अन्नाला ‘पूर्णब्रह्म’ आणि खादाडीला ‘यज्ञकर्म’ म्हणणारे आपले पूर्वज थोरच म्हणायला हवेत. ‘नाम्याशेठ भेजावाला’कडे ज्याने भेजामसाला आणि पाव यांचा आस्वाद घेतला आहे, त्याला या वाक्याची पुरेपूर कल्पना यावी. यज्ञवेदीवर बसलेल्या एखाद्या ऋषीप्रमाणे आपल्या हातातील पळीने तव्यावर तेलाची आहुती देणाऱ्या नाम्याच्या हातचा भेजामसाला खाल्ल्यावर पंचेंद्रियांना शांती मिळते..

लग्नाच्या पंक्तीत किंवा लहानपणी जेवायला बसल्यावर आजी-आजोबा एक श्लोक नेहमी म्हणायला लावायचे. ‘वदनी कवळ घेता.’ या ओळीने सुरू होणारा तो श्लोक ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ या ओळीवर संपत असे. त्या वेळी हा श्लोक म्हणताना पानातल्या वरणाखाली झाकलेल्या भाताच्या मुदीकडे आणि मटकी, बटाटा अशा भाजीकडे जास्त लक्ष असायचं. त्यामुळे भुकेच्या वेळी आपण आणि आईने केलेले हे सुग्रास पदार्थ यांच्यामधील अडसर असलेल्या या श्लोकाकडे कधी लक्षच गेलं नाही. मात्र ‘खाबूगिरी’साठी भ्रमंती करताना दादर पश्चिमेकडे कबुतरखान्याजवळ पाटील हाऊसच्या गल्लीत नाम्याशेट भेजावालाची गाडी सापडली. गाडीपाशी उभं राहून तल्लीनतेने भेजामसाला तयार करणारा नाम्याशेट दिसला आणि अचानक ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ ही ओळ आठवली.
वास्तविक श्लोक आणि तामसी आहार किंवा सामिष भोजन यांचा मेळ आपल्या मनात बसवताना फालतू संस्कारांची पुटं वगैरे आड येतात. मात्र जातीचा खाणारा हा कोणत्याही जातीत बसत नसल्याने खाबू मोशायला त्याचा कधीच अडसर आला नाही. ‘खाण्यासाठी जन्म आपुला’ हे ब्रीदवाक्य मनात घेऊन खाबू मोशाय एका रात्री दहाच्या सुमारास दादर पश्चिम स्टेशनकडून कबुतरखान्याकडे जाणारा तो गलिच्छ रस्ता तुडवत निघाला. कबुतरखान्यावरून शारदाश्रम विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लगेचच बाटाचं दुकान आहे. या दुकानासमोरच एक गल्ली जाते. या गल्लीत शिरल्यावर लगेचच डावीकडे आणखी एक फाटा फुटतो. या ठिकाणीच नाम्याशेट भेजावाला आपलं संस्थान टाकून उभे असतात.
शास्त्रीय संगीतात ‘घराणेशाही’ आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अंगीभूत माजाला फार महत्त्व असतं. ‘माझ्या अटी मान्य असतील, तरच गाणं करा.. नाहीतर तुम्हाला अजूनही गवय्ये मिळतील’ असे ठणकावून सांगणारे गायक आणि गायिका शास्त्रीय संगीतात खूप होऊन गेले. विशेष म्हणजे अशाच गायकांनी संगीताचं झाड फुलवलं. त्यांच्या विक्षिप्त अटी ऐकूनही लोकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं, हे विशेष! नाम्याशेट भेजावाला हादेखील त्याच जातकुळीतला आहे. नाम्याशेटच्या अटीही धम्माल! त्याच्या हातचा भेजामसाला खायला लांबून लांबून लोक येतात, हे माहीत असूनही दिवसाला फक्त ४० भेजेच विकणार, गाडी रात्री दहा ते एक याच वेळेत लावणार, मनासारखा कांदा चिरला नाही तर हाताखालच्या माणसाला ठेवणीतल्या चार शिव्या गिऱ्हाईकासमोरच ऐकवणार आणि सुरी हातात घेऊन स्वत: त्या कांद्याची वासलात लावणार.. पण हे सर्व करताना आपला आब सांभाळला जाईल, याची पुरेपूर खात्री!
नाम्याशेट रात्री दहाच्या आधी आणि अंगारकीला कधीच गाडी लावत नाही. गाडी उभी राहिली की, अनेकदा नाम्याशेटकडे येणारं नेहमीचं गिऱ्हाईक त्याला पाव कापून देण्यापासून पाण्याचे पिंप सरकवण्यापर्यंत सगळ्यासाठी मदत करतं. गाडीवरचा स्टोव्ह पेटला की, त्यावर तवा टाकला जातो. तोपर्यंत हाताखालचा मुलगा कांदा, टोमॅटो, मिरच्या कापून तयार ठेवतो. कोणती गोष्ट कुठे असायला हवी, याबाबतही नाम्याशेट भलतेच चोखंदळ! मग नाम्याशेट तव्याचा ताबा स्वत:कडे घेतात. टोमॅटो, कांदा, मसाले, मीठ आणि तेल या पाच घटकांच्या एकत्रीकरणातून मसाला तयार होतो. हा सगळा मसाला एका परातीत वेगळा काढला जातो.
मग नाम्याशेट समोरच्या ताटात आहुती देण्यासाठी आतुर झालेल्या भेजांकडे आपले लक्ष वळवतात. मागणीप्रमाणे तेवढे भेजे तव्यावर येतात. एखाद्या ऋषीच्या थाटात पळीतून तेलाची आहुती तव्यावर दिली जाते. नाम्याशेट तल्लीन झालेले असतात. त्यात खास तयार केलेला मसाला टाकला जातो. भेजे आणि मसाला एकजीव होतात आणि त्यांच्यावर खास नाम्याशेटने तयार केलेली करी ओतली जाते. गाण्याला चढावा तसा रंग भेज्यांना चढतो आणि अलगद हा भेजामसाला ताटलीत घेतला जातो. पुढे नाम्याशेट याच मसाल्यावर पाव भाजतात आणि भेजामसाला व पाव आपल्यासमोर पेश केला जातो. या ऐवजाची किंमत १०० रुपये एवढी आहे. भेजा मसाला हा या गाडीवरील खास राग! पण त्याचबरोबर येथे भेजा राइस, अंडा राइस, अंडा भुर्जी हे पदार्थही मिळतात आणि ते खातानाही तोंडाला पाणी सुटतंच!

कसे जाल : दादर पश्चिमेला प्लॅटफॉर्म क्रमांक एकला उतरलात की, तेथून कबुतरखान्याकडे यायचे. कबुतरखान्याहून शारदाश्रमच्या रस्त्याला लागलात की, डावीकडे बाटाचे शोरूम दिसते. या शोरूमसमोरच एक गल्ली जाते. गल्लीत शिरल्यावर लगेच डावीकडे नाम्याशेटची गाडी आणि त्या भोवतीची गर्दी दिसते.
किती वाजता : नाम्याशेटच्या गाडीवर जाण्यासाठी अगदी योग्य वेळ म्हणजे रात्री १०-१०.२०. जास्त उशीर केलात, तर भेजा मसाला संपला आहे, असं उत्तर ऐकावं लागेल आणि भुर्जी पाव आणि अंडा राइस यावर भूक भागवावी लागेल.