05 August 2020

News Flash

व्हायरलची साथ : ‘जाणता’ राजा

राजाने ठरवलं तर प्रजेचं बरंच भलं होऊ शकतं हे तर नक्की.

राजा कसा असावा याची रसभरीत वर्णनं आपल्या असंख्य ग्रंथांमध्ये आहेत. त्यानुसार राजे वागतात की नाही तो भाग वेगळा. पण राजाने ठरवलं तर प्रजेचं बरंच भलं होऊ शकतं हे तर नक्की. अशाच एका व्हायरल झालेल्या मॉडर्न राजाची गोष्ट.

नाटकाचे शीर्षक नाही. नाटकाची जाहिरात नाही. कुठल्याही पक्षीय नेत्याच्या जनसंपर्काचे पेडन्यूज कंत्राट आम्ही घेतलेले नाही. पण हा दोन शब्दी मथळा आम्ही खास योजिला आहे. सदरहू लेखाबरोबर एक छायाचित्र दिसेल. एक मध्यमवयीन गृहस्थ दिसतील. अचंबित व्हावं असं फोटोत काही नाही. हिरवा टीशर्ट, किरमिजी रंगाचं लुंगीसदृश वस्त्र, कमरेला टेक्नोसॅव्ही शस्त्र खोवलेलं, समोर मोठय़ा ताटात सोललेले कांदे ठेवलेले, उजव्या बाजूला निवडलेली भाजी मोठय़ा बादलीत भिजत घालण्यात आलीय. हे गृहस्थ आणखी एक कांदा सोलताना दिसत आहेत. कामात गर्क असल्यानं फोटो काढणारा आणि कॅमेऱ्याकडे त्यांचं जराही लक्ष नाही. कॉन्शन्स वगैरे विषयच नाही. एकंदर चेहरेपट्टी पाहून पूर्वाचलातल्या एखाद्या इव्हेंटमधले शेफ असतील असा तुमचा रँडम समज झाला असेल. पण तसं नाही.
6
या गृहस्थांचं नाव आहे- ‘जिग्मे खेसर नमग्येल वांगचूक.’ थ्री एडियटमधल्या फुंगसूक वांगडूचे नातेवाईक वगैरे- असे फिल्मी विचार मनात आणू नका. हे आहेत भूतानचे राजे. करेक्ट वाचलंय तुम्ही- राजे, देशप्रमुख. यांचं शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झालंय. राजा असतानाही ते ‘किडू’ ही पारंपरिक संकल्पना जपतात. यानुसार गरीब विद्यार्थ्यांना मदत करणं, ज्येष्ठ नागरिकांना वैैद्यकीय मदत, आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत करणं, राज्यनियंत्रित जमीन शेतकऱ्यांना देणं अशा उपक्रमांत ते असतात. हा फोटो पाहिलात ना-तो आहे ‘मोंगर’ नावाच्या परिसरातल्या कम्युनिटी स्कूलमधला. मुख्य कार्यक्रमानंतर जेवणाचा घाट घातलेला आहे आणि दस्तुरखुद्द राजे बल्लवाचार्याच्या भूमिकेत आहेत. आणि यातलं काहीही चमकोगिरीसाठी नाही. ते नियमितपणे अशा कार्यक्रमात जातात, काम करतात. त्यांनी बहुतांशी भूतान चालत किंवा सायकलने पालथा घातला आहे. अशा भटकंतीदरम्यान ते सर्वसामान्य माणसांच्या घरी राहतात आणि त्यांच्यासाठी जेवण शिजवतात. दंतकथा वाटावी अशा या प्रकाराची त्यांच्याकडे बातमीही होत नाही. राजांना फुटबॉल आवडतो आणि येतोही. ते गोलकीपर होते. पण भावी राजाला बीट करून गोल करणं योग्य नाही असं वाटून खेळाडू गोलच करत नाहीत म्हणून त्यांनी फुटबॉल सोडलं. आता ते नियमितपणे बास्केटबॉल खेळतात. यंदाच राजांना मुलगा झाला. त्यानिमित्ताने त्यांनी नागरिकांसह एका लाखापेक्षा जास्त झाडं लावली. एकूण भूभागाच्या ६० टक्के परिसर वृक्षवेली पर्यायाने जंगलाखाली असावा असं त्यांचं धोरण आहे.
आपल्याकडे अनेक राजे होऊन गेले. आता लोकशाही आहे. पण आपण निवडून दिलेल्या असंख्य लोकप्रतिनिधींचा चंगळवाद अनेक राजांनाही मागे टाकेल असा आहे. आतापर्यंत दबंगगिरी करणारे आपल्या नेत्यांना कायद्याचा किंवा पोलिसांचा बडगा दाखवला की अचानक त्यांच्या छाती किंवा पोटात दुखू लागतं. चारचाकी गाडी ही युटिलिटीपेक्षा अतरंगी नंबरप्लेटसह चालणाऱ्यांच्या अंगावर घालत माज करण्याची वस्तू आहे असं साधारण असतं आपल्याकडे. कोणताही खेळ खेळण्यापेक्षा ‘गेम’ करणं त्यांना आवडतं. झाडं लावणं सोडा, आवडेल तो भूभाग नावावर करून तो डेव्हलप करण्याची त्यांची मनीषा असते. लोकांसाठी काही करण्यापेक्षा रस्ते अडवून, संगीत आदळआपट मंडळी अर्थात डीजे मंडळींना बोलावून धार्मिक कार्यक्रम ते आयोजित करतात. विधायक काही करण्याऐवजी खटय़ाक स्टाइल तोडफोड, पंगा, राडा यांना भावतो. अन्य पक्षीयांना उद्देशून अर्वाच्य भाषेत बोललं तर आपण चांगले ठरतो असा यांचा गैरसमज असतो. आधी वाचाळपणा करायचा आणि मग माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला अशी सारवासारव त्यांना करावी लागते. त्यांच्या घराला आणि ऑफिसलाही भपकेबाज दर्प येतो. गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्या नावावर असतात. पण त्यांना सहज जामीन मिळतो. त्यांच्याभोवती पंटर आणि चमचे लोकांचा राबता असतो. त्यांचं आणि आपलं अर्थात प्रजेचं राहणीमान यात प्रचंड तफावत असते. आपल्याला भेडसावणारे प्रश्न त्यांच्या गावीही नसतात.
सामान्य माणसाचं एक घर होताना आयुष्य पणाला लागतं आणि सांगावा असा उत्पन्नाचा एकही स्रोत नसतानाही त्यांचे महाल आणि व्हिले दिमाखात उभे असतात. कितीही टेक्नोसॅव्ही असले तरी त्यांना एखाद्या भोंदू बाबाबुवाचा आशीर्वाद लागतो. रविवारी म्हणजे ठोस शासकीय सुट्टी असलेल्या दिवशी विद्यापीठ त्यांना डिग्री देतं आणि त्याचं एक्सप्लनेशन ग्राह्य़ धरलं जातं. एरव्ही भक्त शब्दाला आध्यात्मिक बैठक असते. पण आपल्या सो कॉल्ड राजांचे भक्त आता सायबर ट्रोल्स म्हणून वावरतात. एखाद्याने विरोधी विचार मांडला की त्याचं सोशल लाइफ ते हायजॅक करून टाकतात. आता या सगळ्या वर्णनाला सन्मानयीय अपवाद आहेत. पण दिवसेंदिवस या अपवादांनाही मेन फोर्समध्ये आणण्याचं काम वेगाने सुरू आहे.
परवा पाच राज्यांचे राजे निवडले गेले. दुसऱ्याच दिवशी बहुतांशी राजे अम्मांच्या चरणी गडाबडा लोटांगण घालण्यात मश्गूल होते. पूर्वाचलातल्या निवडून आलेल्या रंगेल राण्यांचं सेलिब्रेशन तुम्ही पाहिलं असेलच. दूरवर दिल्लीत आडनावाच्या बळावर झालेले राजे कुडत्याच्या बाह्य़ा सरसावून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात आणि तरीही हार होते. भूतानच्या राजाने आपल्या वर्तनाने प्रजेसमोर आदर्श मांडला आहे. म्हणूनच लहान असूनही त्यांचा देश सर्वार्थाने मोठा होतोय. आपल्याला प्रतीक्षा आहे लोकशाहीतले आपले राजे ‘जाणते’ होण्याची..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2016 10:18 am

Web Title: bhutan king chops vegetables for school meal and social media applauds
Next Stories
1 व्हायरलची साथ: बालपणाचा स्पेक्ट्रम..
2 व्हायरलची साथ: एक सेल्फी आरपार!
3 व्हायरलची साथ: मुक्तछंदी ‘चाम्पियन’!
Just Now!
X