाडी त्यांनी दाखवली. अश्विनी यांचा टीव्हीपासून सिनेमापर्यंतचा प्रवास व्हिवा लाऊंजमध्ये उलगडणार आहे.
कधी : बुधवार, २५ सप्टेंबर २०१३
कुठे     : पु. ल. देशपांडे मिनी थिएटर, रवींद्र नाटय़ मंदीर, प्रभादेवी
वेळ     : दुपारी ३.३०