|| मितेश जोशी

चारकोल फूड किंवा ब्लॅक फूड हे सध्याच्या ट्रेंडिंग फूडच्या गणतीत आहे. काळेकुट्ट दिसणारे हे पदार्थ सध्या चवीने आणि मोठय़ा कुतूहलाने खाल्ले जात आहेत. काय आहे हे काळंकुट्टं खाणं..

सात थरांचा रेनबो केक आठवा किंवा रंगीबेरंगी मिक्स भाज्यांनी नटलेला पिझ्झा आठवा. भाज्या आणि इतर पदार्थांनी नटलेला रंगीबेरंगी आकर्षक पदार्थ ताटात येताच प्रेमात पडायला होतं, पण हाच पिझ्झा किंवा केक अगदी काळ्या कुळकुळीत स्वरूपात समोर आला तर? नवल वाटेल पण हो! सध्या ब्लॅक फूडचा किंवा चारकोल फूडचा जमाना आहे. ज्याला तरुणाईचा उदंड प्रतिसाद लाभतोय. पूर्वी खमंग, र्तीदार असे खाण्याचे वर्णन केले जात होते. आता त्याच्या जोडीला ब्लॅक फूडचा जमाना आलाय. समाजमाध्यमांवर खूप सुंदर ब्लॅक फूडचे फोटोज बघायला मिळतात. मग तो ब्लॅक बर्गर असो किंवा ब्लॅक सँडविच आणि अगदी ब्लॅक लेमोनेडसुद्धा. पदार्थांची रंगसंगतीच मुळात इतकी सुंदर उठून दिसते की ते आपोआप खवय्यांचे लक्ष वेधून घेतात.

या ट्रेंडची सुरुवात नेमकी झाली कशी याची उकल करण्यासाठी मुंबईस्थित शेफ व फूड ब्लॉगर सोनाली राऊतशी संवाद साधला. ‘या ब्लॅक फूडट्रेंडची सुरुवात साधारणपणे २०१४ मध्ये इटलीत झाली. असं म्हटलं जातं की एका इटालियन शेफने केवळ अ‍ॅक्टिवेटेड चारकोलमुळे होणारे फायदे लक्षात घेऊन पिझ्झा क्रस्ट बनवला. विचार करा या काळ्या पिझ्झाच्या बेसवर रंगीबेरंगी भाज्या किती उठून दिसत असतील. अगदी कोणालाही हा पिझ्झा चाखायची इच्छा होईल. फुडी इटालियन मंडळींवरही तीच जादू झाली. त्यांनी या पिझ्झाला भरघोस प्रतिसाद दिला. आणि मग हळूहळू त्याचा प्रवास जगभर होऊ  लागला’, असं सोनालीने सांगितलं. बऱ्याच लोकांना हा काळा रंग कशामुळे येतो हा प्रश्न पडतो. बहुतांशी लोकांचं मत असं असतं की हा रंग खाण्याच्या काळ्या रंगाच्या वापराने येतो. पण नाही का खाण्याचा रंग वापरून नव्हे तर अ‍ॅक्टिवेटेड चारकोलच्या वापरामुळे आलेला काळा रंग आहे. अ‍ॅक्टिवेटेड चारकोल म्हणजे नक्की काय? तर अ‍ॅक्टिवेटेड चारकोल हा नारळाच्या करवंटीने किंवा बांबूने बनवला जातो. भारतात बहुतांशी ठिकाणी हा चारकोल करवंटीनेच बनवला जातो. हा चारकोल तयार करण्यासाठी खूप मोठी प्रोसेस असते. त्यासाठी करवंटीला खूप जास्त जाळलं जातं. त्या करवंटीपासून राख मिळवणं हा मुख्य हेतू असतो. ही राख ऑक्सिडाइज केली जाते, या प्रोसेसला अ‍ॅक्टिवेशन म्हणतात. या अ‍ॅक्टिवेटेड चारकोलची खासियत अशी असते की त्याच्या पृष्ठभागावर खूप छोटी छोटी छिद्रं असतात ज्यामुळे ते खुप पोरस म्हणजेच जाळीदार होते. या त्याच्या जाळीदारपणामुळेच हा अ‍ॅक्टिवेटेड चारकोल औषधी होतो. ही छिद्रं स्पंजसारखी काम करतात आणि सर्व रसायनं शोषून घेतात. म्हणूनच अ‍ॅक्टिवेटेड कार्बनचा वापर अ‍ॅसिडिटी किंवा ब्लोटिंगच्या ट्रीटमेंटसाठी के ला जात असल्याचे सोनालीने सांगितले.

अ‍ॅक्टिवेटेड कार्बनचा फायदा विषबाधा झालेल्या पेशंटलासुद्धा होतो. तो नेमका कसा होतो याची उकल करून देताना शेफ सोनाली म्हणते, अ‍ॅक्टिवेटेड कार्बनचा एक खूप महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे तो विष खेचून घेतो. अ‍ॅक्टिवेटेड चारकोलच्या जाळीदार पृष्ठभागावर नकारात्मक चार्ज असतो जो सकारात्मक चार्ज असलेल्या विषारी द्रव्यांना खेचून घेतो. यामुळे होतं काय तर सगळे केमिकल्स आणि टॉक्सीन्स त्याला अडकून राहतात आणि रक्तात मिक्स होत नाहीत. म्हणून जेव्हा वेळेचा अभाव असतो तेव्हा हॉस्पिटलमध्ये जाण्याअगोदर विषबाधा झालेल्या रुग्णाला लगेच अ‍ॅक्टिवेटेड चारकोल दिला जातो.

समाजमाध्यमांवर गेल्या दीड वर्षांपूर्वी ब्लॅक आईस्क्रीमचे फोटोज प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. हे ब्लॅक आईस्क्रीम ब्लॅक फूडच्या कुटुंबातीलच सदस्य आहे. या ब्लॅक आईस्क्रीमचा जन्म न्यूयॉर्क शहरातील एका आईस्क्रीम पार्लरमध्ये झाला. जो कालांतराने समाजमाध्यमांच्या कृपेने सर्वत्र प्रसारित झाला. त्यामुळे आज भारतात जे ब्लॅक आईस्क्रीम मिळतं आहे त्याचं मूळ न्यूयॉर्कमध्ये असल्याची माहिती शेफ वरुण इनामदार यांनी दिली. त्याचसोबत भारतीय ब्लॅक फूडची माहिती देताना त्याने आपल्या देशात कित्येक वर्षांपासून एक ब्लॅकफूड प्रसिद्ध असल्याचे सांगितले. आपल्याकडे अगदी गाडीवरही मिळणारे शिंगाडे म्हणजे ब्लॅक फूडच आहे. आजही चवीने खाल्ले जाणारे हे शिंगाडे ब्लॅक फूडच्याच कुळातले असून महाराष्ट्रात रस्त्यावरच्या हातगाडीवर भट्टीत भाजलेले किंवा उकडलेल्या स्वरूपात शिंगाडे मिळतात, असं इनामदार यांनी सांगितलं.

ब्लॅकफूड तयार करण्यासाठी मार्केटमध्ये ब्लॅक फूड मसाला किंवा ब्लॅक फूड पावडरसुद्धा उपलब्ध आहे. ज्याच्यापासून आपण विविध खाद्यपदार्थ बनवू शकतो. तर हॉटेल, कॅ फेजमध्ये ब्लॅक बर्गर, ब्लॅक नूडल्स, ब्लॅक फ्रँकी सारखे पदार्थसुद्धा हल्ली सहज मिळतात. ज्याची चव जिभेवर रेंगाळणारी असते. तर मग निर्धास्त होऊन फूड ट्रेंड्समधला हा काळाकु ट्ट खाण्याचा ट्रेंडिंग ट्रेंड नक्की ट्राय करा !