ही गोष्ट आहे दूरवरच्या स्वीडनधल्या स्टॉकहोम शहरातली. सत्य घटना आहे. मिकाइला केलनर नावाच्या तिथल्या पोलीस ऑफिसर सुट्टीवर होत्या. दशकभराहून अधिक काळ सव्‍‌र्हिसमध्ये आहेत. दैनंदिन व्यापातून ब्रेक म्हणून घेतलेल्या सुट्टीत त्या भटकायला बाहेर पडल्या. शहरातल्या रलम्बशोव्ह पार्क नावाच्या निवांत ठिकाणी बिकिनीवर सनबाथिंग (सूर्याची किरणे जाणीवपूर्वक अंगावर घेण्याचा उपक्रम)साठी पहुडल्या होत्या. थोडय़ा अंतरावर बायकांचा घोळकाही पर्यटनासाठी आलेला. तेवढय़ात अनाथ मुलांसाठी पेपरविक्रीचे काम करतो आहे अशी बतावणी करत एक इसम तिथे दाखल झाला. अनाथ मुलांसाठी असं ऐकल्यावर बायकांनी पेपर विकत घेतले. खरेदी-विक्री झाल्यावरही तो इसम तिथेच घुटमळताना मिकाइला यांना दिसला.

मिकाइला यांची पोलिसी नजर तीक्ष्ण झाली. काहीतरी गडबड आहे हे त्यांना जाणवलं. मात्र थोडय़ा वेळाने तो इसम निघून जाताना दिसला. प्रॉब्लेम होण्याआधीच मिटला असं वाटून त्या निवांतपणे पडून राहिल्या. पाचच मिनिटांत बायकांच्या घोळक्याचा कल्ला त्यांच्या कानावर आला. मिकाइला यांनी तिकडे धाव घेतली. घोळक्यातल्या एकीचा स्मार्टफोन त्या इसमाने लंपास केला होता. तो माणूस चोर निघाला, आपला संशय खरा ठरला हे ताडलं त्यांनी. पाच-दहा मिनिटंच झालेली. पळून पळून जाणार कुठे तो-त्याला पकडायलाच हवा. तेवढय़ात त्यांच्या लक्षात आलं-आपण आता डय़ूटीवर नाही आणि आपल्या अंगावर पुरेसे कपडे नाहीत. डय़ूटीवर नाही हरकत नाही, पण चोराने काही दगाफटका केला तर असा विचार क्षणभर त्यांच्या मनात डोकावला. पण मोबाइल चोरणारा माणूस असा काय दगाफटका करणार हे त्यांना जाणवलं आणि केला तर चोपू त्याला असं त्यांनी मनोमन ठरवलं. पुढच्याच क्षणाला चोर गेला त्या दिशेने त्या पळू लागल्या. आपली ओळख पटू नये यासाठी पूर्णवस्त्रांकित, चेहराही झाकून घेतलेला माणूस आणि बिकिनीत त्याचा पाठलाग करणाऱ्या बाई असं चित्र पाहून त्या पार्कातले लोकही गांगरून गेले. थोडय़ाच वेळात मिकाइला यांनी चोराला गाठलं. कमावलेल्या पिळदार शरीरयष्टीचा आणि पोलिसी खाक्याचा तडाखा त्यांनी चोराला दिला. मोबाइल ताब्यात घेतला. चोर पळून जाऊ नये यासाठी त्याला खाली पाडलं. आणखी चोप दिला. या बाई साध्या नाहीत हे एव्हाना पार्कातल्या लोकांना जाणवलं आणि तेही मदतीला धावले. स्थानिक महिला पोलीसही दाखल झाल्या. मिकाइला यांनी चोराला त्यांच्याकडे दिलं. मी कोण ते सांगितलं. आजूबाजूची माणसं चकित झाली. स्थानिक पोलिसांनी सॅल्यूट वगैरे केलं. केसची औपचारिकता मिकाइला यांनी पूर्ण केली. या मॅटरमुळे त्यांचं सनबाथिंग बाजूलाच राहिलं. आपल्याप्रमाणेच तिकडच्या बघ्यांनी फोटो, व्हिडीओ काढले. त्यापैकीच एक मिकाइला यांच्यापर्यंत पोहचला. घरी परतत असताना त्यांनी तो फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आणि लिहिलं- ‘चोरांना पकडण्याचे प्रसंग अनेकदा घडले. परंतु बिकिनीवर असताना चोराला पकडण्याची पहिलीच वेळ.’ तो फोटो आणि मिकाइला मॅडम काही तासांतच व्हायरल झाल्या.
हे सगळं वाचून आम्हाला ठाण्याची आठवण झाली. मेंटल हॉस्पिटलवालं ठाणे. प्रसंग यंदाच्या वर्षांतलाच. ठाण्यातल्या एका ट्रॅफिक सिग्नलला महिला पोलीस उभ्या होत्या. समोरून येणाऱ्या गाडीतला माणूस फोनवर बोलतोय हे पाहताच त्यांनी गाडी अडवली. परवाना आणि कागदपत्रांची मागणी केली. मात्र धनदांडग्या आणि ‘रस्ता ही आपलीच जहागीर’ समजणाऱ्या इसमाने कर्तव्यावर असणाऱ्या आणि वर्दीतल्या महिला पोलिसाला थेट मारहाण करायला सुरुवात केली. मॅडमनंही प्रत्युत्तर दिलं. मात्र अतरंगी नंबरप्लेट आणि तत्सम गोष्टी ठळकपणे दिसत असतानाही गाडी अडवलीच जाते कशी यामुळे बेफाम झालेल्या इसमाने वर्दीची, माणुसकीची तमा न बाळगता शिवीगाळ करत मारहाण सुरूच ठेवली.

हे सगळं सिग्नलच्या सीसीटीव्हीत कैद झालं. बऱ्याच वेळानंतर मॅडमची सुटका झाली. बिकिनी वगैरे लांबच राहिलं. डय़ूटीवर असलेल्या, गणवेश परिधान केलेल्या महिला अधिकाऱ्याचा सन्मान करता येत नाही अशी आपली अवस्था. समजा चुकून मिकाइला यांच्या गोष्टीप्रमाणे आपल्याकडे काही घडलं तर वखवखलेल्या लोकांचे तांडे कसे रिअ‍ॅक्ट होतील याची कल्पनाच न केलेली बरी. पण कसं आहे बिकिनी, सनबाथिंग, पर्यटन वगैरेसाठी मनशांती लागते. दाट लोकवस्तीच्या भागात दिलेलं घर, पोपडे सुटलेल्या भिंती, गळकी छपरं असं वातावरण. कचेरीत स्वतंत्र, स्वच्छ टॉयलेट असेलच याची खात्री नाही. चेंज करायला नीट आडोसा असलेली खोली असेलच याची शाश्वती नाही. लहान मुलांसाठी पाळणाघर वगैरे तर विषयच नाही. ऑड वर्किंग अवर्समुळे घरापर्यंत कॅबने ड्रॉप वगैरेची शक्यता धुसरच. कुठल्यातरी राजकीय नेत्याची रॅली किंवा डीजेंचा ढणढणाट असलेल्या धार्मिक मिरवणुकांमध्ये डय़ूटी लागली तर हाल विचारायलाच नको. कोणी आगळीक केली तर हाती अत्याधुनिक शस्त्रं वगैरेही नाही. रोजची डय़ूटी म्हणजे नवीन आव्हान असतानाही राज्यातल्या, देशातल्या महिला पोलीस निष्ठेने आपलं काम करत आहेत. नगर जिल्ह्य़ातल्या कोपर्डीपासून उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरापर्यंत विकृत मनोवृत्तीतून महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. ही प्रकरणं हाताळण्यासाठी महिला पोलिसांची संख्या वाढणं आवश्यक आहे हे असंख्य अहवालाद्वारे सरकारनेच स्पष्ट केलंय. एकूण पोलीस दलाच्या आकारमानाच्या तुलनेत महिला पोलिसांची संख्या पावपटही नाही. महिलांवरच्या अत्याचाराचे गुन्हे भरमसाट वाढत असताना महिला पोलिसांची सुरक्षा रामभरोसेच आहे. इथे रोजची डय़ूटी म्हणजे कुचंबणारुपी गोची आहे, कपडय़ाबिपडय़ाचं राहिलं बाजूला. आपला स्वीडन होईपर्यंत मिकाइला यांच्या कहाणीचं पारायण करणं आपल्या हाती!
(बिकिनी म्हणजे उदारमतवादी स्वातंत्र्यप्रेमी आणि साडी, सलवार कमीझ म्हणजे कर्मठ परंपरावादी असा आमचा गैरसमज नाही. कपडे हा सर्वस्वी वैयक्तिक विषय आहे.)
-पराग फाटक