नील डोनाल्ड वॉल्श यांनी लिहिलेल्या ‘कन्व्हर्सेशन विथ गॉडस्’ या पुस्तकाच्या पहिल्या भागाबद्दल यापूर्वी परिचयपर लेख लिहिला होता. मात्र, त्या वेळी या पुस्तकाचे मूळ इंग्रजीत असलेले आणि अजूनही मराठीत अनुवादित न झालेले आणखी दोन भाग वाचनात यायचे होते. पहिल्या पुस्तकांत ईश्वराशी जुळलेला संवाद जितका खुलला आहे त्यापेक्षाही कांकणभर सरस पद्धतीने दुसरा संवाद रंगला आहे.
‘‘मला एखादी गोष्ट करायची आहे, पण मला त्यासाठी निवांतता-शांतपणा मिळत नाही. अगदी जी गोष्ट मला मनापासून करावीशी वाटते, नेमक्या त्याच गोष्टीसाठी मला वेळ मिळत नाही, अस्से का होते?’’ देवाला लेखकाने विचारलेला आपल्या सर्वाच्याच मनांतला हा पहिला प्रश्न! या प्रश्नापासून पुस्तक वाचकाच्या मनाची जी पकड घेते, ती पकड शेवटपर्यंत मनाचा ताबा सोडत नाही. या प्रश्नाचे देवाचे उत्तरही तितकेच सदाबहार आहे. ‘‘कारण, तूच स्वत:चे प्राधान्यक्रम बदलतोस’’ ..आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीसाठी आपल्याला वेळ नाही याचे खरे कारण या एका उत्तरात आहे. नीट विचार केला, तर हे उत्तर मनाला पटते.
देवाला प्रश्न विचारायची संधी मिळाली तर आपण कोणकोणते प्रश्न विचारू, या प्रश्नाचे उत्तर आपल्या मनांत तयार नसेल कदाचित, पण लेखकाने मात्र परमेश्वराची प्रत्येक प्रश्नाद्वारे सत्त्वपरीक्षा पाहिली आहे. ‘देवाच्या इच्छेशिवाय जर झाडाचे पानही हलत नाही, असे आपण म्हणतो, तर हिटलरसारखा नरसंहारक निर्माणच का होतो,’ असा प्रश्न कुतूहलापोटी लेखक विचारतो. या प्रश्नाचे उत्तर हा या पुस्तकाचा आत्मा आहे. ‘प्रत्येक मनुष्याने आपल्या विवेकाचा वापर करावा, त्याने स्वतंत्रबुद्धीने वागावे, अशी माझी इच्छा असते. त्यामुळे जगातल्या प्रत्येक माणसाची इच्छा हा त्याचा स्वातंत्र्याचा वापर असल्याने ती माझीच इच्छा ठरते. म्हणून माझ्या इच्छेशिवाय झाडाचे पानही हलत नाही, हे सत्य ठरते.’ हे देवाचे उत्तर!
पण मग याचा अर्थ देवाची प्रत्येक इच्छा हीच आपलीही इच्छा असा होत नाही का, असा प्रश्न लेखक विचारतो. याचे उत्तरही अप्रतिम आहे, पण ते अशा लेखातून – पुस्तक परिचयातून वाचण्यापेक्षा मुळातूनच वाचावे असे आहे. या पुस्तकात लेखकाने अशाच दोन अस्पर्शित विषयांना स्पर्श केला आहे. एक म्हणजे राजकारण आणि दुसरा म्हणजे वासना. या दोन्ही बाबींमागील मानवी मनाचे व्यवहार, त्या विषयांची व्याप्ती आणि अत्यंत स्वच्छपणे मिळणारी उत्तरे या गोष्टी खरोखरीच भावणाऱ्या ठरतात.
अंतर्विरोध ही एक अशी बाब आहे, जी विवेकबुद्धीमुळे जाणवते आणि प्रांजळ श्रद्धेस तडा देते. वॉल्श यांनी या प्रश्नाचाही ऊहापोह केला आहे. अंतर्विरोधाची निर्मिती आणि श्रद्धेची घसरण यांच्यातील समीकरण या पुस्तकात उलगडते. चांगल्या मार्गावर राहण्यासाठी – सन्मार्गाने जगण्यासाठी नेमके काय करतो आपण, असा एक प्रश्न देवच आपल्याला अप्रत्यक्षपणे विचारतो. अजाणतेपणी लेखक म्हणतो की आम्ही देवाचा प्रकोप होईल, बाप्पा रागावेल असा धाक दाखवतो. या उत्तरानंतर मिळणारी देवाची प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे. या एकाच मुद्दय़ावर खरे तर एक अखंड पुस्तक होऊ शकेल. पण, लेखकाने सर्व कौशल्य पणाला लावत अवघ्या काही पानांमध्ये साध्य-साधने आणि नैतिकता या साऱ्या बाबींवर भाष्य केले आहे आणि तेसुद्धा कोणतीही गुंतागुंतीची- क्लिष्ट भाषा न वापरता!
या पुस्तक मालिकेतील पहिल्या पुस्तकाचे प्रयोजन, आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे असे होते. दुसऱ्या पुस्तकाचे प्रयोजन थोडे वेगळे आहे. आपल्यातील काही क्षमता आपण सातत्याने नाकारतो किंवा सत्य असलेल्या बाबीही स्वीकारणे टाळतो. मात्र यामुळे आपण आपल्या खऱ्याखुऱ्या स्वत्वापासून दूर जातो. आपले हे दुरावलेपण नष्ट व्हावे आणि आपले स्वत्व आपल्याला गवसावे म्हणून हे पुस्तक लिहिले गेले आहे, असे लेखक मलपृष्ठावर नमूद करतात आणि पुस्तक वाचल्यानंतर ते पटतेसुद्धा! एक अत्यंत सुंदर- आवश्यक आणि उपयुक्त असा हा सदाबहार संवाद..

पुस्तक – कन्व्हर्सेशन विथ गॉड
लेखक – नील डोनाल्ड वॉल्श
पृष्ठे – २६३
मूल्य – ३५०/-
प्रकाशक – हॉडर अ‍ॅण्ड स्टॉटन