||वेदवती चिपळूणकर

फूड इंडस्ट्रीच त्यातल्या त्यात प्रयोग करता येण्यासारखी होती. म्हणून या इंडस्ट्रीतच काही तरी करायचा विचार केला असं सांगणाऱ्या गुरमीत कोचरने कॉर्पोरेट नोकरी सोडून व्यवसायाचा शुभारंभ केला. आज त्याचे ‘स्पाइस बॉक्स’आणि ‘ओये किद्दा’ ब्रॅण्ड्स प्रस्थापित झाले आहेत.

वयाच्या विसाव्या वर्षी इन्व्हेस्टमेंट बँकिंग क्षेत्रातल्या नावाजलेल्या कॉर्पोरेटमध्ये कामाची संधी मिळाली तर साहजिकच कोणतीही व्यक्ती ‘लाइफ बन गई’ याच आनंदात असेल. मात्र गुरमीत कोचरला अगदी सुरुवातीपासूनच स्वत:चं काही तरी करण्याची इच्छा होती. त्यासाठी अनुभव म्हणून त्याने नोकरी स्वीकारली. दोन मोठय़ा कॉर्पोरेट्समध्ये काम करूनही अशीच बढती मिळवत पुढे जायचं स्वप्न त्याने पाहिलं नव्हतं. स्वत:चा बिझनेस सुरू करताना त्याला फूड इंडस्ट्रीने आकर्षित केलं आणि त्याच्या व्यवसायाने मूळ धरायला सुरुवात केली. २०११ मध्ये सुरू केलेला ‘स्पाइस बॉक्स’ आणि त्यानंतर तीन ते चार वर्षांनी सुरू केलेला ‘ओये किद्दा’ ही दोन्ही नावं आता ब्रँड झाली आहेत.

इन्व्हेस्टमेंट बँकिंग ते फूड इंडस्ट्री या प्रवासामागच्या विचाराबद्दल गुरमीत म्हणतो, ‘‘स्वत:चा व्यवसाय करण्याची इच्छा तर माझी खूप आधीपासून होती; पण बिझनेस अशा क्षेत्रात करायचा होता जे क्षेत्र ‘नीडबेस्ड’ असेल, ‘वॉन्टबेस्ड’ नाही! या तत्त्वानुसार रोटी, कपडा, मकान ही तीनच क्षेत्रं काम करण्यासारखी होती. कपडा आणि मकान यासाठी भांडवल, अनुभव, माहिती अशा सगळ्याच गोष्टी मोठय़ा प्रमाणावर गरजेच्या असतात. फूड इंडस्ट्रीच त्यातल्या त्यात प्रयोग करता येण्यासारखी होती. म्हणून या इंडस्ट्रीतच काही तरी करायचा विचार केला.’’ विचार पक्का झाला तरी तो कृतीत येण्याचा एक क्षण असतो. त्याबद्दल बोलताना गुरमीत सांगतो, ‘‘मी जॉब करत असताना माझ्या डब्यातले पदार्थ महिना-दोन महिने रिपीट होत नाहीत हे माझ्या ऑफिसमधल्या मित्रांच्या लक्षात आलं. तिथून मला ‘स्पाइस बॉक्स’ची कल्पना सुचली. ऑथेंटिक पंजाबी फूड डब्यात देण्याचा विचार मला यातून सुचला. त्यासाठी काही थोडं प्लॅनिंग करून मी जॉब सोडला, मात्र पहिले तीन महिने घरच्यांना सांगायची माझी हिंमत नव्हती. त्यामुळे मी असं सांगितलं की, मी तीन महिन्यांनी काम रिझ्युम करणार आहे. त्या तीन महिन्यात माझं प्लॅनिंग आणि व्यवस्थित सुरू असलेलं काम पाहून घरच्यांना माझा निर्णय पटेल असं वाटलं आणि मग मी त्यांना हा निर्णय सांगून टाकला.’’

व्यवसाय ही गोष्ट धडपडत शिकण्याची असते. काही वेळा या चुका इतक्या मोठय़ा असतात, की मागे फिरण्याचे विचारही येतात. त्याच वेळी खंबीरपणे उभं राहून पुढे जाण्याची गरज असते. अशाच एका अनुभवाबद्दल गुरमीत सांगतो, ‘‘एकदम सुरुवातीला अकरा महिने काम केल्यावर मला असं वाटलं की, स्वत:चं ऑफिस असावं, छोटंसं किचन असावं. म्हणून मी एक मोठी जागा भाडय़ाने घेण्याचं ठरवलं. अशा वेळी कॉन्फिडन्स एवढा जास्त असतो, की काही वेळा तो ओव्हर ठरू शकतो. मी पाच वर्षांसाठी लीजचं काँट्रॅक्ट केलं आणि जी जागा माझ्या मालकीची नाही त्यासाठी तब्बल आठ लाख रुपये दिले. त्या वेळी मला खात्री होती की, पाच वर्ष ही जागा माझ्या ताब्यात असणार आहे. नवीनच बिझनेस आहे म्हटल्यावर स्वत:च्या ऑफिसची हौस भागवून घेण्यासाठी त्या जागेला सुंदर ऑफिस स्पेस बनवलं, त्यात छानसं किचन बनवलं. वर्षभराने त्या जागेच्या मालकाने मला एक महिन्याची नोटीस देऊ न जागा सोडायला सांगितली, कारण आता त्याला ती जागा विकायची होती. मी त्या जागेचं बदललेलं स्वरूप बघून आता त्याला त्या जागेला चांगला भाव मिळत होता आणि मला ती जागा सोडावी लागली. त्या वेळी ‘सेल्फ डाऊट’ हा प्रकार सुरू झाला,’’ असं तो सांगतो. आपण नोकरी सोडली ते चुकलं का, हे क्षेत्र निवडलं ते चुकलं का, मुळात बिझनेस करण्याचा विचारच चुकला का, असे अनेक प्रश्न मला पडले. मात्र त्या प्रश्नांना जास्त पॉवरफुल ठरवून आपण आपले प्रयत्न सोडून द्यायचे नाहीत हाही विचार मनाशी पक्का होता. त्यामुळे त्यातूनही काही तरी शिकू या, असं म्हणत मी तो एक अनुभव म्हणून जपला आणि पुन्हा कामाला जोमाने सुरुवात के ली, असं गुरमीत सांगतो.

एक ब्रँड चार वर्ष चालवल्यानंतर त्याच्या मनात दुसऱ्या ब्रँडचेही विचार घोळू लागले. मात्र दुसरा ब्रँड सुरू करताना काही तरी वेगळा विचार करणं गरजेचं असतं, अन्यथा ऑफर केल्या जाणाऱ्या सव्‍‌र्हिस किंवा प्रॉडक्टमध्ये रिपीटिशन येण्याची शक्यता असते. ‘स्पाइस बॉक्स’ आणि ‘ओये किद्दा’ या दोन्हीचा वेगळेपणा सांगताना गुरमीत म्हणतो, ‘‘‘स्पाइस बॉक्स’ ही कल्पना सुचली आणि अमलात आणली तेव्हा हे स्वीगी, झोमॅटो अस्तित्वात नव्हते. त्यामुळे ऑनलाइन डब्बा सव्‍‌र्हिस देणं ही नवीन संकल्पना होती. महिन्याचं, आठवडय़ाचं, वर्षांचं सबस्क्रिप्शन ऑनलाइन भरून डब्बा सव्‍‌र्हिस दिली जाते. हे सुरू केलं तेव्हा डिलिव्हरीसाठी फक्त डॉमिनोज प्रसिद्ध होतं. तो आदर्श होता, मात्र पदार्थ सगळे पंजाबी होते. ‘स्पाइस बॉक्स’ने जोर धरल्यावर तीन-चार वर्षांनी ‘ओये किद्दा’ची कल्पना सुचली. सामान्यत: पिझ्झामध्ये मिळणारे फ्लेवर्स आणि टॉपिंग्ज आम्ही पराठामध्ये स्टफ करायला सुरुवात केली. त्याला खूप पटकन रिस्पॉन्स मिळाला. हे पराठे सगळ्यात जास्त हिट तेव्हा झाले जेव्हा आम्ही त्यात नॉन-व्हेज व्हरायटी आणल्या. बटर चिकन पराठा ही सगळ्यात जास्त मीडिया आणि कस्टमर्सनी उचलून धरलेली व्हरायटी! त्यामुळे या नवीन व्हेंचरचा जम बसायला वेळ लागला नाही,’’ असे त्याने सांगितले.

एकदा आपला आधीचा मार्ग सोडून नवीन अवलंबला, की आपण तिथे गेलो असतो तर काय झालं असतं, हा विचार साहजिकच, कुतूहल म्हणून का होईना, प्रत्येकाच्या मनात येतो. त्यावर गुरमीत म्हणतो, ‘‘मी ज्या वयात कॉर्पोरेटमध्ये प्रवेश केला होता त्या हिशोबाने मी आतापर्यंत बऱ्याच वरच्या पोस्टवर असलो असतो. मात्र एकदा आपण आपलं क्षेत्र निवडल्यावर मागे वळून बघणं आणि जर-तरच्या गोष्टी करणं याला काही अर्थ नसतो. कारण आपण एक क्षेत्र निवडताना आपल्याला त्यातले सगळे फायदे-तोटे माहिती असतात, चढउतार येणार याची कल्पना असते. त्याहूनही तो आपण स्वत:हून स्वीकारलेला मार्ग असतो. त्यामुळे मागे बघणं आणि कोणताही पश्चात्ताप करणं यात शहाणपणाच नाही.’’ गुरमीतच्या या शहाणपणाच्या शब्दांनी अनेकांना व्यवसाय उभारण्याची प्रेरणा आणि हिंमत मिळेल!

viva@expressindia.com

व्यवसाय करताना कोणतंही मॅन्युअल किंवा हँडबुक येत नाही. तो सगळा अनुभवाचा खेळ असतो. सगळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अनुभव घेत उभंच राहायचं असतं. त्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून करण्याची गोष्ट म्हणजे बिझनेस! त्यामुळे कम्फर्ट मिळेल ही अपेक्षाही न करताच सुरुवात करावी लागते. सगळ्याच गोष्टींची सर्वागीण जबाबदारी घेण्यासाठी तयार असावं लागतं.’’  गुरमीत कोचर