फॅशन किंवा स्टाइलचे धडे आपण अजूनही चित्रपटसृष्टीतल्या ताऱ्यांकडून घेत असतो. सिनेमातल्या फॅशनचा लगेच ट्रेण्ड बनतो; पण चंदेरी पडद्यावरचं हे स्टाइल स्टेटमेंट प्रत्यक्षात कसं मिरवावं यासाठी हा कॉलम.
तब्बल पाच वर्षांनी रॅम्पवर पदार्पण करणाऱ्या ऐश्वर्या राय- बच्चनने मनीष मल्होत्राच्या शोची निवड करावी, यात काहीच आश्चर्य नाही. पण ब्रायडल लुक असूनही तिच्या लुकमध्ये असलेला सिम्पल पण एलिगन्स सर्वाच्या नजरेत भरला. मरुन रंगाचा एम्ब्रोयडर स्कर्टसोबत मरुन टॉप आणि गोल्डन एम्ब्रॉयडर जॅकेट असा तिचा लुक होता. सोबत वेव्ही केस आणि कमीत कमी मेकअप हे लुकचं वैशिष्टय़ होतं.
कसा कॅरी कराल?
उद्या राखीपौर्णिमा. त्यानंतर लवकरच गौरी-गणपतीचा माहोल सुरू होईल. त्यात खास पारंपरिक लुकलाच पसंती असते. पण नेहमीच अनारकली आणि सलवार सूट घालण्यापेक्षा एखादा एम्ब्रॉयडरी केलेला स्कर्ट आणि सिम्पल टॉप असा लुक कॅरी करायला हरकत नाही. कित्येकदा लग्नासाठी घेतलेले घागरा, लेहेंगा तसेच पडून असतात. त्यांचाही वापर करू शकता. प्रयोग करायचा असेल तर त्यावर सफेद ब्राइट प्रिंटेड टी-शर्ट घालून पहा. नाहीच तर घेरदार स्कर्ट, टॉप आणि एम्बॉयडर जॅकेट असलं तरी पुरेसं आहे. मग इतर दागिन्यांची गरजही भासणार नाही.
मृणाल भगत -viva.loksatta@gmail.com