05 August 2020

News Flash

माध्यमी : संकलनाचं तंत्र

संकलन म्हणजे नेमकं काय हे सामान्य लोकांना माहिती नसण्याच्या काळात त्यांनी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.

भक्ती मायाळू

वेदवती चिपळूणकर – viva@expressindia.com

तांत्रिक क्षेत्रातलं मुलींना काही कळत नाही हे समज जुने झाले हे आताच्या काळात सिद्ध झालेलं आहे. मात्र ज्या काळात मुली केवळ धोपटमार्गाची क्षेत्रं निवडत असत त्या काळात या तांत्रिक क्षेत्रात येऊन, अनुभवातून शिक्षण घेत दूरदर्शनपासून ते दैनंदिन मालिकांपर्यंतचा प्रवास अनुभवलेल्या ‘संकलक’ अर्थात ‘एडिटर’ भक्ती मायाळू. संकलन म्हणजे नेमकं काय हे सामान्य लोकांना माहिती नसण्याच्या काळात त्यांनी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याचं कोणतंही माध्यम नसल्यामुळे त्यांनी थेट अनुभव घ्यायला सुरुवात केली. सगळी माध्यमं बघत, वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करत भक्ती मायाळू हे नाव आज मालिकांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेलं आहे.

‘माझे वडील राजदत्त. त्यांना मी जेव्हा विचारलं की मला दिग्दर्शन करायचं आहे, काय करू? तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, प्रत्येक दिग्दर्शक हा उत्तम एडिटर असावा लागतो. त्यामुळे तू आधी एडिटिंग शीक,’ भक्ती मायाळू सांगतात, ‘मी कॉमर्समधून पदवी घेतली. त्यानंतर पुन्हा परीक्षा द्यावी लागेल असं काहीच मला करायचं नव्हतं. शिक्षण घेताना एवढं लक्षात आलं होतं की, मला ९ ते ५ अशी नोकरी जमणार नाही. मला कोणत्याच नोकरीत सेटल वगैरे व्हायचं नव्हतं. एकदा एखाद्या ठिकाणी सेटल झालं की हळूहळू मला कंटाळा येणार हे मला माहिती होतं. त्यामुळे बाबांच्या सांगण्यानुसार मी एडिटिंग शिकायचं ठरवलं. बाबांच्या सुरू असलेल्या प्रोजेक्टवर मी एडिटर्ससोबत काम करायला सुरुवात केली. टूल्स कशी वापरायची इथपासून ते काय घ्यायचं आणि काय काढून टाकायचं इथपर्यंत सगळंच शिकावं लागतं. पहिल्यांदा मला स्वतंत्र काम मिळालं ते एका भोजपुरी चित्रपटाचं. तिथे भाषा, गोष्ट, लेखक आणि दिग्दर्शकाच्या अपेक्षा असं सगळंच समजून घेण्यापासून सुरुवात करावी लागली’, असं त्या सांगतात.

भक्ती मायाळू यांच्याबाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, त्यांचे वडील राजदत्त दिग्दर्शक असूनही त्यांनी स्वत:हून कधीच कोणतं काम ऑफर केलं नाही किंवा प्रशंसाही केली नाही. शिक्षण देण्यासाठी मदत करणं, काही चुकलं तर समजावणं आणि मॉरल सपोर्ट देणं हे मात्र त्यांच्या वडिलांनी भरभरून केलं. त्या काळात या क्षेत्रात कोणीही मुली नसल्यामुळे आईचा काहीसा विरोध पत्करून भक्ती या क्षेत्रात आल्या होत्या. त्या म्हणतात, ‘बाबांनी चोवीस—चोवीस तास बाहेर राहून कामं केली, त्यांना ते जमलं. पण मला ते जमेल का, अशी माझ्या आईला नेहमीच काळजी असायची. कोणीही मुली त्यात नाहीयेत तर माझा अट्टहास का, कशाला एवढी ओढाताण करून घ्यायची, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असायचे. मात्र तिने कधीच मला काम सोडून घरात बसायला सांगितलं नाही. आई—बाबांनी कधीही प्रचंड कौतुक वगैरे केलं नाही. बाबांचं म्हणणं होतं की, तुम्ही धक्के खाऊन शिकलात तरच ते शिक्षण कायमस्वरूपी राहतं आणि तुम्ही दीर्घकाळ काम करत राहता. त्यामुळे त्यांनी मला कोणतंच काम मिळवून देण्यात कधीच मदत केली नाही.’ भक्ती मायाळूंनी दूरदर्शनसाठी काम केलं आहे. त्या वेळी त्यांना कुमार गंधर्वांची, बाबूराव पेंटरांची अशा डॉक्युमेंट्रीजवर काम करता आलं. काही गुजराथी कार्यक्रम एडिट करण्याची संधीही त्यांना मिळाली.

ज्या क्षेत्रात कोणी मुलगीच नाही त्या क्षेत्रात एक मुलगी शिकते आहे, स्वतंत्रपणे कामं करते आहे हे पाहून त्या क्षेत्रातल्या पुरुषांना जेलसी किंवा इनसिक्युरिटी वाटत असेल असं सगळे सहज गृहीत धरतात. मात्र भक्ती मायाळू यांना याबद्दल वेगळाच अनुभव कायम आला. त्या म्हणतात, ‘मला कधी कोणी अन्डरएस्टिमेट वगैरे केलं नाही. उलट तांत्रिक क्षेत्रात मुलगी काम करते आहे हे बघून माझं नेहमी कौतुकच होत आलं आहे. कदाचित माझ्या वडिलांचं नाव माझ्या पाठीशी होतं म्हणून असं कधी झालं नसेल किंवा झालेल्या गोष्टी माझ्यापर्यंत कधी आल्या नसतील. मला मुलगी आहे म्हणून कधी प्रॉब्लेम आला नाही, मात्र मी माझ्या वयापेक्षा लहान वाटते म्हणून अनेकदा प्रॉब्लेम आला. एवढय़ाशा मुलीला काय येणार असं अनेकांना वाटायचं. त्यामुळे मी हळूहळू माझ्या ड्रेसिंगमध्ये बदल केला जेणेकरून मी जरा मॅच्युअर्ड दिसेन.’ मुलगी आहे म्हणून भेदभावाची वागणूक मिळाली नाही तरीही त्यांनी स्वत:ची प्रतिमा कधीही फार मनमिळावू किंवा मैत्रीपूर्ण वगैरे होऊ दिली नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार यामागे दोन कारणं होती, ‘बहुतेक ठिकाणी मी एकटीच मुलगी असायचे. त्यामुळे मला कोणीही ग्रँटेड घेऊ नये म्हणून मी कोणाशी फारशी कधी मिक्सअप वगैरे होत नसे. दुसरं म्हणजे मला कामच इतकं प्रचंड असायचं की मला टाइमपास करायला, मैत्री करायला वेळही नव्हता. माझी कामाची नुकती सुरुवात असल्याने मला सगळं लक्ष कामात देणं भाग होतं. सगळ्या तांत्रिक गोष्टी समजून घ्यायच्या, लक्षात ठेवायच्या जेणेकरून त्या डोक्यात फिट झाल्या की क्रिएटिव्हिटीकडे लक्ष देता येतं. त्यानंतर लेखकाला काय अपेक्षित आहे, दिग्दर्शकाला काय हवं आहे, कॅमेरा कसा लावला आहे, शॉट्स काय आहेत, म्युझिक कसं असणार आहे, मिक्सिंग कसं करणं अपेक्षित आहे, इत्यादी अनेक गोष्टींकडे लक्ष देऊन झालं की मग माझ्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळायचा. त्यामुळे मला बाकी कोणताच टाइमपास करायला वेळही नव्हता.’

गेल्या अनेक वर्षांत तंत्रज्ञानात बदल झाले, कामाच्या पद्धतीत बदल झाले, मनोरंजन क्षेत्राच्या एकंदरीत साच्यातच बदल झाले. या सगळ्या बदलांना आपण अंगीकारलं पाहिजे या भावनेतून भक्ती मायाळू यांनी स्वत:ला अप—टू—डेट  ठेवलंय. नवीन येणारं प्रत्येक टूल आणि प्रोग्रॅम शिकायला त्या उत्साही असतात. एडिटरकडून प्रत्येक घटकाच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करूनही त्यांनी त्यांच्या कामावर स्वत:च्या वेगळेपणाचा ठसा उमटवला आहे.

मुली जर पायलट होऊ शकतात, स्पेसमध्ये जाऊ शकतात तर हे तंत्रज्ञान त्या तुलनेने खूपच सोपं आहे. त्यामुळे मुलींनी या क्षेत्राकडे नि:संशयपणे यायला हरकत नाही. शिकलं की सगळं जमतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एडिटिंगच्या कामात तुमचा स्वत:चा वेगळेपणा शोधणं आणि तो दाखवणं अवघड असतं. सगळ्यांच्या चौकटीत एखाद्या कलाकृतीला बसवल्यानंतर जी काही थोडीफार स्पेस उरते त्यात तुम्हाला काही करता आलं तर ती तुमची क्रिएटिव्हिटी! अर्थात वेगळं काही तरी करायचं म्हणून आततायीपणे काही तरी अप्रस्तुत बदल करायचे असा अर्थ होत नाही. या सगळ्यासाठी महत्त्वाची आहे ती तुमची त्या तंत्रज्ञानावरची कमांड. एकदा ते यायला लागलं की मग आपलं लक्ष त्यात अडकून पडत नाही आणि नवीन गोष्टी सुचायला लागतात.
भक्ती मायाळू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 1:05 am

Web Title: bhakti mayalu video editor madhyami dd 70
Next Stories
1 ‘मी’लेनिअल उवाच : पॅन्डेमिक म्हणजे काय रे भाऊ ?
2 बुकटेल : पुराणातली वांगी
3 डाएट डायरी : रांधा, वाढा आणि रोगांशी लढा
Just Now!
X