20 January 2021

News Flash

आला डेझर्ट्सचा सण लय भारी..

चीजकेक्सच्या विविध फ्लेवर्सना या दिवसात भरपूर मागणी आहे.

वैष्णवी वैद्य

डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे ख्रिसमस आणि नवीन वर्षांची धूम. गुलाबी थंडीसोबत ख्रिसमस ट्री, न्यू इअर पार्टी या सगळ्याला उधाण आलेले असते. फ्यूजन डेझर्ट्सच्या मागणीचा या दिवसात उच्चांक पाहायला मिळतो. चॉकलेट्स आणि केक्स तर या सीझनचे मुख्य अन्नच असते, असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्याच नेहमीच्या पदार्थाना जरा ट्विस्ट देऊन आजची तरुणाई हा सीझन साजरा करताना दिसते आहे. ख्रिसमसच्या काळात लोकप्रिय असणारा प्लम केक आता डोनट स्वरूपातसुद्धा बनवून मिळतोय. चीजकेक्सच्या विविध फ्लेवर्सना या दिवसात भरपूर मागणी आहे. ‘बकलावा’ हा प्रकार यंदाच तरुणाईमध्ये लोकप्रिय झालेला आहे. पश्चिम आशिया म्हणजे इजिप्त, तुर्कस्तानसारख्या देशात प्रसिद्ध असलेला हा प्रकार सध्या जगभरातील तरुणांच्या मनावर गारूड करून आहे.

ख्रिसमस सीझन स्पेशल चॉकलेट्स बनवणारी मानसी गौरांग सांगते, ‘आम्ही अल्कोहोल फीलिंग म्हणजेच रम आणि व्हिस्की फ्लेवर चॉकलेट्स बनवतो ज्याला सध्या खूप मागणी आहे. विशेषत: कॉर्पोरेट क्षेत्रात एकमेकांना न्यू इअर आणि सिक्रेट सँटा गिफ्ट देण्यासाठी रम-व्हिस्की फ्लेवरचे चॉकलेट्स देण्याचा हा पर्याय तरुणांना खूप आवडतो आहे. त्याचबरोबर नॉन अल्कोहोलिक लोकांचा विचार करून त्यांच्यासाठी हनी फिल्ड चॉकलेट्स, कॉफी चॉकलेट्स आणि विविध फ्लेवर्सचे चॉकलेट्स बनवतो, त्यापैकी पान फ्लेवर चॉकलेट्सना प्रचंड मागणी आहे. स्माइली चॉकलेट्स आणि रॉझ फ्रॉस्टिंग कपकेक्स हे तरुणांसह बच्चे कंपनीलासुद्धा आकर्षित करत आहेत’.

चॉकलेट-के क-डेझर्ट्सची ही संस्कृती पाश्चात्त्य देशांतून आलेली असली तरी आजची तरुणाई जुन्या आणि नव्याचा संगम करण्यासाठी आग्रही आहे. कुठल्या संस्कृतीशी हे पदार्थ जोडले गेलेले आहेत यापेक्षा त्याचा आस्वाद घेत तरुणांना एकत्र मिळून सेलिब्रेशन करायला काहीतरी कारण हवंच असतं. तसेच फास्ट लाइफमुळे होम बेकिंगचा हा साइड बिझिनेस करणं हे स्ट्रेसबस्टरसुद्धा वाटतं. तसेच गिफ्ट म्हणून डेझर्ट्स असतील तर कोणाला नको असतात.. डेझर्ट्सच्या बाबतीत तरुणाईची मन की बात नेहमी, ‘ये दिल मांगे मोअर’ अशीच असते!

काही झटपट होणारे, हटके डेझर्ट्स जे आपल्या ख्रिसमस प्लॅटरमध्ये असायलाच हवेत :

चॉकलेट ब्लिस बॉल्स

साहित्य : तीन टेबलस्पून ड्राय क्रॅनबेरी, अर्धा कप अळशी, एक कप सूर्यफुलाच्या बिया, तीन टीस्पून कोको पावडर, अर्धा कप मध, अर्धा कप सुके खोबरे सजावटीसाठी आणि अर्धा कप मेल्टेड व्हाइट चॉकलेट सजावटीसाठी.

कृती : सर्वप्रथम अळशी आणि सूर्यफुलाच्या बिया मिक्सरमधून काढून त्याची बारीक पावडर करावी. त्यामध्येच कोको पावडर घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यावे. क्रॅ नबेरी आणि मध हलक्या हाताने पावडरमध्ये घालावे आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. मिश्रण एका भांडय़ात काढून एक तास फ्रिजमध्ये सेट करायला ठेवावे. तासाभरानंतर त्या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स करावेत. हे बॉल्स डेसिकेटेड कोकोनट आणि व्हाइट चॉकलेटने छानपैकी सजवून सव्‍‌र्ह करावे.

चॉकलेट बॉल्स फ्रिजमध्ये अनेक दिवस टिकतात. या प्रमाणात साहित्य घेतल्यावर साधारण १०-१२ चॉकलेट बॉल्स तयार होतात.

हेल्दी शुगर फ्री ट्रफल्स

साहित्य : सूर्यफुलाच्या बिया १/३ कप,  लाल भोपळ्याच्या बिया १/३ कप, अळशीच्या बिया १/४ कप, ओट्स १/२ कप, ड्राय क्रॅनबेरीज १/२ कप, सिडलेस खजूर १२—१३,  दालचिनी पूड.

कृती : एका कढईत ओट्स आणि सगळ्या बिया ४ ते ५ मिनिटे मध्यम आचेवर भाजून घ्याव्यात. ओट्सचा रंग गोल्डन ब्राऊन व्हायला हवा. त्यानंतर मिक्सरच्या भांडय़ात हे भाजलेले जिन्नस, दालचिनी पूड, कॅ्रनबेरी, खजूर एकत्र फिरवून घ्यावे. खजुरामुळे मिश्रणात वेगळ्या ओलाव्याची गरज नसते. मिश्रण छान एकत्र मिळून आले की हाताने छोटे छोटे ट्रफल्स करून घ्यावेत.

या प्रमाणात १५ ते १६ ट्रफल्स तयार होतात. थंडीच्या दिवसात आणि हेल्थचा विचार करता ही उत्तम रेसिपी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2020 3:06 am

Web Title: best cake for christmas festival chocolate desserts for christmas zws 70
Next Stories
1 सदा सर्वदा स्टार्टअप : व्यवसाय शोधाची प्रेरणा!
2 क्षितिजावरचे वारे : वाळूतली रेघ
3 वस्त्रांकित : ‘जोट’दार वळणवाट
Just Now!
X