24 September 2020

News Flash

फिटनेस प्ले लिस्ट

कुठला व्यायाम करताना कुठलं संगीत हवं याचं काही गणित असतं का?

व्यायाम करताना संगीत हवंच. व्यायामाचा शीण, थकवा, ताण संगीताच्या साथीत कुठंच जाणवत नाही. आवडीचं संगीत मनालाही आपोआप आराम देतं. पण कुठला व्यायाम करताना कुठलं संगीत हवं याचं काही गणित असतं का? सांगतोय प्रसिद्ध संगीतकार आणि गायक जसराज..

माझ्या एकूण देहायष्टीकडे पाहता, या आजच्या फिटनेस विशेष पुरावणीच्या अंगने में मेरा क्या काम है? असा प्रश्न वाचकांना पडला असेल! मी काही फिटनेस फ्रीक नाही हे कोणीही ओळखेल. अबरचबर खाणं हा तर आपला आवडीचा विषय! खाण्याचं वेळापत्रकाही रोज नव्याने कोलमडणारं. ते ताळ्यावर आणण्याचा अयशस्वी प्रयत्न मात्र अधूनमधून चालू असतो. हो.. व्यायाम मात्र जमेल तसं, आठवडय़ातून किमान चार-पाच दिवस. व्यायाम करायला जी वेळ मिळेल, त्यानुसार व्यायामाचा प्रकार बदलत असतो. म्हणजे सकाळी लवकर उठलोच अगदी तर टेकडीवर जातो, किंवा संध्याकाळी नुसतं चालायला जातो; उत्साह असेल तर जिमला जातो किंवा घरीच तासभर व्यायाम करतो. दिवसभरात वेळ मिळाला नाही तर रात्री आमच्या बििल्डगचे जिनेच चढतो दहा-बारा वेळा.
व्यायामाला सुरुवात करायच्या आधीपर्यंतचा काळ निरुत्साहाने भरलेला असतो. ‘जाऊ दे.. नको आज’ वगरे विचार मनात येतात. व्यायाम सुरू केल्यावर मात्र मजा येते. आणि ही मजा द्विगुणित करायला संगीत असतेच साथीला! संगीतामुळेच मग आधी अर्धा तास करायचा ठरवलेला व्यायाम चांगला तास-दीड तास होऊन जातो आणि त्याचा शीणही जाणवत नाही. किंबहुना दिवसभराच्या गडबडीत व्यायामाच्या काळातच फक्त काही ना काही ऐकले जाते. व्यायामप्रकारानुसार प्लेलिस्ट ठरते. सकाळी टेकडीवर जाताना प्रत्येक वेळी काही तरी नवीन ऐकायचा प्रयत्न करतो. सध्या मी तामीळ खूप ऐकतोय. तामीळ चित्रपट संगीत हे सर्वार्थाने िहदी चित्रपट संगीताच्या समांतर चालणारं असं आहे. त्यातले संगीतप्रकार हे बॉलीवूडच्या ट्रेंडप्रमाणे अजिबात जात नाहीत. त्यांचं त्यांचं वेगळंच चाललेलं असतं. त्यांच्याकडची आधुनिकता आपल्यापेक्षा वेगळी आहे. कितीही डिजिटल म्युझिक असलं तरी त्यात दाक्षिणात्य फोक इन्स्ट्रमेंट्सचा वापर भरपूर केला जातो. चालींमध्येही एकतर लोकगीत किंवा अभिजात संगीताशी नातं कायम ठेवलं जातं आणि तरीही ही गाणी आपल्यापेक्षा जास्त आधुनिक, जास्त प्रायोगिक वाटतात. Neeyum naanum, yenga pona rasaa, nanu rawda dhan, Unakkenna venum sollu, na romba busy, mona gasolina ही काही उदाहरणं.
संध्याकाळी चालताना किंवा जिने चढताना जरा जलद गतीची, आजकाल ज्यांचा ट्रेंड आहे अशी EDM  आणि पॉप प्रकारातली गाणी कानाला लावतो. त्या गतीमध्ये, लयीमध्ये चालायचा प्रयत्न करतो. म्हणजे एकूणच लय पक्की व्हायला मदतही होते आणि चालण्याचा स्पीडसुद्धा वाढतो. Uptown funk, bang bang, titanium ही गाणी चपखल. डेविड गट्टाची सगळीच गाणी अशा प्रसंगी उत्तम. पण हीच गाणी जिममध्ये वाजतात तेव्हा मला ती अज्जिबातच आवडत नाहीत. जिम किंवा इतर व्यायाम करताना मला संथ, शांत संगीत आवडतं.
जिम किंवा तत्सम व्यायाम करताना कुठलं संगीत ऐकावं याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. एकाच्या मते तुम्ही जेवढं धांगडिधगा टाइप गाणं ऐकाल, तेवढं तुमचं अ‍ॅड्रिनलिन की काय ते खवळते आणि तुम्हाला अजून अजून शक्ती लावायला स्फूर्ती मिळते, चेव चढतो. दुसरा विचारप्रवाह असा की, शांत, संथ संगीत ऐकावं. जेणेकरून तुम्ही व्यायाम कसा करताय, नक्की कुठल्या स्नायूंवर जोर देताय याकडे लक्ष राहतं. कारण काही असो, परिणाम काहीही होवो, मी मात्र दुसरा पर्याय वापरतो. खूप वेळ चालणाऱ्या संगीताबरोबर व्यायामाचा वेळ मस्त निघून जातो. किशोरीताईंचा भूप, तोडी, जगदीश प्रसाद यांचे ‘मोरे नना भर भर आये’ किंवा ‘अकेली डर लागे’, अजय चक्रवर्तीची ‘याद पिया की आये’, अथवा मेकाल हसन बँड, असं काही तरी मी व्यायाम करताना ऐकणं पसंत करतो.
व्यायाम झाल्यावर मग तंबोरा लावून ओंकार लावणं किंवा नुसतंच काही वेळ बसून राहणं असा कार्यक्रम असतो. यामुळे शरीराला आणि मनाला जी शांतता मिळते, तिला तोड नाही. जलद झालेले हृदयाचे ठोके हळूहळू संथ होताना बघण्यात वेगळीच मजा असते. तुम्हीपण करून बघा हा प्रयोग. माझ्या मते, कुठलंही काम असो, व्यायाम, अभ्यास, स्वयंपाक, काहीही. योग्य संगीतामुळे त्या कामाची मजा नक्कीच वृद्धिंगत होते, नाही का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 1:50 am

Web Title: best workout song
Next Stories
1 सेलेब्रिटींचा नवा फिटनेस मंत्र..
2 नृत्यातून फिटनेस
3 फिटनेस ट्रेण्ड्स
Just Now!
X