सिनेमातल्या फॅशनचा लगेच ट्रेण्ड बनतो; पण चंदेरी पडद्यावरचं हे स्टाइल स्टेटमेंट प्रत्यक्षात कसं मिरवावं यासाठी हा कॉलम.

नेहमीच्या डेनिमला वरच्या बाजूला खांद्यावरून रुळणारे पट्टे देत त्याला दिलेला व्हिंटेज येट मॉडर्न लुक म्हणजे डंगरी. प्लेफुल, खोडकर, पण तितकाच स्टायलिश लुक या डंगरीजमुळे मिळतो. मध्यंतरी या डंगरीजची फॅशन येऊन परत गेली होती. आता मात्र अनेक सेलेब्रिटीज या ड्रेसवर फिदा असल्याचं दिसतंय आणि त्यामुळे डंगरीज तरुणाईमध्ये पुन्हा एकदा हॉट फेव्हरेट बनतेय.
प्रवास करायचा असो किंवा चित्रपटाच्या प्रसिद्धीचा कार्यक्रम सोनाक्षी सिन्हा, कृती सनॉनसारख्या अनेक बॉलीवूड नायिकांनी या डंगरीजला आपलंसं केलं आहे. मध्यंतरी एका कार्यक्रमात आलिया भटलासुद्धा डंगरी घालायचा मोह आवरता आला नाही. मरून रंगाच्या डंगरी स्कर्टसोबत ऑफ व्हाइट रंगाचा टी-शर्ट तिने घातला होता. त्यावर स्टायलिश स्नीकर्स घातले होते. त्यामुळे तिचा लुक स्पोर्टी तर झालाच, पण तितकाच स्मार्टही दिसतो आहे. व्हाइट नेल्स, पोनीटेल, कानात छोटे स्टड्स आणि चेहऱ्यावर गोड हसू, एक सुंदर लुक पूर्ण करायला अजून काय हवंय.. नाही का?

कसा कॅरी कराल?
डंगरीज कॅरी करण्यासाठी सर्वात सोप्पा आणि मस्त लुक आहे. डंगरीज कंफर्टेबल आहेत. डंगरी पँट असो किंवा स्कर्ट, वेगवेगळ्या साइजमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे शॉर्ट स्कर्टपासून ते नॅरो पँटच्या शौकिनांपर्यंत सर्वाना डंगरीज वापरता येऊ शकतात. त्यात बॉयफ्रेंड डेनिमप्रमाणे थोडय़ा ढगळ डंगरीजची मजा वेगळीच असते. या डंगरीजसोबत टी-शर्ट, शर्ट, क्रॉप टॉप, गंजी, स्ट्रॅपलेस टी-शर्ट घालता येऊ शकतात. डंगरीज शक्यतो प्लेन, नेव्ही, रॉयल ब्लू, कोबाल्ट ब्लू, मरून, काळा, रस्टिक ग्रीन, राखाडी अशा सॉलिड रंगांमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे यांच्यासोबत प्रिंटेड, एम्ब्रॉयडर किंवा कलरफुल टॉप छान दिसतात. अर्थात तुमच्या टॉपच्या निवडीवर आणि तुम्हाला लुक कसा हवाय त्यानुसार हील्सपासून स्नीकर्सपर्यंत सर्व फुटवेअर डंगरीसोबत घालता येतात. फक्त ज्वेलरी घालताना ब्रेसलेट, बांगडय़ा, अंगठय़ा असे हाताला फोकस करणारी ज्वेलरी किंवा इअररिंग्जची निवड करा. नेकपीसने डंगरीजच्या पट्टय़ांची मजा जाऊ शकते. वाटल्यास लांब चेन्स वापरू शकता.
मृणाल भगत – viva.loksatta@gmail.com