‘..आणि महाराष्ट्राची सुगृहिणी हा किताब मिळतोय, मम्मींना.. नाही.. उषाला नाही.. रखुमाईलाऽऽऽ.. होऽऽऽ..’ असं म्हणून पामेला तो किताब रमावहिनींना देते. इतरांचे चेहरे पडतात नि एकांकिका टाळ्यांच्या गजरात संपते. मराठी संस्कृतीचं प्रतीकात्मक दर्शन घडवणाऱ्या ‘शेवटी बाजी कुणी मारली?’ या एकांकिकेत तिनं ‘उषा’चं काम केलं होतं. ही तिची पहिलीच एकांकिका. ती बी.एम.एम.च्या शेवटच्या वर्षांला आहे. तिला ड्रॉइंगचीही आवड आहे. ती ‘मिरॅकल्स अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड मीडिया प्रा. लि.’मध्ये काम करतेय. ही आहे, भरवी महाडिक!
भरवीनं बारावीपर्यंत कॉमर्स घेतलं होतं. नंतर ती बी.एम.एम.कडं वळली. तिनं अ‍ॅडव्हर्टायिझग हा विशेष विषय घेतला असून सध्या तिची परीक्षा सुरू आहे. बी.एम.एम.कडं वळायचं कारण म्हणजे तिला टिपिकल जॉब करायचा नव्हता. घरी राहून करता येण्याजोगं काहीतरी क्रिएटिव्ह असं तिला करायचं-शिकायचं होतं. एरवीच्या शिरस्त्यानुसार बी.कॉम. घेतलं असतं तर बँकेतला जॉब, अकाउंटिंग इत्यादी चौकटीतल्या गोष्टीच करणं भाग पडलं असतं. पण बी.एम.एम.मध्ये थिअरी नि प्रॅक्टिकलचाही समावेश असतो. दोन सेमिस्टरमध्ये सहा-सहा असे वेगळे विषय असल्यानं अभ्यासही अधिक करावा लागतो. यात मॅनेजमेंट, ड्रॉइंग, ऑब्झव्‍‌र्हेशन, मार्केटिंग, फिल्म रिव्ह्य़ूज, एजन्सी मॅनेजमेंट इत्यादी वैविध्यपूर्ण विषय शिकवले जातात. जाहिरात कशी असावी इथपासून ते मीडिया आणि अ‍ॅड एजन्सीशी निगडित असणाऱ्या अनेक गोष्टी शिकवतात. अनेक प्रॅक्टिकल्स, प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट्स करावी लागतात. एखाद्या विषयाचं स्पेशलायझेशन करताना फक्त क्रिएटिव्हिटीच नव्हे तर थिअरीचाही त्याला बेस असतो. विविध अनुषंगानं त्याविषयीचा अभ्यास पूर्ण करून घेतला जातो. भरवीला टी.वाय.च्या पहिल्या सेमिस्टरला अ‍ॅड डिझायिनगचं फुल प्रॅक्टिकल होतं. त्यांना टीव्ही अ‍ॅडसाठी स्टोरीबोर्डही तयार करायचा होता.
‘मिरॅकल्स’ अकादमीमध्ये तिने प्रवेश मिळवला तो तन्वीमुळे. शाळेपासूनच्या या मत्रिणी पुन्हा एकदा एकत्र आल्या  बी.एम.एम.नि ‘मिरॅकल्स’च्या निमित्तानं. ‘मिरॅकल्स’मध्ये डाटा एंट्री करणाऱ्या मुली हव्या होत्या. त्यांनी भरवीला विचारलं. सुट्टी होतीच. घरी बसून टाइमपास करण्यापेक्षा अनुभव घेऊन बघायला काय हरकत आहे, असा विचार करून ती जॉइन झाली. ती सांगते की, ‘‘या कामात रोज वेगवेगळ्या लोकांशी बोलायला लागायचं. समोरच्या माणसाचा स्वभाव ओळखून त्याप्रमाणं वागायला लागायचं.’’ पुढं प्रमोदसरांनी तिला कंटिन्यू करण्याविषयी विचारलं. तिनं ‘हो’ म्हटलं. ‘वेळेचा सदुपयोग होत होता. लोकांशी संवाद साधता येत होता. चांगला अनुभव मिळत होता. सरांनी आमची मीटिंग घेऊन आम्हाला लोकांशी कसं बोलावं, याविषयी मार्गदर्शन केलं होतं. लोकांनी कितीही प्रश्न विचारले तरी आपण संयमानं उत्तर द्यायचं. काही वेळा लोकांचे प्रश्न खूप असले तरी ते जेन्युइन असायचे. मग त्यांच्या शंकांचं निरसन करावं लागायचं. पण ठीक आहे, त्यातही खूप मजा यायची. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना आपल्याला हॅण्डल करता येतंय, याचा एक वेगळाच आनंद असायचा,’ असं ती म्हणते.  
भरवी नि तन्वी कॉलेज सांभाळून ‘मिरॅकल्स’मध्ये काम करायच्या. पुढच्या सुट्टीतही भरवीनं तिथं कंटिन्यू केलं. त्या वेळी नवीन अ‍ॅडमिशन होणार नसल्यानं तिला फोटोग्राफीसाठी असिस्टंट करण्यात आलं. तिनं ‘मिरॅकल्स’मध्ये आतापर्यंत केलेल्या कामापेक्षा हा वेगळा नि कठीण अनुभव होता. भरवी सांगते की, संस्थेतर्फे विद्यार्थ्यांचे फोटो काढायचे असायचे. त्यांच्या नि फोटोग्राफरच्या तारखा अ‍ॅडजस्ट करून त्यांचं पुण्याचं सगळं शेडय़ुल आखायला लागायचं. कारण फोटोशूट पुण्याला होतं. मग त्यांचे फोटो आल्यावर वेळेत फाइल त्यांच्या हाती पोहोचवायला लागायची. सगळी तारेवरची कसरत असायची. एक वेगळाच अनुभव होता तो. एकदा माझ्याकडून एक चूकही झाली. पुण्याच्या मॅडमना पाठवायच्या असणाऱ्या फाइल्समध्ये नाव आणि बर्थडेटचे डिटेल्स असणं अपेक्षित असतं. पण मला ते माहीतच नसल्यानं मी ते चेकच केलं नव्हतं. ती फाइल फेल गेली. पहिल्यावहिल्या जॉबमध्ये एवढी चूक घडली.. त्या वेळी मी खूप टेन्शनमध्ये होते. पण  पूनम कुडाळकर मॅडम आणि इथल्या ऑफिसमधल्या सगळ्यांनी मला खूप समजावलं. आपलेपणानं समजून घेतलं. फोटोग्राफीच्या या कामात काम खूप होतं, मजा खूप आली नि चूकही झाली माझ्याकडून..
या ठिकाणी भरवीला वेगवेगळी कामं करायला मिळाली नि मिळताहेत. टी.वाय.चं वर्ष आणि इथलं काम सांभाळणं तुलनेनं खूप कठीण गेलं नाही. एरवी कॉल्सचं काम सुट्टीत असतं. पण ही अ‍ॅिक्टग अ‍ॅकॅडमी असल्यानं त्यात ‘एकांकिका महोत्सव’, ‘शॉर्टफिल्म महोत्सव’ आदींचं आयोजन केलं जातं. त्यांच्या तारखांची अरेंजमेंट, बॅकस्टेज अरेंजमेंट अशी तयारी करायला त्या दोघी जातात. सुट्टी नसेल तर सवडीनुसार डेटा एंट्रीचे फॉर्म भरणं वगरे ऑफिसवर्कही करतात. काही दिवस ऑफिसला गेल्या नाहीत, तर मात्र त्यांना फार चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. त्यांची पावलं तिकडं वळतातच..
यंदाच्या ऑगस्टमध्ये ‘एकांकिका महोत्सव’ होता. सरांच्या प्रोत्साहनामुळं विद्यार्थ्यांसोबत ऑफिस स्टाफचीही एकांकिका असतेच. भरवी सांगते की, या वेळी मला विचारल्यावर सगळ्यांच्या प्रेमळ आग्रहाखातर मी काम करायला तयार झाले. कारण लहानपणानंतर मी स्टेज परफॉर्मन्स केला नव्हता. मी ‘शेवटी बाजी कुणी मारली?’ या एकांकिकेत काम केलं होतं. अशी संधी कधी मिळेल, असं वाटलं नव्हतं. सगळ्यांच्या वेळेची गणितं जमवून तालीम केली. तालमीगणिक आत्मविश्वास वाढत गेला. सगळ्यांचं काम चांगलं झालं. सगळ्यांच्या नातलगांसारखेच माझेही आई-बाबा आले होते. बऱ्याच वर्षांनी माझा स्टेज परफॉर्मन्स पाहून त्यांना खूप बरं वाटलं. मी इण्ट्रोव्हर्ट असूनही या वातावरणात मिसळून गेल्याचं बघून तेही खूप खूश झाले होते. ‘मिरॅकल्स’मध्ये काम करण्याविषयी ठरवताना बाबांनी सांगितलं होतं की, ‘तुला काही कमवायचंय, या दृष्टीनं तू या कामाकडं पाहू नको. तुला चार नवीन गोष्टी शिकल्यानं अनुभव मिळू शकेल.’ घरून कोणतंही बर्डन नसल्यानं हे सारं करणं शक्य झालं.
अधिकांशी सुट्टीत काम करत असल्यानं तिची अभ्यास नि ऑफिस अशी फार तारांबळ नसायची. वेळेच्या थोडय़ाशा सवलतीमुळं अभ्यासालाही वेळ देता यायचा. मास मीडियासारख्या विषयात थिअरिकल भाग कमी असल्यानं ते मॅनेज व्हायचं. कॉलेज असतानाही ती इव्हेंट्सच्या तयारीला काही दिवस जायची. त्यासाठी दिवसातले २-३ तास जायची. बाकी खुद्द इव्हेंटच्या दिवशी अख्खा दिवस धावपळ असायची. पण तेव्हा परीक्षेचं टेन्शन नसल्यानं ते मॅनेज व्हायचं नि परीक्षेच्या वेळी अभ्यासाला पुरेसा वेळ दिला जायचा. यंदाच्या नवीन अ‍ॅडमिशनसाठी ती महिनाभर कॉलेज सुटल्यावर ऑफिसला जात होती. परीक्षेला अवकाश असल्यानं हे कॉल तिला अटेंड करता आले. ऑफिसमध्येही काम कमी असल्यास ती आणि तन्वी तिथंच एकत्र अभ्यास करत.
भरवीला सगळ्या प्रकारची गाणी ऐकायला खूप आवडतात. एखादं पुस्तक कुणी सुचवलं तर ते ती वाचते एवढंच. पण स्वत:हून आवडीनं वाचावं एवढी तिला वाचनाची आवड नाहीए. तिचे बाबा आर्टस्टि असल्यामुळं पहिल्यापासून तिला ड्रॉइंगची खूप आवड आहे. ती सांगते की, ‘अजून मी तेवढं ड्रॉइंग काढलेलं नाहीए. बाबांचं बघून बघून थोडेफार काढायचे. परीक्षा असली की, तेवढय़ापुरता ड्रॉइंगला वेळ द्यायचे. पण माझ्याकडून ड्रॉइंगला पुरेसा वेळ दिला गेला नाही, याची खंत वाटतेय. आता बी.एम.एम.ची परीक्षा संपल्यावर मी ते करणारच आहे. ड्रॉइंगमध्ये मला इम्प्रूव्हमेंट करायचेय..’
भरवीला जपानी भाषा शिकायची खूप आवड असून ती शिकायला तिनं सुरुवातही केली होती. पण ‘मिरॅकल्स’ आणि टी.वाय.मुळं जपानी शिकण्याला फारसा वेळ देता आला नाही. ती परीक्षेनंतर कंटिन्यू करणारेय. तिला जपानी भाषेबद्दल खूप उत्सुकता वाटत्येय. त्यातील चित्रलिपी तिला आत्मसात करायचेय. भरवी सांगते की, ‘पुढं काय करायचं ते अद्याप ठरलेलं नाहीए. जपानीत करिअर केल्यास ट्रान्सलेटर वगरे होता येईल. शिवाय बीएमएमनंतर मिळणारी संधी किंवा ड्रॉइंगमधलं करिअर हेही पर्याय आहेत. बघूया कसं होतंय ते..’ भरवीच्या करिअरसाठी तिला ऑल द बेस्ट!

लर्न अ‍ॅण्ड अर्न या नव्या कॉलममधून तुम्हाला तुमच्या अशा काही मित्रांना आणि मैत्रिणींना भेटायला मिळणारेय जे शिकताना स्वतची आवड जपत आहेत. अर्थात ही आवड म्हणजे केवळ छंद जोपासण्याइतपत मर्यादीत नाही तर ही आवड आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्याची आहे. तरूणांमध्ये अलीकडे लर्निग प्लस अर्निग हे चित्र दिसून येत आहे. पूर्वी केवळ समर जॉब करणारे चेहरे आता कॉलेजच्या लेक्चर्ससह इतर जॉबसाठीही वेळ देत आहेत. अशाच तरूणांची आणि त्यांच्या कामाची महती आपण जाणून घेऊया. यासंदर्भात आपणास मेल करावयाचे असल्यास viva.loksatta@gmail.com या संकेतस्थळावर माहिती पाठवावी.