News Flash

बी सेफ ऑन रोड

वेगाचं अप्रूप आणि त्यातून येणारी बेफिकिरी यातून रस्ते अपघातात लक्ष्य ठरणाऱ्यांमध्ये युवावर्गाचं प्रमाण वाढतंय...

| February 21, 2014 01:09 am

वेगाचं अप्रूप आणि त्यातून येणारी बेफिकिरी यातून रस्ते अपघातात लक्ष्य ठरणाऱ्यांमध्ये युवावर्गाचं प्रमाण वाढतंय… पण त्यावरचा उतारा शोधला आहे, युवावर्गानेच; लघुचित्रपट, थीमसाँग अशा माध्यमांतून आपली सर्जनशीलता आणि ऊर्जा वापरत.. राज्य महामार्ग पोलिसांच्या रस्ते सुरक्षा अभियानात राज्यभरातील तरुणाईने रस्ते अपघात कमी होण्याकरता आपापला खारीचा वाटा उचलला आहे.
रस्ते अपघातात बळी पडणाऱ्यांमध्ये वा अपघाताचे कारण ठरणाऱ्यांमध्ये युवकांचा समावेश सर्वाधिक असतो, हे लक्षात घेत गेल्या वर्षभरात राज्य महामार्ग पोलिसांनी राज्यभरात महाविद्यालयीन युवक-युवतींसोबत रस्ता सुरक्षा मोहीम राबवली. यात राज्याच्या कानाकोपऱ्यातील सुमारे लाखो मुलांपर्यंत पोहोचण्यात आयोजक यशस्वी ठरले आहेत. युवकांच्या अफलातून संकल्पना, काम करण्याचा झपाटा आणि विविध माध्यमांत वावरण्याची सराईतता याचा कल्पक उपयोग केला तर.. किती जादुई परिणाम घडून येतात, हे राज्य महामार्ग पोलिसांनी आखलेल्या रस्ते सुरक्षा अभियानात स्पष्ट झाले आहे.
या मोहिमेअंतर्गत राज्याच्या कानाकोपऱ्यातील युवक-युवतींना रस्ते सुरक्षाविषयक प्रशिक्षण दिले आणि त्यांच्या हातातच यासंबंधी जाणीव-जागृती करण्याची धुरा सोपवली. या अभिनव प्रयोगाला राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि वेगवेगळ्या माध्यमांद्वारे त्यांनी केलेले कल्पक काम पोलिसांची वाहवा मिळवून गेले.
प्रामुख्याने राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) अंतर्गत अथवा काही महाविद्यालयांत इतर माध्यमांमार्फत राज्याच्या कानाकोपऱ्यातील युवकांपर्यंत राज्य महामार्ग पोलिसांचे रस्ते सुरक्षा अभियान पोहोचले. वर्षभरात राज्यातील ३ हजार महाविद्यालयांच्या तीन लाखांहून अधिक मुले या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी झाली होती. इतक्या मोठय़ा विद्यार्थीसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी कृती गटांचे विशेष प्रशिक्षण जिल्हा, तालुका स्तरावर राज्य महामार्ग विभागाने घेतले. आणि मग या कृती गटामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आले. या प्रशिक्षणात वाहतुकीच्या नियमांचे पालन, अपघात घडू नये म्हणून कुठली खबरदारी घ्यावी, अपघातग्रस्तांना मदत कशी करावी, अशा प्रकारच्या विविध प्रशिक्षणांचा समावेश होता. वाहतूक नियमन, वाहनाच्या वेगावर नियंत्रण, वाहन परवाना प्रक्रिया आणि हेल्मेट, सीट बेल्टच्या वापरासारख्या नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यावर या अभियनाचा भर होता.
रस्ते सुरक्षा या विषयावर जाणीव-जागृती करण्यासाठी शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या माध्यमांतून अत्यंत कल्पक संकल्पना वापरल्या. काहींनी लघुचित्रपट तयार केला.. काहींनी गाणे रचून संगीतबद्ध केले. काहींनी ऐन गर्दीच्या वेळेस बंद पडलेल्या सिग्नलपाशी थांबून तिथली वाहतूक सांभाळली.. काहींनी बचत गटातील स्त्रियांना माहिती देत कुटुंबापर्यंत रस्ते सुरक्षाविषयी माहिती पोहोचवली.
पुणे विद्यापीठ अखत्यारीतील पुणे, नगर, नाशिकमधील सुमारे ३६७ महाविद्यालयांतील ४५ हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाल्याची माहिती पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक आणि संचालक डॉ. पंडित शेळके यांनी दिली. यात विद्यार्थ्यांनी पथनाटय़े, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, ट्रकचालक, रिक्षाचालक यांच्यात सुरक्षित वाहन चालविण्याविषयी जागृती असे विविध उपक्रम राबविण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीतील २८० महाविद्यालयांतील सुमारे ४० हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. चर्चगेटच्या केसी महाविद्यालयात या योजनेअंतर्गत १४ कलमी वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रम राबवण्यात आला. यात पथनाटय़, कॅम्पसमध्ये वाहतूक नियमनासंबंधीचे प्रत्यक्ष वातावरण (स्पीड ब्रेकर, सिग्नल उभारून आणि बस आणून) तयार करून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचा वापर कसा करायचा असतो, याचा अनुभव दिला. रस्ते सुरक्षा संबंधीचे प्रदर्शनही महाविद्यालयाच्या सभागृहात योजले होते. १२०० विद्यार्थ्यांकडून हेल्मेटचा वापर, परवाना यासंबंधीचे माहिती अर्ज भरून घेण्यात आले.
याअंतर्गत अभिनव संकल्पना राबविण्याची जणू चुरसच प्रत्येक महाविद्यालयामध्ये सुरू झालेली दिसत होती. काही महाविद्यालयांची युवा महोत्सवांची संकल्पना त्यावर बेतली होती. पुण्याच्या भारती विद्यापीठाच्या उत्कर्ष महोत्सवात रस्ता सुरक्षा ही मध्यवर्ती संकल्पना होती. पारनेरच्या महाविद्यालयात एकही अपघात न केलेल्या एसटीचालकांचा सत्कार महाविद्यालयाने केला होता. नवी मुंबई येथील भारती विद्यापीठात हेल्मेट घालणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल देण्यात आले.
राज्यभरातून पुरस्कारांसाठी जिल्हा पातळीवर तसेच विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयांनी रस्ते सुरक्षा अभियानात बजावलेल्या कामगिरीवर प्रस्तावांची छाननी करण्यात आली. प्रत्येक विद्यापीठाने गुणवत्तेच्या निकषांवर पाठविलेल्या प्रत्येकी दोन प्रस्तावांचा राज्य पातळीवर विचार करण्यात आला.
धुळ्याच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या डॉ. पा. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयात रस्ते सुरक्षाविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रस्ते अपघातात आपत्ती व्यवस्थापन कसे करावे, याचे धडे अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या उपक्रमाअंतर्गत गिरवले. इंदापूरच्या महाविद्यालयीन तरुणांनी अशाच एका गंभीर अपघातात जखमींना वैद्यकीय मदत प्राप्त करण्यासाठी धडपड करून त्यांचे प्राण वाचवले आणि एक वेगळा आदर्श महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर निर्माण केला. काही महाविद्यालयांनी रस्ते अपघातात मदतीसाठी महामार्ग पोलिसांचा क्रमांक हजारो विद्यार्थ्यांना एसेमेस करून जाणीव-जागृती केली. नाशिकच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडणाऱ्यांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे कौतुक केले. नारायणगाव येथे महिना-दीड महिन्याने जेव्हा बाजार भरतो, त्या वेळेस रस्ता सुरक्षेची माहिती देणारी पथनाटय़े तिथल्या महाविद्यालयीन मुलांनी सादर केली. बारामतीच्या टी.सी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही आठवडा बाजार, यात्रा यांत लोकजागृतीचे प्रयत्न केले. यात उल्लेखनीय प्रयत्न होता तो गडचिरोली येथील गोंडवन परिसरातील आरमुरी महाविद्यालयाचा- नक्षलवादी भागातील या महाविद्यालयाने गटचर्चाद्वारे या उपक्रमाला गती दिली, त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस काळोख्या रस्त्यांवर बैलगाडय़ांचे अपघात कमी होण्यासाठी बैलांच्या शिंगावर रिफ्लेक्टर बसवले.

* भारती विद्यापीठाच्या उत्कर्ष महोत्सवात रस्ता सुरक्षा ही मध्यवर्ती संकल्पना होती.
* इंदापूरच्या तरुणांनी एका अपघातात जखमींना वैद्यकीय मदत प्राप्त करण्यासाठी धडपड करून त्यांचे प्राण वाचवले.
* बारामती आणि नारायणगावच्या विद्यार्थ्यांनी आठवडा बाजारांतून लोकजागृतीचे प्रयत्न केले.
* तो गडचिरोली येथील नक्षलवादी भागातील विद्यार्थ्यांनी रात्रीच्या वेळी काळोख्या रस्त्यांवर बैलगाडय़ांचे अपघात कमी होण्यासाठी बैलांच्या शिंगावर रिफ्लेक्टर बसवले. 

नेरुळच्या डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात तेथील विद्यार्थ्यांनी अपघातग्रस्त बाइक ठेवली आणि जवळ वैद्यक महाविद्यालय असल्यामुळे उपलब्ध असलेल्या मानवी सांगाडय़ाची प्रतिकृती ठेवली. त्याचा अंगावर येणारा परिणाम परिसरातील व्यक्तींनी अनुभवला. दारू पिऊन गाडी चालविल्याने प्रियजनांना मुकण्याची पाळी कशी ओढवते, हे कथन करणारा लघुपट या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवला. या लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, निर्मिती सारी विद्यार्थ्यांचीच होती. याच महाविद्यालयाच्या हेमांग जोशी याने लिहिलेल्या, संगीतबद्ध केलेल्या ‘जरा संभलकर..’ हे गाणं तर या मोहिमेचे थीमसाँग बनले. पुण्याच्या एसएनडीटी महाविद्यालयाने महानगरपालिका नागरी वस्तीसह सुमारे १२ हजार बचत गटांच्या एक लाख महिला सभासदांपर्यंत रस्ते सुरक्षा अभियानाचा उद्देश पोहचवला. गाडीच्या भरधाव वेगाचे अनिष्ट परिणाम समजावून देत हेल्मेटचा वापर अधोरेखित करण्यासाठी द्रोणाची प्रतिकृती विद्यार्थ्यांतर्फे बचत गटातील स्त्रियांना देण्यात आली.  
उत्तम कामगिरी केलेल्या महाविद्यालयांना विविध पुरस्कारही प्रदान करण्यात आले. यात पहिला पुरस्कार दोन लाख रु, द्वितीय पुरस्कार एक लाख रु. तृतीय पुरस्कार – ७५ हजार रु. असे देण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक २५ हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात आली. त्याखेरीज या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महाविद्यालयाला प्रशंसा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
पुण्याच्या भारती विद्यापीठाने यंदाच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावत दोन लाख रुपयांचा पुरस्कार संपादन केला आहे.  राज्य महामार्ग पोलीसांचे तत्कालीन महासंचालक विजय कांबळे यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नांतून ही मोहीम आकाराला आली. गृहमंत्री आबा पाटील यांचे सहकार्य या उपक्रमातील प्रत्येक टप्प्यात लाभल्याचे कांबळे यांनी नमूद केले. कृती गटाच्या प्रशिक्षणापासून समन्वयापर्यंतची जबाबदारी पोलीस अधीक्षक रश्मी करंदीकर यांनी सांभाळली.
केवळ वेगवेगळ्या अपघातांचे आकडे आपण वाचतो. पण त्यातील प्रत्येक आकडय़ाच्या वेगळ्या कहाण्या असतात. त्या आकडय़ावर अवलंबून असलेली अनेक आयुष्यं असतात. जीवनाचा वेग दुणावू पाहणाऱ्या आजच्या युवावर्गासमोर आकडय़ाच्या मागील या कहाण्या उलगडल्या, तर तो स्तब्ध होतो, विचार करू लागतो आणि वेगाच्या मृगजळापासून परावृत्तही होऊ शकतो, हे राज्य महामार्गाच्या प्रयोगाने सिद्ध केले आहे आणि म्हणूनच हा प्रयोग सरस ठरतो. एका पिढीचे मन्वंतर घडवून आणत रस्ते अपघातापासून युवावर्गाला दूर ठेवणाऱ्या या प्रयोगाचा विस्तार जसजसा होईल, तसतसे रस्ते अपघात कमी होतील आणि अपघातांची संख्याही..!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 1:09 am

Web Title: be safe on road
टॅग : Girls,Ladies
Next Stories
1 व्हिवा वॉल : सिनेमा सिनेमा
2 लिव्ह वेल डाएट
3 ओपन अप : जॉब नसण्यातला आनंद
Just Now!
X