आपल्या सो कॉल्ड रुटीनला ‘थांबणं’ हल्ली माहितीच नाही. कॉलेज, नोकरी, अभ्यास, छंद, मित्रमैत्रिणी, पार्टी.. यासाठी कुठेही न थांबता चाललेली विलक्षण धावपळ आपण सगळेच अनुभवतोय. मग कधी ‘बी अ लोनर’ असा एखादा फॉरवर्ड वाचतो तेव्हा जाणवतं, स्वत:ला स्पेस देण्याच्या प्रोसेसला अजून सुरुवातही झालेली नाही. अनेक गोष्टी करायच्यात पण त्यात स्वतला अडकवायचं नाहीय. थोडा वेळ फक्त आणि फक्त स्वतसाठी हवाय.
‘जिंदगी एक रेस है। रफ्तार के सिवां और कुछ नही!’ आपल्यातल्या बहुतेकांच्या जगण्याचं जणू सूत्रंच झालंय हे. आपल्या सो कॉल्ड रुटीनला ‘थांबणं’ हल्ली विसरायलाच झालंय. कुठेही न थांबता चाललेली विलक्षण धावपळ आपण सगळेच अनुभवतोय. ही धावपळ जाणवली आणि कितीही दमछाक झाली तरी सतत काही तरी नवं करण्याची धडपड आपल्या प्रत्येकाचीच चाललेली असते. बिझी होण्याच्या नादात आपण ज्या दहा दगडांवर पाय ठेवलाय तिथे आपण कितपत तग धरू शकतोय हे पाहणं राहूनच जातंय कुठे तरी. नुकताच कुणी तरी फेसबुकवर ‘बी अ लोनर’ नावानं शेअर केलेला एक कोट वाचला आणि तंद्रीतून खाडकन जाग आल्यासारखं वाटलं. स्वत:ला स्पेस देण्याच्या प्रोसेसला अजून सुरुवातही झालेली नाही हे त्या क्षणी प्रकर्षांने जाणवलं.
एखाद्या संध्याकाळी निवांतपणे खुर्चीत बसून जुनी गाणी ऐकत ती स्वत:शीच गुणगुणणाऱ्या आजोबांकडे बघितलं की अनेकदा आपण कुठल्या तरी आनंदाला मुकतोय का, असा प्रश्न पडतो. पूर्वी शाळेत असताना मूल्यशिक्षणाचा एक तास असायचा. बाई वेगवेगळ्या गोष्टी सांगून मनोरंजनातून खूप काही शिकवायच्या. आतल्या आत कुठे तरी एक समाधानाची जाणीव असायची तेव्हा. पुढे वाढत्या स्पध्रेला तोंड देताना सगळ्या गोष्टी मागे पडत गेल्या. पूर्वीचे छंदही जोपासले जाणं हळूहळू कमी होत गेलं. या सगळ्यांतून मनावर सतत एक विचित्र ताण वाढत जातोय, असं अनेकांना वाटत असेल, पटत असेल.
आता स्वत:ला स्पेस देणं म्हणजे नेमकं काय तर आपल्या आवडत्या गोष्टी करणं. मग त्यातून मिळणारा आनंद आपल्या दिवसभर होणाऱ्या धावपळीवरची रिफ्रेशमेंटही ठरू शकेल. कंटाळा आला की नुसताच फेरफटका मारून आलं तरी किती मोकळं वाटतं. आवडत्या लेखकाचं एखादं पुस्तक, आवडतं संगीत ऐकणं, नाटक बघण्यासाठी जाणं.. यासाठी आपल्यातले किती जण आवर्जून वेळ काढतात? अगदी लहानसहान गोष्टीतही आनंद असतो हे खरं. म्हणजे आपण फेसबुक, व्हॉट्सअपवर दररोज ते गुड मॉर्निग, गुड नाइटचे मेसेज करत असतोच की. पण ते केवळ फॉरवर्ड असतात. त्यात व्यक्त केलेल्या भावना, त्या फोटोचं सौंदर्य किती वेळा आपण अ‍ॅप्रिशिएट करतो? मुळात असं मोबाइलवरून शेअर (मोस्टली फॉरवर्ड)करताना स्वत:चं असं खरंच काही उरतंय का, याचा विचार खरंच करतोय का आपण? चौपाटीवर जाऊन सनसेट पाहण्याची मजा, सूर्याचा तो वेधक केशरी गोळा किती वेळा निरखायला जातो आपण? एखाद्या चित्रकाराने एखादं पेंटिंग करावं तसा किंवा एखाद्या पोएट्रीसारखा असणारा निसर्गाचा तो आविष्कार पाहून जे फील होतं ते शब्दांत गुंफणं अशक्यच. बदलत्या रंगछटांबरोबर आपलंही भावविश्व अलगद उलगडत जातं. असं काही तरी एन्जॉय करणं आपण मिस करतोय का याची सतत मनात रुखरुख लागलेली असते हल्ली.
अर्थात, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्याच असणार. तुम्ही जर पीस लव्हर असाल तर एखाद्या शांत ठिकाणी तुम्ही स्वत:ला स्पेस देऊ शकता. अॅडव्हेंचर्स असाल तर ट्रेकिंग, स्विमिंग सारखेही ऑप्शन्स तुमच्याजवळ आहेत. थोडक्यात ज्यामुळे तुम्ही मन रमवू शकाल, असं काही तरी तुमच्याकडे असेल. स्वत:ला वेळ दिलात, स्वत:ची आवड जपलीत तर नक्कीच खरं लाइफ एन्जॉय करता येईल आणि त्यात स्ट्रेस नसेल. तुमची स्पेस तुम्हाला कशात सापडते आम्हालाही कळवा.