इको फ्रेण्डली, नेचर फ्रेण्डली, नॅचरल, ऑरगॅनिक असे उल्लेख हल्ली अनेक वस्तूंवर, पदार्थावर अगदी कपडय़ांबाबतही करण्यात येतात. खाण्याच्या रॅपरपासून ते अगदी टिश्यू पेपरपर्यंत सर्वच गोष्टींवर असे टॅग लावले जातात. पर्यावरणपूरक लाइफस्टाइलची ही सुरुवात आहे आणि ती ट्रेण्ड म्हणून येत असेल तर तो चांगला पायंडा आहे. फॅशनमध्येही हल्ली पर्यावरणपूरक फॅशनचा बोलबाला वाढलाय आणि फॅशन कपडय़ांपर्यंत न राहता आता अ‍ॅक्सेसरीजदेखील इको फ्रेण्डली असाव्यात असा प्रयत्न होतोय. रॅम्पपासून रोडपर्यंतची ही ‘फॅशनेबल नैसर्गिकता’ कर्णफुलांपासून ते अगदी पायातल्या पैंजणार्ंयत येऊन ठेपते. हाच ट्रेण्ड हल्ली ‘बायो ज्वेलरी’ किंवा ‘ऑरगॅनिक ज्वेलरी’ म्हणून प्रसिद्ध होतोय.
माणसाच्या जीवनात प्लॅस्टिकचा शिरकाव होण्यापूर्वी खरं तर स्त्रिया निसर्गालंकारांनीच नटायच्या. फुलं-पानं त्यांचे सौंदर्यालंकार होते. कधी/तरी लाकूड, शंख-शिंपल्यांपासून तर कधी बिया, पिसं यांच्यापासून बनवलेली कर्णफुले, गळ्यातल्या माळा असायच्या. मोती, मौल्यवान खडे हेदेखील नैसर्गिकच. मग धातूचा शोध लागल्यानंतर त्याचा मोह पडला आणि दागिन्यांमध्ये सोनं-चांदी आली. दागिन्यांमध्ये प्लॅस्टिकचा शिरकाव अगदी अलीकडचा. पण तो झपाटय़ाने वाढला. कारण धातूपेक्षा हा पर्याय स्वस्तातला होता. प्लॅस्टिकची, फायबरची कर्णफुले आली आणि कानातल्यांच्या फिरक्याही प्लॅस्टिकच्या झाल्या. आता प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाला असलेला धोका लक्षात आल्यानंतर ते वापरू नये, अशी ओरड होतेय. त्यावर उत्तर म्हणून बायो ज्वेलरीचा ट्रेण्ड येतोय. हा ट्रेण्ड रुजायला हवा.
बायो ज्वेलरीमध्ये रोजच्या वापरातल्या फळांपासून भाज्यांपर्यंत, बियांपासून पानांपर्यंत आणि फुलांपासून दगडांपर्यंतचा वापर इअररिंग्ज, नेकलेस, ब्रेसलेट, अँकलेट बनवण्यासाठी केला जातो. ताजी फळं, भाज्यांचे दागिने रोजच्या दगदगीत वापरणं तसं अशक्यच. पण ही ज्वेलरी कलाकृती म्हणून प्रदर्शनांमधून दिसायला लागली आहे. ही अलंकारिक फॅशन रॅम्पवरून रोजच्या आयुष्यात आली आणि तिला एक वेगळाच टच मिळाला आहे. टाकाऊपासून टिकाऊच्या ट्रेण्डमध्ये नैसर्गिक पदार्थ – म्हणजे नारळाच्या करवंटय़ा, केळीच्या खांबाची साल, सुपारीची साल, वेत, मोरपीस, तांदुळाची तुसं या वस्तूंपासून सुंदर दागिने बनवले जात आहेत. शहरी फॅशनच्या कॅटलॉगमध्ये ही ज्वेलरी हिट ठरते आहे.
सुपारीची साल आणि वेत सुंदररीत्या गुंफून त्याला चांदणीचा, फुलाचा आकार देऊन बनवलेली कर्णफुलं ‘स्टेटमेंट डँगलर्स’ होतात तेव्हा ट्रेण्डी वाटतात. पुन्हा हे कानातले कानाला जड होत नाहीत आणि वैशिष्टय़पूर्ण वाटतात. केळीच्या सालीपासून बनवलेलं ब्रेसलेटही महिला वर्गात तितकंच प्रिय. ब्राझीलमध्ये विशिष्ट प्रकारचं गवत दागिने करण्यासाठी वापरतात आणि हे दागिने सध्या संपूर्ण अमेरिकेत आणि युरोपात बायो ज्वेलरी म्हणून गाजत आहेत. अनेक ई-शॉपिंग वेबसाइट्सवर ते खरेदी करता येतात. नारळाच्या करवंटय़ांपासून लहान बटनांप्रमाणे दिसणारे कानातले ‘रॉ’ लुक देतात आणि लक्षवेधी ठरतात. त्याच्याच चकत्यांच्या माळा, नेकपिसही अगदी खुलून दिसतात. याच नैसर्गिक सामग्रीपासून पैंजणसुद्धा केले जातात, पण ते क्वचितच पाहण्यास मिळतात. टोपल्या बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बांबूच्या लवचीक सालीचाही अलंकारांमध्ये उपयोग होतो.
दागिन्यांच्या या गर्दीत तांदूळाच्या तुसापासून केलेले कानातले- गळ्यातल्याचा सेट सध्या हीट आहे. सूर्यफूलाच्या टोकदार पाकळीप्रमाणे वाटणारे हे दागन्यिांचे हे सेट कानाला आणि गळ्याला हलके, खूपच नाजूक आणि नजाकतदार दिसतात. ज्यूट ज्वेलरीचा ट्रेण्डही आता बऱ्यापैकी स्थिरावला आहे. टेराकोटा, कांथा, शंख-शिंपले यांचे दागिने सर्रास वापरले जातात. विविध प्रदर्शनं, ग्राहक पेठ ही ठिकाणं अशी ज्वेलरी मिळण्याची मोक्याची ठिकाणं आहेत.
पेपर क्विलिंगचे दागिने हा प्रकारही हल्ली भलताच चर्चेत आणि नजरेत आहे. घरच्या घरी कलात्मकतेचे प्रयोग करणाऱ्या अनेक मुली स्वहस्ते बनवलेली क्विलिंग ज्वेलरी हौसेने मिरवतात. कागदाच्या सुरळ्या वळून त्याचे झुमके, उठावदार नेकलेस, शो पिस आणि भेटकार्डही बनवली जात आहेत. क्विलिंग आर्ट कसं करायचं याचे ‘डू इट युवरसेल्फ’ प्रकारचे व्हिडीओ यूटय़ूबवर सध्या हिट आहेत. सो.. या निसर्गपूरक आणि चिरंतन टिकणाऱ्या ट्रेण्डचा भाग होण्यासाठी आपणही ही नैसर्गिक फॅशन जपली पाहिजे.. नाही का!