05 July 2020

News Flash

‘बँड-बाजा-वराती’च्या पलीकडे

धूमधडाक्यात लग्न म्हणजे बँड-बाजा-वरात-घोडा हे एवढंच हल्ली पुरेसं नसतं.

धूमधडाक्यात लग्न म्हणजे बँड-बाजा-वरात-घोडा हे एवढंच हल्ली पुरेसं नसतं. हा सोहळा आणखी मोठा झालाय, म्हणजे आकारानं नाही तर याची संकल्पना विस्तारली आहे. अनेक तरुणांना हल्ली थीम वेडिंग हवं असतं आणि काहींना डेस्टिनेशन वेडिंगही प्लॅन करायचं असतं.

लग्न हे आयुष्यात एकदाच होतं. (निदान भारतीयांचा तरी अजूनही हा समज आहे) त्यामुळे ते दणक्यात आणि थाटातच झालं पाहिजे, असं अनेकांना वाटत असतं. धूमधडाक्यात लग्न म्हणजे बँड-बाजा-बारात एवढंच हल्ली पुरेसं नसतं. हा सोहळा आणखी मोठा झालाय, म्हणजे आकारानं नाही तर संकल्पना विस्तारली आहे. अनेक तरुणांना हल्ली थीम वेडिंग हवं असतं आणि अनेकांना डेस्टिनेशन वेडिंगही प्लॅन करायचं असतं.
एखाद्या थीमवर आधारित सजावट, त्याच थीमला साजेसे कपडे, दागिने, रंगभूषा आणि अर्थातच मेन्यू आणि सेलिब्रेशन.. हे झालं थीम वेडिंग. आपल्या शहरापासून लांब कुठेतरी जाऊन एखादं आलिशान हॉटेल, रेसॉर्ट घेऊन तिथे लग्न केली जातात. मोजक्या नातेवाईक आणि मित्र-मंडळींना बरोबर घेऊन हे पर्यटन आणि सोहळा एंजॉय केला जातो. संपूर्ण सात दिवस हा सोहळा चालतो. संगीत मेहेंदीपासून सुरू होणारा सोहळा लग्नानंतरच्या रिसेप्शनपर्यंत चालू असतो.. हे झालं डेस्टिनेशन वेडिंग. भारतात सध्या राजस्थान, गोवा, आग्रा, अंदमान ही डेस्टिनेशन वेडिंगसाठी लोकप्रिय ठिकाणं आहेत. महाराष्ट्रातही लोणावळा, नाशिक, पुणे या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग केली जात आहेत.
डेस्टिनेशन वेडिंग करायचं ठरलं की, येतात ते वेडिंग प्लॅनर्स. ते तुमच्या लग्नाचा मिनिट टू मिनिट प्लॅन आखून देतात आणि तशी तयारीही करतात. ‘शादी मॅजिक’ या ऑनलीन वेडिंग प्लॅनर कंपनीचे मनीष ग्रोवर सांगतात, ‘बरीच कपल्स आम्हाला डेस्टिनेशन वेडिंगसाठी विचारणा करताहेत. त्यांचं बजेट किती आहे, त्यांना कशा प्रकारचं लग्न करायचंय या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही त्यांना अनेक पर्याय सुचवतो. सध्या डेस्टिनेशन वेडिंगबरोबरच थीम वेडिंगला खूप मागणी आहे. म्युझिक, विंटर, इंडियन, अलिबाबा चाळीस चोर, कलर्ड बेस थीम्स अशा अनेक हटके थीम्सवर आम्ही नुकतंच काम केलं आहे. लग्नाची जागा ते लग्नात लागणाऱ्या बारीक बारीक गोष्टींमध्ये आम्ही मदत करतो.’
डेस्टिनेशन वेडिंग केलेल्या काही कपल्सशी आणि काही नातेवाइकांशी आम्ही बोललो. कुणाल अदक आणि अश्विनी यांचं लग्न नाशिक येथे झालं. त्यांच्या आप्त डॉ. शर्मिला जाधव म्हणाल्या, ‘‘आमच्या मुलांसाठी आम्हाला खूप छान ग्रँड वेडिंग हवं होतं. त्यासाठी आम्ही नाशिकला डेस्टिनेशन वेडिंग करायचं ठरवलं.

आमचा पूर्ण सहा दिवसांचा सोहळा होता. आम्ही सगळ्यांनी हे खूपच एन्जॉय केलं. प्रियांका आणि विपुल जैन यांनीसुद्धा लोणावळा येथे डेस्टिनेशन वेडिंग केलं.’’ प्रियांका म्हणाली, ‘‘मी मुंबईची आहे. आणि विपुल सुरतमध्ये राहतो. त्यामुळे आम्ही सुरत किंवा मुंबईत लग्न करण्यापेक्षा लोणावळ्यात लग्न करायचं ठरवलं. सगळे इव्हेंट्स एन्जॉय केले. आम्हाला आमच्या लग्नात काहीतरी वेगळं करायचं होतं आणि ते मेमोरेबल बनवायचं होतं. एक संस्मरणीय ट्रीप आणि लग्न दोन्ही एंजॉय केलं.’’
डेस्टिनेशन वेडिंग म्हटलं की सगळ्या इव्हेंट्स बरोबरीनीच फोटोग्राफीसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. फोटोग्राफर अर्चना जोशी म्हणाल्या, ‘वेडिंग फोटोग्राफी ही एक प्रकारची कला आहे. आम्ही याला आटरेग्राफी म्हणतो. आम्हाला त्या सगळ्या इव्हेंटला स्पेशल बनवायचं असतं. त्यामुळे त्या दिवशी मुलगा आणि मुलगी दोघांनाही फ्रेश दिसणं गरजेचं असतं. त्यांच्या डाएटपासून ते अगदी पूजेच्या आणि सजावटीच्या सामानापर्यंत प्रत्येक गोष्टीत आम्ही लक्ष देतो. कारण कॅमेरामध्ये अगदी लहानातली लहान गोष्ट म्हणजे पूजेसाठी लागणारे तांदूळ, आंब्याची पानं, फुलाच्या बारीक बारीक पाकळ्या सगळ्या गोष्टी कव्हर होत असतात. त्यामुळे त्याकडे आम्हाला लक्ष द्यावं लागतं.’
viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 1:05 am

Web Title: beyond the band baja
Next Stories
1 क्लिक
2 उदितजी द बॉस
3 डिवेलपमेंट
Just Now!
X