मन मारून डाएट करण्यापेक्षा जिव्हेला चवदार पदार्थाचा नैवेद्य दाखवत तिला शांत करीत, चुचकारत केलेले डाएट अधिक यशस्वी होते, यावर डाएट गुरू आणि फिटनेसतज्ज्ञ सुमन अगरवाल यांचा विश्वास आहे. पदार्थ कमी कॅलरीचे आणि रुचकर कसे होतील, याकडे त्यांचा कटाक्ष असतो. अशा प्रकारच्या विविध पाककृतींच्या प्रयोगाचे नमुने सुमन अगरवाल लिखित ‘अनजंक्ड’ या पुस्तकात वाचायला मिळतात.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रमाणित आहारतज्ज्ञ आणि मुंबईतील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एरोबिक्सच्या मान्यताप्राप्त फिटनेस प्रशिक्षक असलेल्या सुमन अगरवाल यांनी खाण्यावरील प्रेम शाबूत ठेवून डाएट कसे करता येईल याचे अफलातून नमुने या पुस्तकात दिले आहेत. वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी खाणे ही या पुस्तकाची मध्यवर्ती संकल्पना असून कमी कॅलरीयुक्त ८० शाकाहारी पाककृतींचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
होलिस्टिक, आरोग्यदायी, कंटाळा न येण्याजोग्या आणि तरीही आनंदाने चाखता येतील अशा शाकाहारी पदार्थाच्या या पाककृती आहेत. प्रामुख्याने लहान मुलांना आवडतील आणि युवा पिढीच्या पसंतीला उतरतील अशा पाककृतींचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.
कमी वेळेत होणाऱ्या, रंगसंगती साधल्याने देखण्या झालेल्या आणि रुचकर अशा अनेक पदार्थाच्या पाककृती यात दिल्या आहेत. यात उकडीचे दहीवडे अथवा पालक घालून केलेला हिरवागार ढोकळा असे अनोखे मेळ साधत केलेल्या पाककृती आहेत. जराशा बदलाने किती नावीन्यपूर्ण आणि आरोग्यदायी पाककृती जन्माला येते, हे या पुस्तकात नमूद केलेल्या सोप्या आणि झटपट पाककृतींवरून दिसून येते.
या पुस्तकात न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण असे स्वतंत्र विभाग करण्यात आले असून त्यात त्या विशिष्ट वेळेला साजेशा पाककृती देण्यात आल्या आहेत. त्यासोबत आरोग्यदायी जगण्यासाठी पाळायचे काही नियम, पोषणाचे सिद्धान्त, वजन कमी करणारा सात दिवसांचा मेनूही यात दिला आहे. काय खातो, यासोबत कुठल्या वेळेत खातो, चौरस आहार म्हणजे नेमकं काय, अजिबात खाऊ नयेत, असे काही पदार्थ, व्यायाम आणि पूर्ण आहाराचं महत्त्व तसेच कॅलरीचा तक्ताही या पुस्तकात दिला आहे.
खाण्याचा आणि त्यासोबत फिटनेसचा आनंददायी प्रवास कसा करता येईल, याचे मर्म या पुस्तकात उलगडून सांगितले आहे.
अनजंक्ड
– सुमन अगरवाल, सेल्फकेअर प्रकाशन, पृष्ठे – २१४, किंमत – ७९९ रु.