फेसबुक आणि यूटय़ूबसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर सध्या वेगवेगळ्या आव्हानांचं पेव फुटलंय. अमुकतमुक चॅलेंज असं म्हणून त्यावर आपल्या ओळखीच्या लोकांना टॅग करायचं म्हणजेच नॉमिनेट करायचं. मग स्वत: ते चॅलेंज स्वीकारायचं. हा वसा पुढे चालवण्याची जबाबदारी मग त्या टॅग केलेल्या व्यक्तींची. या चॅलेंजचा मूळ उद्देश चांगलाच खरा. दान करण्याचा. स्वयंसेवी संस्थांना त्यांच्या कामांसाठी मदत करण्याचा उद्देश घेऊन आणि एका आजाराविषयी जागृती करण्याच्या उद्देशानं आइस बकेट चॅलेंज सुरू झालं. जगभरातून त्याला मिळालेल्या रिस्पॉन्सनंतर त्याच धर्तीवर नवनवीन चॅलेंज यायला लागली. राइस बकेट चॅलेंज हे त्यापैकी एक. भारतातल्याच स्त्रीनं सुरू केलेलं.
सध्या मात्र बहुतांश वॉलवर एकाच गोष्टीचा बोलबाला होतोय. ते आहे – ‘द बुक बकेट चॅलेंज.’ या ट्रेण्डनुसार आपल्या आवडीच्या दहा पुस्तकांची लिस्ट देऊन आपल्या फ्रेण्ड्सना टॅग करण्यात येतं. ‘चॅलेंज’ म्हटल्यावर चटकन पुढं सरसावणाऱ्यांप्रमाणं पाच पावलं मागं सरणारेही असतात. त्या दोन्हीं प्रकारच्या व्यक्तींना हे चॅलेंज हवंहवंसं वाटणारं आहे. विशेषत: पुस्तकवेडय़ांच्या दुनियेत या ‘शब्दश: चॅलेंज’चं अगदी प्रेमानं नि अगत्यानं स्वागत होतंय. व्हिवा वॉलच्या निमित्तानं तरुणाईशी संवाद साधताना हे चॅलेंज अनेकांन आवडलेलं दिसलं.
थोडंसं गुगललं तर या ‘चॅलेंज’च्या फेसबुक पेजवर सगळी माहिती एका क्लिकसरशी सापडते. म्हटलं तर हे चॅलेंज सोप्पं आहे नि म्हटलं तर कठीणही. आपल्याला अत्यंत आवडीची नि आपल्या आयुष्यात प्रभावशाली ठरलेल्या अशा १० पुस्तकांची लिस्ट या ‘बुक बकेट चॅलेंज’मध्ये द्यायची आहे. दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे गरजूंना नि गावातल्या ग्रंथालयांना पुस्तकं डोनेट करायची आहेत. ‘अक्षरशत्रुत्व’ नाहीसं करण्यासाठी या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. या ‘चॅलेंज‘च्या नियमांनुसार ही पुस्तकांची नावं देताना जरासा विचार करा, पण अतिविचारही उपयोगाचा नाही. कारण तुम्ही सांगणार असलेली पुस्तकं ‘राइट बुक्स’च असावीत किंवा ती अभिजात साहित्यापकीच असावीत, अशी कोणतीही अपेक्षा ठेवण्यात आलेली नाही. उलट आपल्याला ज्या पुस्तकांमुळं प्रेरणा मिळाल्येय, त्यांची नावं देणं नि त्यासाठी इतरांना टॅग करणं अपेक्षित आहे. आपल्या फ्रेण्ड्सनी ही पुस्तकं वाचणं अपेक्षित आहे. तसं न झाल्यास कोणतीही पेनल्टी वगरे नाहीये. फार तर काय की, त्याला डिसलाइक करता येईल इतकंच. त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे ते पुस्तक दान करण्याची कृती नि पुस्तकदानाचं अनमोल ठरणारं महत्त्व.   
मुळात ‘द बुक बकेट चॅलेंज’ची सुरुवात झाली तीच मुळी केरळातल्या ‘वन लायब्ररी पर व्हिलेज’ या एनजीओच्या माध्यमातून. ‘When  a library is open, no matter its size or shape, democracy is open, too हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. त्यांनी अत्याधुनिक साधनांच्या साहाय्यानं गावोगावची ग्रंथालयं समृद्ध करण्याचा नि पर्यायानं तेथील युवा पिढीला ज्ञानप्रदानाचा संकल्प केलाय. लहान वयातच वाचनाची गोडी लागून खेडय़ातल्या मुलांच्याही आयुष्याला ज्ञानाची शिदोरी पुरवण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळं त्यांची कल्पनाशक्ती वाढेल, त्यांचा बौद्धिक विकास होईल नि त्यांच्या विचारांची क्षितिजं आपोआपच विस्तारतील.. इंटरनेटसारख्या सुविधांचा लाभ खेडय़ातल्या मुलांनाही मिळवून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. अधिक माहितीसाठी http://www.olpv.org  या वेबसाईटवर जायला हवं. या चॅलेंज अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये तरुणाई हिरिरीनं उतरलेय. आपली आवडती नि प्रेरणादायी ठरणारी अनेक पुस्तकं आहेत, हे सर्वमान्य झालंय. सगळीच पुस्तकं चांगली असली तरीही काही पुस्तकं आपल्याला हलवून सोडतात, अंतर्मुख करतात. काही नितळ आनंद देतात तर काही आयुष्यभराची साथी होतात. ही पुस्तकं वाचून दरवेळी काही ना काही नवं हाती गवसतं. बहुतांशी अशाच प्रकारच्या पुस्तकांची नावं देण्यात आल्येत. काही पुस्तकांची कॉमन नावं वगळली तर पुष्कळशी नावं वेगळी नि असंख्य विषयांशी निगडित आहेत. तरुणाई केवळ इंग्रजी वाचतेय, या समजाला छेद देत इंग्रजी-मराठी दोन्ही प्रकारची पुस्तकं वाचली जाताहेत, हे या यादीमुळं कळतं. काही वेळा इंग्रजी पुस्तकं ही स्टेटस सिम्बॉल म्हणून नि मराठी पुस्तकं ही आवड म्हणून वाचली जातात. तरीही स्टेटस इश्यू न करता यादीत मराठी पुस्तकांची नावं दिली जाणं, ही चांगली गोष्ट घडलेय. काहींना बऱ्याच जणांनी टॅग केल्यानं त्यांना प्रत्येक टॅगसाठी वेगळी लिस्ट देण्यात आगळाच आनंद वाटतोय. कुणी आपल्या पणजोबांचा ठेवा असणाऱ्या पुस्तकांचे किंवा बुकशेल्फचे फोटो थेट अपलोड केलेत. कुणा चित्रकार मत्रिणीनं वाचनाच्याच अनुषंगानं रेखाटन केलंय. बुकलिस्ट दिली तरीही अजून कित्ती तरी पुस्तकं वाचायची बाकी आहेत, हेही तितक्याच मोकळेपणानं पोस्ट केलं जातंय. कारण ‘Good friends, good books, and a sleepy conscience: this is the ideal life’,  असं मार्क ट्वेननी म्हटलंय.