28 May 2020

News Flash

आहे चविष्ट तरी..

वजन कमी करायला काय टाळायला हवं, वजन वाढवायचं असेल तर काय करायचं? शाकाहारी- मांसाहारी आहारातले फायदे- तोटे काय? डाएट बोअरिंग न वाटता डेलिशिअस कसं करायचं?

| April 3, 2015 01:11 am

vn26वजन कमी करायला काय टाळायला हवं, वजन वाढवायचं असेल तर काय करायचं? शाकाहारी- मांसाहारी आहारातले फायदे- तोटे काय? डाएट बोअरिंग न वाटता डेलिशिअस कसं करायचं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारे पाक्षिक सदर.
सगळे न्यूट्रिशनिस्ट किंवा तज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी काय खावं, ते सांगतात. कसं खायचं ते मात्र आपल्यापर्यंत पोचत नाही आणि मग वेट लॉसचं उद्दीष्ट लांब वाटायला लागतं. तज्ज्ञांनी सांगितलेली घटकद्रव्य पोटात जाण्याआधी जीभेला तर मानवली पाहिजेत. म्हणजे, तेच ते सॅलड आणि ज्यूस पिऊन कंटाळा यायला लागतो आणि मग वेट लॉसचं उद्दीष्ट अशक्यप्राय वाटून आपण सोडून देतो. शाकाहार करावा की मांसाहार याबाबत मागच्या आठवडय़ात आपण चर्चा केली, तेव्हादेखील रोज किती काबरेहायड्रेट्स किंवा प्रोटीन्स गेली पाहिजेत ते आपण पाहिलं. शाकाहारींनी प्रत्येक जेवणात थोडं थोडं दूध -दही- ताक घेणं आवश्यक आहे आणि मांसाहारी व्यक्तींनी प्रत्येक जेवणात थोडं ग्रीन सॅलड, फळे, भाज्या घेतल्या पाहिजेत हे आपण पाहिलं. पण हे रोजरोज कसं घेणार? हे पदार्थ वापरून एखादी रंगतदार डिश बनवली तर? हे डाएटच्या दृष्टीने योग्य पदार्थ चवदार कसे करायचे त्याविषयी आपण आज बोलू या. सर्व वयोगटाला आपलासा वाटणारा हा विषय.. चटकदार खाना. पण चटकदार म्हटलं की आरोग्याला अपायकारक रेसिपीज समोर येतात. भरपूर तेला-तुपात तळलेल्या किंवा मसालेदार अशा. कोण म्हणतं की आरोग्यदायी खाद्यपदार्थ चविष्ट नसतात? हेच सिद्ध करण्यासाठी सादर आहेत, टेस्टला ट्विस्ट देणाऱ्या काही रेसिपीज्.. अर्थात आरोग्यपूर्ण.

व्यायामाआधीचे स्नॅक : मुसली क्रंच
vv16साधी मुसली तीन चमचे घ्या. सफरचंद, पेअर, स्ट्रॉबेरी सारखी फळे त्यात घाला. आवडत असल्यास फ्रूट पावडरही त्यावर घाला. बदाम, अक्रोड यांचा किस त्या मिश्रणात घाला. दोन चमचे मलईरहित दही त्यात मिसळा. संपूर्ण मिश्रण एकजीव करा, व्यायामाआधीचा तुमचे स्नॅक तयार आहे.
पौष्टिक आणि दणदणीत नाश्ता  : मल्टिग्रेन पराठा
ज्वारी, बाजरी आणि नाचणी प्रत्येकी एक-एक मोठा चमचा एकत्र करा आणि हे मिश्रण आपल्या नेहमीच्या गव्हाच्या कणकेत घाला आणि कणीक मळून घ्या. एका वाटीत शिजवलेली मूग किंवा तूर डाळ घ्या (आदल्या रात्री भिजत घातलेली डाळही चालेल.) डाळ पिठात घालून पराठा तयार करा. हे मल्टिग्रेन पराठे नाश्त्याला उत्तम डिश आहे.
संध्याकाळचे चवदार स्नॅक : ओट्स उपमा
वाटीभर ओट्स घ्या. कढईत किंवा तव्यावर हलकेच भाजून ते वाटून घ्या. ओटची पावडर पाण्यात घालून त्यात एक वाटी मलईरहित दही मिसळा. त्यात मीठ आणि काळी मिरी घालून मिश्रण एकजीव करा. थोडय़ा तेलावर कांदा, टोमॅटो आणि मिरची हलकेच परतून घ्या. त्यात ओट आणि द’ााचं मिश्रण घाला. एक वाफ आणली की, उपमा तयार आहे.

रात्रीचे हलके जेवण : मूग डाळ छिल्का, पनीर फ्रँकी
हिरवी सालाची मूग डाळ (मूग डाळ छिल्का) रात्री भिजत घालून वाटून घ्या. मीठ आणि काळी मिरी घालून वाटण एकजीव करा आणि डोशाला भिजवतो तसं सरसरीत पीठ करा. या पिठाचे नॉनस्टिक पॅनवर डोसे घाला. लो फॅट किंवा मलईरहित दूधापासून पनीर तयार करून ठेवा. थोडय़ा तेलावर कांदा, टोमॅटो आणि मिरच्या परतून त्यामध्ये पनीर घाला. अशा प्रकारे लो फॅट पनीर भुर्जी तयार झाली की, मगाशी तयार केलेल्या डोशामध्ये ही भुर्जी घालून त्याची फ्रँकी तयार करा.
भाज्या न खाणाऱ्या मुलांसाठी उत्तम पर्याय : व्हेजिटेबल किंवा चिकन टिक्की
लहान मुलंच नाही, तर अगदी कॉलेज गोईंग स्टुडंट्स आणि मोठी माणसंसुद्धा भाज्या खायला टाळाटाळ करतात. सॅळड किंवा भाजी म्हणून समोर आलेल्या भाज्या न खाणाऱ्यांसाठी ही युक्ती.
फ्लॉवर, गाजर, फरसबी (बीन्स), वाटाणे आणि चिकनचे काप (ऑप्शनल) चिरून शिजवून घ्या. घरगुती साधे मसाले मिसळून ल्सर्व जिन्नस एकत्र करा आणि त्याचा गोळा बनवा. टोमॅटो आणि काकडी घालून एकजीव करा आणि त्याची टिक्की तयार करा. ओटची दोन चमचे ओट पावडर घेऊन त्याची पाण्यात पेस्ट तयार करा. टिक्कीला ओट पेस्ट लावून ती नॉनस्टिक पॅनवर ठेवा. पूर्ण भाजेपर्यंत ती पॅनवर ठेवा आणि घरीच बनवलेल्या पुदीना चटणीसोबत गरमा गरम खा.
viva.loksatta@gmail.com
(लेखिका फिटनेस न्यूट्रिशिनिस्ट  आणि  वेट मॅनेजमेंट एक्स्पर्ट आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2015 1:11 am

Web Title: best diets for reducing weight
टॅग Weight Loss
Next Stories
1 युथफुल स्टायलिंग
2 दिल की धडकन
3 इनक्रेडिबल इंडिया
Just Now!
X