22 September 2020

News Flash

ओळख ऑस्ट्रेलियन खाद्यसंस्कृतीची!

ऑस्ट्रेलियातलं अजून एक आश्चर्यकारक फूड कल्चर म्हणजे पार्कमध्ये असणारे बार्बेक्यू स्टेशन

(संग्रहित छायाचित्र)

मितेश जोशी

गेल्या काही वर्षांत नवनवीन देश आणि तेथील खाद्यसंस्कृतीची ओळख खवय्यांना व्हावी आणि त्यांनी वेगवेगळ्या कुझिन्सकडे वळावे, यासाठी शेफ, हॉटल्स, कॅफेज आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसतात. अशाच प्रकारे ऑस्ट्रेलियन खाद्यसंस्कृतीची ओळख खवय्यांना व्हावी यासाठी शेफ अमेय महाजनी यांनी आपल्या ‘कॅफे आरोमाज्’च्या माध्यमातून ऑस्ट्रेलियन फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले होते.

तसं बघायला गेलं तर ऑस्ट्रेलियाचे मूळचे रहिवासी ‘अ‍ॅबऑरिजिन्स’ म्हणजेच ‘ऑस्ट्रेलियन आदिवासी’ हे होते. मग ब्रिटिश तिथे आले आणि या खंडात त्यांच्या वसाहती वसवल्या. तुरुंगवासासाठी ब्रिटिश कैद्यांना ऑस्ट्रेलियामध्ये मोठया प्रमाणावर पाठवत असत. त्यामुळे अस्सल ऑस्ट्रेलियन खाद्यसंस्कृतीवर इंग्लंडचा प्रभाव दिसतो. बिस्किटं, मासे आणि चिप्स, मीट पाय, स्कोन्स, पावलोवा हा डेझर्टचा प्रकार असे काही स्थानिक ऑस्ट्रेलियन खाद्यपदार्थ सध्या सर्वत्र सर्रास चाखायला मिळतात. खरं म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या मूळ आदिवासी लोकांचं जेवण अगदी साधंसुधं होतं. त्यात भाजलेलं, खारवलेलं मांस, बटाटे इत्यादी मोजकेच घटक असत.

ऑस्ट्रेलिया तसा खूप उशिरा नकाशावर आलेला देश आहे, त्यामुळे तिथली खाद्यसंस्कृती इटली, चीन, भारतासारखी पूर्ण विकसित झाली आहे, असं म्हणता येणार नाही. पण तिथलं कुझिन निश्चितच विकासाच्या वाटेवर आहे, अशी माहिती शेफ अमेय महाजनी यांनी दिली. आजच्या ऑस्ट्रेलियन्सना थाय आणि इटालियन फुडची विशेष आवड आहे. त्यामुळे दिवसेंदिवस स्थानिक पदार्थामध्ये इतर देशांच्या रेसिपीज मिक्स करून नवनव्या पद्धतीने वैविध्यपूर्ण असं ऑस्ट्रेलियन कुझिन पहायला मिळतं आहे, असं ते सांगतात. शेफ अमेय स्वत: दोन वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये होते. त्यामुळे त्यांनी या ऑस्ट्रेलियन फुड फेस्टिव्हलचा घाट घालत लोकांना याही चवीची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या खाद्यसंस्कृतीवर एक नजर टाकली तर संपूर्ण ऑस्ट्रेलिया खंडामध्ये विविध प्रकारची खाद्यसंस्कृती अस्तित्वात आहे, हे पहायला मिळतं. एक प्रदेश आहे जिथे फक्त भारतीयच राहतात. तर एका भागात फक्त चिनी लोकांची वस्ती आहे. काही भागात अरबांचीही स्वतंत्र वस्ती इथे पहायला मिळते. त्यामुळे संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये सर्व खाद्यसंस्कृतीचे रेस्टॉरंट, कॅफे आहेत. ज्यामुळे खाण्याच्या तसेच बनवण्याच्या पद्धतींमध्येही प्रचंड वैविध्य दिसून येतं, असं त्यांनी सांगितलं. चीझचे विविध प्रकार आणि ते वापरण्याच्या नावीन्यपूर्ण पद्धती तिथे दिसून येतात. ‘बरोसा वाइन कल्चर’ आणि ‘बरामुंडी फिश कल्चर’ या दोन लोकप्रिय खाद्यसंस्कृती संपूर्ण ऑस्ट्रेलिया खंडात पसरलेल्या आहेत. या दोन संस्कृतींमुळेच ऑस्ट्रेलियाची खाद्यसंस्कृती वैशिष्टयपूर्ण बनली आहे, अशी माहिती शेफ अमेय यांनी दिली. मटण, चिकन, पोर्क, मासे, फळं, चहा, कॉफी, मध, ब्रेड, चीझकेक, केक्स आदी पदार्थ ऑस्ट्रेलियन आहारातील नेहमीचे पदार्थ आहेत. ऑस्ट्रेलियन आहार सर्वसमावेशक आणि पोषक असल्याने ऑस्ट्रेलियन लोक नेहमीच ‘फिट अ‍ॅण्ड फाइन’ असतात.

ऑस्ट्रेलियातलं अजून एक आश्चर्यकारक फूड कल्चर म्हणजे पार्कमध्ये असणारे बार्बेक्यू स्टेशन. जिथे बार्बेक्यूची शेगडी असते. लोक आपापले बार्बेक्यू घरून घेऊन येतात आणि या शेगडीवर आणून भाजतात. आणि ओपन ग्राउंडवर आपल्या कुटुंब किंवा मित्रांसोबत बार्बेक्यू पार्टी करतात. हा ट्रेण्ड तिथे हमखास वीकें डला पाहायला मिळतो, असे त्यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियाचा खूप मोठा प्रदेश हा सपाट मैदानांचा आहे आणि या मैदानांवर राज्य करणारे ‘कांगारू’ ही ऑस्ट्रेलियाची ओळख आहे. प्राचीन काळापासून कांगारूचं मांस इथे लोकप्रिय खाद्य म्हणून खाल्लं जातं. तिथल्या एखाद्या स्पेशालिटी रेस्टॉरंटमध्ये गेलात तर तुम्हाला ‘कांगारू स्टेक विथ रेड वाईन सॉस’ अशा काही डिशेस सहज दिसतील. अशीच एक वेगळी पाककृती सांगायची झाली तर, कांगारूच्या मटणाला सहा तास मंद आचेवर शिजवून सव्‍‌र्ह केले जाते. या फेस्टिव्हलमध्ये कांगारूचे नाही, पण बकऱ्याचे मटण सहा तास शिजवून सव्‍‌र्ह केलेली ‘सिक्स अवर ब्रेस्ड लॅम’ ही डिश चाखायला मिळेल. त्याचबरोबर मेनकोर्समध्ये डोकावलंत तर अनोख्या अंदाजात पेश केलेली ‘ब्लॅक राईस विथ कोळंबी करी’ ही डिशसुद्धा जिव्हातृप्ती देते. आपण ब्राऊन राईस नेहमीच खातो. पण ऑस्ट्रेलियात ब्लॅक राईसची चलती आहे. म्हणून ही डिश नेहमीपेक्षा जरा वेगळी आहे. स्टार्टरमध्ये अनेक व्हेज-नॉनव्हेज प्रकार आहेत. डेझर्टमध्ये मात्र लॅमिंग्टन पेस्ट्री व पावलोवा हे पारंपरिक ऑस्ट्रेलियन डेझर्ट चाखायला मिळतात. लॅमिंगटन पेस्ट्री ही ऑस्ट्रेलियाची नॅशनल पेस्ट्री म्हणून ओळखली जाते. याच पेस्ट्रीची पाककृती शेफ अमेय यांनी खास व्हिवच्या वाचकांसाठी शेअर केली आहे.

लॅमिंग्टन  पेस्ट्री

साहित्य : बटर १०० ग्रॅम, कॅस्टर शुगर – १०० ग्रॅम, अंडी – दोन, मैदा – १४० ग्रॅम, बेकिंग पावडर – एक टी स्पून, कोको पावडर -२ टी स्पून, दूध – २ टेबल स्पून.

आयसिंगकरिता साहित्य : प्लेन चॉकलेट (तुकडे केलेले) – १०० ग्रॅम, बटर – २५ ग्रॅम, कॅ स्टर शुगर – १०० ग्रॅम, खोबरे पावडर किंवा डेसिकेटेड कोकोनट – १०० ग्रॅम.

कृती : ओव्हन १८० डिग्रीवर प्री-हीट करा. चौकोनी बेकिंग ट्रेला बटर लावून घ्या. बटर आणि शुगर एकत्र फेटून घ्या. नंतर त्यात अंडं टाका. त्यात एक टेबलस्पून मैदा घाला. यामध्ये बेकिंग पावडर आणि कोको पावडर टाकून मेटल स्पूनने फोल्ड करा. नीट मिक्स करून घ्या. १८ ते २० मिनिटे बेक करा. आयसिंग बनविण्याकरिता एका पॅनमध्ये चॉकलेट, बटर आणि चार टेबलस्पून पाणी घ्या. चॉकलेट वितळेपर्यंत गरम करा. गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर त्यात आयसिंग शुगर टाकून मिक्स करून घ्या. ट्रेमधून केक काढून घ्या. त्याचे १६ चौकोनी तुकडे करा. तयार आयसिंगमध्ये हे तुकडे डीप करा. आणि खोबऱ्याच्या किसामध्ये घोळवून घ्या. कूलिंग रॅकवर सेट करायला ठेवा.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 5:04 am

Web Title: australian food culture abn 97
Next Stories
1 जगाच्या पाटीवर : ही वाट दूर जाते..
2 ओ साथी चल
3 केशाकर्षक
Just Now!
X