18 October 2019

News Flash

नव्या वाचनवाटा..

कॅफेचे अनेक प्रकार सध्या पुढे येत आहेत.

|| मितेश जोशी

कॅफेचे अनेक प्रकार सध्या पुढे येत आहेत. बुक कॅ फे हा त्यातलाच एक प्रकार. सध्या वेगवेगळ्या पद्धतींचे हे बुक कॅफे तरुणाईत भलतेच लोकप्रिय होत आहेत. एखाद्या छानशा जागी आवडीचे पुस्तक वाचण्याचा आणि मधूनच पोटोबालाही सुखावण्याचा आनंद देणाऱ्या या बुक कॅफेविषयी जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून अनेक बुक कॅफेखुले झाले आहेत ज्याचे कर्तेकरविते तरुण आहेत. या बुक कॅ फेच्या माध्यमातून तरुण मुलं पुन्हा एकदा पुस्तकांच्या जगात रमताना दिसत आहेत. पुण्यात सर्वात पहिला बुक कॅ फेखुला झाला तो म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोडवरचा – ‘पगदंडी’. पगदंडी हा हिंदी शब्द आहे ज्याचा मराठीत अर्थ होतो पायवाट. अशीही पुस्तकांची पायवाट पुण्यात सर्वप्रथम निर्माण केली ती विशाल आणि नेहा या तरुणांनी. जगभर भटकलेल्या नेहा आणि विशाल यांनी या कॅ फेची २०१३ मध्ये स्थापना केली. रोजच्या धावपळीच्या जीवनात क्षणभर विश्रांती मिळावी आणि पुस्तकवाचनाची गोडी निर्माण व्हावी या हेतूने या कॅ फेची स्थापना झाली. विशाल सांगतो, यापूर्वी मी आयटी मॅनेजर, तर नेहा टीव्ही प्रोडय़ुसर म्हणून काम करत होतो. पुस्तकवाचनाची गोडी आज लोकांमध्ये नाही. तुम्ही सुरू करत असलेला हा पुस्तकांचा कॅफे कुठे चालणार आहे, असे टोमणे आम्हाला मिळत असतानाच आम्ही नेटाने पुढे येऊ न हा कॅफे सुरू केला. कोणताही स्टार्टअप करताना तुम्हाला आव्हानांचा सामना करावाच लागतो. तोच सामना करत आम्ही पुढे आलो. मी लहानपणी शाळेत असताना माझ्या सोसायटीतील मित्रांसाठी ग्रंथालय चालवायचो. तेव्हाचा कमावलेला अनुभव मी इथे वापरतोय.

अनेक र्वष एकाच क्षेत्रात मेहनत घेऊ न जेव्हा आपल्याला दुसरं क्षेत्र खुणावू लागतं तेव्हा विचारपूर्वक उडी घ्यावी लागते. ती उडी घेताना जर आपल्यासोबत आपला परिवार पाठीशी खंबीरपणे उभा असेल तर ती सहज घेतली जाते. अशीच उडी पुण्यातील निवेदिता अत्रे या तरुणीने घेतली. निवेदिताने तीन र्वष मुंबईत वकिलीचा सराव केला. तिला खाण्यापिण्याची प्रचंड आवड होती. वेगवेगळ्या गल्लीबोळांत जाऊन खाऊचे ठेले शोधायला व तिथे खाबुगिरी करायला तिला फार आवडत. अशाच वेळी तिच्या मनात ‘बुक आर्ट कॅ फे’ची संकल्पना आली. असं एखादं कॅ फेजिथे कलाकार आपली कला दाखवू शकेल. चित्रकार आपल्या चित्रांचं प्रदर्शन भरवतील, गायक आपली मैफल भरवेल, पुस्तकी किडा मनुष्य शांतपणे पुस्तक वाचेल आणि या सर्वाच्या जोडीला असेल खाद्यपदार्थाची रेलचेल. याच तिच्या स्वप्नांतून ‘कॅ फेकथा’ आकाराला आला. पुण्यात एफ. सी. रोडवर असलेल्या या कॅ फेत अनेक तरुण मोठी गर्दी करतात. वकिलीचं क्षेत्र सोडून या क्षेत्रात जेव्हा मी उडी घेतली तेव्हा घरच्यांच्या पाठिंब्यामुळेच खरं तर मी हे स्वप्न सत्यात उतरवू शकले. नुकताच कॅ फेला सहा महिने पूर्ण झाले आहेत. मी स्वत: पुस्तकी किडा आहे. कॅ फेमध्ये एकूण १५०० पुस्तकं आहेत. त्यातील माझे स्वत:चे कलेक्शन असलेली ७५० पुस्तकं आहेत. आमच्याकडे अनेक तरुण मुलं वेगवेगळ्या पुस्तकांची मागणी करतात. जर ती पुस्तकं आमच्या कॅ फेमध्ये नसतील तर आमच्याकडे किंडलची सोय आहे. त्यांना अपेक्षित पुस्तकं आम्ही किंडलवर लगेच मिळवून देतो. त्यामुळे आमच्याकडे आलेला वाचक हा पुस्तक नाही म्हणून परत गेला असं कधीच होत नाही. वाचनसंस्कृती खोलवर रुजावी या हेतूने त्या संस्कृतीच्या आड येणारी सर्व कारणे आम्ही मुळापासून उपटून टाकली आहेत, असं निवेदिता सांगते.

‘कॅ फेकथा’मध्ये वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात ज्यामधून व्यक्तिमत्त्व विकास हा जास्तीत जास्त साधला जातो. चित्रकार त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन, फोटोग्राफर त्यांच्या फोटोग्राफीचे प्रदर्शन या कॅ फेमध्ये भरवतात. तशी सोय निवेदिताने कॅ फेमध्ये केली आहे. निवेदिता सांगते, मुलं वाचत नाहीत या तक्रारी पालक चटकन करतात; पण ती का वाचत नाहीत? यामागचं शास्त्रीय कारण कोणीच शोधून काढायला मागत नाही. त्याला कथा वाचायला आवडत नाही तर त्याला ऐतिहासिक पुस्तक तरी वाचायला आवडतं का किंवा अन्य काय आवडतं? याची शहानिशा पालकांनी करायलाच हवी. अनेक मुलांना कॉफीचा एक एक घोट घेत पुस्तकवाचनाची सवय असते; पण कॉलेज लायब्ररीमध्ये खानपान वज्र्य असल्यामुळे ते कॉलेज लायब्ररीमध्ये जायला टाळाटाळ करतात आणि अशा बुक कॅ फेमध्ये गर्दी करतात.

पुण्यातीलच बाणेर भागातील ‘द मंचिग रूट बुक बार कॅ फे’हा पुण्यातील सर्वात पहिला बुक बार कॅ फेआहे. या कॅ फेची स्थापना सखी व सई या दोन सख्ख्या बहिणींनी एकत्र येऊन केली आहे. सखीने हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. तिच्या घरी सर्व पुस्तकप्रिय आहेत. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण झाल्यावर आता पुढे काय? असा प्रश्न जेव्हा तिच्यासमोर पडला होता तेव्हा तिला स्वत:च्या कॅ फेची स्वप्नं पडू लागली; पण त्या कॅ फेत तुझी आवडनिवड असलेले पदार्थ तर असावेच, पण आमच्या पुस्तकांनासुद्धा मानाचं स्थान असावं, असा आग्रह तिच्या घरच्यांनी धरला. तेव्हा दोन्हीचा केंद्रबिंदू साधत फुड आणि बुक ही जोडगोळी तयार करून ‘द मंचिग रूट बुक कॅ फे’ची सुरुवात दोन वर्षांपूर्वी झाली. ‘‘माझ्या आजूबाजूला शाळा, कॉलेज, आयटी सेक्टरची गर्दी असल्यामुळे अनेक तरुण मुलं कॅ फेमध्ये हजेरी लावतात. यातली बरीच मुलं त्यांच्या ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या जागेवर येऊ न बसून पुस्तकंसुद्धा वाचतात,’’ असं सखी आग्रहाने नमूद करते. २००० पुस्तकांचं भांडार आपल्याला या कॅ फेमध्ये पाहायला मिळतं. सोबतच १००० पुस्तकं जागा नसल्यामुळे बाजूला पडली आहेत आणि कपाटाची आशा धरून आहेत. शाळाशाळांमध्ये पुस्तकवाचनासाठीचे उपक्रम, कथाकथन, काव्यकथन असे उपक्रमही इथे होतात. सखी मुळातच फुडी असल्यामुळे चायनीज, इंडियन, महाराष्ट्रीय, इटालियन, मेक्सिकन अशा वेगवेगळ्या कुझिनच्या खाद्यपदार्थाची रेलचेल तिच्या कॅ फेमध्ये अनुभवायला मिळते.

मुंबईमध्ये फोर्ट भागात असाच एक बुक कॅ फेप्रसिद्ध आहे ज्याचं नाव आहे ‘किताबखाना’. कॅ फेच्या नावाला साजेशी अशी ५००० पुस्तकं या कॅ फेमध्ये आहेत. केवळ पुस्तकंच नव्हे तर वेगवेगळ्या चवीच्या फ्युजन डिशसुद्धा या कॅ फेमध्ये चाखायला मिळतात. या कॅ फेमधील पेस्ट्री व सँडविच विशेष प्रसिद्ध आहेत. १५० र्वष जुन्या इमारतीत हा कॅ फेअसल्याने त्याला एक वेगळाच ऐतिहासिक टच आहे.

प्रदीप, एजात आणि देवीदास या तिघांनी एकत्र येऊ न पुण्यात फग्र्युसन महाविद्यालयाच्या समोर ‘कॅ फेवर्ड अँड सिप’ची सुरुवात केली. तत्पूर्वी ते पुण्यातील सदाशिव पेठेत ‘रीडर्स क्लब’ नावाची अभ्यासिका चालवत होते. या अभ्यासिकेला ‘रीडर्स क्लब’ हे नाव असल्याने इथे पुस्तकं वाचायला आहेत का? अशी विचारणा त्यांच्याजवळ होत होती; पण तिथे काही पुस्तकं वाचायला नव्हती. पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती अभ्यासिका खानपानासहित खुली करण्यात आली होती. पुस्तकप्रेमापोटी आपण ग्रंथालय सुरू करू या, असं तिघांनाही मनोमन वाटायला लागलं. आपण असं एक ग्रंथालय सुरू करू या जिथे वाचकांची खानपानाचीसुद्धा व्यवस्था होईल व मुलं अभ्यासही करू शकतील, असं प्रदीपच्या मनात आलं. त्यांनी ग्रंथालय अभ्यासिकेचं रूपांतर पूर्णपणे कॅ फेत केलं आणि ‘कॅ फेवर्ड अँड सिप’ वर्षभरापूर्वी सुरुवात झाली. फग्र्युसन महाविद्यालयाच्या अगदी समोरच हा कॅ फेअसल्याने अनेक मुलं प्रोजेक्ट करायला, रिसर्च करायला कॅ फेमध्ये येतात, असं प्रदीप सांगतो. कॅ फेमध्ये  जवळजवळ ४००० पुस्तकं आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांतील वेगवेगळी पुस्तकं इथे उपलब्ध आहेत. ‘‘कॅ फेत तरुण मुलांचीच गर्दी जास्त असते. त्यामुळे मला असं अजिबात वाटत नाही की, तरुण मुलांमध्ये वाचनाची गोडी कमी झाली आहे. उलट नव्याने उदयाला आलेले लेखक व त्यांची पुस्तकं जर कॅ फेत नसतील तर ती पुस्तकं ठेवायला मुलं भाग पाडतात. कित्येक कॉमन पुस्तकं आमची वेटिंगवरसुद्धा आहेत, असं प्रदीप सांगतो.

मुंबईमध्ये वर्सोव्यातील ‘लिपिंग विंडोज’ या बुक कॅ फेची स्थापना उत्सा शोन या तरुणीने केली. जगभर फिरण्याची व फोटोग्राफीची आवड असलेल्या उत्साला वाचनाचीदेखील विशेष आवड आहे. मनुष्य एक वेळ वाचणार नाही, पण खायला विसरणार नाही. खाणं आणि वाचन या दोघांचाही समबिंदू साधता यावा या हेतूने उत्साने वर्सोव्यात या कॅ फेची सुरुवात केली. कॅ फेपासून काहीच अंतरावर अनेक मालिकांचं चित्रीकरण होत असल्याने या कॅ फेमध्ये अनेक कलाकार चित्रीकरणाच्या मधल्या वेळेत रिलॅक्स होण्यासाठी व पुस्तकवाचनासाठी हजेरी लावतात.

अशा प्रकारे बुक कॅ फे ही संकल्पना तरुणाईमध्ये मोठय़ा प्रमाणात गाजते आहे. वर नमूद केलेल्या कॅ फेबरोबरच पुण्यातील वारी कॅ फे, बोका बुक कॅ फेहे कॅ फेसुद्धा वाचनसंस्कृती रुजवण्यात खारीचा वाटा उचलत आहेत. अनेक कॅ फेमध्ये मोठय़ा प्रमाणात नाहीत; पण तरुणाईत प्रसिद्ध असलेली त्यांच्या आवडत्या लेखकांची पुस्तकं ठेवलेली दिसतात. वाचनाची ही नवी वळणवाट पुण्या-मुंबईपलीकडे सगळ्या राज्यभर हळूहळू मूळ धरते आहे हेही तितकेच खरे!

First Published on April 26, 2019 1:26 am

Web Title: book cafe