छोटय़ा पडद्यावर कारकिर्दीला सुरुवात करून मनोरंजन वाहिन्यांच्या विश्वात आघाडीचे स्थान पटकाविणारी प्रसन्न व्यक्तिमत्वाची अश्विनी यार्दी.  ‘कलर्स’ वाहिनीवरील ‘बिग बॉस’सारख्या नावीन्यपूर्ण कार्यक्रमांच्या संकल्पना ठरविणाऱ्या अश्विनीने नंतर ‘ओ माय गॉड’सारख्या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीत पदार्पण केले.  टीव्ही वाहिन्यांचे विश्वच  तिथली गणितं, प्रेक्षकशरणता, त्यानुसार करावे लागणारे बदल, आव्हाने याविषयी गेल्या मंगळवारच्या ‘व्हिवा लाऊन्ज’मध्ये रसिकांशी दिलखुलास गप्पा अश्विनी यार्दीने मारल्या. छोटय़ा पडद्यापासून मोठय़ा पडद्यापर्यंत तिचा प्रवास आणि प्रत्येक निर्णयामागचा विचार, टीव्ही वाहिन्यांची क्रिएटिव्ह हेड ते ‘ग्रेझिंग गोट पिक्चर्स’मार्फत चित्रपट निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर अश्विनी यार्दीचा चित्रपटविषयक विचार या साऱ्याविषयीचे रसिकांच्या मनताले कुतूहल रेश्मा राईकवार आणि रोहन टिल्लू यांनी घेतलेल्या मुलाखतीतून उलगडत गेले.  

टेलिव्हिजन प्रवेश योगायोगाने..
टेलिव्हिजनवर माझा प्रवेश हा योगायोगाने झाला होता. मी झेवियर्समध्ये होते. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी झेवियर्समध्ये ‘अॅडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग’चा अभ्यास करत होते. १९९२ मध्ये सॅटेलाईटची सुरुवात झाली होती आणि १९९३ साली मी माझा अभ्यास संपवून कामाच्या शोधात होते. वरळी हा परिसर असा आहे की इथे सर्वात जास्त जाहिरात एजन्सीज् आहेत. त्यामुळे मी प्रत्येक एजन्सीत जाऊन माझा बायोडेटा देत होते. त्या दरम्यान, कोणीतरी मला सांगितले की कुणाल कोहली म्हणून दिग्दर्शक आहे झी टीव्हीमध्ये.. तर त्याला एका सहाय्यकाची गरज आहे. तर टीव्ही म्हटल्यावर मी नाही..नाही. मला टीव्ही करायचाच नाही आहे. मला जाहिरात क्षेत्रात जायचं आहे, कॉपीरायटिंग करायचं आहे.. असं सांगितलं. पण, तू एकदा जाऊन भेट तर.. खूपच चांगलं काम आहे असा आग्रह झाल्यावर मी वरळीतच होते, झी टीव्हीचं ऑफिसही तिथेच होतं म्हणून मी तिथे गेले. कुणालला भेटले. त्याने सांगितले की आम्हाला ‘लक्स क्या सीन है’साठी सहाय्यक दिग्दर्शकाची गरज आहे. पण, मला काही ते फारसं आवडलं नव्हतं त्यामुळे मी ते करू शकेन की नाही, मला माहीत नाही..असंच काहीस उत्तर मी कुणालला दिलं होतं. नंतर झीमध्ये माझे खूप मित्रमैत्रिणी झाले होते. त्यांनी मला सांगितलं की ही खूपच चांगली संधी आहे. तेव्हा कसं होतं की टीव्हीविषयी फार कोणाला माहिती नव्हती. एक दूरदर्शन तेवढं होतं. त्यामुळे प्रॉडक्शन काय असतं वगैरे कसलीच माहिती नव्हती. आता उलट सगळ्यांनाच टीआरपीपासून सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे १९९३ साली झी टीव्हीपासून माझी सुरुवात झाली आणि आज योगायोगाने सुरू झालेल्या त्या कारकिर्दीला वीस वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यासाठी खरंतर कुणाल कोहली आणि झी टीव्हीचे आभार..

‘बिग बॉस’ची धम्माल !
‘बिग बॉस’ हे अजिबात ठरवून केलेलं नसतं. तीन महिने बिग बॉस सुरू असतं आणि तो काळ म्हणजे मी नेहमी माझ्या टीमला म्हणायचे की आपण अक्षरश: देव असल्यासारखेच वागत असतो. मानवी स्वभाव जर तुम्ही बघितला तर समोरचा माणूस असं वागला पाहिजे यासाठी तुम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करता. पण, प्रत्यक्षात तो नेमका कसा वागेल?, हे तुमच्या हातात नसतं. ‘बिग बॉस’ हा असाच खेळ आहे. ‘बिग बॉस’च्या सेटवर एकूण ४२ कॅमेरे असतात. ते स्पर्धकांना माहिती नसतं. पण, आमची टीम २४ तास हे कॅमेरे मॉनिटर करत असते आणि ते फक्त आम्हालाच दिसतं. एखादा भाग जर फारच कंटाळवाणा झाला आहे, असं लक्षात आलं तर मी आमच्या टीमने काढलेल्या नोंदी बघते. त्यात समजा असं आमच्या टीमने म्हटलेलं असलं की आज संध्याकाळी राहुल रॉयने अमकीकडे एक कटाक्ष टाकला आणि तो फार वेगळा होता. मग हे वाचल्यावर मी या दोघांना एकत्र टास्क द्यायचा ठरवते. मग ते दोघे टास्कच्या निमित्ताने एकत्र येतात. आता त्यांच्या एकत्र येण्यातून बरंच काही घडू शकतं. घडलं तर ठीक आहे नाहीतर जाऊ दे..पण, बऱ्याचवेळा आम्हाला जे हवं ते घडतंच!
पण, कधीकधी अडचणीही येतात. कसं असतं की या सेटवर एक कॅमेरा लगलेला असतो. तिथे सगळे कॅमेरामन असतात. स्पर्धकांना तिथे फक्त आरसा दिसतो पण, त्या आरशामागे कॅमेरामनची एक टीम असते. एकदा चित्रण तपासताना एका स्पर्धकाच्या तोंडून ‘ओबामा राष्ट्राध्यक्ष झाले’, असं मी ऐकलं. त्याला ही बातमी कशी कळली?, काही लक्षात येईना. कारण, प्रत्यक्ष सेटवर तिथे एकही पेपर नसतो, पुस्तक नसतं, टीव्ही नसतो, काही नसतं तरी त्याला हे कळलं कसं? मी सगळ्या कॅमेरामनना बोलावलं. मला शंका आली की कोणीतरी स्पर्धकांना माहिती पुरवली आहे. अखेर, सगळ्या शोधानंतर असं लक्षात आलं की त्यांनी काहीतरी मागवलं होतं आणि ती वस्तू ज्या वर्तमानपत्राच्या कागदात बांधून पाठवली होती त्यात ती बातमी छापलेली होती. पण, ‘बिग बॉस’च्या सेटवर जी भांडणं होतात ती स्वाभाविक आहे. कारण, ज्या स्थितीत त्यांना ठेवलं जातं तिथे घडय़ाळ नाही, कॅलेण्डर नाही, संवादाचं काहीच माध्यम नाही.. अशा वातावरणात आपल्याला जरी ठेवलं तर आपणही भांडायलाच लागणार.

प्रभात आणि माझे आजोबा
माझे आजोबा बाबुराव पै यांचे निधन झाले आणि त्यानंतर पाच दिवसांनी माझा जन्म झाला. त्यामुळे मी आजोबांना पाहिलेले नाही. पण, त्यांच्याबद्दल आणि प्रभातबद्दल अनेक गोष्टी मी आधी बाबांकडून आणि आता काकांकडून ऐकत आले आहे. म्हणजे, देव आनंद यांना पहिला चित्रपट माझ्या आजोबांनी मिळवून दिला होता. तर अशा अनेक गोष्टी आहेत, माहिती आहेत ज्या मी नेहमी काकांना विचारत असते, पडताळून घेत असते. ‘प्रभात’चे जे भागीदार होते त्यांचं प्रत्येकाचं असं वेगळेपण होतं. व्ही. शांताराम दिग्दर्शक होते. त्यांच्याकडे सगळ्या सर्जनशील गोष्टींची जबाबदारी होती. दामलेंकडेही सर्जनशील कामांची जबाबदारी जास्त होती. माझ्या आजोबांकडे निर्मितीव्यवस्था आणि अर्थव्यवस्था होती. म्हणजे खऱ्या अर्थाने ते निर्माते होते. त्यांचा पिंडच मुळात व्यावसायिकाचा होता.
प्रभातचे चित्रपटही मी लहानपणापासून आवर्जून बघत आले आहे. लहानपणी मला ‘बाळकृष्ण’ हा चित्रपट आवडायचा. मोठी झाल्यावर आणि स्वत: या क्षेत्रात आल्यानंतर मात्र ‘कुंकू’ हा माझा सर्वात जास्त आवडीचा चित्रपट ठरला आहे. कारण त्यात जो विचार मांडला होता तो त्या काळी फार पुढारलेला असा विचार होता. प्रभातचे जे चित्रपट होते त्यात कुठली ना कुठली सामाजिक समस्या हाताळलेली असायची. मालिकांची निर्मिती करताना मी त्या चित्रपटांमधून जे सामाजिक विषय मांडण्यात आले होते त्याचा अभ्यास जरूर केला. त्यामुळे माझी प्रत्येक मालिका असेल मग ती ‘लाडो..’ असो, ‘बालिकावधू’ असो कु ठलातरी सामाजिक विषय धरूनच तिची मांडणी झालेली असते.

‘क्रिएटिव्ह हेड’ म्हणजे काय?
क्रि एटिव्ह हेड’ म्हणजे खरेतर ‘प्रोग्रॅमिंग हेड’. तुम्ही टीव्हीवर जे काही चांगलं-वाईट पाहता.. मालिका, प्रोमोज् जे काही असेल त्याची जबाबदारी ही प्रोग्रॅमिंग हेडवर असते. कुठल्याही वाहिनीची सुरुवात करताना आम्ही आधी ‘स्ट्रॅटेजिक टाईमटेबल’ बनवतो. म्हणजे मी जर ‘कलर्स’मध्ये आहे. तर आम्ही आधी आमची स्पर्धा इतर कोणत्या वाहिनीबरोबर आहे झीबरोबर आहे की स्टारबरोबर आहे ते आधी निश्चित करतो. मग एक आलेख तयार केला जातो..स्टारच्या मालिका कोणत्या, झीच्या मालिका कोणत्या, त्यांना त्या त्या वेळेत किती प्रेक्षक आहे?, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग आपल्या कार्यक्रमांची आखणी आणि प्रसारणाची वेळ ठरवली जाते. ‘कलर्स’ ही वाहिनी तर आम्ही व्यवस्थित नियोजन करून म्हणजे फक्त कार्यक्रमांच्या बाबतीत नाही तर वितरणाचेही नियोजन करून मार्केटमध्ये उतरवली होती. त्यासाठी आम्ही गुंतवणूकही तितकीच जास्त केली होती. त्या वेळी ‘स्टार’ ही नंबर वन वाहिनी होती. त्यामुळे आम्ही भरपूर पैसे देऊन स्टारच्या मागेच आमची वाहिनी प्रसारित केली जाईल, अशी व्यवस्था केली होती. त्यामुळे व्हायचं काय? स्टारवर जाहिराती लागल्यानंतर प्रेक्षकांनी रिमोटवर पुढचं बटन दाबताच त्यांना दुसरी वाहिनी ‘कलर्स’ दिसते. हे आमचं मोठं यश होतं. दुसरं आम्ही काय केलं असेल तर स्टारवर दहा वाजता त्यांच्या सगळ्यात लोकप्रिय मालिका होत्या ‘कहानी घर घर की’ आणि ‘क्यों की सास भी कभी बहू थी’. इथे काहीतरी खूप वेगळं करावं लागणार होतं तेव्हा आम्ही ‘फीअर फॅक्टर’ करण्याचा निर्णय घेतला. ‘फीअर फॅक्टर ’ हा पहिल्यांदा सोनीवर मुकुल देवला सूत्रधार घेऊन करण्यात आला होता. पण, जास्तीत जास्त प्रेक्षकांना या शोपर्यंत आणायचे असेल तर आपल्याला बॉलिवूडचा प्रसिद्ध चेहरा लागणार हा विचार करून आम्ही अक्षय कुमारला ‘फीअर फॅक्टर’साठी करारबद्ध केले. त्याचवेळी मी त्या कार्यक्रमाचं स्वरूप जे होतं ते पूर्णपणे बदलून टाकलं. त्यात १३ मुली आणल्या त्यामुळे सगळ्यात मोठा बदल काय झाला असेल? तर तरूण जे होते ज्यांना स्टंट्स आवडतात त्यांनी रात्री १० वाजता आईकडचा रिमोट आपल्या हातात घ्यायला सुरुवात केली. नेहमी साँस-बहू बघणारी आई मुलाच्या बाजूला बसून ‘फीअर फॅक्टर’ बघायला लागली कारण त्यात अक्षय कुमार होता. आणि जर या १३ मुली करू शकतात तर आपण का नाही करू शकणार?, या इर्षेने मुलीही ‘फीअर फॅक्टर’कडे आकर्षित झाल्या. म्हणजे एक अक्षय कुमार, १३ मुली आणि भरपूर सारं नाटय़..अशी काही कार्यक्रमाची मांडणी करण्यात आली की तो डेली सोप ऑपेरा वाटावा.

प्रेक्षकांनी टीव्हीवरच्या गोष्टी या मनोरंजनापुरत्याच ठेवाव्यात
सोनी टीव्हीवर दाखवले जाणारे क्राईम पॅट्रोलसारखे वीकेण्ड शो हे खरोखरच चांगले आणि महत्त्वाचे आहेत. आपण त्या मालिकांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे महत्त्वाचे ठरते. बऱ्याच गोष्टी या त्या त्या प्रेक्षकांच्या संस्कारांवर अवलंबून असतात आणि या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही देखरेख ठेवू शकत नाही. एकतर आजच्या घडीला टीव्ही हे सर्वात स्वस्त माध्यम आहे. तुमच्याकडे रिमोट कंट्रोल असतो, चाईल्ड लॉकसारखे पर्याय असतात पण, आपण त्याचा वापर करत नाही. वाहिनीची अधिकारी म्हणून बघायचं झालं तर आमच्याकडे ‘स्टॅण्डर्ड प्रॅक्टिसेस’ नावाची समिती असते. त्यांच्या नियमांनुसार जितकं काट-छाट करता येईल ते करून आम्ही दाखवतो. पण, शेवटी सगळं प्रेक्षकांच्याच मनावर असतं. बरं, गुन्हा करणाऱ्यांना किंवा वाईट विचार करणाऱ्यांना टीव्हीपासूनच प्रेरणा मिळते, असंही नाही. पुण्यात झालेलं मोठं हत्याकांड हे कादंबरी वाचून केलेलं होतं. तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींवर र्निबध आणणार? मला वाटतं, प्रेक्षकांनी त्या गोष्टी केवळ मनोरंजानाच्या उद्देशानेच बघायला हव्यात.

आशयघन निर्मितीचं समाधान मराठीत आहे
मराठी कलाकारांमध्ये जी गुणवत्ता आहे ती कुठेही शोधून सापडणार नाही. आपल्याला कुठलाही विषय मराठीत मांडता येतो. म्हणजे ‘७२ मैल’सारखा विषय हिंदीत मांडण्याचा मी विचारसुद्धा करू शकणार नाही. मला वाटतं हेच मराठी चित्रपटांचं शक्तीस्थान आहे आणि आशयघन चित्रपटांच्या निर्मितीचं समाधानही मराठीतच तुम्हाला मिळतं. अ

टीव्हीमुळे समाजात फार बदल झाले

समाजात आज जे बदल झालेले दिसतात त्या बदलांसाठी टीव्हीच जबाबदार आहे असं मला वाटतं, कारण मालिकांचा प्रेक्षकांवर खूप प्रभाव पडतो. त्यांची जीवनशैली बदलते. चित्रपट हे एका अर्थाने प्रेरणा देणारे असतात. पण, मालिकेतली सगळीच पात्रं ही प्रेक्षकांना आपल्या घरातली वाटत असतात. त्यामुळे सॅटेलाईट आल्यानंतर एक माध्यम म्हणून फक्त टीव्हीच बदलला असं नाही तर टीव्हीमुळे समाजाची मानसिकता, त्यांची जीवनशैलीही पूर्णत: बदलली.

टीआरपीची गणितं
एसी निल्सन ही एक अमेरिकन कंपनी आहे. भारतात ती ‘टॅम’ या नावाने काम करते. त्यांनी प्रेक्षकांची काही एक संख्या ठरवून घेतली आहे. दाक्षिणात्य लोक सोडून म्हणजे महाराष्ट्रापासून ते काश्मीपर्यंत जे हिंदी भाषिक आहेत त्यांची एक संख्या त्यांनी निश्चित केली. मुळात, भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे त्यामुळे प्रत्येकाचा प्रतिसाद मोजणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी साधारण ८००० लोक निवडले आहेत. या लोकांच्या घरात एक पीपल मीटर म्हणून बॉक्स ठेवलेला आहे. त्यांचं वेगळं रिमोट असतं. जर एखादा तरुण मुलगा टीव्ही बघत असेल तर त्याला रिमोटवर तरुणांसाठी असणारं बटन दाबावं लागतं, एखादी महिला बघत असेल तर तिला वेगळं बटन दाबावं लागतं तर अशा पद्धतीने मग त्यांची वर्गवारी नोंद होते. हे ८००० लोक कोण आहेत हे आमच्यापैकी कोणालाच माहिती नसतं. आणि ते लोक सतत बदलत असतात. तर अशा पद्धतीने हे ८००० लोक आपल्या टेलिव्हिजन वाहिन्यांचं भविष्य निश्चित करतात.

तासाला १२ मिनिटांच्या जाहिरातींचा नियम जुनाच
तासाला १२ मिनिटांच्या जाहिरातींचा नियम जुनाच आहे. सुरुवातीला झी टीव्ही आणि स्टार टीव्ही हे हाँगकाँगमधून प्रक्षेपित व्हायचे आणि हाँगकाँग सरकार हा नियम कटाक्षाने पाळत होते. इथे भारतात प्रक्षेपण सुरू झाल्यानंतर मात्र हा नियम कु ठेतरी हरवला. साधारणपणे आता ३० मिनिटांच्या मालिकांमध्ये १२ मिनिटांचा प्रोमो, १० मिनिटांच्या जाहिराती आणि उरलेल्या वेळेत मालिका असं सर्वसाधारण स्वरूप आहे.

प्रेक्षकांची विचारसरणी ही जुनाट आणि एक काळ मागे नेणारी ठरली..
१९९० मध्ये ज्या मालिका होत्या त्या खूप पुढारलेल्या होत्या. ‘तारा’, ‘हसरतें’ या मालिकांच्या नायिका त्या काळाच्या कितीतरी पुढच्या होत्या. तारा ही छोटे केस ठेवणारी, बीअर पिणारी अशी होती. आता ती खलनायिके च्या रूपात दिसते. ‘हसरतें’ मालिकेतील सावीची व्यक्तिरेखाही खूप बोल्ड होती. आता बघाल तर मालिकेतील सगळ्या नायिका या खालमानेने वावरणाऱ्या, नेहमी खरे बोलणाऱ्या अशा आहेत. तो जो ९० पासूनचा प्रवाह होता तो फोर बदलत गेला. त्यामागे मुख्य कारण असं वाटतं की सुरुवातीला सॅटेलाईट आले तेव्हा केवळ उच्चशिक्षित, उच्चभ्रू वर्गालाच टीव्ही बघणे आर्थिकदृष्टय़ा परवडत होते. आमच्याकडे प्रेक्षकांची अ, ब, क, ड अशी वर्गवारी असते. शिक्षणावर आधारित अशी ही वर्गवारी असते. या वर्गवारीनुसार सुरुवातीला केवळ ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील लोकांनाच टीव्ही बघणे शक्य होते. त्यांनी या बोल्ड विषयांवरच्या मालिका स्वीकारल्या. पण, २००० सालानंतर केबलचे भाव कमी झाले आणि टीव्ही स्वतंत्र झाला. ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील प्रेक्षकांची संख्या वाढली. यात हरतऱ्हेच्या प्रेक्षकांचा भरणा होता आणि त्या प्रेक्षकांना मात्र नवे विषय पचनी पडले नाहीत. त्यामुळे, प्रेक्षकांची विचारसरणीच एक काळ मागे नेणारी ठरली आणि म्हणूनच साँस-बहू मालिकांचा राबता वाढला.

‘कलर्स’ ते ‘ओएमजी’ हा ‘७२ मैल प्रवास’ कसा घडला?

‘कलर्स’मध्ये असतानाच एक चित्रपट करायचा विचार माझ्या डोक्यात घोळत होता. मी वाहिनीच्या व्यवस्थापकांनाही तो विचार बोलून दाखवला होता. मला मुळात एक मराठी चित्रपट करायचा होता तोही माझ्या बाबांसाठी. माझ्या वडिलांचं मराठी चित्रपटसृष्टीत फार मोठं योगदान आहे. हिंदीसाठी भरपूर पैसे मिळत असूनही ते प्रभात टॉकीजमध्ये मराठीच चित्रपट दाखवायचे. प्रभात हे मराठी चित्रपटांसाठी बनलेले आहे आणि आपण कायम मराठी चित्रपटच प्रदर्शित केले जातील, हे बघितले पाहिजे, असे माझे वडील नेहमी म्हणत असत. त्यामुळे आज ते हयात नसले तरी त्यांचा हा वसा आम्ही घेतला आहे. मला त्यांच्यासाठी एक चित्रपट करायचा होता. त्या वेळी तू कशी करणार चित्रपट? तुला वेळ मिळणार आहे का?, असं सगळे म्हणायचे. आणि मला व्यवस्थित वेळ देऊन चित्रपट करायचा होता. त्यामुळे मग ‘कलर्स’ वाहिनी सोडून पूर्णपणे चित्रपट निर्मिती करायचा निर्णय घेतला.

टेलिव्हिजन संस्कृतीबरोबरच मी जाणती होत गेले..

झी टीव्हीसुद्धा त्याकाळी शिकण्याच्या प्रक्रियेत होतं, कुणाल स्वत: शिकत होता.. आम्ही लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. असं कुठेच नव्हतं की सगळं तयार आहे आणि आम्हाला फक्त ते घेऊन पुढे जायचं आहे. आमचा प्रत्येक दिवस हा काहीतरी शिक वून जात होता. त्यामुळे जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला कुठेच असं वाटत नाही की मी टीव्हीकडे आले नसते आणि जाहिरात क्षेत्रात आले असते तर अधिक चांगलं झालं असतं. नाही. कारण, मी स्वत: टेलिव्हिजन संस्कृतीबरोबरच जाणती होत गेले. टीव्ही या माध्यमातून तुम्हाला दरदिवशी लोकांची नव्याने ओळख होत असते. तिथे रोज काही ना काहीतरी घडत असतं आणि तुम्ही त्याबद्दल कुठलेही आडाखे बांधू शकत नाही. चित्रपटाचं कसं आहे की एकदा तो पूर्ण झाला की बस्स्! तुम्हाला तो प्रदर्शित झाल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया कळतात. पण, टेलिव्हिनजचं तसं नाही. तुमचा रोजचा अध्र्या तासाचा कार्यक्रम असतो आणि त्याला लगेच प्रतिसाद मिळतो म्हणजे रोजच्या अध्र्या तासाचा तो प्रतिसाद असतो. मला आठवतंय आम्ही ‘बालिकावधू’ करत होतो त्या वेळी त्या मालिकेच्या सगळ्याच व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय झाल्या होत्या. मालिका सुरू झाल्यानंतर साधारण तीन-चार महिन्यांनी आम्ही त्यातली जग्याची बहीण जी आहे सुगना. तर तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला आहे, असं आम्ही दाखवलं होतं. मी साडेआठ वाजता कार्यालयात होते. तो भाग प्रक्षेपित झाल्यानंतर मला एवढे फोन आले शिव्याशाप देणारे की मी म्हटलं, तो फोन पहिले बंद करून ठेवा. मी एकही फोन घेऊ शकणार नाही. खरं म्हणजे मी खूप घाबरले होते की बापरे! मी हे काय केलं आहे? मला मालिकाच बंद करावी लागणार. पण, प्रेक्षकांची मानसिकता अशी असते की एवढे शिव्याशाप देऊनही दुसऱ्या दिवशीचा जो भाग होता ज्यात त्याच्या मृत्यूचा खरा प्रसंग चित्रित केला होता त्या भागाला सर्वाधिक टीआरपी मिळाला होता. त्यामुळे ही शिकण्याचीच प्रक्रिया होती की पहिल्या दिवशी मला वाटलं होतं.. मालिकाच बंद करावी लागते आहे तर दुसऱ्या दिवशी त्याच मालिकेला सर्वाधिक टीआरपी होता.

वास्तवही मनोरंजकतेनेच मांडावे लागते
१९९० साली झी टीव्हीवर ज्या हसरतें, सैलाब अशा मालिका होत्या त्या फार वेगळ्या होत्या. त्यामानाने आता मालिकांमध्ये फार बटबटीतपणा आला आहे हे मान्य करते. पण, प्रेक्षकांना ते आवडतं. म्हणजे, मालिकांमध्ये त्या पात्रांनी नेसलेल्या साडय़ांची चौकशी होते. आम्हाला तर सोफ्यांच्याही ऑर्डर्स आलेल्या आहेत. तुमचं भिंतीवरचं पेंटिंग जरी बदललं तरी लोकांचा फोन येतो की तुम्ही पेंटिंग का बदललं? काल भगव्या रंगाचं होतं आज ते निळ्या रंगाचं आहे, अशी चौकशी सातत्याने केली जाते. त्यामुळे कुठेतरी रोजच्या तणावातून, अडीअडचणींतून सुटकेचा मार्ग म्हणून टीव्हीकडे पाहिलं जातं. पूर्वी झी टीव्हीवर आठवडय़ाच्या मालिका होत्या. ते स्वरूप खरोखर चांगले होते. आता दैनंदिन मालिकांचा जो प्रवाह सुरू झाला आहे त्यात अशा विचित्र गोष्टींचा भरणा जास्त आहे. पण, प्रेक्षक मूर्ख नाहीत हे कुठेतरी वाहिनीलाही लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळे सतत तेच तेच देऊन चालत नाही आणि ‘बालिकावधू’ सारखा गंभीर, वास्तव विषयही मनोरंजकतेनेच मांडावा लागतो नाहीतर प्रेक्षक लवकर कंटाळतात.

टीव्ही सर्वात जास्त अवघड !
टीव्हीचं काम सगळ्यात जास्त अवघड आहे. चित्रपट दिलेल्या मुदतीत पूर्ण करणं आपल्या हातात असतं. कित्येक मालिकांचे भाग चित्रित करणं, ते अपलोड करणं यासाठी फार वेळ लागतो.

संकलन : रेश्मा राईकवार

छाया : प्रदीप कोचरेकर